
आपल्याकडे सकाळच्या नाश्त्यात पोह्यांना विशेष स्थान आहे. पोहे हा पदार्थच असा आहे, त्याच्या तयार करण्याच्या पद्धतीवर त्याची चव अवलंबून असते. महाराष्ट्रात पुण्या-मुंबईबरोबरच खान्देश, मराठवाडा या भागात पोहे तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. पुण्यात पोहे खाताना त्यामध्ये संतुलित स्वाद जाणवतो. ते कुठेही तेलकट नसतात आणि तिखटही नसतात, त्यांच्या साधेपणात श्रीमंती दिसते. कोकणात नारळाला असलेलं सर्वव्यापी महत्त्व पोह्यांतही दिसून येते. खोबऱ्यामुळे तिकडच्या पोह्यांना एक वेगळी गोडसर चव असते. नागपूर आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पोह्यांसोबत तिखट, मसालेदार रस्सा म्हणजेच लाल हरभऱ्याची तर्री दिली जाते. काही ठिकाणी याला चना पोहे असेही संबोधले जाते. पोह्यांवर किंवा त्याच्या बाजूला गरमागरम तर्री (किंवा अलीकडच्या काही ठिकाणच्या फॅशननुसार सांबार) ओतल्यावर पोह्यांचे रूपच बदलते. खानदेशातील पोहे हे तिथल्या स्थानिक मसाल्यांमुळे अधिक चवदार होतात.
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आसपासच्या भागांत पोह्यांची घरगुती परंपरा मोठ्या प्रमाणात आढळते. इथे कांदे-पोह्यांबरोबर बटाटा पोहे प्रकार देखील लोकप्रिय आहे. मध्य प्रदेशातल्या इंदौर, उज्जैन, गुजरातमधल्या बडोदरा, सुरत इथे मिळणाऱ्या पोह्यांची चवही पुन्हा वेगळी असते. पुण्यातली खास गंमत म्हणजे वर उल्लेखलेल्या बहुतेक सगळ्या चवी पुण्यात चाखायला मिळतात. कारण गेल्या काही वर्षांपासून पुण्याचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. खासकरून शिक्षण आणि नोकरीसाठी इथे येणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडत असताना पुणेकरांना नवीन चवीचे पदार्थ देण्याऱ्या ठिकाणांची संख्या देखील वाढत आहेत. अशीच एक लोकप्रिय जागा म्हणजे अस्सल मराठवाड्याच्या चवीचे काटकर पोहे.
एमपीएससी करायला आला, पण…
काही वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयार करण्यासाठी बीडमधल्या केजजवळच्या यवता गावातील युवक सुशील काटकर पुण्यात आला. भरपूर अभ्यास करून त्याने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली, मात्र आठ वेळा प्रयत्न करून देखील अपेक्षित यश मिळाले नाही. करिअर घडवण्याचा प्लॅन बी म्हणून त्याने काटकर पोहे या नावाने हा जॉईंट सुरू केला. ही जागा गेल्या आठ वर्षांत चांगलीच नावारूपाला आली आहे. सुशीलने मराठवाड्यातील पोह्यांची चव पुणेकरांच्या जिभेवर उतरवण्यात यश मिळवले आहे. 
सुशीलने राज्यशास्त्र विषय घेऊन संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर सेट नेट करून प्राध्यापक होण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, घर शेतीवरच अवलंबून, त्यात वडिलांवर १२ ते १३ लाख रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक होण्याचे त्याने पक्के केले. परीक्षेच्या तयारीसाठी त्याने थेट पुणे गाठले. सदाशिव पेठेत कॉट बेसिसवर राहून त्याने तयारी सुरू केली. सुशीलचे वडील त्याला दर महिन्याला पाच हजार रुपये खर्चासाठी पाठवत असत. आठ वेळा त्याने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. मात्र, इंग्रजी भाषा चांगली नसल्याने त्याला अपयश आलं.
२०१७ साली सुशील गावाला गेला होता. तेव्हा त्याचे वडील आजारी पडले होते. त्यांना घेऊन तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी वडिलांची रक्त तपासणी करून घेण्यास सांगितले. तेव्हा सुशीलकडे दवाखान्याचा खर्च करण्यासाठी लागणारे अडीचशे रुपयेही नव्हते. चार पेनकिलरच्या गोळ्या घेऊन तो वडिलांना सोबत घेऊन घरी आला. हा प्रसंग त्याच्या मनावर खोलवर कोरला गेला. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी काहीतरी करायलाच हवे, असा निर्णय त्याने घेतला. याच क्षणी त्याच्या आयुष्यात ‘प्लॅन बी’चा जन्म झाला.
असा सुचला व्यवसाय
मराठवाड्याच्या खाद्यपरंपरेत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे पोहे प्रसिद्ध आहेत. दरवर्षी ७ जून हा ‘विश्व पोहा दिवस’ म्हणून इथे साजरा करण्यात येतो. प्रवासात इथे येणारे लोक इथले पोहे खातात आणि तोंडभरून त्याचे कौतुक करतात. आपण या अस्सल चवीचे पोहे देणारा व्यवसाय पुण्यात सुरू केला तर खवय्यांची राजधानी असलेल्या पुण्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सुशीलमध्ये निर्माण झाला होता. श्रीकांत काटकर या भावाला त्याने पोहे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवले आणि १८ सप्टेंबर २०१८मध्ये सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळ पोह्याचा व्यवसाय सुरू केला.
पोह्यांची टेस्ट भारीच
काटकर पोह्यांची टेस्ट भारीच आहे. या पोह्यांत हळदीचे प्रमाण खूपच कमी असते. त्यांत बारीक मोहरी, ओवा, तेल, कांदा, कडीपत्ता, कोथिंबीर, असते. पोह्यावर दही आणि सलाड असते, त्यामुळे हे पोहे फारच चविष्ट लागतात. काटकरांकडे मिळणाऱ्या पोह्यांमध्ये दही पोहे, मटकी पोहे आणि मसाला पोहे हे प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. मसाला पोह्यांसाठी सुशील यांचा सिक्रेट मसाला वापरला जातो. मसाल्याच्या जिन्नसांच्या संतुलित प्रमाणामुळे हा मसाला पोह्यांशिवाय, नुसता खाताना देखील खूपच चविष्ट लागतो. पोह्यांत ओवा असल्यानं ते खाल्यानंतर पित्ताचा त्रास होत नाही.

दोनच पदार्थांचा खेळ
काटकरांकडे यांच्याकडे पोहे आणि त्याच्या जोडीला साबुदाण्याची खिचडी असे दोनच पदार्थ मिळतात. सुशील म्हणाले, सुरुवातीला मी निलंगा राईस देखील विकत असे. मात्र, एकावेळी दोन पदार्थ विकत असल्याने पोह्याच्या चवीवर त्याचा परिणाम होऊ लागला. त्यामुळे एकच पदार्थ विकायचं ठरवून निलंगा राइस तयार करणं बंद करून टाकलं. ग्राहकांच्या मागणीमुळे तीन वर्षांपासून साबुदाण्याची खिचडी सुरू केली आहे.
लाजायचं कशाला?
सुशील सांगतात, एकेकाळी पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत असताना शर्ट इन करून मी फिरत असे. मात्र, व्यवसायात उतरण्याचे ठरवले तेव्हा लाज बाजूला ठेवून दिली. सुरुवातीला भाऊ पोहे तयार करायचा आणि मी बाकी कामे करायचो. मात्र, आता व्यवसाय हेच आपले करिअर आहे, हे मनाशी पक्के केले आहे. उत्तम प्रकारे व्यवसाय करण्यातच तन-मन-धन ओतण्याचं ठरवलं आहे, त्यानुसारच वाटचाल सुरू आहे. पोहे विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यावर काही जण म्हणाले, तू तर एमपीएससी करत होतास, आता काय पोहे विकतो? त्याउलट, काहींनी पुढे येऊन व्यवसायाला पाठिंबा दिला. या व्यवसायाने मला घडवले, पुण्यासारख्या शहरात मला त्यामुळे घर घेता आले, ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे. पुण्यात एमपीएसस्सी करणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. ही मुले कशी शिक्षण घेत असतात याची कल्पना मला आहे, त्यामुळे त्यांना आपण कायम सहकार्य करतो, हे सुशील आवर्जून सांगतात.
आयुष्यात आपण ज्या स्वप्नामागे धावत असतो, ते प्रत्येक वेळी आपल्याला हवे त्या ठिकाणी घेऊन जाईलच असे नाही. पण त्या प्रवासात एखादा टर्निंग पाईंट आपल्याला आपल्या खऱ्या वाटेची ओळख करून देतो. काटकर पोहे हे त्याचेच उदाहरण आहे. स्वप्न कधी कधी पूर्ण होत नाही; ते रूप बदलते. आणि त्या बदललेल्या रूपातही यशाची एक नवी चव दडलेली असते.
