• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

धौलपूरमध्ये उभी राहिली डिजिटल ‘संविधान घरे’

प्रशांत सिनकर (विशेष लेख )

Marmik Team by Marmik Team
November 28, 2026
in इतर, विशेष लेख
0
धौलपूरमध्ये उभी राहिली डिजिटल ‘संविधान घरे’

एखाद्या गावात रस्ता नसला तर विकासाची वाट अडते, पाणी नसेल तर जीवन कठीण होते आणि शिक्षणाची सोय नसेल तर अनेक स्वप्नांना सुरुवातीलाच विराम मिळतो. मात्र ज्या गावात ज्ञानाचा दिवा पेटतो, त्या गावातील मुलांच्या डोळ्यांत भविष्याची नवी स्वप्ने दिसू लागतात. पुस्तकांच्या सहवासातून विचारांना दिशा मिळते, तंत्रज्ञानाच्या मदतीने जग जवळ येते आणि संविधानाच्या माहितीमुळे आपल्या हक्कांची जाणीव होते. गावागावांत अशी ज्ञानाची केंद्रे उभी राहिली, तर ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य नक्कीच बदलू शकते. राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात सुरू झालेला ५० डिजिटल ‘संविधान घरांचा’ उपक्रम याच विचारातून ग्रामीण युवकांसाठी आशेचा नवा मार्ग तयार करत आहे.

आज भारत डिजिटल युगात वेगाने पुढे जात आहे. शिक्षणापासून नोकरीपर्यंत आणि सरकारी योजनांपासून दैनंदिन व्यवहारांपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शहरातील विद्यार्थ्यांना संगणक, इंटरनेट, ग्रंथालये आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सहज मिळते. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या सुविधांसाठी शहरात जावे लागते. आर्थिक अडचणी, प्रवासाचा खर्च आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातच चांगल्या शिक्षण सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात इंडिया इन्फ्राक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (घ्घ्इण्थ्) यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (ण्एR) सहकार्याने ५० डिजिटल संविधान घरे विकसित करण्यात आली आहेत. धौलपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निवृत्ती सोमनाथ आव्हाड (IAS) यांच्या संकल्पनेतून या कामाला दिशा मिळाली. जिल्हा परिषद, पंचायत राज विभाग, ग्रामपंचायती, स्थानिक नागरिक आणि IIFCL यांच्या सहकार्याने तसेच छत्रपती संभाजीनगर येथील इको नीड्स फाउंडेशनने संस्थापक आणि प्रकल्पप्रमुख डॉ. प्रियानंद आगळे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी केली आहे.
या लायब्ररीमध्ये संगणक, इंटरनेट, स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही, फर्निचर, पुस्तके, प्रिंटर, इन्वर्टर, टॉयलेट, वॉटर कुलर, स्पर्धा परीक्षांचे साहित्य आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे गावातील जुन्या किंवा वापरात नसलेल्या सार्वजनिक इमारतींची दुरुस्ती करून त्यांचा या कामासाठी उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध जागांचा शिक्षणासाठी चांगला वापर झाला आहे.

या संविधान घरांचा सर्वांत मोठा फायदा ग्रामीण विद्यार्थ्यांना होऊ शकतो. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असते. काहींना संगणक शिकायचा असतो, तर काहींना चांगल्या नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये मिळवायची असतात. संविधान घरांमुळे विद्यार्थ्यांना गावातच बसून अभ्यास करता येईल. एकत्र अभ्यास करणारे गट तयार होतील. करिअरविषयक मार्गदर्शन मिळेल आणि इंटरनेटच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती घेता येईल. घर आणि शाळा किंवा महाविद्यालय यापलीकडे अभ्यास, चर्चा आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळणारी जागा म्हणजे अभ्यास, संवाद आणि ज्ञानाचे सामूहिक केंद्र. या केंद्रांमधून ग्रामीण युवकांना अशीच जागा उपलब्ध होत आहे. विशेषतः ग्रामीण मुलींना गावातच सुरक्षित आणि अभ्यासाला पोषक जागा मिळणे ही महत्त्वाची बाब आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर अनेक क्षेत्रांत वाढत आहे. शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योग आणि नोकरीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही या नव्या तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. केवळ संगणक वापरता येणे म्हणजे डिजिटल शिक्षण नव्हे. इंटरनेटवर योग्य माहिती कशी शोधावी, खोटी माहिती कशी ओळखावी, ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि एआयचा उपयोग अभ्यासासाठी कसा करावा, हेही विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे.
या केंद्रांना ‘संविधान घर’ असे नाव देण्यामागेही महत्त्वाचा विचार आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार देते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानाची प्रमुख मूल्ये आहेत. मात्र सामान्य नागरिकांना आजही आपल्या अधिकारांची आणि कर्तव्यांची पुरेशी माहिती नसते. आपल्याला कोणते अधिकार आहेत, शासनाकडून कोणत्या सुविधा मिळू शकतात, ग्रामपंचायतीची कामे कोणती आहेत आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, याची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. संविधान घरांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची माहिती, स्त्री-पुरुष समानता, बालहक्क आणि सामाजिक विषयांवर चर्चा आयोजित करता येतील. यामुळे लहान वयापासूनच मुलांमध्ये संविधानाविषयी आदर आणि नागरिक म्हणून जबाबदारीची भावना निर्माण होऊ शकते.

गावाच्या विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्त्वाची आहे. गावातील रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि इतर विकासकामांबाबत ग्रामसभेत चर्चा होऊ शकते. मात्र अनेकदा नागरिकांना ग्रामसभेचे महत्त्व माहीत नसते किंवा आपल्या समस्या कशा मांडाव्यात याची माहिती नसते. संविधान घरांमध्ये गावातील युवक आणि नागरिक एकत्र येऊन अशा विषयांवर चर्चा करू शकतात. गावातील समस्या समजून घेऊन त्यावर उपाय सुचवू शकतात. सरकारी योजनांची माहिती घेऊन गरजू लोकांपर्यंत ती पोहोचवू शकतात. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा ग्रामसभेतील सहभाग वाढला, तर गावाच्या विकासकामांमध्ये सर्वांचा आवाज ऐकला जाईल.

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घरापासून दूर असलेले महाविद्यालय, प्रवासाची सोय, आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षिततेचे प्रश्न यामुळे काही मुलींचे शिक्षण थांबते. गावातच चांगली अभ्यासिका, इंटरनेट आणि पुस्तके उपलब्ध झाली, तर मुलींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर महिलांसाठी डिजिटल साक्षरता, सरकारी योजनांची माहिती, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही या केंद्रांमध्ये देता येईल.

शिक्षण आणि नोकरीच्या शोधात ग्रामीण भागातील अनेक युवक शहरांकडे जातात. शहरात राहण्याचा खर्च, प्रवास आणि नोकरी मिळविण्यासाठीची स्पर्धा यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. गावातच डिजिटल शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन मिळाले, तर युवकांना नवीन संधी शोधता येतील. शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, स्वयंरोजगार आणि ऑनलाइन कामांची माहितीही त्यांना मिळू शकते. अर्थात केवळ संविधान घरे उभारल्याने गावातील स्थलांतर थांबणार नाही. त्यासाठी रोजगाराच्या संधी आणि स्थानिक उद्योगही वाढले पाहिजेत. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि प्रशिक्षण मिळविण्यास ही केंद्रे नक्कीच मदत करू शकतात.
मात्र केंद्रे उभारल्यानंतर त्यांची नियमित देखभाल होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संगणक सुरू राहिले पाहिजेत, इंटरनेटची सुविधा मिळाली पाहिजे, पुस्तके अद्ययावत असली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे लोक उपलब्ध असले पाहिजेत. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी या केंद्रांची जबाबदारी घेतली, तर ती दीर्घकाळ सुरू राहू शकतील.

महाराष्ट्रातील गावांमध्येही अशा प्रकारची केंद्रे सुरू करण्याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि कंपन्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.

Previous Post

जपानवर संकटांच्या त्सुनामी

Next Post

थला फॉर अ रीझन!

Next Post
थला फॉर अ रीझन!

थला फॉर अ रीझन!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.