
या महिन्यात जपानभर दुकानांसमोर रांगाच रांगा लागलेल्या होत्या. जपानमध्ये तांदळाची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे, भाव दुप्पट झालेले आहेत. जपानी माणूस तांदळाशिवाय राहू शकत नाही. या रांगा त्यासाठी लागलेल्या होत्या. जपान सध्या एकामागोमाग एक अशा संकटांच्या त्सुनामीतून जात आहे. त्यांतून मार्ग कसा काढायचा हे राज्यकर्त्यांना समजत नाही. या महिन्याच्या मध्यावर सरकारनेच काढलेल्या आर्थिक अर्थव्यवस्थेचा डाटा राज्यकर्त्यांना चकित करून गेला आहे. जपानी अर्थव्यवस्था चक्क ०.१ टक्क्याने आकुंचली आहे.
मध्यंतरी त्सुनामीचा एक खोटा अलर्ट जपानच्या हवामान खात्याने जाहीर केला होता. मंत्रिमंडळाने सावधगिरी म्हणून जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला. त्याचा चुकीचा अर्थ जपानी जनतेने घेतला. जपानी जनतेने पॅनिक बाईंग चालू केले. बघता-बघता दुकानांतील सामानसुमान दिसेनासे होऊ लागले. कृत्रिम टंचाई निर्माण झाली. साठेबाजीमुळे आवश्यक वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देता देता महिला पंतप्रधान सानी तकायची यांच्या नाकी नऊ आले.
यावर अजून तरी ठोस उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आलेले आहे. त्यातच जपानचा येन डॉलरच्या तुलनेने घसरत चालल्याची भीती जपानी सरकारमध्ये निर्माण झालेली आहे. अवघ्या दहा वर्षांपूर्वी १०० येनमध्ये एक अमेरिकन डॉलर मिळत असे. आता त्यासाठी १६० येन खर्च करावे लागत आहेत. यामुळे जपानच्या आयात-निर्यातीवर प्रचंड परिणाम झालेला आहे. जपानमध्ये अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात. येनचे मूल्य घसरल्यामुळे आयात वस्तूंची किंमत आवाक्याबाहेर चाललेली आहे. जपानमध्ये तयार होणारा माल कमी किंमतीला विकावा लागत आहे. त्याचा परकीय चलनावर मोठा परिणाम झालेला आहे. जपानमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसत असल्यामुळे त्यांची सरकारवरील नाराजी वाढत चाललेली आहे.
अवघ्या काही वर्षांपूर्वी जपानी अर्थव्यवस्था जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था समजली जात असे. या व्यवस्थेला सध्या ग्रहण लागलेले आहे. जपानमध्ये वाढता मृत्यूदर आणि घटता प्रजननदर ही त्यामागची मुख्य समस्या असल्याचे जपानी विचारवंत ताकिओ होशी आणि हैजाओ ताकेनका यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार घसरलेला जन्मदर हे जपानमध्ये कामगारांची कमतरता वाढण्याचे मुख्य कारण आहे. जपानमध्ये सध्या जितकी माणसे मरण पावतात त्यापेक्षा कमी बालके जन्माला येत आहेत. याचा थेट फटका जपानी संस्कृतीला बसत आहे.
जपानी संस्कृती कामावर कमालीची भक्ती असणारी आहे. जपानी माणूस अगदी ८०च्या वयात पोहोचला तरी तो कुठल्या ना कुठल्या कामात व्यग्र असतो. जपानी माणूस आरोग्याची उत्तम काळजी वाहत असल्याने सहजपणे नव्वदी पार पाडतो. म्हणजे एकीकडे म्हातार्या माणसांचे प्रमाण वाढत चाललेले आहे तर दुसरीकडे बालकांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे तरुणांची संख्या रोडावत चाललेली आहे. वृद्ध माणसे जी कामे करतात ती जुजबी स्वरूपाची असतात. मोठ्या बुद्धिमत्तेची आणि कष्टाची कामे करण्यासाठी तरुणांची गरज असते. विशेषतः औद्योगिक क्षेत्रात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असावी लागते. तरुणच कमी झाल्याने उद्योगधंदे चालविण्यासाठी जपानमध्ये कामगारांची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. तिचा थेट संबंध आर्थिक क्षमतेबरोबर जोडला गेलेला असतो. आर्थिक क्षमता टिकवून धरण्यासाठी जपानला सतत जागतिक बँकेकडून कर्ज उचलावे लागत आहे. कर्ज जीडीपीच्या २०० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे व्याजदर वाढवावे लागत आहेत. वाढलेल्या व्याजदराचा थेट फटका अर्थव्यवस्थेला बसतो. त्यामुळे महागाई जीवघेणी होते.
एकेकाळी जपानमध्ये तयार झालेला माल सर्व जगात विक्रीसाठी जायचा. कपडाउद्योग, तंत्रज्ञान उद्योग, रासायनिक उद्योग यावर एकेकाळी जपानी व्यापाराचा दबदबा होता. बॉस्की, सोनी यांच्यासारखे ब्रँड, टोयोटासारखी कार घरोघरी पोहचली होती. आज जपानच्या औद्योगिक प्रगतीला खीळ बसलेली आहे. बाजूच्या चीनने जपानचा व्यापार-उद्योग ताब्यात घेतलेला आहे. जगात सर्वत्र चिनी मालाला बाजारपेठा उपलब्ध झालेल्या आहेत. जपानी मालाचा खप घटल्यामुळे सरकारच्या कर्जवसुलीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे जपानी सरकार सार्वजनिक उपक्रमावर कमीत कमी खर्च करत आहे. एका प्रकारे जपानी उद्योगविश्वाचा आत्मविश्वास हरवलेला आहे. अनेक अन्य देश पुढे सरसावत असताना जपानी उद्योगधंद्यांना उतरती कळा लागलेली आहे. त्याचा थेट परिणाम जपानच्या प्रभावक्षेत्रावर होत आहे. जपानच्या आजूबाजूला दक्षिण कोरिया, तैवान, फिलीपाईन्स, इंडोनेशियासारखे देश आहेत. त्यांच्यावर असलेला जपानी प्रभाव कमी होत असल्याची चिंता जपानला भेडसावत आहे.
जागतिक अर्थतज्ञ पॉल क्रुगमन यांच्या मते जपानी तंत्रज्ञान जुनाट झालेले आहे. जपानकडे एआय टेक्नॉलॉजी नाही. दहा वर्षांपूर्वी एआय टेक्नॉलॉजी जपानने गांभीर्याने घेतली नाही. त्याचे परिणाम आता जपान भोगत आहे. सायबर सिक्युरिटीचाही मोठा धोका जपानसमोर निर्माण झालेला आहे. सायबर गुन्हेगार बहुसंख्य जपान्यांच्या वृद्धत्वाचा पुरेपूर गैरफायदा घेत आहे. दिव्ासागणिक अनेक वृद्ध माणसांचे खिसे रिकामे करण्यात येत आहेत. त्याबाबत तंत्रज्ञान अद्ययावत नसल्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावलेले आहे. त्यामुळे जपानी सरकार चिंताक्रांत आहे.
या संकटांच्या त्सुनामी जपानला भंडावून सोडत आहेत. येत्या दहा वर्षांत जपानने त्यांचा योग्य समाचार घेतला नाही तर जगातल्या दहा सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून जपानचे नाव वगळले जाईल असे तज्ज्ञांचे भाकीत आहे.

