
प्रबोधन, गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लघुतम कथा स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावणारी कथा!
निर्मनुष्य सागरकिनारा होता. अजून पुरतं उजाडलंही नव्हतं. काल रात्रीच्या भरतीमुळे किनार्यावरची सगळी वाळू ओलसर होती. त्या वाळूवरून पळताना त्रास होत होता तरी ओंकार जिवाच्या आकांताने धावतच होता. पळता पळता त्याने मागे वळून पाहिलं, तेव्हा पाठलाग करणार्या चार आडदांड माणसांबरोबर आता एक आजीबाईही पळताना दिसल्या… अरेच्चा! मगाशी तर नव्हत्या आणि त्या इतक्या वेगाने कशा धावत आहेत…? आश्चर्य वाटून ओंकार नकळत थबकला. ती माणसं क्षणांत त्याच्याजवळ येऊन ठेपली. सर्वांच्या हातात जाडजूड दंडुके होते. सार्यांनी ते त्याच्यावर उगारले. जवळून त्या आजींचा चेहरा पाहताच ओंकारची भीतीने गाळण उडाली. तो काहीतरी मोठ्याने ओरडला आणि तेवढ्यात त्याच्या बायकोने, दीप्तीने त्याला हलवून जागं केलं.
त्याच्या कपाळावरचा घाम पुसत तिने प्रेमळ स्वरात विचारलं, ‘काय झालं ओंकार? परत तेच स्वप्न पडलं का? तू माझ्यापासून खरंच काही लपवत नाहीयेस ना? रत्नागिरीचं आपलं घर सोडून इथे नाशिकमध्ये बदली मागून घेतलीस, त्यामागे या स्वप्नातल्या घटनेचा काही संबंध नाही ना? त्या स्वप्नाची किती वेळा पुनरावृत्ती होते आहे, तुला इतका मनस्ताप होतोय त्यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. मला का सांगत नाहीस तू? एकटाच किती त्रास सहन करतोस?’
एव्हाना तो थोडा सावरला होता. तिच्या स्वरातील, नजरेतील त्याच्याविषयीचं प्रेम, काळजी त्याला स्पष्टपणे जाणवली. तिला जवळ घेत तो म्हणाला, ‘अगं, मी बदली कुठे मागितली? बँकेच्या हेड ऑफिसकडूनच तशी ऑर्डर आली होती. अचानक आयुष्याची संपूर्ण घडीच बदलली, त्यामुळे जरा डिस्टर्ब आहे मी. बाकी खरंच काही कारण नाही. बरं, तू झोप आता शांतपणे. उद्या सकाळी नीलच्या शाळेसाठी लवकर उठायचं आहे ना?’
खरंतर दीप्तीला त्याचं स्पष्टीकरण फारसं पटलं नव्हतं. त्याने पहिल्यांदा जेव्हा त्या स्वप्नाविषयी तिला सांगितलं होतं, तेव्हा ती बर्यापैकी हादरली होती. क्षुल्लक म्हणून सोडून देण्यासारखं ते नक्कीच नव्हतं आणि ते जेव्हा वरचेवर पडायला सुरुवात झाली तेव्हा ती चांगलीच काळजीत पडली होती. याबाबतीत नक्की काय करावं तेच तिला समजत नव्हतं.
आत्ताही ती पुन्हा आडवी झाली खरी; पण तिला झोप लागेना. ओंकार मात्र थोड्या वेळात शांत झोपला.
दुसर्या दिवशी, तो ज्या स्टेट बँकेत कामाला होता तिथे पोहोचला. लंचटाईममध्ये जरासा निवांत बसला असताना त्याला कालच्या स्वप्नाची आठवण झाली आणि गेल्या सहा महिन्यांत घडलेला घटनाक्रम त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
सहा महिन्यांपूर्वी तो रत्नागिरीच्या स्टेट बँकेत कामाला होता. छोटंसच पण स्वतःचं घर, बायको, चार वर्षांचा गोंडस मुलगा, वरवर पाहता सगळं आलबेल होतं; पण ओंकार मात्र समाधानी नव्हता. त्याचा एकट्याचा पगार जेमतेम पुरायचा. ठरलेल्या बजेटबाहेर जराही हौसमौज केली किंवा अनपेक्षित खर्च आले की सगळं गणित बिघडायचं. खूप विचारपूर्वक खर्च करावा लागायचा. यालाच तो कंटाळला होता. दीप्ती अगदी समजूतदार होती, कसलेही हट्ट, अवास्तव मागण्या नसायच्या तिच्या. नीललाही तिने तसंच वळण लावलं होतं; पण ओंकारला याचीच खंत वाटायची.
तो सोने तारण विभागात होता. सहा महिन्यांपूर्वी सोनावणे म्हणून एक आजी त्यांच्याकडे असलेली एकमेव सोन्याची घसघशीत साखळी तारण ठेवायला आल्या होत्या. त्यांना ना आगा ना पिछा! पंच्याहत्तरीच्या आसपास वय आणि पूर्ण निरक्षर होत्या. त्यांना सोने तारणाची कुठलीच प्रक्रिया माहिती नव्हती. मग ओंकारनेच आवश्यक प्रोसीजर पूर्ण केली आणि त्यांना लोन मिळवून दिलं. आजींनी त्याचे खूप आभार मानले होते.
त्या महिन्याच्या बँक ऑडिटला ऑडिटरसमोर स्टॉक चेक करून दाखवताना ती साखळी बघून, कसा कोण जाणे, ओंकारच्या मनात कली शिरला. ‘आपण ही साखळी बदलून अशाच डिझाईनची खोटी साखळी ठेवली तर त्या म्हातारीला काय कळणार आहे? तसंही पोळ्यांची कामं करून ती हप्ते कुठले भरू शकणार आहे? मुदत वाढवतच न्यावी लागणार हे नक्की. कदाचित तोपर्यंत ती जगणारसुद्धा नाही. साखळी खोटी आहे हे नंतर ऑक्शनमध्ये कळलं तरी आपल्यावर बालंट यायची शक्यता कमीच आहे.’ बँकेच्या व्हॅल्युअरने साखळीचा खरेपणा तपासूनच कर्जाची किंमत ठरवली आहे. बरीच वर्षं आपण इमानेइतबारे हे काम चोख सांभाळतोय. बाकीच्या कस्टमर्सचे यापेक्षा कितीतरी जास्त मूल्यवान दागिने असताना एका साखळीची अदलाबदल कोण करेल?’
ओंकारची सदसद्विवेकबुद्धी आता पार लुप्त झाली होती. मोहाच्या निसरड्या वाटेकडे त्याचं पाऊल वळलं होतं. त्याने धोका पत्करून, सीसीटीव्हीच्या कक्षेबाहेर राहून साखळी बदलली. ती विकण्याचं धाडस काही त्याला झालं नव्हतं. त्या क्षणापासून मानसिक शांती मात्र तो गमावून बसला होता. आजींचे कर्जाचे हप्ते नियमित त्यांच्या अकाऊंटमधून वळते होत होते. अकाउंटला पैसे भरायला त्या यायच्या तेव्हा कधीतरी दिसायच्या आणि त्याच्या काळजात धस्स व्हायचं. स्वतःच्या कृष्णकृत्याचं ओझं कायमचं त्याच्या खांद्यांवर विसावलं होतं.
त्याच सुमारास बदलीची नोटीस त्याल्ाा मिळाली. आनंदाने ती स्वीकारून तो सहकुटुंब नाशिकला आला. सुरुवातीचे दिवस बरे गेले, मग अचानक स्वप्नाचा ससेमिरा मागे लागला. आपल्या कृत्याची कबुली द्यावी तर करिअर उद्ध्वस्त व्हायची दाट शक्यता, शिवाय दीप्ती आणि नीलचा विश्वास गमावण्याचीही भीती होतीच. याच मनःस्थितीत काही दिवस गेले. एक दिवस कामात गढून गेलेला असताना त्याच्या कानावर शब्द पडले, ‘साहेब, कर्जविभाग कुटं हाये?’
त्याने समोर पाहिलं आणि त्याच्या हातापायाला कापरं भरलं. समोर सोनावणे आजी उभ्या होत्या!

