• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

थला फॉर अ रीझन!

प्रशांत केणी (खेळियाड)

Marmik Team by Marmik Team
November 28, 2026
in खेळियाड
0
थला फॉर अ रीझन!


‘आयपीएल’मधील महानायक महेंद्रसिंह धोनी याने खेळाडू म्हणून कारकीर्द स्थगित केलीय आणि आगामी हंगामात तो सीएसकेचा मेंटॉर म्हणून काम करताना दिसेल. या स्पर्धेत आकड्यांच्या पलीकडे जाणारी त्याची कामगिरी डोळ्यांचं पारणं फेडणारी. यानिमित्तानं ‘थला फॉर अ रीझन’ या त्याच्या लौकिकाची केलेली कारणमीमांसा.

 

महेंद्रसिंह धोनी… एकदिवसीय ते ट्वेंटी-२० क्रिकेट असं स्थित्यंतर होत असताना आक्रमक फलंदाजीनं आणि अचाट फटक्यांनी यष्टीरक्षक फलंदाजाची व्याख्या बदलणारा ‘पोस्टर बॉय.’ पुढे जाऊन त्यानेही भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ घडवला. रांचीसारख्या मागास भागात कारकीर्द घडवताना त्याला खडतर संघर्ष करावा लागला. रेल्वेतला तिकीट तपासनीस ते दोन विश्वविजेतेपदं जिंकणारा कर्णधार हा प्रवास आख्यायिका किंवा मिथक बनून बसला. बॅट, ग्लोव्हज, तल्लख मेंदू यांच्याबरोबरच दैवी ‘मिडास टच’ ही त्याची अस्त्र-शस्त्रं. एकीकडे त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द नवनवी उंची गाठत असताना २००८पासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गौरवशाली अध्यायानं त्याचं महानायकत्व अधिक दृढ केलं. एमएसडी, माही ह्या विशेषणांमध्ये ‘थला’ची (थलायवाचं लघुरूप) भर पडली. ‘आयपीएल’च्या वारीतले चेन्नई सुपरकिंग्जचे पिवळे वारकरी दरवर्षी उत्साहात धोनीनामाचा अविरत गजर करीत मैदान दणाणून सोडतात. मागील वर्षी एकही सामना न खेळता केवळ आर्थिक समीकरणांसाठी त्याचं ड्रेसिंग रूमधील दूरदर्शन अनुभवावं लागलं, तेव्हाच चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. अपेक्षेप्रमाणे शारीरिक मर्यादांचा आदर राखत त्यानं खेळाडू म्हणून ‘आयपीएल’ कारकीर्दीपुढे पूर्णविराम दिलाय; पण, तो ‘प्रेरक’ (मेंटॉर) म्हणून पुन्हा येतोय.

शिट्टी वाजली… ऋणानुबंधाची!
‘आयपीएल’च्या गौरवशाली पर्वाला २००८मध्ये प्रारंभ होण्याआधी चेन्नई सुपरकिंग्जसाठी ‘व्हिसल पोडू’ हे संघगीत तयार करण्यात आलं होतं. नामांकित जाहिरात तज्ज्ञ चोक्कलिंगम यांनी ते तयार केलं होतं. रजनीकांतच्या चित्रपटाला तमिळ जनता थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवते, हेच सूत्र ‘सीएसके’ला प्रेक्षकांशी भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी गीताकरिता वापरण्यात आलं होतं. धोनी हा संघाचा नायक होता. त्यामुळे धोनी, चेन्नई, चेपॉक आणि तमिळ क्रिकेटप्रेमी यांच्यातला ऋणानुबंध सांधण्यासाठी ते उपयुक्त ठरलं. चेन्नईकरांच्या पारंपरिक वेशात लुंगी डान्सवर थिरकल्यानं तो उत्तर भारतीय असूनही दक्षिण भारताच्या मातीत रूजला. पुढे धोनीच्या शिट्टीनं गेली १८ वर्षं राज्य केलं. ‘व्हिसल पोडू आर्मी’ ही चाहत्यांची अधिकृत फौज उभी राहिली. २०१६-१७ ह्या ‘सीएसके’च्या बंदीच्या दोन वर्षांतही चेन्नईवासियांचं धोनी-प्रेम सुतराम कमी झालं नाही. ‘व्हिसल पोडू एक्स्प्रेस’ ही नवी संज्ञा याच काळात रुजली आणि टिकून राहिली. ह्या सर्वाच्या केंद्रस्थानी अर्थातच धोनी होता.

‘टीआरपी’चा राजा!
“फिल्में सिर्फ तीन चीजों के वजह से चलती है… एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट” हा ‘द डर्टी पिक्चर’मधील सिल्कचा (विद्या बालन) गाजलेला डायलॉग. त्याचप्रमाणे ‘आयपीएल’ही तीन दिग्गज क्रिकेटपटूंच्या बळावर चालते… धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा. हे खेळाडू मैदानावर फलंदाजीसाठी उतरतात, तेव्हा टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येचा म्हणजेच ‘टीआरपी’चा आलेख क्षणार्धात जेटच्या वेगानं झेप घेतो. हीच ह्या त्रिकुटाची किमया. त्यामुळे ‘आयपीएल’ प्रक्षेपण करारही (सध्याचा ५ वर्षांसाठी ४८,३९० कोटी) विक्रमी मुसंडी मारतो. कारण जाहिरातींच्या कमाईची खात्री असते.
गतवर्षीचा संपूर्ण हंगाम धोनी संघात आहे, या भावनिक सामर्थ्यावर पार पाडला. ‘सीएसके’, प्रक्षेपण यंत्रणा, ‘बीसीसीआय’ आणि क्रिकेटरसिकांनी त्याला पिवळ्या पोशाखात सराव करताना किंवा ड्रेसिंग रूममध्ये पाहून धन्यता मानली. एव्हाना तो ४५ वर्षांचा झालाय, वय आणि दुखापती यामुळे आता खेळणं कठीण असल्याचं स्पष्ट झाल्यानं खेळाडू म्हणून थांबणं अपरिहार्य होतं. 
विजिगिषु वृत्तीचा विजयवीर!
विजिगिषु वृत्तीनं भारलेला धोनी सामन्याचा निकाल पालटण्यात पटाईत. ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या काही वर्षांत तीन ते पाच क्रमांकावर हिंमतीनं खेळणारा धोनी वर्षे सरली तसतसा खालच्या क्रमांकावर खेळू लागला. मावळतीच्या वर्षांत तर तो तळाच्या फळीत आठव्या-नवव्या क्रमांकावरही दिसला. बदलली नाही ती त्याची ‘फिनिशर’ची म्हणजेच विजयवीराची भूमिका. शेवटच्या दोन वर्षांत तो क्रमांकाला महत्त्व न देता अखेरच्या हाणामारीच्या षटकांत उतरून एकेरी-दुहेरी धावांपेक्षा चेंडू लीलया सीमापार धाडण्याचंच कार्य करायचा. धोनी खेळलेल्या २७८ सामन्यांपैकी १५६ सामने त्याच्या संघाने जिंकलेत, हे पहिलं वैशिष्ट्य. धोनी ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये सातव्या क्रमांकावर असून त्याच्या खात्यावर एकूण ५,४३९ धावा जमा आहेत. यापैकी २,९३६ धावा त्यानं डेथ ओव्हर्समध्ये म्हणजे १७ ते २० षटकांत फटकावल्यात. धावांचा पाठलाग करताना तो अधिक आक्रमक रूप धारण करतो. डेथ ओव्हर्समध्ये त्यानं १,२१८ धावा केल्यात. ह्या टप्प्यातील त्याच्या एकंदर षटकारांची संख्या १८६ आहे. फक्त २०व्या षटकात त्यानं तब्बल ७२ षटकार खेचलेत. एकूण २४२ डावांपैकी १०० डावांत तो नाबाद राहिलाय. २०२०पासून धोनीचा धावांचा धबधबा आटला. तेव्हापासून निवृत्तीपर्यंत जेमतेम एक अर्धशतक त्यानं नोंदवलं. पण, आकड्यांपेक्षा त्याची फलंदाजीची उपयुक्तता आणि नजाकत ही कायम राहिली, हीच त्याची खासियत.

कणखर कर्णधार!

शांत वृत्तीनं चेन्नईचं कुशल नेतृत्व करणारा कणखर कर्णधार ही ओळख निर्माण करण्यासाठी धोनीच्या खात्यावर असलेली पाच ‘आयपीएल’ विजेतेपदं (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३) सार्थ ठरतात. याशिवाय त्यानं संघनायक म्हणून संघाला २२१पैकी १३१ सामने जिंकून दिले. म्हणजे विजयाची सर्वाधिक टक्केवारी ५९.८२%. निष्णात बुद्धिबळपटूप्रमाणे त्यानं मैदानावर रणनीतीच्या चाली रचल्या आणि लढवय्या सेनानीप्रमाणे अचूक निकाल मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, मथीशा पथिराणा, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगर्गेकर ह्या युवा पिढीला त्यानं घडवलं. कठीण प्रसंगातही आत्मविश्वास न गमावता निर्धारानं कसं खेळावं, हे त्यांना त्यानं शिकवलं. सूर हरवल्यामुळे भारतीय क्रिकेटच्या सीमारेषेबाहेर फेकल्या गेलेल्या अजिंक्य रहाणेला त्यानं जीवदान दिलं. अंबाती रायुडू, मोईन अली या चाळीशीकडे झुकलेल्या अनुभवी खेळाडूंना त्यानं कामगिरी होत नसतानाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. डेव्हॉन कॉन्वे, रवींद्र जाडेजा दीपक चहर आणि माहीश तीक्षणा हे त्याचे हुकूमी शिलेदार. २०१८मध्ये तिशीपलीकडच्या हरभजन सिंग, शेन वॉटसन, फाफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो, आदी बुजुर्गांना घेऊन मोट बांधली, तेव्हा क्रिकेटजगतानं ‘डॅड्स आर्मी’ म्हणून ह्या संघाची निर्भत्सना केली. पण, धोनीनं सर्वांना चकित करीत जेतेपद मिळवून दाखवलं. गेल्या काही वर्षांत स्वत:कडील कर्णधारपदाचा त्याग करून जडेजा, गायकवाड यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यानं मेहनत घेतली; परंतु ती फोल ठरली.

यष्टीरक्षणातील चपळाई!

धोनीचं यष्टीरक्षणातील चापल्य हे विद्युल्लतेपेक्षाही वेगवान. त्याचे काही झेल आणि यष्टीचीत नव्या पिढीला धडे देणारे. फलंदाजाचं बारकाईनं निरीक्षण करून गोलंदाजांना योग्य दिशादर्शन करीत भलेभले अडसर दूर करण्याची त्याची वृत्ती वाखाणण्याजोगी. ‘सीएसके’साठी त्यानं १४० झेल आणि ४० यष्टीचीत केलेत. २०१३ आणि २०२० हे त्याचे सर्वोत्तम झेलांचे (प्रत्येकी १५) हंगाम ठरले, तर २०१०मध्ये त्यानं सर्वाधिक सहा यष्टीचीत केले.

धोनी रीव्ह्यू सिस्टिम!
मैदानावरील पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याच्या प्रक्रियेला ‘डिसीजन रीव्ह्यू सिस्टिम’ (डीआरएस) संबोधलं जातं. यात बऱ्याचदा मैदानावरील पंचांचा निर्णय बरोबर ठरतो. पण, एकमेव खेळाडू त्याला अपवाद ठरतो, तो म्हणजे धोनी. फलंदाज पायचीत झाल्याचं अपील असो, यष्टीरक्षक धोनीचा झेल असो वा अन्य क्षेत्ररक्षकानं घेतलेला झेल असो. पंचांनी निर्णय नाकारताच सर्वांच्या नजरा त्याच्याकडे रोखल्या जात. कारण त्याने यष्टीपाठून केलेलं निरीक्षण अचूक असे. त्यामुळेच निर्णय बदलण्याची शक्यता अधिक, हे बऱ्याचदा सिद्ध झालंय. म्हणूनच ‘धोनी रीव्ह्यू सिस्टिम’ हे नाव रूढ झालंय.

तात्पर्य : धोनीचं मोठेपण हे फक्त आकड्यांतून सिद्ध होत नाही, तर त्याच्यातील ह्या गुणांमुळे होतं. ‘सीएसके’ची ओळख बनलेला हा पठ्ठ्या म्हणूनच खेळाडू म्हणून कारकीर्द संपवून ‘प्रेरक’ ह्या नव्या जबाबदारीसह मैदानावर अवतरतोय!

Previous Post

धौलपूरमध्ये उभी राहिली डिजिटल ‘संविधान घरे’

Next Post

महायुतीतील तडे आणि तडाखे!

Next Post
महायुतीतील तडे आणि तडाखे!

महायुतीतील तडे आणि तडाखे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.