
१८ऑगस्टला इस्त्रायलने सीरियाच्या अबू अल दुहुर धावपट्टीवर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे संपूर्ण धावपट्टी उद्ध्वस्त झाली. इस्त्रायलचा हा सीरियावरचा हल्ला नव्हता, तर तो तुर्कस्तानवरचा हल्ला होता, कारण, या विमानतळाचे नियंत्रण तुर्कस्तानकडे होते.
सीरियाच्या गृहयुद्धामध्ये तुर्कस्तानने सीरियाचे सध्याचे अध्यक्ष अहमद अल शरा यांना खुला पाठिंबा दिला होता. त्यांनी सीरियाचा हुकूमशहा बशर अल असाद याची २५ वर्षांची सत्ता उलथवून त्याला देशाबाहेर पळवून लावले होते. या लढाईमध्ये सीरियाचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले होते. अबू दुहुर धावपट्टी देखील उद्ध्वस्त झाली होती. तुर्कस्तानने ही धावपट्टी दुरुस्त करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. आता ही धावपट्टी उद्ध्वस्त करून इस्त्रायलने तुर्कस्तानबरोबरच्या युद्धाची नांदी केली आहे.
या धावपट्टीवर इस्त्रायल हल्ला करणार आहे याची खबर अमेरिकेच्या सीआयए यंत्रणेला होती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इस्त्रायलने असा हल्ला करू नये असे आवाहन देखील केले होते. वांड इस्त्रायलने ते ऐकले नाही. तुर्कस्तानमधील अमेरिकन राजदूत टॉम बराक यांनी या हल्ल्याबाबत अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली. इस्त्रायलने न सांगता केलेली ही चढाईच असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे वॉशिंग्टनला धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणात तुर्कस्तानची बाजू घेतली. दुसर्या देशाच्या राजकारणात इस्त्रायलने मध्यस्थी/ढवळाढवळ करू नये असे ते म्हणाले. तुर्कस्तान हा अमेरिकेचा मोठा मित्र असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी तुर्कस्तानच्या लष्कराची आणि युद्धसज्जतेची प्रशंसा केली. इस्त्रायलला हे पाऊल महागात पडल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्भित धमकी त्यामागे होती. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपले ऐकत नाही असा ट्रम्प यांचा व्यक्तिगत संतापही त्यामागे होता.
तुर्कस्तानचे पंतप्रधान रसेप तय्यप एर्दोगान यांनी प्रतिहल्ल्याची धमकी देखील दिली आहे. त्यावर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली नाही. थोडक्यात अमेरिकेचे मध्यपूर्व आशियातील राजकारण बदलत आहे. आजवर अमेरिकेने इस्त्रायलला पोसलेले आहे. आपला सर्वोत्तम शस्त्रसाठा अमेरिकेने इस्त्रायलला दिलेला आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी इस्त्रायल हा जणू अमेरिकेचाच एक भाग आहे असे मानले. त्यांनी इस्त्रायलची हरएक मागणी मान्य केली. २०१७मध्ये त्यांनी जेरुसलेम ही इस्त्रायलची राजधानी असल्याची मान्यता दिली. बेंजामिन नेतन्याहू या परममित्रासाठी हे सगळे चाललेले होते. इस्त्रायलचा मध्यपूर्व आशियामध्ये दबदबा वाढवावा अशी त्यामागे खेळी होती. दरम्यान अब्राहम करार झाला. त्यात दहा देश सामील झाले होते. एकट्या इस्त्रायलसाठीच हा करार होता. मध्यपूर्व आशियावर इस्त्रायलचे वर्चस्व निर्माण व्हावे हा त्यामागे हेतू होता. मात्र आज इस्त्रायल अमेरिकेचे ऐकत नाही. हे आश्चर्यकारक आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची इस्त्रायलचे सच्चे मित्र म्हणून स्तुती केली होती. त्यांचे अपार गुणगान केले होते. आता ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडाला पाने पुसायला निघालेले आहेत.
नेतन्याहू यांनी अबू दुहुर विमानतळावर जाणूनबुजून हल्ला केला. त्याचे कारण शोधण्यात राजकीय पंडित गर्क आहेत. यातून नेतन्याहू यांना काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. त्याचे साधे आणि सरळ उत्तर आहे. नेतन्याहू यांना येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये स्वतःचा अटळ पराभव दिसत आहे. त्यांच्या लिकुड पार्टीला कधीही बसला नव्हता एवढा भयानक धक्का या निवडणुकीत बसणार आहे. या पार्टीचे पानिपत होईल असे भविष्य इस्त्रायलची वर्तमानपत्रे व्यक्त करीत आहेत. २७ ऑक्टोबरला इस्त्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. सर्व तज्ज्ञांनी लिकुड पार्टीचा पराभव अटळ असल्याचे मत व्यक्त केलेले आहे. तीच नेतन्याहू यांची प्रमुख भीती बनलेली आहे.
नेतन्याहू १९९३पासून इस्त्रायलच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यावर्षी ते पहिल्यांदा विरोधी पक्षनेता बनले. तेव्हापासून इस्त्रायलच्या राजकारणात त्यांचा दबदबा सुरू झाला. आतापर्यंत सहा वेळा ते इस्त्रायलचे पंतप्रधान बनलेले आहेत. अत्यंत आक्रमक राजकारण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. इस्त्रायलमध्ये त्यांनी दुहीचे राजकारण तयार केले. इस्त्रायलमध्ये इतर अतिरेकी संघटना आणि पक्ष आहेत. सातत्याने पॅलेस्टिनी लोकांना विरोध आणि मुस्लिम द्वेष हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. त्याला अमेरिकेतील ज्यू लॉबीने गेली ५० वर्षे व्यवस्थित खतपाणी घातलेले आहे. अमेरिकेतील तरुण ज्यूंची डोकी भडकवून त्यांना राष्ट्रसेवेच्या नावाखाली इस्त्रायलच्या सैन्यात भरती करविले जाते. ही तरुण मुले पॅलेस्टिनी लोकांवर बंदुका रोखून धरतात. या सर्वांचा परिणाम म्हणून एकेकाळी निधर्मीवादी म्हणून ओळखले जाणारे इस्त्रायल आता कट्टर धार्मिक अतिरेकीवादाकडे वळलेले आहे. त्यांचे नेतृत्व नेतन्याहू यांनी स्वतःकडे घेऊन गेली अनेक वर्षे इस्त्रायलच्या राजकारणाचा ताबा घेतलेला आहे. राजकारणात त्यांनी मोठे यश मिळविले आहे. पण त्याची मोठी किंमतही त्यांना चुकवावी लागत आहे.
पॅलेस्टिनी लोकांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यावा ही जगाची मागणी आहे. नेतन्याहू यांनी ती फेटाळून लावलेली आहे. अब्राहम कराराच्या निमित्ताने भारतातून थेट इस्त्रायलपर्यंत व्यापारी कॉरिडॉर करण्याची त्यांची संकल्पना देखील उद्ध्वस्त झालेली आहे. २०२३मध्ये सात अरब देशांना नमवून त्यांच्याच देशांतून हा हमरस्ता मिळण्याचा घाट त्यांनी घातला होता. परंतु हमासने त्यांचे हे स्वप्न धुळीला मिळवले.
२७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्त्रायलच्या दक्षिण भूभागावर चढाई करून १२०० लोकांचे प्राण घेतले. इतर कोणीही राष्ट्राध्यक्ष असते तर या हल्ल्याचा त्यांनी नीट तपास केला असता. तो हल्ला का झाला याची कारणमीमांसा तपासून पाहिली असती. तसे न करता नेतन्याहू हे नरसंहारक बनले. त्यांनी संपूर्ण गाझापट्टी उद्ध्वस्त करून टाकली. त्यात आजपर्यंत ६५ हजारांच्या वर लोकांची आहुती पडलेली आहे. त्यात महिलांची आणि बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
ही विषम आणि अन्याय्य लढाई होती. इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये हमासच्या शस्त्रधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक होते. तोच पुरुषार्थ ठरला असता. हिटलरला जशी नरसंहाराची नशा चढली तशी नेतन्याहू यांना देखील नशा चढली. आटोपते घ्या म्हणून जगाने केलेली विनवणी त्यांनी धुडकावून लावली. अमाप शस्त्रभांडाराच्या जोरावर त्यांनी गाझा बेचिराख करून टाकला. त्यांच्या कारवाईमुळे काही काळ इस्त्रायली जनता प्रभावित झाली होती. इस्त्रायलवर हल्ला केल्यास त्याचे काय परिणाम होतात हे बघा अशी दर्पोक्ती ते करू लागले होते. परंतु बघता बघता वारे फिरले. जगभरातून इस्त्रायलच्या नरसंहाराची निर्भर्त्सना होऊ लागली. अमेरिकेमध्ये इस्त्रायलविरोधी वातावरण तयार होऊ लागले. असंख्य मानवतावादी ज्यूंनी देखील इस्त्रायलची निर्भर्त्सना करीत त्यांचा शस्त्रसाठा रोखण्यात यावा अशी मागणी केली. या सर्वांचा गंभीर परिणाम इस्त्रायलवर झाला. येथील जनजीवन विस्कळीत झाले. महागाई बेकाबू झाली. हिंसाचाराच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली. नेतन्याहू यांना नरसंहारक म्हणून घोषित करा अशी मागणी होऊ लागली.
त्यानंतर नेतन्याहू यांनी दुसरी चाल रचली. देशातील वातावरण पाहून आपण पुढील निवडणुका हारू याचा अंदाज नेतन्याहू यांना आलेला होता. त्यांनी ट्रम्प यांना हाताहात फसवले. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची काहीही गरज नव्हती. इराणविरुद्धच्या लढाईत अमेरिका १०-१५ दिवसात इराणचा पाडाव सहज करेल त्यामुळे अमेरिकेचा दबदबा जगभर वाढेल, अशा दिवास्वप्नात नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना ओढले. त्यातून ‘ग्रेटर इस्त्रायल’चे आपले स्वप्न पूर्ण होईल असा नेतन्याहू यांचा होरा होता. तो देखील फसला. डोनाल्ड ट्रम्प यांना ही लढाई महागात पडल्याने आता या लढाईतून काढता पाय घेऊ पाहत आहेत. त्यांना आता इराणबरोबर थेट युद्ध नको आहे.
नेतन्याहू यांची सध्यातरी प्रचंड पंचाईत झालेली आहे. खुद्द इस्त्रायलमध्ये आपल्याला इराणने युद्धात नमवले अशी भावना तयार झालेली आहे. त्यामुळे नेतन्याहू यांना आपण निवडणूक हारणार याची ठाम खात्री झालेली आहे. हरले तर ते दुसर्या महिन्यात तुरुंगात असतील हे निश्चित. नेतन्याहू यांना ते नक्कीच नको आहे. तुर्कस्तानबरोबर लढाई करून काही हाती लागते का या खटपटीत ते आहेत. त्यासाठीच अबू दुहुर धावपट्टीवर त्यांनी हल्ला केला. इस्त्रायल आणि तुर्कस्तान यांची लढाई झाल्यास संपूर्ण जगाने युद्धाच्या खाईत जावे अशी त्यामागे नेतन्याहू यांची चाल आहे. तिला जग फसेल, अशी शक्यता मात्र फारच धूसर दिसत आहे. त्यात नेतन्याहूच फसत आणि एकटे पडत जातील, हीच शक्यता अधिक आहे.
