• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डिग्री!

ऋषिराज शेलार (अर्ध्या मुर्ध्या गोष्टी)

marmik by marmik
June 15, 2026
in भाष्य, विनोदी लेख, विशेष लेख
0
डिग्री!

चित्र-आशुतोष वाळे

आज कंपनीत परमनंटच्या काही जागा निघाल्याची नोटीस बोर्डवर लागली. अर्ध्यानं लंच टाइममधी सगळी नोटीस दोनदा वाचून काढली. एक मोबाईलमधी फोटो घेतला. दुपारनंतर तशीही त्यानं सुट्टी टाकलेली. त्याचं कारण वेगळं. पण आज लागलेली नोटीस त्याला बेचैन करणारी. तो आत गेला. मध्ये सुट्टीची निश्चिती करून तो बाहेर पडला.

तो रस्त्यावर आला, क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे? म्हणून पुन्हा नोटीस चेक केली. त्यातील अनुभव आणि डिग्री तर अर्ध्याकडं आहे. उरलं काय? अर्रर्रर्र! इथं एमबीए पाहिजे. नुसती डिग्री नाही. आता? ऐनवेळी ही पुढली डिग्री आणायची कुठून? हा बी चान्स गेला तर… अर्ध्याला हुरहूर लागली.

‘अय अर्ध्या चालायचं का?’ एक जुनी कार समोर थांबली.
‘आँ?’ त्यानं चमकून वर पाहिलं. गाडीत आता तालुक्याला एक मोठ्या संस्थेत शिक्षक म्हणून लागलाय तो भोंगळ बसला आहे. हा, त्यानं मागं आडनाव पण बदललं जसं. राजपत्र वगैरे करून भ च्याजागी ओ टाकला आणि ओंगळ केलेलं. हा हे फॅड इकडं बरंच चालुय. हगवणेनं आगवणे केलेलं. आणखी कुणी काय तर कुणी काय! काहींनी आडनाव म्हणून कुठलं जुनं महसुली पद चिकटवलेलं कुणी डायरेक जातीला आडनाव बनवलेलं. अश्या नाना तर्‍हा!
‘मग अध्वर्यू! उन्हात काय उभाय? यायचं का? चाल!’ त्यानं आमंत्रण दिलं. अर्ध्याला दुसरं काय पाहिजे होतं? त्यालाही घरी जायची घाईच होती ना?

‘आज एकटाच? तुझी तर दरवेळी गाडी भरलेली रहाते ना?’ अर्ध्यानं दार उघडत आत बसत विचारलं.

‘आज सुट्टीवर होतो. अजून शाळा नीट सुरू कुठं झाल्यात?’ त्यानं उलट सवाल केला. कार चालू पडली.

‘हां १५ जूनला सुरू होतील ना? शाळा सोडल्यापासून सगळं विसरायला झालं.’ अर्ध्यानं मान डोलावली.
‘मग आणखी काय चाललंय? ह्यावर्षी बुंदी-बिंदी आहे का नाही?’ भोंगळनं अर्ध्याला डिवचलं.
‘कसलं लग्नं? इथं नोकरीसाठी रिझ्युम पाठवू पाठवू थकलो, त्यात पाहुण्यांनी बायोडाटा मागवू मागवू डोकं पिकवलं. एकदा तर बायोडाटा म्हणून रिझ्युमचं पाठवला गेला. पाहुण्यानं अनुभव पाहिला सहा वर्षे! तेव्हा ते चक्रावले. मग फोनवर फोन! हे काय पाठवलं?’ अर्ध्या सांगायला लागला, तसा भोंगळ हसायला लागला.
‘साल्या, लग्नाआधी सहा वर्षं अनुभव म्हंटल्यावर तर पाहुणे कोमात गेले असतील. मग निदान अनुभव बघून तरी जमलं का नाही?’ भोंगळनं हसत हसत विचारलं.
‘मी काय आमीर आहे का? सैफ? पोरी अनुभव पाहून माझ्यासाठी लाईन लावायला? आपलं नशीब बी फुटकं न…’ अर्ध्या मात्र भलता सिरीयस.

‘हातावरच्या लोकांना पण लग्न जुळवायला अडचणी येत नाही. तुला का अडचणी आल्यात पण? इथं पोरं चारदोन महिने कंपन्या जॉईन करत्या. मागून लग्न जमलं रे जमलं का लगेच बारे द्यायला वावरात. तसं काही करायचं!’ भोंगळ त्याला आयडिया द्यायला लागला.
‘इथं शेत आहे कुठं? तीन पिढ्यांआधी सगळं विकून आमच्या म्हातार्‍यांनी एक गावात घर ठेवलं फक्त! त्याच्यावर चुलत्यानं कर्ज घेतलं होतं. बापानं जिंदगीभर ते फेडलं. नाहीतर आज आम्ही बी असतो भाडे भरत!’ अर्ध्यानं इतिहासाची टेप पुन्हा ऐकवली.
‘हे मोबाईलमधी काय बघतोय तू?’ भोंगळनं अर्ध्याचा समोर धरलेला मोबाईल बघत प्रश्न केला.
‘हे माझ्या कंपनीत काही परमनंटच्या जागा निघाल्यात. तेच आहे हे.’ अर्ध्यानं मोबाईलची स्क्रीन त्याला दाखवली.
‘यायला मग कर ना अप्लाय. काय वाट पाहतो?’ भोंगळनं त्याला न मागता पाठिंबा दिला. बाहेरून.
‘त्याला एमबीएची डिग्री पाहिजे. माझ्याकडं कुठून यायची ती?’ अर्ध्यानं त्याला माहिती दिली.
‘म्हणजे तू अश्या डिग्र्या मिळवल्या नाही?’ भोंगळनं आश्चर्यानं विचारलं. पण बोलता बोलता त्याला रसाचं गुर्‍हाळ दिसतं, तशी त्यानं गाडी बाजूला घेतली. थांबवली.

‘त्या काय बाजारात मिळत्या का? एवढं दोन दोन, तीन तीन वर्षे कोण घाशील? आहे ह्याच डिग्र्या कश्या मिळाल्या आम्हालाच माहीत. तिकडं जायचं म्हणजे रिकामटा वेळ आणि पैसा पाहिजे. माझ्याकडं दोन्ही बी नाही.’ अर्ध्या निराशेनं बोलला.
‘तुला कोण म्हंटलं, काम सोडून डिग्र्या घे?’ भोंगळनं काचेतून मान बाहेर काढली. ‘भाई दो ग्लास फुल्ल लाना!’ बोलता बोलता त्यानं रसावाल्याला ऑर्डर पण दिली. इथं टपर्‍यावर असो वा स्टॉलवर केवळ हिंदीतून बोललं पाहिजे, मग तिथला कारागीर, मालक मराठी असला तरी! ह्या अघोषित फतव्याचं कठोर पालन त्यानं समाधानानं केलं.
‘मग डिग्री घ्यायची म्हणजे रेग्युलर
कॉलेज करायला लागंल ना?’ अर्ध्याचा सरळ प्रश्न!
‘तुला कोण म्हंटलं? आता मी हे बीएड्ची डिग्री घेतली. मी काय कॉलेज करत बसलो का?’ भोंगळनं दबक्या आवाजात उलट विचारलं.
‘म्हणजे?’ अर्ध्याची उत्सुकता चाळवली.
‘अरे, एक ओळखीच्याचं उत्तरेला कॉलेज होतं. म्हणजे त्यानं नुकतंच सुरू केलं. तेव्हा तीस हजार पहिल्या तोंडी लमसम भरले. त्यानं तीन वर्षांनी प्रिंटेड डिग्री घरी आणून दिली.’ भोंगळनं छाती फुगवून सांगितलं.
‘असं होतं?’ अर्ध्याचा निरागस भाबडा प्रश्न!
‘मग हे पुढारी-बिढरी मागच्या इलेक्शनमधी दुसरी फेल राहत्या, तेच पुढल्या इलेक्शनपर्यंत बिटेक, एमकॉम होतात. कसे?’ तोवर रसाचे बर्फ टाकलेले दोन ग्लास आले.
‘पण असं डिग्री मिळवून पुढं काही आलं नाही तर?’ अर्ध्याला पुढचा प्रश्न पडला.
‘काही पण अर्ध्या! आता तुझ्याकडं एमबीएची डिग्री असती, तू तुझ्या कंपनीत परमनंट झाला असता तर तुला कोणी विचारलं असतं? सांग एमबीएच्या सेकंड सेमिस्टरच्या चौथ्या सब्जेक्टचा तिसरा प्रश्न? विचारेल कुणी?’ भोंगळनं वास्तव सांगितलं.
‘अरे पण…’ अर्ध्याला काही सुचलंय, पण…
‘आमच्या शाळेत माझ्या कलीग आहेत एक मॅडम! इंग्रजी शिकवायला लागल्या होत्या. संस्थाचालकांच्या रिलेटिव्ह आहेत. पण इंग्रजीतलं ओ का ठो येत नाही. एक
बॉडीवरल्याचं पोरगं नापास झालं, तेव्हा तिला कार्यानुभव विषय दिला. त्यात बाई अर्धा वेळ रील बनवण्यात घालवतात. पण कुणाला फरक पडतोय? बाई महिन्याचा दाबून पगार घेते. वर शाळेत रुबाब!’ भोंगळनं ग्लास संपवला.
‘समजा, मी घेतला असा एखाद्या
कॉलेजमध्ये प्रवेश. मग मला फी वगैरे किती द्यावी लागेल? आणि परीक्षेचं काय?’ अर्ध्यानं संपलेल्या ग्लासानंतर लाईन धरली.
‘तू फक्त फी आपल्या इकडचे टॉपचे
कॉलेज घेतात तेवढी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी हजेरी लावायची. बाकी
कॉलेजवाले बघून घेतील. पूर्वी ती पण गरज नव्हती, पण आजकाल पडते ती गरज!’ भोंगळनं डिटेल दिली.
‘आणि मला असं कॉलेज कुठं मिळंल?’ अर्ध्याचा निष्पाप प्रश्न.
‘तुला खरंच करायचं काय, एमबीए? माझ्या मित्राचं आहे एक कॉलेज. मी सांगतो तुला संध्याकाळपर्यंत!’ भोंगळनं रसाचे पैसे दिले. गाडी पुन्हा रस्त्याला लागली.
‘पण खरंच मला अशी डिग्री मिळेल? अन् इथं रोज कामावर राहिल्यावर मी अभ्यास कधी करेन? परीक्षा द्यायला?’ अर्ध्या डोकं खाजवायला लागला.
‘इथं देशभरातले पेपर फुटतात. देश चालवणारे फेक डिग्र्या मिरवतात. बोगस मेंदूरोगतज्ज्ञ असलेले काही निवडणुका जिंकतात. वाचता येत नाही असे शिक्षक बनतात. ज्यांनी अध्यात्माचे मठ चालवावे असे माठ शैक्षणिक संस्था चालवतात. जे माठ थुंकदाणी म्हणून वापरावे असे शैक्षणिक खात्याचे मंत्री बनतात. त्या देशात हे सहज साधारण आहे. हे ध्यानात घे. जिथली शिक्षण व्यवस्था सडलीय, तिथेच असा चिखल होतो, आणि चिखलातच फुलतं मग…’ बोलता बोलता कार बसस्टँडवर आली. भोंगळनं अर्ध्याला तिथं उतरवलं. अर्ध्या नागड्यानं जड डोक्यानं घराकडं निघाला.
रस्त्यात त्याला पचकन् रस्त्यावर थुंकणारा त्याच्या शाळेतला शिक्षक वाटेत दिसला. व्वा रे नागरिकशास्त्र! त्याने स्वतःच मनातल्या मनात शाबासकी दिली. पुढं दोन पावलं गेल्यावर पाश्चात्य विज्ञानानुसार विनातोडफोड वास्तू शांती करून मिळेल अशी जाहिरात दिसली. येथे सर्व कायदेशीर सल्ले मिळतील नावाच्या बोर्डखाली कोर्टाचे अर्धे कज्जे शांतीत, वाजवी दरात मिटवणारा काळ्या कोटवाला दिसला. अखेर अर्ध्या खाली मान घालून चालू लागला. नकोच वर बघायला.
घरी गेल्यावर देखील तो लवकर जेवण आटोपून झोपी गेला. पण त्याने प्रश्न सुटणार थोडंच आहे? त्याच्या स्वप्नात तोच बीएएमएसचा डॉक्टर बनून लोकांचे किडनीचे ऑपरेशन स्वादुपिंडावर करत असल्याचं दिसलं. तसा तो घाबरून उठला आणि स्वतःचंच स्वादुपिंड तपासू लागला… रात्रभर जागून!

Previous Post

झळाळत्या ‘वैभवगाथे’चा युगारंभ होईल?

Next Post

ग्रेट निकोबारवर विकासाचा हल्ला!

Next Post
ग्रेट निकोबारवर विकासाचा हल्ला!

ग्रेट निकोबारवर विकासाचा हल्ला!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.