• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

झळाळत्या ‘वैभवगाथे’चा युगारंभ होईल?

प्रशांत केणी खेळियाड

marmik by marmik
June 15, 2026
in खेळियाड
0
झळाळत्या ‘वैभवगाथे’चा युगारंभ होईल?

‘आयपीएल’मधील पराक्रम गाजवल्यामुळे अपेक्षेप्रमाणे वैभव सूर्यवंशीची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यावर सातत्य टिकवणं महत्त्वाचं आहे. सूर्यवंशीच्या कारकीर्दीचा हा युगारंभ असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वैभवगाथा’ लिहिला जाईल का, हा प्रश्न ऐरणीवर आहे…

 

अखेर प्रतीक्षा संपली. वैभव सूर्यवंशीची भारतीय क्रिकेट संघात निवड अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झालीय. वैभव हे नाव आता फक्त देशभरापर्यंत मर्यादित राहिलं नाही, तर आता ते जगभरापर्यंत पोहोचलंय. फक्त १५ वर्षांचा हा बिहारचा मुलगा मागील वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नभांगणात लुकलुकला ते ३५ चेंडूंत झंझावाती शतक झळकावल्यामुळे. मग काही महिन्यांपूर्वी झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात त्यानं पराक्रम गाजवला. अंतिम सामन्यात फक्त ८० चेंडूंत १५ चौकार आणि १५ षटकारांसह त्यानं केलेल्या १७५ धावांच्या वादळी खेळीमुळे भारतानं ९ बाद ४११ धावांचा विशाल डोंगर उभारला. पुढे इंग्लंडनं शरणागती पत्करली आणि भारतानं युवा जगज्जेतेपद जिंकलं. या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूसुद्धा सूर्यवंशी ठरला होता. पण या वर्षीचं ‘आयपीएल’ आलं आणि तो तेजानं तळपला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटजगताला आपली दखल घ्यायला त्यानं भाग पाडलं.
मागील वर्षी जेव्हा त्याची ओळख देशांतर्गत क्रिकेटजगताला झाली, तेव्हा त्याचं वय खरं की खोटं ही चर्चा ऐरणीवर होती. पण या चर्चा संपवून त्यानं माझी बॅट बोलते, ती चौकार-षटकारांची भाषा, याची ग्वाही त्याने दिली. दुर्दैवानं राजस्थान रॉयल्सचं आव्हान क्वालिफायर-२मध्ये संपुष्टात आलं; पण राजस्थान रॉयल्सच्या विजेतेपदाप्रसंगी जो पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला, त्यावर पूर्णत: वर्चस्व होतं ते वैभवचं. १९ व्या हंगामातील सर्वाधिक धावांसाठीची ‘ऑरेंज कॅप’, सर्वाधिक षटकार, सर्वात मौल्यवान खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू, सर्वोत्तम स्ट्राइकर (२३७.२०) असे पाच पुरस्कार त्यानं जिंकले. त्यामुळे वैभव भारतीय संघात कधी दिसणार, या संदर्भात भारतीय निवड समिती आणि प्रशिक्षक मंडळींणी काय धोरण आखलंय, हा प्रश्न क्रिकेटजगतापुढे होता. हा वैभव पुढील काही वर्षांत देशोदेशीची मैदानं गाजवणारा क्रिकेटपटू होणार हा आशावाद इथे रुजतोय. पण खरंच वैभवगाथा लिहिली जाईल का?

वैभवच्या संभाव्य भवितव्याचा विचार करण्याआधी यंदाच्या ‘आयपीएल’मधील त्याच्या आकडेवारीकडे नजर टाकू या. त्यानं गुजरात टायटन्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात फक्त ४७ चेंडूंत ८ चौकार आणि ७ षटकारांनिशी ९६ धावांची दिमाखदार खेळी साकारली. त्याचं शतक हुकलं; परंतु असं पहिल्यांदा घडलं नव्हतं. तो या हंगामात तिसर्‍यांदा नव्वदीच्या दुर्दैवी फेर्‍यात अडकला. यावर्षी त्यानं सहा गोलंदाजांना पहिल्याच चेंडूवर षटकार हाणले, ही नावं पाहिली तरी धडकी भरेल. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा, पॅट कमिन्स, साकीब हुसैन, लुंगी एन्गिडी आणि आकाश सिंग. त्यानं गेल्या वर्षीसुद्धा त्याने चार गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. वैभवनं या हंगामात सर्वाधिक एकूण ७७६ धावा काढल्या. यात होती, पाच अर्धशतकं आणि एक शतक. वैभवनं विक्रमी ७२ षटकार मारले. अगदी राजस्थानच्या खात्यावरही २००९ (४५) आणि २०११ (४२) या हंगामांमध्ये तितके षटकार नव्हते. त्यानं मारलेल्या ७२ षटकारांच्या ४३२ धावा होतात. संघात त्याहून अधिक धावा फक्त ध्रुव जुरेलच्या (५१५) खात्यावर होत्या. यशस्वी जैस्वाल (४२७), डोनोव्हान फरेरा (३१७), रयान पराग (३०९) यांनीही तेवढ्या धावा काढल्या नव्हत्या. वैभवच्या ४३२ षटकारांच्या आणि ६३ चौकारांच्या धावा मिळून एकूण ६८४ धावा या त्यानं फक्त चौकार-षटकारांनी कमावल्या. म्हणजे ८८.१४ टक्के धावा या सीमापार फटक्यांनी त्यानं काढल्या. याहून अधिक हंगामातील एकूण धावा फक्त गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुभमन गिल (७३२) आणि साई सुदर्शन (७२२) या दोघांच्याच खात्यावर होत्या. त्यानं फक्त ९२ धावा ह्या हंगामात धावून काढल्या. याशिवाय न्यू चंदीगड येथे त्यानं धावा काढण्यासाठी फार मेहनत न करता १४० पैकी १३४ धावा सीमापार फटके मारत काढल्या.

नोव्हेंबर २०२४मध्ये १३ वर्षांच्या ह्या शाळकरी मुलाच्या समावेशासाठी ‘आयपीएल’च्या लिलावात बोली लावल्या गेल्या. ३० लाख रुपये पायाभूत किंमत असलेल्या वैभववर बोलीचा आकडा पाहता-पाहता एक कोटीचा टप्पा ओलांडून गेला. राहुल द्रविड मुख्य मार्गदर्शक असलेल्या राजस्थान रॉयल्सनं एक कोटी, १० लाख रुपये मोजून त्याला संघात स्थान दिलं. ‘आयपीएल’च्या संघाशी करारबद्ध झालेला सर्वात युवा क्रिकेटपटू हा मान मिळवत त्यानं आपलं नाव अधोरेखित केलं. वयाच्या १२व्या वर्षी त्याला विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी बिहारच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळालं होतं. जानेवारी २०२४मध्ये त्यानं १२ वर्षे, २८४ दिवसांचा असताना बिहारकडून मुंबईविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केलं. दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात युवा रणजी पदार्पणवीर हा विक्रम तेव्हाच त्याच्या खात्यावर जमा झाला. नोव्हेंबर २०२४मध्ये त्यानं ट्वेन्टी-२० क्रिकेट पदार्पण केलं ते राजस्थानविरुद्ध. त्यावेळी तो १३ वर्षे, २४१ दिवसांचा होता. मग सप्टेंबर २०२४मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघापर्यंत त्याने मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्दापणाच्या सामन्यातच त्यानं शतक झळकावलं. डिसेंबर २०२४मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध तो विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा खेळला. त्यावेळी त्याचे वय १३ वर्षे, २६९ दिवस होतं. म्हणजेच ‘आयपीएल’च्या आधीच त्यानं देशांतर्गत आणि युवा क्रिकेटचा स्तर गाजवला आहे. त्यामुळे वैभव हा देशांतर्गत क्रिकेटमधील पायर्‍या चढत इथपर्यंत आलाय.

चार दशकांपूर्वी सचिन तेंडुलकरनं असंच भारतीय क्रिकेटला आशा दाखवली आणि तिच्यातून खरोखरच सचिनगाथा लिहिली गेली. त्याचा स्तर इतका मोठा होता की, ‘क्रिकेटचा देव’ असं सचिनला म्हणतात. वयाच्या १४व्या वर्षी त्यानं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पुढे १६ वर्षं आणि २०५ दिवस या वयात त्यानं पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध त्यांच्या देशात जाऊन पदार्पण केलं. जगातला सर्वोत्तम वेगवान मारा असा लौकिक असलेल्या या संघात अब्दुल कादीरसारखा चेंडू हातभर वळवणारा फिरकी गोलंदाजही होता; पण सचिननं त्याची तमा बाळगली नाही. पुढे जो घडला, तो इतिहास आजही बर्‍याचशा पानांवर अबाधित आहे. तब्बल २४ वर्षं त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा होता. वयाबाबत चर्चा करायची तर, युवराज सिंगनंही १५व्या वर्षी रणजी पदार्पण करीत पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. शेफाली वर्मानं २०१९मध्ये फक्त १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तिच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या. पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. गेल्या आठ वर्षांत तिच्या कारकीर्दीकडे पाहिल्यास अनिश्चितता आणि सातत्याचा बराचसा अभाव दिसून येतो. हेच महत्त्वाचं असतं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासाकडे पाहिल्यास अशा अनेक क्रिकेटपटूंनी गाजावाजा करीत आपलं पाऊल आंतरराष्ट्रीय स्तरावर टाकलं; पण पुढे त्यांना तो लौकिक सार्थ ठरवता आला नाही. ते आले कधी आणि गेले कधी हेच कळेना. आता सर्वांच्या नजरा वैभवकडे आहेत.

गेल्या काही वर्षांत क्रिकेटमधल्या किमयागारांचं वय लहान लहान होतंय. अगदी वयाच्या १४ व्या वर्षी टी-२० मुंबई लीगमध्ये लक्ष वेधणारी स्वरा जाधव असो वा असे अनेक घडणारे क्रिकेटपटू आशा उंचावतायत. पण कारकीर्दीतील प्रदीर्घता टिकणं महत्त्वाचं आहे. २००७मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या संघानं पहिलं ट्वेंटी-२० विश्वविजेतेपद जिंकलं, त्यावेळी अखेरचं षटक टाकणारा जोगिंदर शर्मा त्यानंतर भारतीय संघात दिसला नाही. विनोद कांबळी, पृथ्वी शॉ, सर्फराज खान यांनीही शालेय वयात कर्तृत्व दाखवलं. पण या तिघांच्या कारकीर्दीत बरेच खाचखळगे आले. ठाण्याच्या १५ वर्षीय प्रणव धानवडेनं २०१६मध्ये १००९ धावांची मॅरेथॉन खेळी उभारत भविष्यातला तारा घडतोय अशी ग्वाही दिली. सचिन, धोनीनं मुक्त कंठानं कौतुक केलं. प्रणवचे वडील ऑटोरिक्षाचालक. त्याला गरिबीवर मात करून क्रिकेटपटू म्हणून घडता यावं, म्हणून त्याच्या प्रशिक्षणाचा आणि शिक्षणाचा खर्चही उचलला गेला. पण पुढील दीड वर्षात प्रणवला अपेक्षित सूर गवसलाच नाही. परिणामी त्याच्या वडिलांनी पत्र लिहून मुलासाठीची शिष्यवृत्ती थांबवली. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतानं २०१२मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. आई-वडील शिक्षकी पेशातले असल्याने क्रिकेटसह शैक्षणिक गुणवत्ताही त्याची कमालीची उत्तम होती. पुढच्याच वर्षी त्याने ‘द स्काय इज द लिमिट’ हे पुस्तकही लिहिलं. परंतु उन्मुक्तची कारकीर्द अपेक्षेनुसार बहरली नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यानं भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. परदेशातील लीग खेळून पैसा कमावण्याच्या हेतूनं अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं. अरमान जाफरनंही शालेय वयातील खेळीनिशी काका वसीम जाफरप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावेल अशा आशा निर्माण केल्या. पण सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. २०१८च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात कमलेश नागरकोटीनं वेगवान मार्‍यानं वाहवा मिळवली. त्यामुळे ‘आयपीएल’मध्येही त्याला संधी मिळाली. परंतु वारंवार होणार्‍या दुखापतींमुळे त्याच्या कारकीर्दीला ग्रहण लागलं.

पण वैभव या सर्व उदाहरणांना अपवाद ठरेल का? ट्वेंटी-२० हे पहिलं पाऊल. पुढे जाऊन एकदिवसीय आणि कसोटी संघसुद्धा त्याला साद घालतोय. सध्या तरी तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलंय, असं मैदानावर होतंय. परंतु त्याचा अभ्यासही सुरू झालाय. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये वैभव १६ डाव खेळला. त्यापैकी १३ डावांत तो वेगवान गोलंदाजांना तर तीन वेळा फिरकीसमोर बाद झाला. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रफुल हिंगेनं त्याला शून्यावर बाद केलं होतं. म्हणजे त्याचे कच्चे दुवे हेरले जातायत. आपण ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा फिरकीसमोर धडपडताना पाहिला. त्यामुळे वैभवची अग्निपरीक्षा सुरू झालीय. पण सातत्य टिकवलं तरच ह्या सूर्यवंशीचा युगारंभ हा वैभवगाथा लिहिणारा ठरेल!

Previous Post

पुतीनना सम्राट बनायचं आहे…

Next Post

डिग्री!

Next Post
डिग्री!

डिग्री!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.