गेल्या लेखात वेलदोड्याच्या सुगंधाची कहाणी नकळत आजच्या विषयाचे बीज पेरून गेली. पक्वान्नांच्या दरबारातील ही दोन आवळी जावळी शिलेदार रत्नेच जणू! ढोबळ विभागणी करायची तर साखरेच्या पदार्थात वेलदोडा नी गुळाबरोबर जायफळ हे ठरलेलं, अर्थात तसं काही ठाम बंधन वगैरे नाही बरं. वेलदोडे जसे महाग म्हणून कायम मोजकेच असायचे घरात व दुकानातही, जायफळं मात्र भरपूर मिळायची अलिबागला. अगदी एसटी स्टँडवरही छोट्याश्या टोपलीत जायफळं विकणार्या मावश्या फिरायच्या. कितीही सामान वा खाऊ घेतला असला तरी दुसरीकडे जातांना या सुगंधसम्राटासाठी हमखास जागा असायचीच ओघानेच मग सामानात. आजही तिथल्या स्थानिक बाजारात सहज मिळतात ही जायफळं. मध्यंतरी ओंकारने घरच्या झाडाची आणून दिली तेव्हापासून विकत घ्यावी लागली नाहीत व त्याच्या म्हणण्यानुसार कधी घ्यायचीच नाहीत आता विकत, हा भाग निराळा!
होळीचे उष्ण हवामान असो वा हसर्या नाचर्या श्रावणातील शुक्रवार वा पोळ्याचा सण असो, घराघरांत पुरण शिजल्याची वार्ता सर्वदूर पसरविण्याचे काम या जायफळांचा मधुर सुगंध तेवढ्याच उत्साहाने पार पाडतो. पुरणाच्या मुळातच खमंग असलेल्या डाळीच्या आणि गूळ वा साखरेच्या स्वादागंधाला खुलविण्यात जायफळाला तोड नाही. वेलदोडे, केशर काही घाला वा नका घालू पण पुरणात जायफळ मात्र हवेच, नाही का? श्रीखंड बासुंदीचा स्वाद तर खुलवतेच हे जायफळ, पण गुजराती मोहनथाळाचीही चव या सुगंधाशिवाय अपूर्णच की. ह्याखेरीज एक हृद्य व कालौघात काहीशी लुप्त पावत असलेली जायफळाची आठवण म्हणजे फिल्टर कॉफीची. बेताची गोडी आणि जायफळाचा छानसा स्वाद असलेली फार कडक नसलेली कॉफी नक्कीच चाखली असेल अनेकांनी.
पूर्वी कॉफीपानांच्या समारंभात आपला आब राखून असायची ही मधुरा! कॉफीचा कडवटपणा जरी मनापासून आवडत असला तरी त्या जायफळयुक्त कॉफीची बातच काही और! केवळ गोड पदार्थांतच जायफळाची वर्णी लागते असं नाही बरं, अगदी ब्रोकोलीच्या सूपमध्येपण जायफळ वापरले जाते. शाही बिर्याणी तर जायपत्रीखेरीज अपूर्णच! ह्या सगळ्यांबरोबर हमखास बनवलं जाणारं जायफळांच्या सालींचं लोणचं विसरून नाही हो चालणार, फार छान स्वाद येतो त्याचा!
आयुर्वेदातही या जायफळाला विशेष स्थान आहेच की. आपल्या घराघरांत तान्ह्या बाळांना पूर्वापार घुटी पाजली जाते त्यातही जायफळाची वर्णी असतेच. एखादे दिवशी मूल जरा जास्त किरकिर करत असलं की आजीबाईने जायफळाचा एक वेढा जास्त उगाळलाच म्हणून समजा! नंतर आपोआप मूल शांत झोपलं आणि ताजतवानं झालं की त्याच्या जोडीला सगळं घरदारही सुखावतं, नाही का? अतिप्रमाणातील मात्रा जरी व्यवहार्य नसली तरी जायफळाचा प्रमाणबद्ध वापर आपल्याकडे परंपरागत औषधशास्त्रात सांगितला आहेच. या विशिष्ट व मधुर गंधाचा सर्वात मोठा गुण व उपयोग म्हणजे सेवन करणार्याच्या मनावरचा ताणतणाव हलका वा दूर करणे होय! हा गुण समजला नी मुळातच आवडणारा हा मधुगंध माझ्या नजरेत जास्तीच श्रेष्ठ ठरला!
बदलत्या जीवनशैलीचे म्हणा वा जीवघेण्या स्पर्धेचे म्हणा मनावर होणारे परिणाम ताणतणावांना नकळत खतपाणी घालतातंच नं? अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या ताणतणावांना कमीजास्त प्रमाणात सामोरं जावं लागतंच की. स्वतःच्या ताणतणावांवर ़फुंकर घालण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांना त्यांच्या व्यवधानांमधून दोन फुरसतीचे, समाधानाचे क्षण देणे. पेरलेले उगवते ह्या न्यायाने आपलेही जीवन सुकर होते हे निश्चित! ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा.’ तुकोबाराय किती सहज व्याख्या करून गेलेत नं? हे संतपण ही सात्विकता काही अंशी का होईना प्रत्येकातच असते, त्याला खतपाणी घालून जोपासणे नक्कीस श्रेयस्कर ठरते. या सगळ्याची पहिली पायरी म्हणजे सुगंधी जायफळाचा वसा घेणे होय असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. दुसर्याच्या जखमा बर्या करणं हातात नसलं तरी फुंकर मारून क्षणभर का होईना सुसह्य करता येतेच की परिस्थिती. तीच गत मानसिक ताणतणावांची पण. आपापली लढाई सगळेच जण लढत असतात, विसाव्याचे दोन क्षण जर एकमेकांसाठी निर्माण करता आले तर नकळत आपले सच्चे माणूसपण अधोरेखित होईल, नाही का? वार्याची एक झुळूक जरी कायमसाठी वातावरण बदलवू शकत नसली तरी क्षणभर सुखावून पुढच्या उष्म्याला सामोरं जायचं बळ देते नं, तसाच हा जायफळाचा मनांना सैलावणारा, शांतावणारा मधुर सुगंध! आपण जर कोणासाठी असे जायफळ बनू शकलो तर काय बहार येईल, नाही का? काय हरकत आहे मग प्रयत्न करायला?

