गणेशवाडी पोलीस स्टेशनमध्ये रात्रीचे साधारण दहा वाजले होते. नाईट राऊंडची तयारी सुरू होती. सर्वजण नुकतेच जेवणाचे डबे संपवून हात धुवत असतानाच अचानक पोलीस स्टेशनच्या लँडलाईनचा फोन वाजला. ठाणे अंमलदारांनी तत्परतेने रिसिव्हर उचलला. पलीकडून अत्यंत घाबरलेल्या आणि थरथरणार्या आवाजात एक व्यक्ती बोलली, ‘हॅलो… मी रमेश डगळे बोलतोय साहेब, गणेशवाडीतील भागात आमच्या शेजारी राहणारे अजय मोरे… त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीये! लवकरात लवकर पोलिस पाठवा साहेब!’
ठाणे अंमलदारांनी या गंभीर फोन कॉलची माहिती काम संपवून घरी निघालेले इन्स्पेक्टर सतीश लोंढे यांच्या कानावर घातली. इन्स्पेक्टर लोंढे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कंट्रोल रूमला फोन करून वायरलेस व्हॅन आणि फॉरेन्सिक व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना करण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे ठाणे अंमलदारासह दोन कर्मचार्यांना घेऊन ते स्वतः सरकारी जीपमध्ये गणेशवाडीच्या दिशेने रवाना झाले.
काही मिनिटांतच पोलिसांच्या गाड्या सायरन देत अजय मोरे यांच्या घरासमोर येऊन थांबल्या. परिसरात लोकांची मोठी गर्दी जमली होती. तणावाचे आणि दहशतीचे वातावरण पसरले होते. इन्स्पेक्टर लोंढे गाडीतून उतरून गर्दीतून वाट काढत घरात प्रवेश करणार इतक्यात फोन करणारा शेजारी रमेश डगळे पुढे आला. तो अत्यंत घाबरलेल्या स्थितीत इन्स्पेक्टर लोंढे यांच्याशी बोलू लागला.
इन्स्पेक्टर : ‘नेमकं काय घडलंय इथे? शांतपणे सांगा.’
रमेश डगळे (हात जोडून, थरथरत्या आवाजात) : ‘साहेब, काय सांगू तुम्हाला! साधारण एक तासापूर्वी… रात्री नऊ-साडे नऊच्या सुमारास स्वाती वाहिनी धावत आमच्याकडे आल्या. रडत होत्या. त्यांनी सांगितले की त्यांचे मिस्टर आत दरवाजा लावून बेडरूममध्ये बसले आहेत, बराच वेळ झाला मी जेवण करण्यासाठी त्यांना बोलवत आहे, बर्याच हाका मारल्या पण ते उत्तर देत नव्हते. मग मी त्यांच्या मोबाइलवर देखील कॉल केला, रिंग वाजल्याचा आवाज येत आहे, पण उचलत नाहीत. ते काही प्रतिसाद देत नाहीत, त्याच्यामुळे मला भीती वाटायला लागली आहे. नको नको ते विचार मनात यायला लागले आहेत. तर प्लीज चला, असं त्या म्हणू लागल्या… अजय बर्याच वर्षांपासून सोसायटीत राहत आहे आणि तो काही दिवसांपासून दारू पिऊन असा गोंधळ घालतो, हे माहित होते, म्हणून फार सिरीयसली घेतले नाही.’
इन्स्पेक्टर : ‘तुम्ही आल्यावर काय पाहिलंत?’
रमेश डगळे : ‘आम्ही सगळे धावत यांच्या घरी आलो. अजय यांचा बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. आम्ही बाहेरून जोरजोराने दरवाजा ठोठावला, हाका मारल्या, पण आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. आत काहीच हालचाल होत नव्हती.’
इन्स्पेक्टर : ‘मग दरवाजा उघडला कसा?’
रमेश डगळे : ‘साहेब, बराच वेळ आतून काहीच आवाज न आल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी मिळून एकत्र जोर लावला आणि तो दरवाजा जबरदस्तीने तोडूनच आत प्रवेश केला… आणि साहेब, आतलं दृश्य पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली! अजय पंख्याला लटकलेले होते!’
इन्स्पेक्टर लोंढे यांनी रमेश डगळेचे हे संपूर्ण म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. आत प्रवेश करून त्यांनी सर्व परिस्थिती पाहिली, डेड बॉडी खाली उतरवून तिचे संपूर्ण निरीक्षण केले तसेच मयताची स्थिती, ज्यावर मयत लटकलेला आहे तो पंखा, त्याचे मानेवरील गाठ, बाजूला पडलेला स्टूल याची पाहणी केली. मयताच्या अंगावर कुठे मारहाण किंवा जबरदस्तीने लटकावल्याच्या खुणा दिसतात का, ते देखील त्यांनी पाहिले. सर्व परिस्थिती पाहता प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्येची केस असावी असा कयास त्यांनी बांधला, परंतु जे दिसते त्याच्या पलीकडे पाहण्याची पोलिसी दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांनी दिसत्या परिस्थितीवर विश्वास न ठेवता खात्री होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्ट तपासायचे ठरविले. पूर्ण खात्री होण्यासाठी व तसे पुरावे गोळा करण्यासाठी व यामागे काहीतरी भयानक रहस्य किंवा घातपात असल्यास त्याचा वेध घेण्यासाठी त्यांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला घराची व मयताची तपासणी करून पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले. घरात फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांची तपासाची कारवाई वेगात सुरू होती. इन्स्पेक्टर लोंढे यांनी आता स्वातीकडे मोर्चा वळवला.
इन्स्पेक्टर : ‘मॅडम… शांत व्हा. आम्हाला तुमच्या शेजार्यांनी सांगितलं की अजय काही दिवसांपासून खूप टेन्शनमध्ये होता. नेमकी काय परिस्थिती होती घरात? ते तुमच्याशी आत्महत्येविषयी किंवा कोणत्या टेन्शनविषयी काही बोलले होते का?’
स्वाती (मोठा हुंदका देऊन थरथरत्या आवाजात) : ‘साहेब… काय सांगू तुम्हाला! गेल्या काही महिन्यांपासून कंपनीतील नोकरी गेल्यामुळे ते पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर झाला होता. त्यांना सतत हेच टेन्शन खायला उठलं होतं की आता कुटुंबाचा आणि मुलाचा खर्च कसा भागवायचा, आपल्याला व्यवस्थित संसार चालवता येत नाहीये…’
इन्स्पेक्टर : ‘आत्महत्या वगैरे असा काही विषय काढला होता का त्यांनी?’
स्वाती : ‘हो साहेब… ते मला सारखे सांगायचे की आपल्यावर खूप कर्ज झालंय आणि मी आता कुणाला तोंड देऊ शकत नाही. पण मी त्यांना नेहमी समजून सांगायचे, म्हणायचे, ‘अहो, तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? वाईट दिवस सगळ्यांवर येतात, आपण मिळून यातून मार्ग काढू. वाटल्यास मी बाहेर लोकांकडे धुणी-भांडी करेन, चार पैसे जास्त कमवीन, तुम्हीही दुसरं एखादं छोटं-मोठं काम बघा, पण असं खचून जाऊ नका!’ मी त्यांना प्रत्येक वेळी धीर देण्याचा प्रयत्न केला साहेब…’
इन्स्पेक्टर : ‘मग असं असताना त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असावं असं तुम्हाला वाटतं?’
स्वाती : ‘माझं ऐकून ते वरवर शांत व्हायचे, पण मनातून ते प्रचंड निराश झाले होते. त्यांना ते सहनच होत नव्हतं. याच टेन्शनमुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जास्त प्रमाणात दारू प्यायला सुरुवात केली होती. मी त्यांना कितींदा तरी रोखलं, भांडलेसुद्धा, की दारू पिऊन प्रश्न सुटणार नाहीत; पण ते कोणाचं ऐकतच नव्हते… मी पण आत्महत्या करतो आणि तुम्हालाही मारून टाकतो असे ते बोलायचे. त्यामुळे मी घाबरून पोलीस स्टेशनला देखील याविषयी तक्रार केली आहे… आणि शेवटी त्यांनी हे सगळं संपवून टाकलंच!’
फॉरेन्सिक टीमने सर्व घराची तपासणी केल्यानंतर त्यांनी बेडवर पडलेला मोबाइल इन्स्पेक्टर लोंढे यांना दिला. त्यांनी तो तपासला त्यात स्वातीचे मिस्ड कॉल्स दिसत होते. त्यांनी त्याचे व्हॉट्सअॅप उघडून पाहिले, त्यात गणेशवाडी प्रâेंड सर्कल या त्याच्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आणि त्याच्या चुलत भावाला आणि पत्नीला एक शेवटी मेसेज पाठवला होता, ‘माझी नोकरी गेल्यापासून मी आर्थिकदृष्ट्या खूप कर्जबाजारी झालो आहे. मी बायको-मुलांचा सांभाळ करू शकत नाही, ही गोष्ट मला फार सलतेय. त्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीची आणि मुलांची काळजी घ्या. स्वाती मला माफ कर, माझ्या आत्महत्येशी कोणाचाही संबंध नाही. त्याकरिता कोणालाही जबाबदार धरू नये.’
हा मेसेज पाहून हा नैराश्यातून केलेला आत्महत्येचाच प्रकार आहे, असे पोलिसांना वाटत होते. पुरावे आणि मेसेज जुळत असल्यामुळे पोलीस हे प्रकरण बंद करण्याच्या तयारीत होते. अजयच्या मृत्यूला पाच दिवस लोटले होते. पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर लोंढे टेबलवर बसून इतर कागदपत्रांची छाननी करत असतानाच हवालदार केबिनमध्ये आले आणि त्यांच्या टेबलावर एक पांढरे पाकीट ठेवले.
हवालदार (दमल्या स्वरात) : ‘साहेब! सरकारी रुग्णालयातून अजय मोरे यांच्या मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.’
इन्स्पेक्टर लोंढे (तत्परतेने पाकीट उघडत) : ‘आण बघू… नेमका काय शेरा दिलाय डॉक्टरांनी?’
इन्स्पेक्टर लोंढे यांनी तो रिपोर्ट वाचायला सुरुवात केली. सुरुवातीच्या पानावर वैद्यकीय परिभाषेत मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद केले होते : मृत्यूचे कारण: ‘फटका बसल्यामुळे किंवा गळफास बसल्याने श्वास गुदमरल्यामुळे झालेला मृत्यू.’
डॉक्टरांचा प्राथमिक रिमार्क असा होता : ‘गळ्यावरील फाशीची खूण आडवी किंवा तिरकस आहे, जी गळफास घेतल्याशी जुळणारी आहे. आतील तपासणीत श्वसननलिकेमध्ये रक्त साचल्याचे आणि घशातील ‘हायॉइड’ हाड फाशीमुळे मोडल्याची सामान्य लक्षणे दिसून आली आहेत.’
इन्स्पेक्टर लोंढे यांनी ती प्राथमिक माहिती वाचून डोळे मिटले आणि ते विचार करू लागले की सर्वकाही अगदी सरळसरळ आत्महत्येसारखेच दिसते आहे. पण त्यांनी रिपोर्टच्या खालील पानावर आणि
डॉक्टरांच्या अंतिम शेर्याकडे नजर टाकली, तशा त्यांच्या भुवया आकुंचन पावल्या आणि त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलला. रिपोर्टमधील एका विशिष्ट ओळीने त्यांना विचार करायला भाग पाडले. रिपोर्टच्या त्या पानावर स्पष्ट लिहिले होते : ‘मृताच्या पोटात आणि रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण अतिशय जास्त आहे (सुमारे ३५० मिलिग्राम प्रति १०० मिली रक्त). इतक्या नशेमुळे, व्यक्तीचे मेंदूवर नियंत्रण राहत नाही. गंभीर ताण, शरीराचा समतोल बिघडणे, बेशुद्ध अवस्थेत जाणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या नशेतली कोणतीही व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहण्यासही शारीरिकदृष्ट्या असमर्थ असते; मग ती व्यक्ती स्टुलावर चढणे, पंख्यावर दोरी टाकणे, घट्ट गाठ बांधणे आणि स्वतःला गळफास लावून घेणे यांसारख्या शारीरिक समन्वयाची कृत्ये करणे शक्य नाही.’
इन्स्पेक्टर लोंढे यांनी तो रिपोर्ट खाली टेबलावर ठेवला आणि ते एका क्षणासाठी पूर्णपणे चक्रावून गेले. त्यांचे डोळे संशयाने अधिक तीव्र झाले. ते स्वत:शीच पुटपुटले, ‘हे कसं शक्य आहे?! एवढा नशेत धुंद झालेला माणूस स्वतः स्टुलावर चढून, पंख्याला दोरी बांधून गळफास कसा घेऊ शकतो?’ सुरुवातीला अगदी साधा, कागदोपत्री क्लिअर वाटणारा तो आत्महत्या प्रकरणाचा अहवाल आता एका भयंकर आणि थंड डोक्याने रचलेल्या खुनाचा प्रकार वाटू लागला होता. लोंढे यांच्या डोक्यात चक्रे वेगाने फिरायला लागली.
पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी आणि भक्कम पुराव्यांच्या शोधात ते डीबी पथकासह थेट अजय मोरे यांच्या घरी पुन्हा पोहोचले. घराचे मुख्य दार उघडेच होते. आत प्रवेश करताच समोर स्वाती, तिचा कौटुंबिक मित्र गणेश (जो पहिल्या दिवसापासून तिच्यासोबत होता) आणि अजयचा लहान मुलगा उपस्थित होते. अचानक पोलिसांना दारात उभे असलेले पाहून स्वातीच्या चेहर्यावर एक क्षणासाठी भीतीची छटा उमटली आणि तिचे पाय थरथरले. तिने स्वतःला सावरत धावतच पुढे येऊन घाबरत, ओठांवर कृत्रिम हसू आणत विचारले, ‘साहेब… तुम्ही पुन्हा इथे?’
इन्स्पेक्टर म्हणाले, ‘स्वाती मॅडम, घाबरू नका. त्या दिवशी घराबाहेर खूप गर्दी असल्यामुळे घाईगडबडीत आम्हाला तुमच्याशी व्यवस्थित बोलता आलेलं नव्हतं, तसेच घराची नीट तपासणीही करता आली नव्हती. म्हणून आज आम्ही सविस्तर तपासासाठी आलो आहोत.’ लोंढे आणि त्यांचे पथक संपूर्ण घरभर पसरले. त्यांनी प्रत्येक डायर्या, टेबल, खुर्च्या, आणि बेडरूमचा प्रत्येक कोपरा तपासला, पण फॉरेन्सिक टीम आधीच येऊन गेल्यामुळे त्यांना उघड्या डोळ्यांनी घरात वेगळे काहीही संशयास्पद आढळले नाही. परंतु या तपासणीत स्वाती आणि गणेश हे काहीसे अस्वस्थ असल्याचे त्यांना जाणवले.
काही वेळाने इन्स्पेक्टर लोंढे तपासणी संपवून हॉलमध्ये आले. बाहेर पडणार इतक्यात त्यांची पावले थबकली. त्यांनी दोन पावले मागे घेतली आणि माघारी फिरून बेडरूमच्या मुख्य दरवाज्याचे बारकाईने निरीक्षण करू लागले. त्यांची नजर दरवाज्याच्या अगदी वर असलेल्या त्या हवेशीर झडपेवर गेली. ती झडप बंद होती आणि संपूर्ण घराची साफसफाई नीट होत नसल्यामुळे त्या झडपेच्या काचेवर धुळीचा जाड थर साचला होता. पण इन्स्पेक्टर लोंढे यांची गरुडासारखी तीक्ष्ण नजर त्या धुळीवर खिळली. त्या धुळीने मळलेल्या झडपेच्या काचेवर चार बोटांचे स्पष्ट ठसे उमटलेले त्यांना दिसले! लोंढे यांच्या मनात क्षणात विचार चक्रावले, ‘जर हा दरवाजा आणि ही झडप पूर्णपणे आतून बंद होती आणि दरवाजा शेजार्यांनी फोडल्याशिवाय उघडलाच नव्हता, तर या बंद झडपेच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे हाताचे बोटे कसे उमटले? याचा अर्थ ती उघडण्याचा प्रयत्न केला गेला असेल किंवा उघडली असेल. याचा या घटनेशी तरी काही संबंध नाही ना? धुळीचा थर जुना आहे त्यावर असणारे ठसे वरवर तरी अलीकडचे वाटत आहेत.’
लोंढे यांच्या चेहर्यावर एक रहस्यमय आणि जिंकल्यासारखे स्माइल आले. त्यांनी कोणताही आवाज न करता, मागच्या बाजूला उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलला खुणेने जवळ बोलावून त्याच्या कानात हळू आवाजात म्हणाले, ‘तिकडे बघ… त्या झडपेच्या काचेवर बोटांचे उमटलेले ठसे दिसतायत का? चुपचाप आपल्या फोनच्या कॅमेर्याने फोटो घे आणि फॉरेन्सिक युनिटला बोलावून या बोटांच्या ठशांचे क्लोज-अप फोटोंसह नमुने गोळा करून घे! परंतु या लोकांना कळले नाही पाहिजे, एकट्या एक्सपर्टला यायला सांग.’
कॉन्स्टेबलने तत्परतेने मान डोलवली आणि लोंढेंच्या बेरकी नजरेने गुन्ह्याचा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा हेरला होता. कॉन्स्टेबलने लगेच कॉल करून फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलावून घेतला. इन्स्पेक्टर लोंढे यांनी स्वाती आणि गणेश यांना बोलत ठेवून मेन दरवाज्यापर्यंत नेले. त्यानंतर कॉन्स्टेबलला म्हणाले, ‘अरे, आपण फरशीपासून छतापर्यंत अंतर हे पंचनाम्यात घेतलेले नाही, ते घ्यावे लागेल, ते माप दोघेजण जाऊन घेऊन या.’ कॉन्स्टेबलने इशारा समजून घेतला, फॉरेन्सिक लॅबकडून आलेला एक्सपर्ट आत घेऊन गेला आणि त्यांनी त्या खिडकीच्या झडपेवर असलेले बोटांचे ठसे मॅग्नेटिक पावडरचा वापर करून अधिक स्पष्ट करून आणि विशेष पारदर्शक टेपच्या मदतीने जसेच्या तसे ‘लिफ्ट’ करून घेतल्यानंतर सर्वजण बाहेर आले. इन्स्पेक्टर लोंढे यांनी लॅब एक्सपर्टला लवकरात लवकर रिपोर्ट पाठवायला सांगितले. एक्सपर्ट म्हणाला, ‘ज्या संशयिताच्या बोटांच्या ठशाशी हे ठसे जुळतात की नाही हे पाहायचे आहे, त्यांच्याही बोटांचे ठसे आपल्याला लागणार आहेत.’ इन्स्पेक्टर लोंढे यांनी काही वेळ विचार केला. थोड्या वेळाने त्यांनी सांगितले, स्वाती आणि गणेश यांना पोलीस ठाण्यात फोन करून बोलावून घ्या. त्यांना तपासातल्या काही फॉर्मेलिटीज पूर्ण करायच्या आहेत, असे सांगा. हवालदारांनी दोघांना तसा निरोप दिला.
स्वाती आणि गणेश पोलीस ठाण्यात आले. त्यांच्याशी इन्स्पेक्टर लोंढे अवांतर गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता त्यांनी त्या दोघांसाठी चहा आणायला सांगितला…ठरल्याप्रमाणे कॉन्स्टेबल तुकाराम काचेच्या ग्लासवर इतर कोणाचे ठसे राहणार नाहीत अशी काळजी घेऊन चहाचे ग्लास ट्रेमध्ये घेऊन आले. स्वाती आणि गणेश यांनी चहाचे ग्लास घेतले, चहा पिऊन झाल्यानंतर टेबलवर ठेवले. काही वेळ गप्पा झाल्यानंतर दोघे निघून गेले. ते गेल्यानंतर कॉन्स्टेबल तुकाराम यांनी शास्त्रीय पद्धतीने दोन्ही ग्लास सील पॅक करून फॉरेन्सिक लॅबकडे नेले.
इन्स्पेक्टर लोंढे यांना खात्री होती की बेडरूमच्या दरवाजावरील झडपेच्या धुळीने मळलेल्या काचेवरचे चार बोटांचे ठसे हा या प्रकरणातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे. एखादी व्यक्ती धूळ किंवा मळाने झाकलेल्या पृष्ठभागास स्पर्श करते, तेव्हा त्वचेवरील घाम, तेल यामुळे धुळीचे कण विस्थापित होतात आणि बोटांच्या वळणांचे स्पष्ट नमुने तिथे उमटतात. संध्याकाळी त्यांनी फिंगरप्रिंट एक्सपर्टला फोन करून रिपोर्ट मागवला. लॅबमधील ऑटोमेटेड फिंगरप्रिंट्स आयडेंटिफिकेशन्स सिस्टमद्वारे हे ठसे स्वातीच्या बोटांच्या ठशांशी तंतोतंत जुळले. धुळीचा थर जाड आहे आणि त्यावर बोटांचा दाब पडला आहे, यावरून तो ठसा ताजा आहे की जुना, हे मोजले जाते. दरवाजा उघडण्यासाठी किंवा कडी लावण्यासाठी वर हात ताणल्याशिवाय तो ठसा उमटणे शक्य नाही, असा निष्कर्ष उच्च रिझोल्यूशन कॅमेरे आणि थ्रीडी स्कॅनर वापरून काढण्यात आला.
इन्स्पेक्टर लोंढे यांच्या संशयाला आता फॉरेन्सिक पुराव्याची जोड मिळाली. दरवाजा आतून बंद होता आणि शेजार्यांनी दरवाजा तोडल्याशिवाय उघडलाच नव्हता, तर बंद झडपेच्या आतल्या किंवा बाहेरील बाजूला धुळीवर बोटांचे ठसे आले कसे? जर बाहेरून आत काय चाललंय हे बघण्यासाठी जर झडपेला हात लावला असता, तर मग आतून हाताचे ठसे कसे काय उमटले असते. आणि झडपेतून पाहिले असते तर स्वातीने किंवा साक्षीदारांनी हे सांगितले असते. तसे काही कोणीही पाहिले नाही किंवा सांगितलेले नाही. मग हे काय होते?
याचे एकमेव उत्तर होते, खून झाल्यानंतर मारेकर्याने बाहेरून किंवा आतून हात घालून ती झडप बंद केली होती किंवा कडी लावण्याचा प्रयत्न केला होता. स्वातीशिवाय त्यावेळी घरात कोणी नव्हते. स्वातीने शेजार्यांना बोलावल्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडला होता आणि आत प्रवेश केला होता. त्यामुळे झडपेवर असलेले हाताचे ठसे ही या गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावाच होता. फॉरेन्सिक
लॅबच्या रिपोर्टमुळे स्वातीच आरोपी आहे हे सिद्ध होत होते.
या एकाच फॉरेन्सिक पुराव्याने स्वातीकडे संशयाची सुई वळली खरी. परंतु ती त्याच घरात राहते, गृहिणी आहे, तर तिचा ठसा कामाच्या ओघाने येऊ शकतो, असा बचाव घेतला जाऊ शकतो; त्यामुळे अजून पुरावा लागणार, हे लक्षात आल्याने इन्स्पेक्टर लोंढे यांनी तपासाची दिशा स्वातीभोवती केंद्रित करण्याचे ठरवले. त्यांनी स्वातीच्या मोबाइल फोनचा सीडीआर काढला आणि डीबी पथकातील लोकांना तिच्यावर पाळत ठेवायला सांगतात. त्यांना एक गोष्ट लक्षात आली की अजय आणि स्वाती यांच्या घरी गणेशचे वारंवार येणे होत असे. विशेषतः दुपारी अजय कामाला गेल्यानंतर बर्याच वेळा गणेश त्यांच्या घरी आल्याचे सोसायटीच्या वॉचमनने सांगितले. त्याचबरोबर स्वातीचे वागणे बदललेले पाहून सोसायटीच्या महिलांमध्ये देखील कुजबूज सुरू होती, ही माहिती मिळाली. त्यांनी तिच्या सीडीआरचा अभ्यास केला, तेव्हा घटनेच्या आधी एक दिवस आणि नंतर एक दिवसानंतर बर्याच वेळा आणि बरेच कॉल स्वाती आणि गणेश यांच्यात झालेले आहेत, हे दिसून आले. परंतु ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मात्र त्यांच्यामध्ये कॉल झालेला नव्हता. त्यामुळे इन्स्पेक्टर लोंढे यांचा संशय अधिक वाढत गेला.
भक्कम पुरावा मिळेपर्यंत तिला हटकायचे नाही, हे त्यांनी ठरवले होते. त्यांची खात्री होती की एवढा मोठा अपराध ती एकटी करू शकणार नाही, यामध्ये आणखी इतर कोणीतरी तिला मदत करणारे होते. त्यामुळे जोपर्यंत त्या सहआरोपीपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपण स्वातीला अटक करायची नाही असे त्यांनी ठरवले.
(स्वातीच्या सहआरोपीपर्यंत पोलिस कसे पोहोचले ती कहाणी वाचा पुढच्या अंकात.)

