• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कोकणी स्वयंपाकातील कल्पतरू: कुळीथ

शुभांगी जोशी (चवदार साठवण)

marmik by marmik
May 29, 2026
in चवदार साठवण
0
कोकणी स्वयंपाकातील कल्पतरू: कुळीथ

आजी मग उलगडा करून सांगे, बयो आपण राहतो डोंगरावर, भाज्या मिळतात दाभोळला, रोज कोण आणून देणार आणि उन्हाळ्यात भाज्या मिळत नाहीत. बरं, आपण शेतात कुळीथ लावले की बारा महिने कडधान्य घरात. परत आल्या-गेलेल्यास पुरवठीस येत. पटकन करायला सोपे.

गुढघ हे गाव उंच डोंगरावर, हिरवे गार! झुळझुळ वाहणारे पाण्याचे झरे, पोफळीच्या बागा, आंबे, नारळ, जांभ, पेरू एक ना अनेक झाडे. त्यातून पायवाटेने चालत जाताना मजा यायची. मध्येच एखादे वानर टुण्णकन उडी मारून समोर येई. पाटाच्या गार पाण्यात पाय बुडवून बसायचा आनंद औरच. गावठी गुलाबांचे ताटवेच्या ताटवे… त्यांचा सुगंध अजून मनातून जात नाही. मध्येच कोकिळेची साद, त्याला उत्तर म्हणून भारद्वाजचे कुककुक… सगळा आसमंत निसर्गाच्या किमयेने भारलेला.

हा काळ म्हणजे सत्तरच्या दशकाचा, मी साधारण चौथीत होते. हे माझ्या मामीचे गाव. तिच्या बाळंतपणासाठी मी तिच्याबरोबर हट्टाने गेले होते. तेव्हा तिथे वीजही नव्हती. दिवस उनाडकीत जायचा पण रात्र झाली की पाचावर धारण! कंदिलाच्या उजेडात सर्व कामे चालत. गडी आणि कामकरी बायका मला मुद्दाम घाबरवत,’ वाघ येतो, रानडुक्कर येतात.’ असे सांगत. मग मी आबांच्या बरोबर त्यांच्या मागोमाग फिरत असे. गोठ्यात धारा काढताना कंदील धरून उभी राही, मनात (रामराम) चालू असे. पडवीत, माजघरात, ओटीवर, सगळीकडे. उंच डोंगरावर उगम पावणार्‍या झर्‍यातून पन्हाळीद्वारा घरापर्यंत येणारे थंडगार आणि अतिमधुर पाणी.

मामीच्या माहेरी गुलाब शेती होती, आजही आहे. गुलकंदासाठी लागणारा हा गुलाबी रंगाचा व एक वेगळा सुगंध असणारा गुलाब. त्याचे ताटवेच्या ताटवे आसपास असायचे.या गुलाबांना खूप राखण लागायची. जरा जरी लक्ष विचलित झाले तर आसपास वावरणारी वानरसेना क्षणात हे सर्व पूर्ण वाढलेले गुलाब खाऊन फस्त करायची. चिनी मातीच्या मोठ्या रांजणांमध्ये या गुलाबाच्या पाकळ्या मुरवून उत्तम दर्जाचा गुलकंद बनवण्याची प्रथा आजही तेथे चालू आहे.

मग मामीच्या आजीची हाक येई, ‘बयो जेवावयास ये.’ भूक लागेलेलीच असे. मग केळीच्या पानावर गरम भात, त्यांवर तूप, आंबोशीचे लोणचे, पोह्याचा पापड आणि गरमागरम कुळथाचे पिठले.

अहाहा… आजीच्या हातच्या पिठल्याची चव अजून जिभेवर तशीच रेंगाळते आहे. जेवणं उरकली की अंगणात सुपारी सोलायला कामकरी बायका आलेल्या असत, त्यांच्याबरोबर माझी लुडबुड चालू असे. त्यातल्या काहीजणी सांगत सर्दीला आम्ही कुळथाचे कढण देतो. मला प्रश्न पडे, चहा द्यायचा सोडून हे काय प्यायचे! जे गुणधर्म कुळथात आहेत ते त्या चहात कुठले असणार? असो, ते वय हे गुणधर्म समजण्याचे नव्हतेच.

दोन दिवसांनंतर सकाळच्या जेवणात कुळथाची उसळ, त्याचेच कढण, पोळी. रात्री पोळी नसे, आठवड्यातून तीन वेळा तरी कुळथाची उसळ, कढण व रात्री पिठलं हा मेन्यू ठरलेला असे. मला कंटाळा येई, मनात विचार येई, ‘हे लोक भाज्या का नाही करत?’ आजी मग उलगडा करून सांगे, बयो आपण राहतो डोंगरावर, भाज्या मिळतात दाभोळला, रोज कोण आणून देणार आणि उन्हाळ्यात भाज्या मिळत नाहीत. बरं, आपण शेतात कुळीथ लावले की बारा महिने कडधान्य घरात. परत आल्या-गेलेल्यास पुरवठीस येत. पटकन करायला सोपे. सर्दी, ताप, लघवीचा त्रास यांवर रामबाण उपाय म्हणजे कुळथाचं पिठलं. कुळथाच्या वेलींचे सर्व भाग उपयोगात येतात. कुळीथ भाजून गार झाले की भरडतात, मग त्याची डाळ निघते, टरफलं जनावरांना घालायची. बरं, शेंगा काढून झाल्या की उरलेल्या काड्यांचा उपयोग म्हशीच्या आंबोणात होतो.

अजून एक आठवण दापोलीला मामाकडे कीर्तनाला गोविंदबुवा आफळे आले होते (चारूदत्त आफळे यांचे वडील). कीर्तन संपल्यावर घरी आले आणि मामीला म्हणाले, ‘वहिनी, पक्वान्नं राहू देत बाजूला. मला आपले चुलीवरचे कुळथाचे पिठले कर.’ भल्याभल्याना वेड लावते हे पिठले. लग्नाच्या जेवणावळी झाल्या की श्रमपरिहाराला कुळथाचं पिठलं, भात, पोह्याचे पापड, खाराची मिरची हा ठरलेला बेत. कोकणात मुलगी झाली की कुळथाच्या घुगर्‍या वाटायची पद्धत. मामा कोळथरला वर्ग घ्यायला जात असे. खूप श्रमदान आणि तालीम झाली की मुलांना तांब्या भरून पिठलं प्यायला दिले जाई. ही अतिशयोक्ती नाही, मी पाहिलं आहे. मुलं काटक व चपळ सगळी. पिठल्याचे किती गोडवे गायले तरी कमीच.

आपल्या नवीन पिढीला याची महती कळण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी मी तुम्हाला कुळथाचे पिठले आणि कुळथाच्या पाटवड्या या दोन लोकप्रिय खाद्यकृतींची सविस्तर माहिती सांगत आहे.

कुळथाचं पातळ पिठलं
साहित्य –
१ चमचा भरून कुळीथ पीठ
२ दोन चमचे तेल
३ ते ४ मिरच्यांचे तुकडे
५ लसूण पाकळ्या
२ कोकमाचे तुकडे
चवीनुसार मीठ
कृती –
दोन वाटी पाण्यात कुळथाचे पीठ कालवून घ्या. लसूण ठेचून घ्या, मिरच्यांचे तुकडे करा.
पातेलीत तेल घ्या, ते तापल्यावर मोहरी, हिंग, लसूण, मिरची, घालून चरचरीत फोडणी करायची. नंतर कालवलेले पीठ त्यात घाला. मीठ व आमसूल घाला.
चांगली उकळी येऊ द्या पिठल्याला. झकास पिठलं तयार.

कुळथाच्या पाटवड्या
ही रेसिपी आजीची. हरभरा डाळ पचायला जड म्हणून ती कुळथाची करायची. बाळंतीणीला आण्िा आजारी माणसाला पण चालते.
साहित्य –
१ वाटी कुळथाचे पीठ
१ चमचा तांदूळ पिठी
७/८ लसूण ठेचून
मीठ, तिखट, कडीपत्ता, तेल
कृती – पहिल्यांदा पिठात पाणी घालून सरसरीत भिजवा, त्यात मीठ, मिरची, (कुटून) घाला.
कढईत तेल घाला, चरचरीत फोडणी करा, लसूण आणि कडीपत्ता चांगला खमंग परता.
आता बनवलेले मिश्रण त्यात सोडा आणि चांगली दणकून वाफ आणा.
ताटलीला तेल लावून ठेवा. मिश्रण त्यावर ओतून थापा. जरा गार झाले कि वडी पाडून घ्या. वरून खोबरे व कोथींबीर भुरभुरा.
कुळथाला इंग्रजीत Horsegram असे म्हणतात. म्हणजे मराठीत ‘अश्वखाद्य ‘ म्हणावे का? प्रथिनांनी परिपूर्ण असे हे अन्न खाऊन गती आणि मती अश्वगती होत असेल तर ते योग्यच नाही का?

Previous Post

युवा पिढीच्या अंतर्मनाचे दर्शन!

Next Post

`रामनगरी’-एक भन्नाट कहाणी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.