
दादा कोंडके त्यावेळी `अपना बाजार’मध्ये काम करायचे. त्यांचं `जनता कलापथक’ होते, `खणखणपूरचा राजा’ हे वसंत सबनीस लिखित लोकनाट्य ते करीत असत. रामही त्यात करायचा. अखेर राम नोकरी आणि कलापथक ही तारेवरची कसरत करता करता थकला आणि नोकरीचा राजीनामा देऊन त्यात थेट पुणं गाठलं.
`मार्मिक’चा वर्धापनदिन मी त्यावेळी मुंबईत होतो. पुण्यातील सेवादल कलापथकात सामील झालो होतो. निळूभाऊ फुले यांच्यामुळे इतर कलाकारांबरोबर ओळखी, मैत्री होत होती. राम नगरकर यांच्याशी थोडीशी ओळख झाली होती. पण प्रत्यक्ष रंगमंचावर त्याचा अभिनय बघितला नव्हता. तो योग आला. `मार्मिक’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आणि तेथूनच आमच्या मैत्रीच्या खर्या अर्थाने प्रारंभ झाला.
सभागृह तुडुंब भरले होते. दादा कोंडके त्यांचे सर्व साथीदार आणि निळू फुले यांनी रंगमंचावर प्रवेश केला आणि सुरू झाला.
चिनी आक्रमणाचा फार्स
शाहीर : हिमालयाच्या शिखरावरुनी डोकावतोय!
साथीदार : कोण डोकावतोय?
शाहीर : डोकावतोय हा लाल चिनी
साथीदार : डोकावतोय हा लाला चिनी
शाहीर : मुलुख आपुला गिळायला टपलाय बसलाय बगळा साधुवानी
साथीदार : बसलाय बगळा साधुवाणी
शाहीर : त्याचा करायला खुर्दा
साथीदार : भले!
शाहीर : चल ऊठ की रं मर्दा!
साथीदार : भले!
शाहीर : त्याचा करायला खुर्दा उठ की रं मर्दा, भागायचं नाय आता बसुनी शिनी त्याला मराठी मुलखाचं दाव पानी…
शाहीराच्या या ओळी साथीदार डफ तुणतुणं, ढोलकी, झांज यांच्या साथीनं उचलून धरतात आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांतून एक धिप्पाड माणूस उठून उभा राहतो आणि म्हणतो-’जमायचं न्हाई, हे जमायचं न्हाई’. सारे प्रेक्षक त्याच्याकडे बघू लागतात. तो माणूस प्रेक्षकांतून वाट काढत रंगमंचाकडे येऊ लागतो.
शाहीर त्याला रंगमंचावरूनच विचारतो-
शाहीर : मधे कोण बोललं?
तो माणूस : मी बोललो…असं म्हणत तो कम्युनिस्ट पुढारी रंगमंचावर प्रवेश करतो. आणि तास दीड तास शाहीरांची आणि कम्युनिस्ट पुढार्यांची जुगलबंदी सुरू राहते.
पाटलाचे काम करणारे निळू फुले मधनं–मधनं या जुगलबंदीला कांदा-लसूण-मिरचीची शाब्दिक खमंग फोडणी देत असतात. टाळ्या-हशांच्या गजरात कम्युनिस्ट पुढारी रंगमंचावरून पळ काढतो आणि शाहीर आणि साथीदार खड्या आवाजात गाऊ लागतात… ’लाल चिन्यांनो! खबरदार खबरदार जर याल पुढे, जवान हिंदी इथे खडे ध्वजा तिरंगी नभी चढे!’
असा हा `चिनी आक्रमणाचा फार्स!’
चीनने `हिंदी चिनी भाई-भाई’चे गाणे गात गाफील राहिलेल्या भारतावर आक्रमण केले. आपल्याला पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली एक कम्युनिस्ट पक्ष वगळता सारा देश पेटून उठला. कम्युनिस्टांनी मात्र चीनची तळी उचलून धरली. आचार्य अत्रे त्यावेळी कम्युुनिस्ट पक्षाच्या बाजूचे होते आणि ते चीनचे समर्थन करीत होते. त्यांना खणखणीत उत्तर देणे आवश्यक होते. चीनचा नीचपणा भारतातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याची नितांत गरज होती. दादा कोंडके यांनी आपल्या `चिनी आक्रमणाचा फार्स’ या वगनाट्यातून हा ज्वलंत आणि जिवंत प्रश्न जनतेसमोर मांडला हे सारे सविस्तर सांगण्याचा हेतू एवढाच की शाहीर दादा कोंडके आणि आचार्य अत्रे आणि कम्युनिस्ट पुढारी यांचं सोंग वठवणारे राम नगरकर यांची अभिनयातून, गाण्यातून सवाल-जबाबामधून अशी काही धमाल-जुगलबंदी झाली की हशा टाळयांनी हॉल दणाणून गेला. राम नगरकरांनी अशी काही धमाल उडवून दिली की त्याच्यातला रांगडा, बहुरुपी सोंगाड्या त्यांचे नाचणे-गाणे, चिडणे, रडणे, तडफडणे आणि स्टेजवरून अखेर पळ काढणे- सारेच भुलवून गेले. या हरहुन्नरी माणसाशी स्नेह जमवायचा अशी खूणगाठ बांधतच मी घरी परतलो.
राम नगरकरबरोबर मैत्र जमू लागले ते त्याने पुण्यात टिळक रस्त्यावर `वंदन हेअर कटिंग सलून’ सुरू केल्यानंतरच. त्यापूर्वी तो मुंबईत पोस्टमन म्हणून काम करीत होता. राष्ट्रसेवादल कलापथकात वसंत बापट, लीलाधर हेगडे, सदानंद वर्दे, सुधा वर्दे, प्रमिला दंडवते, मधू कदम यांच्यासह लोकनाट्यात, महाराष्ट्र दर्शन अशा कार्यक्रमात सहभागी होत होता. कलापथकात काम करताना वाट्टेल ती कारणं सांगून नोकरीवर दांड्या मारायचा. मुंबईच्या फोर्ट विभागात नगरकरांचं हेअर कटिंग सलून होते. नोकरीपेक्षा कलाक्षेत्राकडे याचा ओढा अधिक. दादा कोंडके त्यावेळी `अपना बाजार’मध्ये काम करायचे. त्यांचं `जनता कलापथक’ होते, `खणखणपूरचा राजा’ हे वसंत सबनीस लिखित लोकनाट्य ते करीत असत. राम ही त्यात करायचा. अखेर राम नोकरी आणि कलापथक ही तारेवरची कसरत करता करता थकला आणि नोकरीचा राजीनामा देऊन त्यात थेट पुणं गाठलं.
पुण्यात त्याचं आसन स्थिर करायला, `वंदन हेअर कटिंग’ (एअर कंडिशन) काढायला, लोकमान्य नगरमध्ये त्याला राहण्यासाठी जागा मिळवून द्यायला निळूभाऊंनी जी मदत केली त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. आम्ही सारे मित्र त्याचे साक्षी आहोत.
राम प्रथमपासून गोष्टीवेल्हाळ! मित्र जमविण्याची प्रचंड आवड. हळू-हळू त्याच्या `वंदन’च्या फुटपाथवर मित्रांचा मेळावा जमू लागला. भाई वैद्य, बाबा आढाव, मधुकर निरफराके, चंदू बोराटे, आणि सेवादलाचे लोक अशी मंडळी जमू लागली. समोरच्या ’उदय विहार’मध्ये एक कप चहात दोघे अशा गप्पा रंगू लागल्या. मधून मधून त्या फडात अशोक शहाणे, द.मा. मिरासदार अशी मंडळीही सामील झाली. मीही वेळ मिळाली की त्यांच्यात मिसळू लागलो.
रामला उत्स्फूर्त विडंबन काव्य करण्याची उपजतच आवड. बघता बघता तो कवितेचे झकासपैकी विडंबन काव्य करायचा-
बर्फ पेटला खूप भडकला
सीमेवरती चला फक्त
शस्त्र घ्या, फक्त अस्त्र घ्या
या समरगीताचे बसल्या बसल्या विडंबन केलेले मी बघितले आहे…
बंब पेटला. खूप तापला.
आंघोळीला चला.
फक्त वस्त्र घ्या.
फक्त वस्त्र घ्या…
असे हावभाव करीत तो म्हणत होता.
ही ’चिंधी-नाही कुणाची मिंधी’ अशी एका कवितेची विडंबन आवृत्ती अभिनयासकट फुटपाथवर त्यानं मला ऐकवली होती. मला एकट्यालाच नाही. त्याला भेटणार्या प्रेक्षकाला त्याने ती ऐकवली असणार.
`विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस यांच्या लोकनाट्याने धम्माल उडवून दिली. `छपरी पलंगाचा वग’ हा वीणा मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले लोकनाट्य! दादा कोंडके यांनी रंगमंचावर आणले. साहित्य संघ मुंबई येथील जाहिरातीच्या बोर्डवर दादा कोंडके, राम नगरकर, नीलांबरी आणि इतर कलाकारांच्या नावाबरोबरच निळू फुले यांचेही नाव वाचल्याचे माझ्या चांगले स्मरणात आहे. पण प्रत्यक्ष प्रयोगात ते कधीच नव्हते.
`विच्छा माझी पुरी करा’च्या सुरुवातीच्या प्रयोगांना फारशी गर्दी नसायची. पण वसंत सबनीस आणि दादा कोंडके यांची `मुंबईची लावणी` आणि बतावणी जशी सुरू झाली तसतशी गर्दी वाढू लागली आणि या `विच्छा’मुळेच दादांनी `सदिच्छा चित्र’ ही चित्रपट संस्था काढली. आणि `सोंगाड्या’ या पहिल्या चित्रपटातून ते पंचविसाव्या चित्रपटापर्यंत गर्दीचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठला. `दादा कोंडके’ ही स्वतंत्र नाममुदा चित्रपटसृष्टीत उमटवली.
`विच्छा’ मध्ये राम `हल्या’चे म्हणजे राजाच्या मेव्हण्याचे काम करायचे. राजाच्या बायकोचा भाऊ! एक हात वाकडा. अंगावर ढगळ, खाकी कपडे, डोक्यावर खाकी हॅट, काखेत काठी अशा रुपातला हा हल्या. पोलीस परेडात ऑर्डर देत राम रंगमंचावर प्रवेश करायचा. त्यानंतर दादा आणि त्यांची अभिनयाची अशी कुस्ती, कसरत सुरू व्हायची की प्रेक्षकांची हसून हसून पोटं दुखायची. दोघेही कसलेले, कलंदर, हजरजबाबी. पुढं कुठं घोडं पेंड खाल्लं कुणास ठाऊक, पण राम आणि दादा विच्छामधून बाहेर पडले. दादांनी इतके सिनेमे केले, पण रामला रुपेरी पडद्यावर यायची संधी दिली नाही. पुढं `सोंगाड्या’नंतर निळूभाऊही दादांच्या चित्रपटात दिसले नाहीत.
`कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्याची कथा कल्पना अमृत गोरे यांची होती. त्यावर शंकर पाटलांनी लोकनाट्य लिहिले. निळू फुले, राम नगरकर, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे असे कलाकार. ग.दि.माडगूळकर यांची गीतरचना आणि राम कदम यांचे संगीत असा सरंजाम होता. पहिला प्रयोग सांगलीला झाला. पण पसरट रचनेमुळे त्यात रंग भरला नाही. सगळे काळजीत पडले. प्रयोग संपल्यानंतर यातील प्रमुख मंडळी झोप न घेता काटछाटीला बसली. सकाळपर्यंत नवीन रंगावृत्ती तयार झाली. मग ही मंडळी २-३ तास झोपली. सकाळी ११ वा. नवीन रंगावृत्तीसह या सर्वांनी कसून तालीम केली. मग आंघोळ, जेवण आणि कोल्हापूर गाठलं. रात्री `कथा…’ चा प्रयोग असा काही रंगला की त्यानं निळू फुले आणि सर्व मंडळी अवाक् झाली. त्यानंतर ’कांद्यानं…’ जे बाळसं धरलं. त्याची हिरवीगार पात `हाऊसफुल्ल’चे बोर्ड मिरवू लागली. अधून मधून मी या प्रयोगात छोटी-छोटी कामे केली. कांदा कसा फुलत गेला याच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी या सर्व कलाकारांच्या तोंडून ऐकताना मज्जा यायची.

निळू फुले, राम नगरकर हे माझ्या खास मैत्रीतले आहेत, याची कल्पना माझे मामा आणि `मनोहरचे’ संपादक श्री.भा.महाबळ यांना होतीच. यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे, यांच्या कलेचे कौतुक झाले पाहिजे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. निळूभाऊंच्यावर स्वतंत्र लेख लिहिला. त्यासाठी निळूभाऊंनी स्टुडिओत जाऊन ब्लॅक अॅण्ड व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो काढला होता, हे माझ्या चांगलेच स्मरणात आहे.
राम नगरकरची बोलण्याची हातोटी, विविध किस्से यांचे सूक्ष्म निरीक्षण करून महाबळांनी त्यांच्याकडे ’मनोहर’चे सदर लिहिण्याची सूचना केली. राम म्हणाला, ’मी बोलू शकतो पण लिहिण्याचा मला अजिबात सराव नाही.’ महाबळांनी त्यावर तोड काढली. वंदनसमोरील फुटपाथवर किंवा उदय विहारमध्ये राम, महाबळ आणि मी गप्पा मारत बसायचो. राम अभिनय किस्से सांगायचा. महाबळ ते मनातल्या मनात टिपून घ्यायचे. घरी गेल्यावर ते सर्व ते लेखात रुपांतर करायचे. मी त्याचे वाचन करायचो आणि मग ते ’मनोहर’मध्ये प्रसिद्धीला जायचं. सदराचं `राम नगरी’ हे नाव आणि सदरावरती एक पाय पसरुन बसलेला माणूस आणि त्याच्या हातातील एक फूल ही कल्पनाही संपादक महाबळ आणि त्यांच्या इतर सर्व सहकार्यांचीच! हळू हळू राम स्वत: प्रसंग लिहू लागला. आपल्या जाड तिरक्या अक्षरातील पाने तो महाबळांकडे देऊ लागला. महाबळ त्यावर संपादकीय संस्कार करून लेख प्रसिद्ध करू लागले. अशी आहे `राम नगरी’ची भन्नाट जन्मकथा!
या राम नगरीमुळे मराठी वाङ्मयात मोलाची भर पडली. पुढं `रामनगरी’ हे स्वतंत्र आत्मकथनाचे पुस्तक प्रकाशित झाले. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांनी त्यावर एक अप्रतिम लेख लिहिला आणि रामनगरीला सर्व स्तरातून वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अमोल पालेकर या सुप्रसिद्ध कलावंत आणि दिग्दर्शकाने त्यावर स्वतंत्र चित्रपट निर्माण केला. `रामनगरी’चे एकपात्री प्रयोग राम करू लागला. तेही लोकप्रिय झाले. या सगळ्या यशाबद्दल राम अतिशय नम्र होता. त्यानं याबद्दल म्हटलं आहे की, ’`रामनगरी’ हा सुरुवातीला नुसता एक धोंडा होता. पु.ल.देशपांडे यांनी या दगडाल्ाा शेंदूर फासला आणि त्याला देव बनविला आणि म्हणूनच या दगडाला देवपण प्राप्त झाले.’ रामचे हे नम्रपणाचं बोलणं असलं तरी पु.ल. हे कुठल्याही दगडाला शेंदूर फासणारे ऐरेगैरे नव्हते. त्यांना त्यात गुण दिसले म्हणूनच त्यांनी त्यावर लिहिले. रामनगरीमध्ये तेवढे सामर्थ्य ठासून भरलेले आहे.
राम विठोबा नगरकर, जन्म- नगर जिल्ह्यातील सारोळे गावचा. जन्मदिनांक ५ एप्रिल १९३०. न्हावी समाजात जन्म. लग्नाच्या वरातीत शिंग वाजवायचे काम या जमातीकडे असायचं म्हणून `शिंगाडे’ असेही लोक यांना हाकारायचे. लहानपणीच मुंबईत राहायला आले. बालपण नकला, गाणी आणि उनाडक्या करण्यात गेलं. शिक्षण बेताचं. मुंबईत पोस्टात नोकरी आणि त्याच सुमारास एस.एम्.जोशी, प्रा. वसंत बापट, लीलाधर हेगडे, सुधा वर्दे, मधू कदम या समाजवादी सेवादलातील दादा लोकांशी संबंध आणि या सर्वांशी झालेल्या मैत्रीमुळेच कलेची वाट रामला मोकळी झाली. उपजतची विनोदबुद्धी, अभिनय, गाणी म्हणण्याची हौस आणि उत्कृष्ट कथनशैलीमुळे राष्ट्रसेवादल कलापथकाला अत्यंत भरवशाचा कलाकार अशी प्रशंसा प्राप्त झाली. निळू फुलेसारखा जिवाभावाचा मित्र लाभला आणि रामच्या जीवनात राम आला.
रामचा एक मुलगा अशोक. मी ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होतो त्या विद्या महामंडळ (आता आपटे प्रशाळा) मध्ये माझा विद्यार्थी होता. तो सतत आजारी असायचा. त्याने निदान दहावी तरी पूर्ण करावी अशी रामची इच्छा होती. पण त्याला क्षयाची बाधा झाली आणि तो विद्यार्थीदशेतच मरण पावला. रामचा दुसरा मुलगा वंदन. हा हरहुन्नरी होता. तो एकपात्री कलाकार संघटना चालवायचा. रामचा वारसा त्यानं पुढं चांगला चालविला होता. दुर्दैवाने तोही अकाली गेला. रामची मुलगी आणि लिलाधर हेगडे यांचा मुलगा यांचा विवाह झाला आणि राम आणि लिलाधर व्याही-व्याही या नात्याने जोडले गेले. जात-पात-धर्म आम्ही मानत नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिले. रामची पत्नी राधाबाई अशिक्षित पण अत्यंत कुशलतेने संसार सांभाळणारी, तोंडाने फटकळ पण अंतरंगी अतिशय मायाळू. या सर्वांचाच माझा उत्तम संबंध आला.
’हर्या नार्या झिंदाबाद’, ’बायांनो नवरे सांभाळा’, ’लक्ष्मी’, ’एक डाव भुताचा’ असे काही चित्रपट रामच्या नावावर आहेत. पण त्याचे नाते रंगमंचाशी अतिशय निकटचे होते. तेही लोकनाट्याच्या मुक्त अभिनयाच्या क्षेत्रातले.
पु.ल. देशपांडे यांनी `फुलराणी’ हे नाटक लिहिले. त्यातील पात्रांची निवड करताना त्यांनी राम नगरकरला मंजुळेचा बाप दगडोबा साळुंके या पात्र कामासाठी निवडले. निळू भाऊंनी त्यांना बजावून सांगितले. `राम, पुलंच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची मोठी संधी तुला मिळाली, त्याचं सोनं कर. जाताना कोरी पाटी घेऊन त्यांच्याकडे जा. राम मुंबईला गेला. तालमी सुरू झाल्या. नाटक `भाषा’शास्त्र यावर आधारलेले. नाटकातील प्रत्येक वाक्य अन् वाक्य महत्त्वाचं! रामला लोकनाट्यातील ऐनवेळेला संवाद टाकण्याची सवय. त्याला काही ते पाठांतर जमलं नाही.चार दिवस झाले आणि राम परत पुण्याला आला. रामने ही सुवर्णसंधी गमावली असेच आम्हा त्याच्या सर्व मित्रांचे म्हणणे आहे.

पण राम हा अस्सल कलावंत होता, याचा मी प्रत्यक्ष घेतलेला अनुभवही फार महत्त्वाचा आहे. मुंबईतील एका अंधशाळेत रामचा कार्यक्रम होता. आपल्याबरोबर कोणीतरी सोबतीला असावे असा रामचा आग्रह असायचा. ’`ए गोरा राम’ येतोस का माझ्यााबरोबर मुंबईला? चल, जिवाची मुंबई करू!’ तो स्वत:ला `काळा राम’ आणि मला `गोरा राम’ असं हाकारायचा. त्याच्या सोबतीला मी गेलो, पण मलाच धाकधूक वाटू लागली. रामच्या कायिक, वाचिक आणि उत्स्फूर्त अभिनयाची मला पुरेपुर ओळख झालेली. इथे तर सगळी अंध मुले! यांच्यासमोर रामचा टिकाव कसा लागणार? माझ्याच जिवाची घालमेल सुरू झाली. कसाबसा सावरुन मी खुर्चीवर जाऊन बसलो. रामचा कार्यक्रम सुरू झाला आणि पहिल्या पाच सहा मिनिटातच `आंधळी’ (?) पोरं खुदखुदून हसू लागली, टाळ्या वाजवून, अंग घुसळून घुसळून दाद देऊ लागली. सुमारे दीड तास `रामनरी’चा कार्यक्रम रंगत-रंगतच गेला. कार्यक्रम संपला तेव्हा रामच्या चेहर्यावरचे कृतकृत्यतेचे जे भाव मला दिसले ते मी आजही विसरु शकत नाही. मी रामला नमस्कार केला आणि एकच वाक्य म्हणालो- `राम नगरकर! `काळा राम जिंकला! गोरा राम हरला!!’
रामची पत्नी गेली आणि राम खचला. त्याची उमेदच संपली. एरवी अखंड बोलणारा जोक सांगणारा राम उदासवाणा झाला. अखेर ८ जून १९९५ रोजी त्याची प्राणज्योत पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये मालवली. मला वार्ता कळली, तेव्हा मी तडक तिथे गेलो. बाहेरच्या पटांगणातील झाडाखाली निळूभाऊ आणि मित्र मंडळी बसली होती. अजून रामची बॉडी ताब्यात मिळायची होती. मी त्यावेळी सुयोगच्या संस्थेत ’जावई माझा भला’ या नाटकात काम करीत होती. प्रयोग सकाळचा होता. त्यामुळे मला रात्रीच मुंबईला जाणे आवश्यक होते. मी माझी अडचण निळूभाऊला सांगितली. निळूभाऊंनी ‘लागलीच निघ’ असा सल्ला दिला. रामचं अंत्यदर्शन न घेताच मी तेथून निघालो.
दोन दिवसांनी परत आलो तेव्हा समजलं- `राम नं मृत्यूपत्र केलं होतं. त्यात त्यानं देहदानाची इच्छा प्रगट केली होती. त्याप्रमाणे कोणतेही अंत्यसंस्कार न होता रामचा मृतदेह रुग्णालयात देण्यात आला होता.
वरून रांगडा. ओबडधोबड, विनोदी, सोंगाड्या वाटणारा राम नगरकर नावाचा बहुरुपी अवलिया अंत:करणाने किती कोमल होता, समाजसेवेचे भान असणारा होता आणि मरुनसुद्धा देहदानरुपाने जिंदादिल होता याचा प्रत्यय मला आला आणि `तेथे कर माझे जुळले!’

