
२०२१सालच्या ऑक्टोबर महिन्यापासून रशियानं युक्रेनच्या हद्दीवर फौजेची जमवजमव सुरू केली. बेलारूस आणि मोल्डोवा हे देश युक्रेनला लागून आहेत. रशियानं सैन्याच्या तुकड्या त्या देशांत हलवल्या, त्या बाजूनं युक्रेनच्या हद्दीजवळ आणून ठेवल्या. युक्रेनच्या दक्षिणेच्या क्रायमियात तर रशियाच्या फौजा आधीपासून होत्याच, कारण २०१४ साली युक्रेनचा हा भूभाग रशियानं हडपला होता. शिवाय युक्रेन रशियाच्या हद्दीजवळ रशियन सैन्य तैनात झालं.
सुमारे १.९ लाख सैनिक होते.
सॅटेलाईटवरून सार्या जगाला सैनिकांची हलवाहलव दिसत होती. रशिया मोठ्या हल्ल्याची, आक्रमणाची, लढाईची तयारी करत होतं हे उघड होतं. युरोपीय देश आणि युक्रेननं चिंता व्यक्त केली. पुतीन म्हणाले की जमवाजमव युद्ध सरावासाठी केली आहे. जगातली सर्व सैन्यं लष्कराची तयारी करण्यासाठी, लष्कर कार्यक्षम ठेवण्यासाठी असे युद्ध सराव वेळोवेळी करत असतात.
मागं क्रायमिया गिळण्याच्या आधी नेमका हाच उद्योग पुतीन यांनी केलेला असल्यानं पुतीन लबाडी करत आहेत हे जगाच्या लक्षात आलं. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन पुतीनशी फोनवर बोलले. एकदा जिनेवात प्रत्यक्ष भेटले. पहिल्या संभाषणात त्यांनी सभ्यपणानं चौकशी केली, पुतीननी आक्रमणाचा उद्देश नसल्याचं सांगितलं. दुसर्या संभाषणात बायडन म्हणाले की तुम्ही लबाडी करताहात, आक्रमण करणार आहात असा आमच्या गुप्तचर संस्थेचा अहवाल आहे, आक्रमण केलंत तर तुम्हाला गरम पडेल, अमेरिका स्वस्थ बसणार नाही. तिसर्या आणि नंतरच्या संभाषणात जाम तणातणी झाली असं म्हणतात.
या काळात युक्रेनच्या डोनबास प्रांतात रशियन सैन्यानं आधीच ठाण मांडलेलं होतं, दररोज या गावावर नाही तर त्या गावावर रशियन तोफखाना मारा करत होताच. सहा सात वर्षांपासून ही हाणामारी सुरू असल्यानं जग तिकडं दुर्लक्ष करत होतं. १७ डिसेंबर २०२१ रोजी रशियन सरकारनं एक पत्रक प्रसिद्धीसाठी दिलं. त्यात नाटो (NATO) या संस्थेला आणि तिच्यात सामील देशांना अंतिम इशारा दिला होता. नेटोचा विस्तार थांबवा, १९९७पूर्वीपर्यंत जिथवर नेटो होतो तिथवर परत जा. याचा अर्थ पोलंड व इतर बाल्टिक देशांमध्ये नेटोनं ठेवलेले लष्करी तळ हटवा. युरोपमध्ये अमेरिकेनं ठेवलेली अण्वस्त्र हटवा. मुख्य म्हणजे युक्रेनला नेटोमध्ये सामील करून घेऊ नका. या मागण्या नेटोनं बर्या बोलानं मान्य कराव्यात, नाही तर रशिया लष्करी कारवाई करेल आणि नंतरच्या घटनांची जबाबदारी रशियावर राहणार नाही.
हे पत्रक काढण्याआधी दोन महिने रशियानं दोनेक लाखाचं लष्कर तय्यार ठेवलंच होतं.
२१ फेब्रुवारीला रशियानं डोनबास प्रांतातल्या (युक्रेनमधल्या) डोनेस्क आणि लुहान्स्क ही शहरं स्वतंत्र राज्य झाली आहेत असं जाहीर केलं आणि त्या राज्यांच्या संरक्षणासाठी लष्कर त्या शहरांत घुसवलं. २२ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता पुतीन टीव्हीवर आले. त्यांनी युक्रेनमध्ये ‘विशेष कारवाई’ सुरू झालीय असं जाहीर केलं. त्यांच्या मते हे ‘युद्ध’ नव्हतं. कीव या राजधानीपासून १० किमी अंतरावर असलेल्या होस्टोमेल विमानतळावर रशियन छत्रीधारी सैनिक उतरले, त्यांनी विमानतळ ताब्यात घेतला. त्याच वेळी वॅग्नर ग्रुप ही पुतीन यांची खाजगी सेना कीवमध्ये पोचत होती. या सेनेला सूचना होत्या, ‘युक्रेन मंत्रीमंडळातले सदस्य शोधून काढून त्यांना मारा.’ वॅग्नर ग्रुपचे सैनिक कीवमध्ये पोचत आहेत याची पूर्वकल्पना युक्रेनला अमेरिकन इंटेलिजन्सनं दिली होती. झेलेन्स्की यांना कीवमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था अमेरिकेनं केली होती. झेलेन्स्कींनी कीव सोडायला नकार दिला.
वॅग्नर ग्रुप त्यांना हुडकून मारायच्या तयारीत असताना झेलेन्स्की कीवच्या मुख्य चौकात पोचले. परिस्थिती काय आहे याची कल्पना त्यांनी दिली, रशियाच्या आक्रमणापुढं झुकणार नाही, युक्रेनची जनता लढाई देईल असं त्यांनी कॅमेर्यासमोर जगाला सांगितलं.
बेलारूसमधून निघालेलं सैन्य कीवच्या दिशेनं निघालं. क्रायमियातलं सैन्य उत्तरेला युक्रेनमल्या खारकीव या शहराच्या दिशेनं निघालं. डोनबासमध्ये तर सैन्य आधीपासूनच घुसलेलं होतं. रशियन सेनापतींनी पुतीनना आश्वासन दिलं होतं की ‘विशेष मोहीम’ जेमतेम तीन दिवस चालेल. त्यांचा प्लॅन असा; कीवचा ताबा घेतला जाईल, युक्रेनचं सरकार बरखास्त होईल, रशियाधार्जिणा माणूस युक्रेनचा प्रेसिडेंट होईल. रशियात राखून ठेवलेल्या कोणत्या युक्रेनी माणसाला प्रेसिडेंट करायचं, इतका किरकोळ तपशील फक्त बाकी होता. राजधानी काबीज झाली की प्रेसिडेंट रशियातून दाखल होणार होता.

तीन दिवस उलटून गेले. ना कीव पडलं, ना खारकीव रशियाच्या ताब्यात आलं. खारकीव रशियाच्या हद्दीपासून फक्त ३२ किमी अंतरावर असूनही रशियन सैन्य खारकीवपर्यंत पोचू शकलं नाही. कीव आणि खारकीवमधील युक्रेनचं सैन्य आणि नागरिक टिच्चून उभे राहिले, त्यांनी रशियन सैन्य रोखलं.
महिन्याभरातच रशियन सैन्य दक्षिण आणि पूर्व युक्रेनमध्ये ठिकठिकाणी पोचलं. तुंबळ लढाई सुरू झाली. रशियन तोफखाना आणि मिसाईल्स युक्रेनी गावातील इमारती उद्ध्वस्त करत करत पुढं सरकत. काही काळानं युक्रेनचं सैन्य तिथं पोचे, रशियन सैन्याशी मुकाबला करून रशियन सैन्याला पळवून लावत असे. उद्ध्वस्त शहर युक्रेनच्या ताब्यात येई. पुन्हा रशियन सैन्य उद्ध्वस्त शहरावर हल्ला करून उद्ध्वस्त इमारतींवरच मिसाईल आणि बाँबफेक करे, शहर ताब्यात घेई. हाच लढाईचा पॅटर्न पूर्ण युद्धभर पूर्ण युक्रेनभर राहिला. युद्द युक्रेनच्या भूमीवर होत असल्यानं युक्रेनी मरत किंवा विस्थापित होत, दुसर्या गावात जात, नाही तर दुसर्या देशात जात. तीन दिवसांची लढाई तीन वर्षांहून अधिक काळ चालली. पण निकाल लागला नाही. युक्रेन लढत राहिलं, रशियाला युक्रेनवर ताबा मिळाला नाही.
रशियन विमानं आणि मिसाईल युक्रेनमध्ये खोलवर जाऊन बाँबफेक करत. विमानं आणि मिसाईल पाडणं येवढंच युक्रेनच्या हाती होतं. बाँब आणि मिसाईल पडल्यानंतरच्या विध्वंसाला तोंड देणं येवढंच युक्रेनच्या हाती होतं. जमिनीवर रशियन लष्कर रोखणं, त्यावर हल्ले करणं अशा तर्हेनं युक्रेनची लढाई बचावाची होती. युक्रेनला आक्रमक होता येत नव्हतं. रशियात दूरवर जाऊन बाँबिंग करणं, मिसाईल टाकणं युक्रेनला जमत नव्हतं. तशी शस्त्रं युक्रेनकडं नव्हती.
दुसरं म्हणजे पुतीननी धमकी दिली होती की युक्रेननं रशियावर हल्ला केला तर रशिया अणुबाँब वापरेल. त्यामुळं लढाईच्या उत्तरकाळात युरोपीय देश आणि अमेरिकेनं युक्रेनला भेदक शस्त्रं दिली असली तरी त्यांचा वापर करायला युरोप-अमेरिका परवानगी देत नव्हतं. युरोपच्या मदतीवर युक्रेन अवलंबून होतं. युक्रेननं जर रशियावर हल्ला केला तर पुतीन युरोपीय देशांशी लढाई पुकारेल अशीही भीती युरोपला होती. त्यामुळंही युरोप प्रभावी शस्त्रं युक्रेनला देत नव्हतं, दिली तर वापरायला परवानगी देत नव्हतं.
युद्धाच्या उत्तरार्धात स्थिती बदलली. युक्रेननं ड्रोनचा वापर सुरू केला. काळ्या समुद्रातल्या रशियाच्या नौदल ताफ्यातल्या मोस्कवा या बोटीवर युक्रेनच्या ड्रोननी हल्ला केला. या बोटीवर मिसाईल्स होती. बोट नष्ट झाल्यानं रशियाचं नुकसान झालं, युक्रेनवर हल्ला करू शकणार्या मिसाईल्सची संख्या घटली. रशियाच्या मनोधैर्यावर परिणाम झाला. २०२५च्या जूनमध्ये युक्रेननं रशियात खोलवर जाऊन हवाई तळावर हल्ला केला. युक्रेननं अवजड बाँब लादलेले ड्रोन ट्रकवर लादून रशियन हवाई दलाच्या केंद्राच्या अगदी नजीक नेऊन ठेवले. ट्रकच्या ड्रायव्हरनाही माहित नव्हतं की त्यांच्या ट्रकमध्ये काय आहे. रशियन सरकारलाही या ट्रकचा सुगावा लागला नाही. ठरल्या वेळी दूरनियंत्रण यंत्रणा वापरून युक्रेननं ट्रकचं छप्पर उघडलं, ड्रोन उडवले, ड्रोन विमानांच्या जवळ गेले, विमानांवर बाँब टाकले. काय घडतंय ते कळायच्या आताच रशियाची ११ पेक्षा जास्त लढाऊ विमानं नष्ट झाली.
या हल्ल्यानंतर पुतीन आधीची धमकी खरी करून युरोपवर स्वारी करतील अशी भीती युरोप अमेरिकेला होती. पण तसं घडलं नाही. रशियानं युक्रेनवरचे हल्ले अधिक तीव्र केले, संख्येनंही वाढवले.
*********
युक्रेनमधलं प्रत्येक गाव
ही एक कहाणी आहे.
३५ हजार लोकसंख्येचं बुचा हे गाव कीवच्या वाटेवर आहे. रशियन सैन्य बुचामध्ये शिरलं. या गावात एक छोटी लढाई होऊन गेली होती, त्या लढाईत युक्रेनी तुकडीनं रशियन तुकडी नष्ट करून युक्रेनी तुकडी निघून गेली होती. रशियन तुकडीला प्रतिकार झाला नाही. सैनिक गावातल्या लोकांशी मित्रत्वाच्या नात्यानं वागत होते. एका रशियन बुचातल्या नागरिकाला म्हणाला म्हणाला, ‘आपण काय करतोय ते आपल्याला कळत नाहीये, पुढं काय करायचं तेही सांगितलेलं नाहीये, आम्हाला दिलेलं रेशनही अगदी कमी आहे, एका माणसाचं रेशन सहा माणसांत वाटून घ्यायचंय. केव्हा ही तीन दिवसीय कारवाई संपतेय आणि घरी परततोय असं आम्हाला झालंय. तुम्ही आम्हाला मदत करा’.
तिसर्या दिवशी रसद संपली. सैनिक पिसाटले. दुकानात घुसून तिथले पदार्थ खाऊ लागले. मग घराघरात घुसून घरातले अन्नसाठे पळवायला सुरुवात केली. लोकांचा विरोध सुरू झाला, प्रतिकार सुरू झाला. सैनिकांची वागणूक बदलली.तीनेक दिवस त्यांनी रणगाड्यात, जीपमध्ये वगैरे कसेबसे काढले. पण हे किती दिवस लांबणार ते कळेना, रात्रीची झोपही नाही. सैनिकांनी घरांचा ताबा घ्यायला सुरुवात केली. घरात घुसायचे, घर मोकळं करा, निघून जा म्हणून सांगायचे. लोक ते कसं मान्य करणार? लोक विरोध करू लागले.
नकार आला. गोळ्या घालून ठार केलं. प्रेतं उचलून रस्त्यावर टाकून सैनिकांनी घर घेतलं. घरातल्या माणसांचे कपडे वापरायला सुरुवात केली, त्यांचे सेल फोन वापरायला सुरुवात केली. दुसरं घर, तिसरं घर. एक प्रेत, दुसरं प्रेत, तिसरं प्रेत.
दुकानदारानं प्रतिकार केला. त्याचे हात पाठीमागं बांधले. रस्त्यावर नेला, गोळ्या घातल्या. आसपासच्या इमारतीतले लोक सारा प्रकार पाहात होते. खिडकीतून हे पहात असलेल्या लोकांना स्नायपरनं गोळ्या घालून मारलं. मेलेला माणूस धाडकन जमिनीवर पडला. प्रेतांची संख्या एकानं वाढली.
एक गयावया करणारा माणूस. त्याला जायला सांगितलं. आपण वाचणार या कल्पनेनं तो धावत सुटला, त्याला पाठून गोळ्या घातल्या.
युद्ध आणि बलात्कार यात काही तरी नातं आहे. अन्यथा बायकामुलं असणारा सैनिक बलात्कार कां करतो? घरापासून, सेक्सपासून बराच काळ दूर असल्यामुळं सैनिकाला सेक्स हवा असतो? की शत्रूपक्षातली स्त्री दिसली की आणखी चेव येतो? बलात्कार. नंतर गोळ्या घालणं. बुचाच्या रस्त्यावर प्रेतं पसरली होती. त्यांची विल्हेवाट लावायलाही सौfनकांना वेळ मिळाला नसावा. त्यात नव्या प्रेतांची भर.
सॅटेलाईटवरून चित्रं टिपली गेली. जगभरातल्या चॅनेलनी ती दाखवली.
किती माणसं मारली? पाचशे ते तेराशे असे आकडे समोर येतात. रशियानं असं काही घडल्याचा इन्कार केला. दाखवलेले फोटो आणि व्हिडियो फेक आहेत, भलत्याच ठिकाणची प्रेतं बुचामध्ये दाखवली आहेत असं रशियन सरकारनं सांगितलं.
************
युद्ध दोन देशांपुरतं मर्यादित नव्हतं. युक्रेनच्या बाजूनं युरोपीय देश आणि अमेरिका युद्धात उतरले. रशियाला चीन, उत्तर कोरिया आणि इराणनं मदत केली. रशियाचं मुख्य उत्पन्नाचं साधन तेल. रशियन तेल आणि गॅसवर युरोप चालतो. जर्मनीतली घरं उबदार रहातात कारण त्यांना रशियातला गॅस मिळतो. अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध लादले. रशियाकडून गॅस, तेल घेणार्या देशांवर अमेरिकेनं निर्बंध लादले. म्हणजे त्या देशातून माल विकत घेणार नाही, त्या देशातल्या मालावर जकात लादली. पण रशियावर या निर्बंधाचा परिणाम झालेला दिसत नाही. रशियानं भारताला तेल विकलं. पूर्वी जेवढं विकत होते त्यापेक्षा जास्त विकलं. पूर्वीपेक्षा कमी भाव लावला. डॉलरमध्ये नव्हे, रुपयात पैसे घेतले. युक्रेनमधलं युद्ध रशिया खेळू शकतो यात भारताचाही काही वाटा आहे.
युक्रेन रशिया युद्धाचं एक वैशिष्ट्यं म्हणजे भाडोत्री, कंत्राटी माणसांचा वापर. प्रिगोझीन नावाच्या माणसाची एक खाजगी सेना रशियात होती. वॅग्नर गट या नावानं ही सेना वावरत होती. या सैन्यात नाना प्रकारचे फ्रीलान्स सैनिक असत. सैन्यातून बाहेर पडलेले रिकामे सैनिक (कुठल्याही देशाचे) पैसे मिळवण्यासाठी वॅग्नर ग्रूपमध्ये येत असत. रशियानं वॅग्नर गटाला खास सवलती दिल्या होत्या. वॅग्नर गट रशियन तुरुंगातल्या कैद्यांची भरती करत असे. कधी तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता नसलेल्यांना वॅग्नर गट सहा महिन्यांसाठी तुरुंगाच्या बाहेर काढून भरती करत असे. तुम्ही लढायला गेलात की परतण्याची शक्यता जवळ जवळ नाहीये याची जाणीव त्यांना दिलेली असे. जगलावाचलात तर नशीब. मेलात तर नातेवाईकांना पन्नास लाख रूबल दिले जातील अशी योजना. खूप कैदी वॅग्नर सेनेत दाखल झाले.
डोनबासमध्ये वॅग्नर सैन्य पाठवण्यात आलं. रशियाची रणनीती अशी होती. या सैनिकांना पुढं पाठवायचं. सुरुंगावरून चालत गेले की सैनिक मरत, सुरुंग निकामी होत आणि नंतर रशियन सैनिक पुढं सरकत. युक्रेनच्या सैन्याच्या हातात हे बकरे जात, युक्रेनी सैन्याचा दारुगोळा यांना मारण्यात संपे, नंतर खरं रशियन सैन्य पुढं सरके.
इराक-इराण युद्धात छोटी मुलं इराणनं अशा रीतीनं वापरली होती.
वॅग्नर सैन्य अर्थातच अधिकृत सैन्य नव्हतं. प्रिगोझीन नावाच्या पुतीन यांच्या मित्रानं ते उभारलं होतं. प्रिगोझीन खाणावळी चालवत असे. पुतीन यांच्या मित्रांसाठी, रशियात आलेल्या पाहुण्यांसाठी खास पदार्थ तो करत असे. पुतीन यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर करून त्यानं सैन्य तयार केलं आणि ते सैन्य त्यानं पुतीनसाठी युक्रेनमध्ये वापरलं. रशियानं उत्तर कोरियातून सैनिक आणले. या सैनिकांना हेही माहित नव्हतं ते कुठं जाणार आहेत, कुणाशी लढणार आहेत. त्या सैनिकांना रशियानं कसकसे किती पैसे दिले ते कळलेलं नाही. नेपाळमधूनही काही माणसं रशियाच्या बाजूनं लढायला गेली.
