• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

युवा पिढीच्या अंतर्मनाचे दर्शन!

संजय डहाळे (तिसरी घंटा)

marmik by marmik
May 29, 2026
in तिसरी घंटा
0
युवा पिढीच्या अंतर्मनाचे दर्शन!

रेकॉर्ड ब्रेक नाटकांची गर्दी आजकाल रंगमंचावर झालीय. दोन पानं भरून नाटकांच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रे भरून गेलीत. यात काही नाटके दुर्लक्षित होण्याचे भय आहे कारण, दर आठवड्याला एकामागोमाग एक नवीन नाटके आली तर ती वेळेवर पकडणं म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी फास्ट ट्रेन पकडण्यासारखी आहे. तरीही मराठी नाट्यरसिक चांगली गर्दी करतोय हे बुकिंगवरल्या अर्थगणितातून दिसतंय. यात अनेक पुरस्कारांचे विजेते ठरलेले नाटक- ‘लागली पैज?’

नावापासूनच पैज लावण्याचा इरादा. नाटक पंचाक्षरी! काही निर्मात्यांना लकी! सही रे सही, ऑल द बेस्ट, वस्त्रहरण, नटसम्राट अगदी… एकच प्यालापर्यंत पंचाक्षरी नाटकांचा इतिहास बोलका आहे. असो. इथली पैज ही कुस्तीच्या फडातली ‘पैज’ नाही किंवा ‘पैजेचा विडा’ही नाही, तर आजच्या सुपरफास्ट संगणक युगातला हा फ्रेश पैजेचा विडा आहे, जो दोन जीवांच्या प्रेमाभोवती फिरतोय. पैज लावण्याच्या सवयीभोवती गुंफलेल्या तरुणाचं प्रेम-विरह आणि…?

पडदा उघडतो. पॉश हॉटेल. नव्या पिढीचा जल्लोष. दारू,खाणं, मौजमजा सुरू आहे. तिथे आहे आदित्य देशमुख हा महत्त्वाकांक्षी तरुण, जो एका कंपनीत नोकरीला आहे. सोबत रेवा ही तरुणी. अचानक भेट झालेली. प्रकरण मैत्रीतून लग्नापर्यंत पोहोचलेलं. रेवा ही तशी स्वप्नाळू. बिनधास्त स्वभावाची. पदोपदी पैजा लावण्याचा तिचा स्वभाव. त्यात सदैव अडकलेली. आता या दोघांची नव्या पिढीची भाषा. संवादातून, कृतीतून प्रेम आणि प्रेम… थोडक्यात म्हणजे, मराठी नाटक वयात आलंय हेच खरे!

रेवाची आई वंदना हिची ही एकुलती एक मुलगी. वंदना ही हाडाची शिक्षिका. उभं आयुष्य मुलांवर संस्कार करण्यात गेलेलं. काहीशी मिश्किल स्वभावाची. नव्या विचारांना समजून घेणारी अशी ही आई. योगायोगाने आदित्य तिचा माजी विद्यार्थी निघतो. जुन्या शालेय आठवणींना उजाळा मिळतो. वंदनाबाई या गुणी विद्यार्थ्यांना त्यावेळी ‘माकड’ म्हणायच्या. त्यालाही उजळा मिळतो मुलीइतकाच जावई देखील वंदनाला महत्त्वाचा आहे. 

या कथानकात आणखीन एक सदस्य आहे. अमेय हा आदित्यचा जिवलग दोस्त. आदित्य आपली सुख-दुःखं त्याच्याशी शेअर करतोय. त्याचा सल्ला मानतोय. एकटेपणा दूर करण्यासाठी अमेयची कंपनी आहे. आदित्य नोकरीत समाधानी नाही. स्वतःचा धंदा-उद्योग सुरू करण्याचा त्याचा विचार आहे. पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा, हे टेन्शन त्याला हैराण करतेय. आदित्यकडे आव्हान झेलण्याची तयारी असली तरी, पैशाचं सोंग कसं काय आणणार? त्यात रेवाचा वाढदिवस… महत्त्वाचा दिवस. आदित्य आणि अमेय यांच्यात चर्चा होते. अचानक एक नवीनच पर्याय पुढे येतो. दोघेही सुखावतात. एक लॉटरीचे तिकीट. कोट्यवधी रुपये देणारे. नंबराची तपासणी होते. तेव्हा चक्क १६पैकी १५ नंबर जुळतात. जीवनाला कलाटणी देणारा क्षण पुढे दिसतो खरा. पण शेवटचा एक नंबर…अर्थात, हा शेवटचा प्रसंग कथानकाचा टर्निंग पॉईंट ठरतो. जो प्रत्यक्ष प्रयोगातून अनुभवण उत्तम! प्रेम आणि महत्त्वाकांक्षा या दोघांपैकी एकाची निवड करायची असेल तर… नशिबाने सुद्धा साथ दिली तर…

आदित्य, रेवा, वंदना आणि अमेय या चौघांभोवती नाट्य मिश्किल शैलीत गुंफले आहे. आदित्य-रेवा यांचे प्रेम, लग्नाचा प्रस्ताव आणि पैजा, अटी याभोवती हळुवारपणे कथानक पुढे सरकते. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक वेगवान आहे. याची वनलाईन खरोखरच वनलाईनमध्ये बसणारी. संवादलेखन जेन झी संस्कृतीत बसणारं. हर्षद प्रमोद कठापूरकर हा नव्या पिढीचा नाटककार. तरुणांच्या भावविश्वात ही संहिता अलगद घेऊन जाते. रंगभूमीवर काही वेगळा विषय आणण्याचा त्यामागे प्रयत्न दिसतोय. लिखित संवादांना हद्दपार करण्याची मध्यंतरी लाट आली होती, त्याला हे एक चोख उत्तर आहे.

दिग्दर्शक अंकुर अरुण काकतकर यांनी नाट्याला दिलेली ट्रीटमेंट यथायोग्यच म्हणावे लागेल. नाटककार आणि दिग्दर्शक दोघेही तसे नवखे रंगकर्मी असले तरीही त्यांची समज दाद देण्याजोगी आहे. प्रसंगाची मांडणी हलकीफुलकी केली आहे. दोघांनाही फार काही मोठे तत्त्वज्ञान वगैरे सांगायचं नाही. निव्वळ एक गोष्ट मांडायची आहे. हे जाणवते.

नाटककार गीतकार असल्याचाही प्रत्यय येतो. यातील काही काव्यांनी नाट्य रंगण्यात मदत होतेय. या रचना बोजड नाहीत. त्यातला साधेपणा अस्सल वाटतो. ‘तू मागावंस, मी देत जावं, तुझ्या मनात येण्याआधीच, तुझ्यासमोर आणावं, तुझ्या स्वप्नांना माझे पंख असावेत!’ हे काव्य आणि त्याचे सादरीकरण उत्तम झालंय. या शृंगारपूर्ण काव्यानंतर अर्थात दोघांचे भांडणही आहे! एक लाईव्ह गाणं देखील आदित्यच्या स्वरात पकड घेतं. ’मी हरलो कुठे, मन हे चंचल, काय सांगू माझे रडगाणं, काही कळेना मला, असलं लाईफ नकोय मला,’ हे देखील तालासुरात मस्त आहे. त्यात कुठेही कृत्रिमता नाही.

नातं ठेवा किंवा ठेवू नका पण विश्वास जवळच्या माणसावर निश्चित ठेवा. कारण जिथे विश्वास असतो, तिथेच नाती ही आपोआप बनतात. अविश्वासाच्या अनिश्चित पैजेपेक्षा विश्वास लाखमोलाचा ठरतो, हा छुपा मेसेज तरुणाईला यातून देण्याचा नाटककाराचा प्रयत्न आहे.
‘फुलपाखरू’ मालिकेतला मानस आणि ‘शुभविवाह’मधला आकाश या भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेला चार्मिंग बॉय यशोमन आपटे याने आदित्यची मध्यवर्ती भूमिका सहजतेने तसेच संयमानं साकारली आहे. यशोमन हा डहाणूकर महाविद्यालयाचा विद्यार्थी. कॉलेजजीवनात अनेक अभिनयाचे पुरस्कार पटकावलेला. मालिका, चित्रपट यामुळे काहीसा रंगमंचापासून दूर राहिलेला. एका मध्यंतरानंतर पुन्हा एकदा या नाटकातून आलाय. हे कौतुकास्पदच. प्रवेशातच दारू ढोसून आगमन होताच रसिकांचा मिळणार प्रतिसाद हा त्याच्या रसिकप्रियतेची साक्ष आहे अर्थात मालिकेचा परिणाम! आदित्यची भूमिका गंभीर होण्याचा तसा धोका होता. पण त्यात मिश्किलता भरून रंग भरलेत. प्रेयसी कम पत्नी असलेल्या रेवाशी असलेला संवाद पकड घेणारा. एकूणच देहबोलीतून आजच्या तरुणाईचे दर्शन घडते. संवादफेक व अभिनय सहजसुंदरच. रेवाच्या भूमिकेत रुमानी खरे हिने चांगली साथ दिलीय. त्यामुळे अनेक प्रसंग नैसर्गिक वाटतात. प्रेम, राग, संताप, जिव्हाळा या सर्व भावना रुमानीने चांगल्या रंगविल्या आहेत. दोघांचे ट्युनिंग मस्त जमलंय. रुमानीचं हे पहिलंच नाटक. कुठेही नवखेपणा दिसत नाही. मालिकांचा अनुभव व प्रसिद्धी यांचा फायदा नजरेत भरतो.

सुप्रिया विनोद यांचे वंदना या भूमिकेतलं आगमन प्रसन्न आहे. आजवर काहीशा गंभीर भूमिकेत दिसणार्‍या या ज्येष्ठ अभिनेत्रीची ही भूमिका नर्मविनोदी आहे. मिश्किलतेची झालर त्याभोवती दिसते. आजच्या काळातली आई म्हणून भूमिका जिवंत केलीय. मुलीचा संसार आनंदी असावा यासाठीचे तिचे प्रयत्न स्वाभाविक वाटतात. भूमिकेला दिलेल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे वंदनाची उंची वाढते. मित्र कम् निवेदक असलेला अमेय शंतनू अंबाडेकर याने गोष्ट पुढे येण्याचा प्रयत्न केलाय. भूमिकेत तसा वाव नसला तरीही अमेय चांगला उभा केलाय.

दिग्दर्शक अंकुर काकतकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने प्रत्येक प्रसंगाची बांधणी कशी मजबूत होईल, याकडे लक्ष दिलंय. रंगमंचीय भाषा शोधण्याचा त्यामागे प्रयत्न दिसतोय. संहितेला पुरेपूर न्याय दिलाय. तांत्रिक बाजूही चांगल्या जमून आणल्या आहेत.
डॉ. सुमित पाटील यांचे नेपथ्य हे नव्या तंत्रमंत्राचा वापर केल्याने शोभून दिसतेय. चांगली वातावरणनिर्मिती होते. विविध लोकेशनचा सकारात्मक परिणाम झालाय. साई -पियुष यांची संगीत साथ आणि अमोघ फडके याची प्रकाशयोजना अनुरूप. निर्मात्यांनी कुठेही कसूर ठेवलेली नाही. सर्व तांत्रिक बाजूंची जुळणी उत्तम.

तरुणाईचे विषय आजकाल रंगभूमीवर विशेषत: येताना दिसताहेत. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय,’ ‘ठरलंय फॉरएव्हर,’ ‘लग्नपंचमी’ ‘अ‍ॅनिमल’ ही काही नाटके या क्षणी डोळ्यापुढे असतानाच ‘लागली पैज’ने पडदा उघडलाय. तरुणांना नाटकाकडे आकृष्ट करणारे आणखीन एक सादरीकरण!

स्वच्छ पाण्याचा तळ हा स्पष्टपणे दिसला की पाण्यात उतरण्याची जराही भीती वाटत नाही. अगदी तसंच प्रेमातल्या जोडगोळीला एकमेकांच्या मनातला तळ एकदा का समजला की त्यांना सहवासाची भीती वाटत नाही. आणि मग नातं ही स्वच्छ, पारदर्शक दिसू लागतं. हेच या पैजेच्या विड्यामागलं सत्य आहे.!

लागली पैज ?
लेखन – हर्षद प्रमोद कठापूरकर
दिग्दर्शन- अंकुर अरुण काकतकर
नेपथ्य- डॉ. सुमित पाटील
संगीत – साई- पियुष
प्रकाश -अमोघ फडके
गीते- हर्षद कठापूरकर
निर्माते – ज्योती कठापूरकर /
निखिल करंडे
सूत्रधार – संतोष शिदम
निर्मिती – प्रभात थिएटर

Previous Post

विश्वास ठेवला, दगा मिळाला!

Next Post

कोकणी स्वयंपाकातील कल्पतरू: कुळीथ

Next Post
कोकणी स्वयंपाकातील कल्पतरू: कुळीथ

कोकणी स्वयंपाकातील कल्पतरू: कुळीथ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.