
डिजिटल युगात मैत्री आणि नातेसंबंध जुळवण्यासाठी डेटिंग अॅप्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. पण जिथे विश्वास असतो, तिथेच फसवणुकीचाही धोका लपलेला असतो. सायबर गुन्हेगार आता या अॅप्समध्येच घुसखोरी करून आपले जाळे विणत असतात. हे हॅकर डेटिंग अॅप्स, वेबसाइट्समध्ये शिरकाव करून बनावट प्रोफाइल तयार करतात. त्या प्रोफाइल्स इतक्या खर्यासारख्या वाटतात की समोरची व्यक्ती सहज त्यावर विश्वास ठेवते. गोड बोलणे, आकर्षक फोटो आणि भावनिक संवाद या सगळ्यांच्या माध्यमातून ते हळूहळू समोरच्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवतात. सुरुवातीला साधी ओळख, मग मैत्री, नंतर विश्वास अशा टप्प्यांतून जाताना व्यक्तीला कधी फसवले जाते, हेच कळत नाही.
‘हॅकर-इनफिल्ट्रेटेड डेटिंग अॅप्स’ कशी फसवणूक करतात, ते माधुरीने फार वाईट पद्धतीने अनुभवलं.
माधुरी वर्तक ही मुंबईतल्या भायखळ्यात राहणारी २१ वर्षांची तरुणी. कॉलेजचं शिक्षण संपत आल्यामुळे एकीकडे, पुढे काय करियर करायचं, याचा शोध घेणं तिने सुरू केलं होतं. त्याचवेळी तिच्या मनात मनासारखा जोडीदार मिळवण्याची इच्छाही निर्माण झाली होती. एका संध्याकाळी, कॉलेजमधून परत येत असताना तिची मैत्रीण पूजा म्हणाली, ‘अगं माधुरी, तू अजून सिंगलच आहेस ना?’
माधुरी हसत म्हणाली, ‘हो गं… अजून मला हवा असणारा ‘तो’ सापडलेला नाही.’ त्यावर पूजा म्हणाली, तू डेटिंग अॅप वापर की. आता सगळेच वापरतात. ते माधुरीच्या लक्षात राहिलं. त्या रात्री, थोडा विचार करून माधुरीने मोबाईल हातात घेतला. बघू या काय असतं हे डेटिंग अॅपचं प्रकरण, असं म्हणत तिने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावर एक अॅप डाउनलोड झालं. आपलं प्रोफाइल तयार करताना माधुरीने तिचे छान फोटो टाकले, थोडी माहिती लिहिली. हॉबीमध्ये ट्रॅव्हलिंग, म्युझिक, कॉफी लव्हर, असा उल्लेख केला. काही तासांतच तिच्या प्रोफाइलवर अनेक रिक्वेस्ट येऊ लागल्या. ती एकेक प्रोफाइल पाहत होती. काही साधे, काही विचित्र होते.
अचानक एक प्रोफाइल तिच्या नजरेत भरलं, ते होते अक्षय मेहरा याचं… उंच, देखणा, सूट-बूटमधला फोटो, मागे लक्झरी कार, माधुरीने मनाशी हसत म्हटलं, ‘वा… हा तर चित्रपटातला हिरोच वाटतो. तिने त्याची रिक्वेस्ट स्वीकारली. काही वेळात लगेचच अक्षयचा मेसेज आला. ‘हाय माधुरी, हाऊ आर यू?’
ते वाचताना माधुरी थोडी लाजली आणि म्हणाली, गुड, हाऊ आर यू? त्यावर अक्षय म्हणाला, बेटर नाऊ आफ्टर सीइंग युअर प्रोफाइल.’ हे वाचून माधुरीच्या चेहर्यावर हलके हास्य उमटले. ‘हा खूपच स्मार्ट दिसतोय, ती मनात म्हणाली. दिवसागणिक त्यांचं फोनवर, व्हॉइस मेसेजवर संभाषण वाढत गेलं. एकदा अक्षय तिला म्हणाला, माधुरी,मला बिझनेस खूप आवडतो. माझं स्वतःचं फार्महाऊस आहे. इतकंच नाही तर माझ्याकडे दोन-तीन लक्झरी कार्स आहेत. त्यावर माधुरी आश्चर्याने म्हणाली, ‘खरंच? एवढ्या लहान वयात?’ त्यावर अक्षय हसत म्हणाला, ‘हार्ड वर्क पेज ऑफ आणि योग्य प्लॅनिंग. बरोबर ना… माधुरी त्याच्या बोलण्यावर फिदा होत चालली होती.
तिच्या मनात मोठी स्वप्न रंगू लागली होती. ‘आपणही त्याच्यासोबत परदेशात फिरायला जावे, मोठ्या गाडीत बसावे. दोन-तीन दिवसांनी अक्षयने विषय काढला. ‘माधुरी, हे डेटिंग मला सुरक्षित वाटत नाही. आपण प्रायव्हेट चॅट अॅपवर बोलू या का? त्यावर माधुरी थोडी गोंधळली, ‘का? इथे काय प्रॉब्लेम आहे?’
त्यावर अक्षय शांतपणे म्हणाला, अगं, इथे खूप लोक असतात. आपली कॉन्वर्सेशन्स प्रायव्हेट राहिली पाहिजे ना. माधुरीला त्याचं म्हणणं पटलं. हो. खरंय, ती म्हणाली. तिने त्याच्या सांगण्यावरून दुसरं अॅप डाउनलोड केलं.
एका रात्री, ते दोघे गप्पा मारत होते. अक्षय म्हणाला, माधुरी, मी एक प्रोजेक्ट सुरू केलाय. तू मला थोडी मदत करू शकतेस का? नक्की काय करायचं? असं माधुरीने विचारल्यावर अक्षयने एक लिंक तिला पाठवली. त्या लिंकवर एक फाईल आहे. ती डाउनलोड करून ओपन कर, म्हणजे तुला एक सरप्राईज दिसेल. माधुरी थोडी उत्सुक झाली. ‘सरप्राईज?’ कसले रे? अगं खरचं ट्रस्ट मी, असा आग्रह अक्षयने केला. क्षणभरही न विचार करता माधुरीने लिंकवर क्लिक केलं. फाईल डाउनलोड झाली. तिने ती उघडली. पण त्यामध्ये काहीच विशेष दिसलं नाही. अरेच्या इथे तर काहीच दिसत नाही, असे ती म्हणाली. अक्षयने लगेच विषय बदलला.
‘अरे, कदाचित काहीतरी चुकले असेल, सोड ना. त्यावर माधुरीनेही त्याकडे दुर्लक्ष केलं. पण तिला कल्पना नव्हती, त्या एका क्लिकने तिचं आयुष्य बदलणार होतं.
दुसर्या दिवशी सकाळी, माधुरीचा फोन वाजला. तो एका अनोळखी नंबरवरून आला होता. हॅलो, समोरून आवाज आला, तू माधुरी वर्तक आहेस ना? ती म्हणाली, हो, पण तुम्ही कोण? फोनवरची व्यक्ती तिला म्हणाली की, ’आमच्याकडे तुझे सर्व फोटो, कॉन्टॅक्ट्स आणि वैयक्तिक माहिती आहे.’ हे ऐकून माधुरी घाबरली… ’असं कसं शक्य आहे?’ असं विचारत असतानाच माधुरीच्या हातातून फोन निसटला. कसंबसं तिनं स्वतःला सावरलं आणि तिनं विचारलं की, ’हे कसं शक्य आहे?’ तो आवाज पुन्हा म्हणाला, ’काल तू जी फाईल डाउनलोड केली होतीस ना त्यामधून सगळं आमच्याकडे पोहोचलं.’
माधुरीच्या डोळ्यांसमोर कालचं सगळं चित्र आलं. ’नाही, नाही… हे कसं शक्य आहे…’ फोनवर बोलणारी पलीकडची व्यक्ती पुन्हा म्हणाली की, ’दोन तासांत १० लाख रुपये पाठव. नाहीतर तुझे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकू…‘ हे ऐकल्यावर माधुरीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती त्या फोनवरच्या व्यक्तीला रडत रडत म्हणाली,’ प्लीज…असं करू नका…’ ‘टाइम इज टिकिंग’ असे म्हणत त्या व्यक्तीनं कॉल कट केला. या सगळ्या प्रकारामुळे माधुरी पूर्णपणे कोलमडून गेली होती. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबतच नव्हते… ’मी काय केलं, का विश्वास ठेवला?’ असे प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती. हा प्रकार घडल्यावर तिने लगेचच अक्षयला कॉल केला. पण त्याचा फोन बंद होता. त्याच्या चॅटवर लास्ट सीन दिसत नव्हते. आपण फसलो आहोत याची तिला जाणीव झाली होती. काही वेळाने, तिने स्वतःला सावरलं.
‘नाही… मी हार मानणार नाही,’ ती ठामपणे म्हणाली. घडलेला प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला. तिने सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू झाला. काही दिवसांतच पोलिसांनी आरोपीचा माग काढला. माधुरीबरोबर मैत्री केलेला अक्षय मेहरा हा राजस्थानमधल्या एका गावात राहणारा आठवी नापास मुलगा होता. त्याने डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमन अशी खोटी रूपे धारण करून फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. प्रत्येक वेळी नाव बदलून तो मुलींना फसवत असे. या घटनेमधून माधुरीला सगळ्यात मोठा धडा मिळाला. ऑनलाइन जगात ‘ट्रस्ट’ हा सर्वात मोठ ट्रॅप असू शकतो, हे कळलं.
अशी घ्या काळजी
चुकीच्या खटकणार्या विनंतींपासून सावध राहा : डेटिंग अॅपवर भेटलेल्या एखाद्या व्यक्तीने संभाषण दुसर्या प्लॅटफॉर्मवर हलवण्यास सांगितले, तर सावध राहा. तो तुम्हाला सुरक्षा उपायांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असू शकतो.
संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा : लिंकवर क्लिक करणे किंवा तुम्ही ऑनलाइन भेटता त्या लोकांच्या फायली डाउनलोड करणे टाळा, विशेषतः जर स्त्रोत अपरिचित असेल.
वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती शेअर करू नका : तुम्ही ऑनलाइन भेटता त्या लोकांसोबत वैयक्तिक माहिती, विशेषत: संवेदनशील तपशील शेअर करण्याबाबत सावधगिरी बाळगा. जर एखादी गोष्ट खरी वाटत असेल किंवा खूप चांगली असेल, तरी सावधगिरी बाळगा.
मजबूत पासवर्ड वापरा: तुमच्या डेटिंग अॅप खात्यासह तुमच्या ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत, अद्वितीय पासवर्ड तयार करा.
सायबर सुरक्षा जागरुकता : ऑनलाइन घोटाळे आणि सायबर गुन्हेगार वापरत असलेल्या डावपेचांबद्दल स्वतःला शिक्षित करा.

