• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

झुरळांना न्याय हवा!

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
May 29, 2026
in टोचन
0
झुरळांना न्याय हवा!

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगारांना चक्क झुरळांची उपमा दिल्यानंतर देशभरात त्याविरुद्ध उठलेले वादळ अजून शमलेले नाही. त्यानंतर मी असे बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा तो हेतू नव्हता, माझ्या विधानाचा अर्थाचा अनर्थ केला गेला, असे बरेच काही सांगून त्यांनी सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. पण ’  बुंदसे गई वो हौदसे नही आती.’ माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा विस्कटून विस्कटून अर्थ लावण्यात सध्या मग्न आहे. बेरोजगारांच्या दुःखावर डागण्या देणार्‍या या महाशयांवर त्याचा जेवढा राग आहे, तेवढाच गरीब बिचार्‍या झुरळांना वेठीस धरण्याच्या वृत्तीचीही त्याला कीव आहे. कोणीही यावे, टिकली मारून जावे, असा कोणीही येतो आणि बेरोजगारांची खिल्ली उडवून जातो याचे त्याला वाईट वाटते. तो म्हणतो, आपली काही झुरळप्रधान संस्कृती नाही. झुरळांचा आणि त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लावळीचा संसार सुखाचा चालला असता त्यांना या वादात ओढणे चुकीचे असल्याचे पोक्याचे म्हणणे आहे.
पोक्या म्हणतो, सरन्यायाधीश हा सुद्धा माणूस आहे. कितीही प्रयत्न केला तरी त्याचाही तोल कधी कधी जाऊ शकतो. अलिगडच्या काही रेंगाळलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणांबद्दल योग्य मार्गाने वकिलांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना ज्या पद्धतीने या प्रकरणाला झुरळासारखे झटकून, उलट नम्रपणे विचारणा करणार्‍यांवर हवी तशी आगपाखड केली, तेव्हाच आता काही खरे नाही, याचा प्रत्यय न्याय मागणार्‍यांना आला होता. शेवटी, माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याचे पाय मातीचेच असतात याचा प्रत्यय आल्यावर वातावरण चिडीचूप झाले. भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल न बोललेलेच बरे, असे पोक्या म्हणतो.
झुरळ प्रकरणावर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मात्र तीव्र होत्या. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा की, जगात भारत हा एकच देश आहे जिथे हजारो खटले कित्येक वर्षं प्रलंबित आहेत. तारीख पे तारीख हाच इथला नियम आहे. कायदेमंत्र्यांपासून कोणालाही त्याचे काहीही पडलेले नाही. इथे न्यायही विकत मिळतो असे एखाद्या न्यायाधीशाच्या घरी कोट्यवधी रुपयांची बंडले सापडल्यावर अर्थातच सिद्ध होते. काही न्यायमूर्ती तर सरकारच्या ताटाखालची मांजरे असतात. ती सरकारच्या विरुद्ध निकाल देऊच शकत नाहीत इतके त्यांचे हात कशाने बांधलेले असतात हेच कळत नाही. सरकारची कृपादृष्टी असावी, निवृत्तीनंतरही सरकारच्या ब्लॅकलिस्टमध्ये आपण नसावे, यासाठी ते प्रयत्नशील असतात. निकाल देताना न्यायाच्या मोठमोठ्या बाता मारणारे न्यायाधीश सरकारविरुद्ध बोलण्यास कचरतात आणि निकालाच्या पुढच्या तारखा देऊन कितीही वर्षे वेळ मारून नेतात.
न्यायव्यवस्थेचा हा खांब डळमळीत करण्यात सरकारच कारणीभूत असते, हेही सर्वांना माहीत आहे. लोकशाहीचे चारही खांब सरकारी वाळवीने पोखरले जात आहेत, हे तर जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असते आणि या देशाचे काय होणार आहे, याबद्दल पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त चिंता करत असते, असे पोक्याला प्रामाणिकपणे वाटते.
या सरन्यायाधीशांच्या बेरोजगार आणि झुरळ यांचे नाते स्पष्ट करणार्‍या विधानाबद्दल सत्ताधारी राजकीय नेतेही कशी त्यांची तळी उचलून धरतात हे आजमावण्यासाठी पोक्याने त्यापैकी काहींच्या मुलाखती घेतल्या. त्यातीलच या काही संक्षिप्त मुलाखती –
मुख्यमंत्री फडणवीस : ते योग्यच बोलले. बेरोजगारांबद्दल इतकी सुंदर उपमा वापरल्याबद्दल मला त्यांचं कौतुक वाटतं. मलाही झुरळं आवडतात. हा झुरळांचा सन्मानच आहे. त्यांनी बेरोजगारांना झुरळाची उपमा दिलेली नाही, हे मी खात्रीलायक सांगतो.
उपमुख्यमंत्री शिंदे : झुरळासारखा चिवटपणा अंगी यायला हवा. सरन्यायाधीशसाहेब बेरोजगारांबद्दल काही वाईट बोलले असतील यावर मी विश्वास ठेवणार नाही. मला फक्त भाजपमधल्या झुरळांची चिंता वाटते.
किरकिट थोमय्या : कॉक्रोचचा बंदोबस्त झालाच पाहिजे. कोठेही शिरतात. धड झोपायलाही देत नाहीत. थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलच्या बेडरूममध्ये सुद्धा छुप्या
कॅमेर्‍यासारखी लपून बसलेली असतात.
शिक्षणमंत्री भुसे : शालेय पाठ्यपुस्तकात झुरळांवरचा एक अभ्यासपूर्ण धडा असलाच पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना झुरळांविषयी सर्वांगीण माहिती मिळू शकेल.
५२ कुळे : बेरोजगार तेव्हाही होते, आताही आहेत आणि यापुढेही असतील. झुरळांचेही तसेच आहे. हा संघर्ष बेरोजगार आणि झुरळांमधील नाही,तर आपल्या व्यवस्थेचा तो अविभाज्य भाग आहे. दोघांना सांभाळताना न्यायव्यवस्थेवर अन्याय होता कामा नये, या मताचा मी आहे.
नीलम गोर्‍हे : झुरळांची मला पहिल्यापासून भीती वाटते. अगदी छोटी होते तेव्हापासून मला शिसारी येते त्यांची. त्यामुळे बातमीत झुरळ हा शब्द असला तरी अंगावर काटा येतो. आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब याबाबतीत जे मत मांडतील तेच माझे मत आहे, असे मानावे.
नरेंद्र मोदी : मी नेदरलँडच्या दौर्‍यावर असताना मला सरन्यायाधीशांचे विधान ऐकायला मिळाले. आमच्या लोकशाही देशात विचारस्वातंत्र्य आहे. कोणत्याही विषयांवर कोणीही आपले विचार मांडू शकतो. सरन्यायाधीशही त्याला अपवाद नाहीत. मी तर त्यांना सांगेन, तुम्ही बेरोजगारांची पर्वा अजिबात करू नका. त्यांना झुरळच काय पण पाली, विंचू, चिलटाच्या उपमा देण्याचा तुम्हाला हक्क आहे. मी सर्व शक्तीनिशी तुमच्या हक्कांचे रक्षण करीन.
चीनचे जिनपिंग : झुरळ ही चीनची अस्मिता आहे. तिला तुमच्या देशात सन्मान मिळाला हे आमचे भाग्य. आपल्या दोन्ही देशात झुरळांचा व्यापार वाढला तर मला आनंद होईल. सोबत झुरळांच्या काही नवीन प्रजाती नमुने म्हणून पाठवतो.

 

Previous Post

राशीभविष्य (३० मे ते ५ जून २००६)

Next Post

विश्वास ठेवला, दगा मिळाला!

Next Post
विश्वास ठेवला, दगा मिळाला!

विश्वास ठेवला, दगा मिळाला!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.