• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कधी एकादशी आषाढी हे

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर अभंगबोध

Marmik Team by Marmik Team
July 21, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
कधी एकादशी आषाढी हे

संपदा सोहळा नावडे मनाला।
करी ते टकळा पंढरीचा ।।१ ।।
जावे पंढरीसी आवडी मनासी।
कधी एकादशी आषाढी हे ।।२ ।।
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी।
त्याची चक्रपाणी वाट पाहे ।।३ ।।

प्रस्तुत अभंगात तुकोबाराय आषाढी वारीच्या ओढीने पंढरीकडे निघालेल्या वारकर्‍यांची महत्ता सांगतात. वारकर्‍यांना संपदा आणि इतर सोहळे आवडत नाहीत. त्यांना फक्त पंढरीचा टकळा लागलेला असतो. आषाढी एकादशी कधी एकदा येते याची अनिवार ओढ त्याच्या मनाला लागलेली असते. त्या आर्ततेने आणि व्याकुळतेने तो पंढरीची वाट चालत असतो.

वास्तविक पाहता वारकरी संप्रदायात वारी केली जाते ती देवाच्या प्रेमासाठी. वारीचा इतर कोणताही हेतू नसतो. नवस करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी इतर यात्रा केल्या जातात. वारी मात्र फक्त विठ्ठलाच्या दर्शनाच्या आवडीपोटी केली जाते. विठ्ठलदर्शनाच्या ओढीचा विरह वरकरणी दुःखाचा असला तरी त्या विरहातही एक उच्च दर्जाचं सुख आहे. किंबहुना मिलनाच्या सुखापेक्षा विरहाच्या दुःखाचा दर्जा अधिक श्रेष्ठ आहे. त्यामुळेच अतीव व्याकुळतेने संतांनी विरहिणी रचल्या आहेत. विरहिणी म्हणजे देवाच्या विरहाने झालेली मनाची तगमग मांडणार्‍या अभंग रचना. या विरहिणी पंढरीच्या वाटेवर जेव्हा वारकरी गातात तेव्हा त्याची एक वेगळीच अनुभूती वारकर्‍यांना येत असते. विरहिणीच्या अभंगांवर वारीत कीर्तनंही होतात. त्या कीर्तनातून विरहाचा अनुभव प्रकट केला की भल्या भल्या लोकांच्याही अंतःकरणाला विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागते. तुकोबाराय प्रस्तुत अभंगात म्हणतात की जो आर्ततेने विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर होतो, त्याची चक्रपाणीही वाट पाहत असतो. देवालाही त्याला भेटायची ओढ लागलेली असते. भक्ताच्या भेटीसाठी आतुर होणारा हा एकमेव देव आहे. ‘वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उतावीळ ।।’ असं त्याचं संतांनी वर्णन केलं आहे.

पूर्वी वारकरी संप्रदायात एक रीत होती. वारकरी वारीसाठी दशमीला पंढरपुरात यायचे. पंढरपुरात पोचल्यानंतर पहिल्यांदा धुळभेटीचं दर्शन घेत असत. धुळभेटीचं दर्शन याचा अर्थ हातपाय न धुता पायाच्या धुळीसह घेतलेलं देवाचं दर्शन. इतर देवाच्या ठिकाणी सोवळं-ओवळं आहे. विठ्ठलाजवळ तसं नाही. तिथे प्रेम आहे. त्यामुळेच ही पद्धत होती. पुढच्या काळात गर्दी वाढल्यानं धुळभेटीच्या दर्शनाचा प्रकार कमी होत गेला. मुळात वारी करायची तीच देवासाठी. विठ्ठलाने आपल्याला बोलावलं आहे हा भाव मनात ठेवून वारकरी वारी करत असतात. हाच भाव जागता ठेवत वर्षानुवर्षे पंढरीची वारी चालू आहे.

या वारीची विशेषता अशी की तिच्यात कठोर बुद्धिमान माणसंही भावविभोर होतात. वारकर्‍यांचा भाव पाहून त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहायला लागतात. ‘नेत्री अश्रुचिया धारा। कोठे रोमांच शरीरा ।।’ असं पंढरपूरचं वर्णन तुकोबारायांनी केलं आहे. पंढरीला जाणारे वारकरी पाहूनही अनेकांची तीच स्थिती होते. न्या. महादेव गोविंद रानडे महाराष्ट्रातील आद्य विचारवंत; उच्चशिक्षित तर होतेच पण न्यायमूर्तीही होते. एकदा पुण्याच्या नगरवाचन मंदिराजवळून पालखी जात होती. वारकरी नाचत होते. संतांचे अभंग गात होते. वारकर्‍यांना पाहून रानड्यांना रडू आवरलं नाही. त्यांच्या डोळ्यातून घळघळा आसवांच्या धारा वाहिल्या. वारकर्‍यांची ही परंपरा आणि वारी समजून घेण्याचं त्यांनी ठरवलं. स्वतः जाऊन त्यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्या, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी, वारीमागची भावना, वारकर्‍यांची तात्त्विक भूमिका आणि इतर संतांचे पालखी सोहळे यांचा प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यास केला. त्यावर आधारित एक व्याख्यान त्यांनी प्रार्थना समाजाच्या लोकांसमोर दिलं. हा प्रसंग १८८२ सालचा आहे. ते व्याख्यान ‘न्या. मू. रानडे यांची धर्मपर व्याख्याने’ या संग्रहात समाविष्ट आहे. त्यात रानडे म्हणतात- ‘दिंड्या म्हणजे वैष्णव साधूंचे थवे अगर संघ आहेत. त्यात जाती, विद्या, अधिकारपरत्वे भेद यात्रेकरू लोक मानीत नाहीत. सर्व एकाच परमेश्वराचे भक्त, भक्तिमार्गाने आपली उन्नती होण्याविषयी झटतात. पण, हा विचार ब्राह्मणधर्मात नाही. त्यात भेदाभेद व आग्रहाचा प्रकार विशेष आहे. ज्या वैष्णव साधू लोकांनी आपल्या उपदेशात व आचरणात हा आग्रहाचा भाग सोडून सर्वत्र समबुद्धी ठेविली त्या वैष्णवमताचा हल्लीच्या कालमानाप्रमाणे आपण अंगिकार करतो. आराध्य दैवत एक आहे, दुसरे नाही व आपण सर्व त्याचे सारखेच भक्त आहोत. ही मते आपणास ग्राह्य आहेत. पूर्व संस्काराचे अभिमानामुळे दिंडीवाले लोकांकडून या मताचा पूर्णपणे स्वीकार होत नाही; तथापि त्यांच्यापासून आपल्यास एका गोष्टीचा बोध करुन घेण्यासारिखा आहे. तो हा की परमेश्वर प्राप्तीचे मार्गास लागल्यानंतर ते लौकिक लज्जा, आढ्यता व संकोच या गोष्टी एकीकडे करुन गांवोगांवी, देशोदेशी, घरांत, देवळांत, एकांती, लोकांती, जेथे सवड सापडेल तेथे, सर्वत्रास हा उपदेश करतात.’

वारी म्हणजे आपल्या गावापासून पंढरपूरपर्यंत वारकर्‍यांबरोबर भजन करत चालत जाणं. त्यामुळेच महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातल्या गावागावातून दिंड्या पंढरपूरला येत असतात. काहीजण आषाढीची वारी करतात तर काहीजण कार्तिकीची. या दोन वार्‍यांच्या खालोखाल चैत्री आणि माघी वारी करणारेही वारकरी आहेत. काहीजण बाराही वार्‍या करतात. यातील आषाढी वारीला सर्वाधिक वारकरी येत असतात. या परंपरेला सतराव्या शतकात पालखी सोहळ्याची जोड मिळाली. पालखी सोहळ्याची ज्ञात सुरुवात नारायण महाराजांनी केली. हे तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव. त्यांनीच तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा- म्हणजे ज्यांच्या नावाने पालखी सोहळा आहे त्या संतांच्या प्रतीकात्मक पादुका घेऊन पंढरपूरला जाणं- सुरू केला. त्या संतांबरोबरच आपण वारी करत आहोत असा भाव पालखी सोहळ्यातल्या वारकर्‍यांच्या मनात असतो.
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात करणारे नारायण महाराज देहूकर हे वारकरी संप्रदायातील अधिकारी संत होते.
संतपण जया विरजते अंगी।
प्रकटला जगी भक्तिप्रेमा ।।
सकळ वैष्णवा वाटे जीवप्राण।
तो हा नारायण देहूकर ।।
असं त्यांच्या संतत्वाचं वर्णन निळोबारायांनी केलं आहे. नारायण महाराज हे निळोबाराय आणि कचेश्वर भट ब्रह्मे यांचे मार्गदर्शक होते. निळोबारायांनी नारायण महाराजांच्या मुखातून तुकाराम महाराजांचं चरित्र श्रवण केलं होतं. नारायण महाराजांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्यात ‘ज्ञानबा तुकाराम’ हे भजन केलं जात होतं. पुढच्या काळात १८३२ साली हैबतबाबा आरफळकरांनी ज्ञानोबारायांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. त्यानंतर क्रमाक्रमाने इतरही पालखी सोहळे सुरू झाले. या पालखी सोहळ्याचे दस्तावेजीकरण करताना न्या. रानड्यांनी त्यामागची वारकर्‍यांची भावनाही नोंदवून ठेवली. ते म्हणतात- ‘यासंबंधाने आपल्यास विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, इतके लाखो लोक या पालख्यांविषयी एवढी पूज्य बुद्धि का बाळगतात? कोणास असे वाटेल की, धर्मभोळेपणाचाच हा एक प्रकार आहे. परंतु वास्तविक विचार पाहता पालख्यांबद्दलची खरी समजूत वेगळीच आहे. पूर्वकाळी जे साधूपुरुष होऊन गेले, ते जिवंत असताना यात्रा करण्यास जात असत, तो प्रकार ते मेल्यानंतरही चालू ठेवून, ते जसे काही जिवंतच आहेत अशा समजुतीने यात्रेकरु लोक त्यांच्या समागमाने यात्रा घडावी म्हणून हाल सोसतात.’ या पालखी सोहळ्यातील आनंदाचा विलक्षण अनुभव हा शब्दात मावण्यासारखा नाहीच. त्याचं वर्णन तो सोहळा अनुभवलेल्या गो. नी. दांडेकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलं आहे. साधारणपणे १९३४ साली ते ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते, त्यावेळचं हे वर्णन आहे. गोनीदांनी गाडगेबाबांचे अनुयायी महानंदस्वामी यांच्या हातून माळ घालून वारकरी संप्रदाय स्वीकारला होता. त्यानंतर त्यांची ती पहिलीच वारी होती. ते लिहितात, ‘आपापल्या तालछंदात धुंद झालेला वारकर्‍यांचा जमाव. पताकांची दाटी. तो स्थिर नाही, पुढं सरतो आहे. हे असलं दृश्य कधीही पाहिलं नव्हतं. गर्दी पाहिली होती. सभा मिरवणुकाही पाहिल्या होत्या. पण ते वेगळं, हे वेगळं. इथं या वारकरी जनांना काहीही नको होतं. प्रसिद्धि, वृत्तपत्रातून छायाचित्रं, प्रतिष्ठा, त्यांचे जयजयकार, या अवघ्या लोकेषणेपासून हा वारकर्‍यांचा थवा मैलोनमैल दूर होता. ज्ञानोबाच्या पालखीसवे चालत होता. वाटेचे कष्ट भोगत होता. लांबच्या लांब पायवाट तुडवीत होता. हरिरंगणी नाचत होता. हे असं वर्षानुवर्षं चाललं होतं.

हे सगळे लोक नाना जातीचे होते. उच्चवर्णींयापासून चांडाळांपर्यंत. नाना यांचे देश. खानदेश, वर्‍हाड, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक, कोकण, गोवा असा झाडून अवघा मुलूख पालखीबरोबर गात चालला होता. पन्थोपपन्थाच्या सीमारेषा एकाएकीत बुडून गेल्या होत्या. वैश्यवाणी होते. लिंगायत होते, काही थोडके जैन आणि मुसलमान देखील होते. ‘जातपात पूछे न कोय, हरिकू भजे हो हरिका होय!’ ही इथली घोषणा होती.

ते गात होते. नाचत होते. एकमेकांच्या पायां पडत होते. तुकारामबाबांनी सांगून ठेवलं होतं, कीं पंढरीच्या लोकां नाहीं अभिमान, पायां पडे जन एकमेकां! समाजांतलं स्थान वाटेल तें का असेना, पंढरीच्या वाटेला लागलं, कीं अभिमान पायतळीं घालून एकमेकांच्या चरणी डुई ठेवलीच पाहिजे. इथला दंडकच तसा आहे. वर्ण अभिमान विसरलीं याती एक एकां लोटांगणीं जाती रे। निर्मल चित्तें झालीं नवनीतें पाषाणा पाझर फुटती रे! असं हरिरंगण हरिनामाचा कल्लोळ करीत वाटेनं पुढं सरत होतं आणि त्याच्या मधोमध होती ज्ञानाईची पालखी! ती खांद्यावर मिरवीत ते पंढरपुरीं निघाले होते.

या बहुजनांच्या स्वभावामध्ये अधिकउणं नव्हतं असं नव्हे. होतं. इतरांप्रमाणं इथंही त्याचा साक्षात्कार होई. बामणांच्या पंगती निराळ्या. ते उरकले म्हणजे इतरेजन. महार-पोरं अगदी शेवटी. पालखीसोहोळा हे तरी विशाल समाजाचंच एक अंग होतं. त्याचेच गुणदोष इथं उमटले होते.’

यात गोनीदांनी जे उणं सांगितलं ते १९३४ सालचं आहे. मूळ संतविचार समतेचाच आहे. त्याला अनुसरून पुढे बदल होत गेले. आषाढी वारीसाठी गावागावातून निघणार्‍या दिंड्यातील आणि पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांनी हा महाराष्ट्रधर्म जिवंत ठेवला आहे. भागवत धर्म जिवंत ठेवला आहे. इतर देवांना काही ना काही देण्याची पद्धत आहे. विठ्ठलाला मात्र भक्तांकडून काहीही लागत नाही. त्याला भक्तांकडून फक्त प्रेम हवं आहे. ‘थोर भावाचा भुकेला। हाची दुष्काळ तयाला ।।’ असं संतांनी म्हटलं आहे. त्याच्याजवळ फक्त भावाचा म्हणजेच प्रेमाचा दुष्काळ आहे.

आता महाराष्ट्राच्या काही भागात बर्‍यापैकी समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या दुष्काळाचं संकट काही अंशी तरी कमी झालंय. आता त्यामुळे पंढरपुरातल्या देवाजवळचा भावाचा दुष्काळ कमी करण्यासाठी वारीची गरज आहे. तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या अखेरच्या चरणात म्हणतात त्याप्रमाणे आर्त भक्ताची वाट पाहत चक्रपाणी उभा आहे. मान्सूनच्या पावसाने पाण्याचा दुष्काळ संपतो आणि आषाढी वारीतल्या वारकर्‍यांच्या भक्तीच्या पावसाने देवाचा प्रेमभावाचा दुष्काळ संपत असतो. त्यामुळे जसा शेतकरी मान्सूनच्या पावसाच्या वाट पाहतो तसा विठुराया वारकर्‍यांची वाट पाहतो. ‘तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी। त्याची चक्रपाणी वाट पाहे ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. पावसाचा दुष्काळ पडला तर पिकं जळतील. पूर्वी दुष्काळात जनावरं आणि काहीवेळा माणसंही मरायची. पण प्रेमाचा दुष्काळ पडला तर माणसंच काय पण माणुसकीही मरते. मानवता जिवंत ठेवायची असेल तर प्रेमाचा दुष्काळ दूर करणारा हा वारकरी संतविचारांचा मेघवर्षाव करण्याची गरज आहे.

Previous Post

सोनमजी, उपोषण सोडा!

Next Post

भारताची `निर्यात’बनायचे की जगाचा डोकेदुखी!

Next Post
भारताची `निर्यात’बनायचे की जगाचा डोकेदुखी!

भारताची `निर्यात'बनायचे की जगाचा डोकेदुखी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.