• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भारताची `निर्यात’बनायचे की जगाचा डोकेदुखी!

रवींद्र मराठे (सातासमुद्रापलीकडून)

Marmik Team by Marmik Team
July 21, 2026
in सातासमुद्रापलीकडून
0
भारताची `निर्यात’बनायचे की जगाचा डोकेदुखी!

लेखाला सुरुवात करण्याच्या आधीच एक स्पष्टीकरण देतो-हे लेखन भारतविरोधी नाही. हे एक प्रामाणिक निरीक्षण आहे. माझ्याप्रमाणेच ब्रिटन आणि अमेरिकेत पंचवीस वर्षे राहिलेल्या एखाद्या भारतीयाला या विश्लेषणातील प्रत्येक निरीक्षण परिचयाचं वाटेल आणि भारतात बसलेल्यांना ते अस्वस्थ करेल. दोन्ही प्रतिक्रिया बरोबर आहेत. गेल्या काही काळात विविध ठिकाणी भारतीयांच्या वर्तनातून फार मोठ्या नकारात्मक चर्चा झाल्या. भारतीयांना काय झाले आहे, असा प्रश्न सुबुद्ध भारतीयांसह अनेकांना पडला. यातल्या काही प्रकरणांचा आढावा घेऊया.

स्वित्झर्लंडमधील हॉटेल प्रकरण
२०२५च्या उत्तरार्धात उद्योजक हर्ष गोएंका यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक फोटो पोस्ट केला. स्वित्झर्लंडमधील गस्टाड येथील ‘हॉटेल आर्क-एन-सील’ मध्ये एक नोटीस लावण्यात आली होती- ‘भारतातून आलेल्या प्रिय पाहुण्यांसाठी.’ फक्त भारतीयांसाठी. त्या नोटिशीत भारतीय पाहुण्यांना विनंती केली होती- न्याहारीच्या बुफेमधून अन्न बाहेर नेऊ नका. जेवणाच्या खोलीत चमचे-काटे वापरा, हाताने खाणे टाळा. हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये आणि बाल्कनीत रात्री शांतता पाळा. इतर पाहुण्यांचा विचार करा. बुफेतील अन्न फक्त न्याहारीसाठी आहे- दुपारचा डबा वेगळा विकत घ्या.

गोएंका यांनी ही नोटीस ‘लाजिरवाणी’ आहे असे म्हटले होते. ती व्हायरल झाली आणि नेहमीचे दोन गट निर्माण झाले. एक गट म्हणतो— ‘हे वर्णद्वेषी आहे, भारतीयांना वेगळा न्याय का?’ दुसरा छोटा पण प्रामाणिक गट म्हणाला, ‘अशी नोटीस का लागली, याचा आपण विचार करायला हवा.’ अशी नोटीस लावण्याची गरज कोणत्या वागणुकीने निर्माण झाली?

हे एकटे प्रकरण नाही. त्याच काळात व्हिएतनाममधील एका लक्झरी स्पाने भारतीय पुरुषांच्या गट बुकिंग बंद केल्या. काही युरोपीय हॉटेलांनी ‘कृपया आवाज कमी करा’ अशा नोटिसा अनेक भाषांत लावल्या- पण भारतीय भाषेतील आवृत्तीच चर्चेत आली. एका युरोपीय हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले. ‘हे वर्णद्वेष नाही, आम्ही कंटाळलो आहोत… आमच्याकडे चांगले भारतीय पाहुणे येतात, पण असेही येतात जे कर्मचार्‍यांवर ओरडतात, सार्वजनिक लाऊंजमध्ये हाताने जेवतात, रात्री उशिरापर्यंत मोठ्याने बोलतात. गाणी लावतात. स्वित्झर्लंडची नोटीस एकट्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांत भारतीय पर्यटकांशी संबंधित अशा घटनांची एक साखळी तयार झाली आहे जी परदेशस्थ भारतीयांनाच सर्वात जास्त लाज वाटवते.

व्हिएतनाम विमानतळावर गरबा
मे २०२६मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला- व्हिएतनामच्या विमानतळावरील टारमॅकवर एक गट गरबा खेळत होता. व्हिएतजेट एअरच्या विमानाजवळ. टारमॅक म्हणजे विमानतळाचा ऑपरेशनल झोन- सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असलेली जागा. विमानतळ कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप करून हे थांबवले.
भारतात नेहमीप्रमाणे दोन गट : एक म्हणाला, हा सांस्कृतिक आनंद आहे; दुसरा म्हणाला विमानतळाच्या प्रतिबंधित भागात नाचणे हा सुरक्षाविषयक नियमभंग आहे, आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी थेट सांगितले : ‘भारतीय पासपोर्ट बाळगण्यासोबत जबाबदारी येते. काही जणांच्या वागणुकीचा परिणाम लाखो भारतीयांच्या प्रतिमेवर होतो.’ टारमॅक म्हणजे नृत्यमंच नाही, हे सांगायला लागावे, हीच मुळात समस्या आहे.’

ऑस्ट्रिया, दुबई, न्यूयॉर्क
२०२४मध्ये इन्सब्रूक या ऑस्ट्रियाच्या ऐतिहासिक जुन्या शहरात ४३ गुजराती आणि मारवाडी पर्यटकांनी सार्वजनिक जागी गरबा खेळला. दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’च्या निरीक्षण डेकवर,जिथे शेकडो पर्यटक एकत्र असतात. तिथे एका गटाने नाचाचे वर्तुळ तयार केले. न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटवर सुमारे ४०० जणांनी लग्नाची मिरवणूक काढली. हे एक सातत्याचे वर्तनचित्र आहे, जे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पर्यटक गटांचे ओळखचिन्ह बनत आहे.

जपानमधील चोरी
गुंतवणूक सल्लागार मुत्थुकृष्णन धंदापाणी यांनी सोशल मीडियावर एक तपशीलवार वृत्तांत शेअर केला…जपानमधील एका भारतीय टूर गटातील कोणाकडून कथित चोरी झाली. जपान. जिथे दुकानातून चोरी ही सांस्कृतिकदृष्ट्या अकल्पनीय गोष्ट आहे, जगातील सर्वात कमी चोरी दराचा देश,तिथे हे प्रकरण भारतीयांमध्येच मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले.

बुफे आणि चमचा
पुन्हा स्वित्झर्लंडच्या नोटिशीकडे येऊ या. तिच्यातील दोन मुद्दे- बुफेतून अन्न बाहेर न नेणे आणि हाताऐवजी चमचा-काटा वापरणे- सतत समोर येतात. युरोपातील अनेक हॉटेलांनी अशाच नोटिसा लावल्या आहेत, कारण हे वारंवार घडते. न्याहारीच्या बुफेतून रोल, फळे, चीज खिशात घालणे सर्रास घडते. अनेकांना हे ‘पैशाचे मूल्य’ वसूल करणे वाटते. सार्वजनिक जेवणाच्या खोलीत हाताने खाण्याची सवय इतर संस्कृतींमध्ये अस्वस्थता निर्माण करते.

या नैतिक चुका नाहीत- या आपल्या घरच्या सवयी आहेत ज्या परदेशातील वातावरणाशी विसंगत आहेत. आपली सवय कुठे सोडायची हे न ओळखणे ही समस्या आहे. पर्यटकांच्या पलीकडे पर्यटकांची समस्या दिसते आणि लाजवते. पण, परदेशात कायमचे स्थायिक झालेल्या डायस्पोराची समस्या खोल आणि काही अर्थाने जास्त गंभीर आहे. परदेशात कायमचे स्थायिक झालेले भारतीय केवळ कौशल्य आणि महत्त्वाकांक्षाच घेऊन येत नाहीत, ते जग कसे चालते याची काही गृहितके घेऊन येतात. त्यापैकी काही परदेशात जुळत नाहीत.

लाकडी घरांजवळ फटाके
दिवाळी २०२५ मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये एक मोठी नकारात्मक लाट आणली. एडमंटन, कॅनडामध्ये दिवाळीच्या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीने दोन घरे खराब झाली. तीन जणांवर जाळपोळीचे आरोप ठेवण्यात आले. नॉर्थ कॅरोलायनाच्या मॉरिसव्हिलमध्ये बेकायदा फटाक्यांमुळे सार्वजनिक उद्यानातील क्रिकेट मैदान खराब झाले, भारतीय समाजाच्या वापरासाठीचेच हे मैदान होते. टेक्सासमधील डलास, फ्रिस्को आणि इतर शहरांमध्ये पोलिसांनी घरोघरी जाऊन फटाके न वाजवण्याची विनंती केली.

याबद्दल स्थानिक भारतीयांचा युक्तिवाद असा असतो की फटाके हा आमच्या दिवाळीचा भाग आहेत, त्यांना जागा द्यायला हवी. हा युक्तिवाद दोन गोष्टी विसरतो. एक म्हणजे दिल्लीसह अनेक भारतीय शहरांनी वायू प्रदूषण आणि आगीच्या धोक्यामुळे दिवाळीचे फटाके कायद्याने बंद केले आहेत. दोन — उत्तर अमेरिकेतील घरे बहुतांश लाकडाची आहेत. त्यांच्यापाशी फटाके उडवणे म्हणजे शेजार्‍यांच्या घराला आग लावण्याचा धोका पत्करणे. यात सांस्कृतिक प्रश्नच नाही, हा सुरक्षेचा आणि कायद्याचा प्रश्न आहे. तुमचा तुमची संस्कृती साजरी करण्याचा हक्क शेजार्‍याच्या घराच्या दारात संपतो.

संस्कृती लादता कशाला?
परदेशात नव्याने आलेले भारतीय एक महत्त्वाचा भेद सातत्याने विसरतात. आपली संस्कृती जगणे आणि ती सार्वजनिक जागी इतरांवर लादणे यांत फरक आहे. घरात दिवाळी साजरी करणे, परवानगी असलेल्या सामुदायिक हॉलमध्ये गरबा खेळणे, सरकारी परवान्यासह सार्वजनिक कार्यक्रम घेणे, हे आपली संस्कृती परदेशातही जगणे आहे. ते पूर्णपणे योग्य आहे. पण, रस्त्यावर फटाके उडवणे, विमानतळाच्या टारमॅकवर नाचणे, जनतेची संमती न घेता रस्ता अडवणे हे परदेशातील सार्वजनिक जागेवर आपली संस्कृती लादणे आहे. ती जागा सगळ्यांची आहे. आणि इथे एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी- तुम्ही या देशांचे ‘मूळ’ रहिवासी नाहीत. तुम्ही पाहुणे आहात. स्वागतार्ह, मूल्यवान योगदान देणारे पाहुणे- पण पाहुणे. यजमान संस्कृती सार्वजनिक जागेचे नियम ठरवते. तुम्ही त्या नियमांशी जुळवून घेता किंवा संघर्ष निर्माण करता. इतके हे सोपे आहे. सांस्कृतिक अभिमान प्रशंसनीय आहे, पण, सांस्कृतिक आक्रमण नाही. फरक संमतीचा आहे- ज्या जागेत तुम्ही उत्सव करताय, तिथले इतर लोक त्याचा भाग व्हायला तयार आहेत का?

सगळीकडे तेच ते
इंग्लंडमधील लेस्टरमध्ये बहुसंख्येने भारतीय आहेत. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. दुकानाच्या बाहेर निम्मी फुटपाथ आणि निम्मी रस्त्यावर गाडी पार्क करणे (नो पार्किंग बोर्ड असताना) हे इथे सर्रास होते. तुम्ही त्या दुकानात गेलात आणि म्हणालात की मी गाडी दुकानाच्या समोरच पार्क केली आहे, तर दुकानदार म्हणेल ”कोई समस्या के तकलिफ नथी, आ आमरो विस्तार छे… अहि कोई कार्यवाही नही करे.”

२०२५ मध्ये टेक्सासमध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव एका निवासी रस्त्यावर आला, रस्ता अडवला गेला. शेजार्‍याची प्रतिक्रिया वर्णद्वेषी आणि पूर्णपणे चुकीची होती. ती व्हायरल झाली आणि भारतीय समाजाने शेजार्‍याच्या वर्णद्वेषावर लक्ष केंद्रित केले. परवानगीशिवाय रस्ता अडवणे योग्य होते का, हा प्रश्न जवळजवळ विचारलाच गेला नाही. हे ठराविक नमुन्याचे उदाहरण आहे. भारतीय वागणुकीवर कोणीही आक्षेप घेतला की लगेच ‘वर्णद्वेष’ हा शब्द येतो आणि प्रामाणिक चर्चा थांबते.

आवाज कुणाचा?
ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधील भारतीय समाजाबद्दल निवासी भागांमध्ये सर्वात सातत्याने येणारी तक्रार आहे — आवाज. रात्री उशिरा मोठ्याने बोलणे, जवळच्या निवासी भागात मोठ्या कर्कश्श आवाजात संगीत, रात्री उशिरापर्यंत चालणारे मेळावे. हे फक्त भारतीयांच्या बाबतीत घडत नाही, पण ते भारतीय समाजाशी जोडलेले हे एक सततचे नकारात्मक वैशिष्ट्य बनले आहे. भारतीय सामाजिक जीवनात सामूहिक मोठा आवाज असतोच. पण ते लाड घरात, भारतात चालतात. लेस्टरमधील टेरेस्ड हाऊसमध्ये किंवा टोरंटोच्या कॉन्डोमध्ये तीच सवय शेजार्‍यांसाठी दैनंदिन त्रास बनते आणि तिची कायदेशीर तक्रार होते.

हे का होते?
भारतीयांना आपल्या देशात संपूर्ण समाजाप्रती असलेली कर्तव्ये आणि जबाबदार्‍या कधीच शिकवल्या जात नाहीत. हे सर्वात अस्वस्थ करणारे सत्य आहे. भारतातील सार्वजनिक जागा पिढ्यानपिढ्या याच समजुतीवर चालल्या आहेत की सार्वजनिक जागा कोणाचीही खासगी मालकीची नाही, म्हणजे सगळ्यांची आहे. पण म्हणून सगळ्यांनी तिची जबाबदारी घ्यायची असते, हे आपल्या गावी नाही. आपल्यासाठी तिथे हवे ते करता येते. कचरा टाकणे, आवाज करणे, रस्ता अडवणे, बुफेतून जास्त वाटा घेणे हे आपल्याला ‘नियमभंग’ वाटत नाहीत. सार्वजनिक जागेसाठी सामायिक जबाबदारीची भावना भारतीय संस्कृतीत अगदीच कमी रुजलेली आहे.
सार्वजनिक जागा नीट सांभाळली जात नाही, तेव्हा माणसे तिच्याबद्दल बेफिकीर बनतात. भारतीय शहरे हे रोज सिद्ध करत असतात. भारतीय लोक हे गृहितक सोबत घेऊन परदेशात जातात, इथे गडबड होते.

‘मी पैसे दिले’ हक्क!
२०२४मध्ये भारताचे परदेशी पर्यटन ३० टक्के वाढले- २ कोटी ७० लाखांहून जास्त भारतीय परदेशी गेले. यातील लाखो पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे होते. त्यांच्यासाठी परदेश प्रवास म्हणजे दर्जाची प्राप्ती आहे. यातून एक वृत्ती निर्माण होते- ‘मी पैसे दिले, जग मला सेवा द्यायला बांधील आहे.’ हॉटेलच्या कर्मचार्‍यांवर आरडाओरड करणे, बुफेवर वाट्याहून जास्त घेणे, सेवा कर्मचार्‍यांशी सामाजिक स्तराच्या भारतीय कल्पनांनुसार वागणे, जिथे सेवा देणारे ‘कमी’ असतात, असे गृहीत धरले जाते. परदेशात वेटरचे काम करणारी व्यक्ती चांगल्या घरातील असू शकते. परदेशात श्रमाला मूल्य आहे आणि कोण कुठला जॉब करतो यावर तुम्ही त्याची योग्यता ठरवू शकत नाही. मी स्वतः एका टॅक्सीतून प्रवास केला आहे, जिचा ड्रायव्हर हा एका शाळेतून मुख्याधापक म्हणून निवृत्त झालेला माणूस होता.

‘आपण भारतातच आहोत…’
ही भारतीयांच्या बाबतीतली सर्वात व्यापक समस्या आहे. पर्यटक असोत वा दीर्घकालीन रहिवासी, अनेक भारतीय अशा प्रकारे वागतात जणू परदेशात जिथे भारतीय मोठ्या संख्येने आहेत तिथे भारतातलेच नियम लागू होतात. भारतीयबहुल निवासी भागात, भारतीयांनी भरलेल्या हॉटेलमध्ये, भारतीयांनी गर्दी केलेल्या विमानतळावर भारतीय मानके लागू होतात, असे गृहितक असते. ते तसे नसते. तुम्ही ज्या देशात आहात त्या देशाचेच नियम तिथे लागू होतात. सदैव.

आत्मपरीक्षणाचा अभाव
परदेशी माध्यमांनी, यजमान देशाच्या रहिवाशांनी किंवा दोन्ही बाजू पाहिलेल्या भारतीयांनी या समस्या उपस्थित केल्या की सर्वात सामान्य प्रतिक्रिया अशी असते की ‘हे वर्णद्वेषी आहे,’ ‘त्यांना आपली संस्कृती समजत नाही,’ ‘इतर देशांना का सूट दिली जाते?’ या प्रतिक्रियांमध्ये अगदीच काही तथ्य नाही, असे नाही. भारतीय हे एकटेच खराब पर्यटक नाहीत आणि प्रसारमाध्यमे कधीकधी निवडक बातम्याच देतात. पण, स्वित्झर्लंडची नोटीस हा काही वर्णद्वेष नाही. ती हॉटेलने पाहुण्यांना योग्य वर्तनाची अपेक्षा सांगणे आहे. ती फक्त भारतीयांसाठी होती हे लाजिरवाणे आहे, आणि लाज वाटल्यावर आपण आत्मपरीक्षण कधी करणार?

‘आदर्श अल्पसंख्याक’ ही प्रतिमा झिजतेय
दशकांपासून भारतीय डायस्पोरा ब्रिटन आणि अमेरिकेत ‘आदर्श अल्पसंख्याक’ म्हणून ओळखला जात होता, उच्चशिक्षित, व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी, कायदा पाळणारा, आर्थिक योगदान देणारा. ब्रिटनमधील भारतीय सर्व वांशिक गटांमध्ये सर्वोच्च सरासरी वेतन मिळवतात. अमेरिकेत भारतीय अमेरिकनांचे घरगुती उत्पन्न देशातील सर्वोच्च आहे. या पायावर समाजाला मोठे सामाजिक भांडवल मिळाले होते. पण, हे भांडवल अमर्याद नाही आणि ते खर्च होत आहे. अनेक दशकांत कमावलेले सामाजिक भांडवल अलीकडील पर्यटकांच्या आणि नव्या स्थायिकांच्या वर्तनाने झिजत आहे.

व्हिएतनाम, स्वित्झर्लंड आणि युरोपच्या काही भागांतील हॉटेल, स्पा आणि टूर ऑपरेटर भारतीय गट बुकिंगवर अनौपचारिक निर्बंध घालू लागले आहेत. हे सातत्याच्या नकारात्मक अनुभवातून झालेले अनौपचारिक निर्णय आहेत. हा एका अर्थाने भेदभाव आहे. पण तो आपल्या वागणुकीतून निर्माण झाला आहे, हा फरक महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने हे निर्बंध सगळ्या भारतीयांवर परिणाम करतात- आपल्यापैकी बहुसंख्य विचारशील आणि उत्तम पाहुणे असूनही. काही जणांचे वागणे बहुसंख्यांना किंमत मोजायला लावते.

राजकीय असुरक्षितता
ब्रिटन आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सध्या स्थलांतरितांविरोधातील भावना तीव्र आहे. या वातावरणात भारतीय समाजाचे सांस्कृतिक वर्तन राजकीय असुरक्षितता निर्माण करते. ‘भारतीय योगदान देतात, समाजात मिसळतात, त्रास देत नाहीत,’ ही आपल्याकडची जुनी ढाल होती. आता हे सातत्याने खरे नाही — आणि स्थलांतरावर निर्बंध घालू इच्छिणारे राजकारणी एडमंटनचे फटाके, टेक्सासचे अडवलेले रस्ते आणि टारमॅकवरील गरबा ‘पुरावा’ म्हणून वापरू शकतात.

काय बदलायला हवे

तुम्ही पाहुणे आहात, हे स्वीकारा. 

तुम्ही पर्यटक असा किंवा ३० वर्षांचे रहिवासी; तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाचे आवाजाबद्दल, सार्वजनिक जागेबद्दल, सामायिक सुविधांबद्दल असलेले नियम पाळलेच पाहिजेत. त्यांच्याशी जुळवून घेणे म्हणजे संस्कृती सोडणे नाही. हा त्या समाजात राहण्याचा मूलभूत करार आहे.
उत्सव साजरा करा, सार्वजनिक जागेवर लादू नका.
तुमची संस्कृती तुमची आहे, साजरी करा. पण ती तुमच्या शेजार्‍यांनी अनुभवण्याची सक्ती नाही. दिवाळी, गरबा, होळी, गणेश चतुर्थी हे घरात, समाज केंद्रात, किंवा परवान्यासह सार्वजनिक कार्यक्रमात जोमाने साजरे करता येते. विमानतळाच्या टारमॅकवर, परवानगीशिवाय रस्त्यावर, किंवा रात्री बारा वाजता हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये ते करता कामा नये.
कायदा तुम्हालाही लागू होतो
अमेरिका आणि कॅनडाच्या बहुतांश शहरांमध्ये फटाके बेकायदेशीर आहेत — भारतविरोधी भावनेतून नाही, तर आगीचा धोका, ध्वनीप्रदूषण आणि पर्यावरणीय हानी यामुळे. ‘पण आम्ही भारतात असे करतो’ हा बचाव नाही. तुम्ही भारतात नाही. स्थानीय कायदा तुम्हाला लागू होतो. एका विशिष्ट भागात भारतीय मोठ्या संख्येने राहतात, म्हणून त्या जागेचे नियम बदलत नाहीत. आवाज करणे, रस्ता अडवणे हे योग्य ठरत नाही. उलट मोठ्या गटाची सामूहिक वागणूक जास्त मोठी समस्या निर्माण करते.

चूक सांगितल्यावर आधी ऐका
भारतीय डायस्पोराच्या वागणुकीवर कोणीही टीका केली की ‘हे वर्णद्वेष आहे’ ही प्रतिक्रिया चर्चा थांबवते. पण, प्रथम तक्रार ऐकणे आणि सारासार विचार केल्यानंतरच मगच ‘वर्णद्वेष’ हा शब्द वापरणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे, जे आपल्या समाजाला विकसित करायला हवे.
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि सर्वाधिक स्थलांतरितांचा स्रोत आहे. ४ कोटी ५० लाख भारतीय परदेशात आहेत. भारतीय डायस्पोरामधून असाधारण माणसे निर्माण झाली आहेत : डॉक्टर, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान नेते, लेखक, राजकारणी. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होते. सुंदर पिचाई गुगल चालवतात. सत्य नडेला मायक्रोसॉफ्ट चालवतात. समाजाचे आपल्या यजमान देशांना योगदान महत्त्वाचे आहे. पण यजमान देशांमधील नागरी जीवनाशी समाजाचे नाते वाढत्या प्रमाणात गुंतागुंतीचे होत आहे. बहुसंख्य भारतीय परदेशात सभ्य, विचारशील आणि चांगले मिसळून गेलेले आहेत. पण जे तसे मिसळलेले नाहीत तेच दुर्दैवाने संपूर्ण समाजाची प्रतिमा ठरवतात.

स्वित्झर्लंडची नोटीस हा एक आरसा आहे. प्रश्न असा आहे की पर्यटक आणि परदेशातले स्थायिक भारतीय रहिवासी त्यात बघायला तयार आहे का? भारतीय डायस्पोरा जगातील सर्वात प्रशंसनीय स्थलांतरित समाज बनू शकतो किंवा जगाची डोकेदुखी बनू शकतो, निवड पूर्णपणे आपली आहे.

(सर्व उल्लेखित घटना प्रकाशित वृत्तांतांवर आधारित)

Previous Post

कधी एकादशी आषाढी हे

Next Post

आंब्राई

Next Post
आंब्राई

आंब्राई

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.