हे संपादकीय लिहिले जाण्याच्या काही वेळापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पर्यावरणवादी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्याचवेळी सोनमजींना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. या देशातला कोणताही सहृदय माणूस या घटकेला सोनमजींना हेच सांगेल की आपला जीव अनमोल आहे, आपल्याकडून प्रिय भारतमातेची आणखी बरीच सेवा व्हायची आहे. त्यासाठी आपण ठणठणीत असणं गरजेचं आहे. आपण ज्या मुद्द्यांसाठी लढत आहात, तो तडीला जाण्यासाठीही आपण धडधाकट असणं गरजेचं आहे. उपोषणाने ज्यांच्यात हृदयपरिवर्तन होईल असे आपल्याला वाटते, ते हृदयशून्य आणि विधिनिषेधशून्य सत्ताधारी आहेत… शेतकरी आंदोलनात शेकड्यांनी शेतकरी शहीद झाले तर ‘ते काय माझ्यासाठी मेले का’ असे उद्गार काढणारे संवेदनाशून्य लोक आहेत! यांच्याशी लढायचे आहेच, पण जीव पणाला लावणे हा यांच्याशी लढण्याचा योग्य मार्ग असू शकत नाही.
कॉक्रोच जनता पार्टी या उपरोध आणि उपहासातून सुरू झालेल्या पॅरडी पेजचे आंदोलन अशा गंभीर वळणावर येऊन ठेपेल अशी कल्पना कोणी केली नव्हती. नीट परीक्षेच्या पेपरगळतीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या आंदोलनाला केंद्रीय शिक्षण विभागाच्या एकंदर भोंगळ कारभाराने इंधन पुरवले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात थोडा जरी सद्सद्विवेक शिल्लक असता, तर त्यांनी आंदोलनाची वाट न पाहता राजीनामा दिला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सद्सद्विवेक असता, तर त्यांनी प्रधान यांचा राजीनामा घेतला असता. ज्या तडफदारपणे त्यांनी भूपेंद्र यादव या अमित शहासमर्थक मानल्या जाणार्या आपल्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचे सगळे पंख कापून टाकले, त्या तडफदारपणे प्रधान यांनाही ताळ्यावर आणणे मोदींना शक्य होतेच. पण ते त्यांनी केलेले नाही.ठरवून केलेले नाही.
मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का सामोरे जात नाहीत, हा प्रश्न जगभरातल्या पत्रकारांना पडतो आहे. त्यावर, भारतात बहुसंख्य लोक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना पारावर चकाट्या मारल्यासारखी एकतर्फी मन की बात ऐकायला आवडते, असलं पांचट उत्तर कोणा सरकारी बाबूने दिले आहे. प्रत्यक्षात, आपण कोणालाही उत्तरदायी नाही, स्वयंभू अवतारपुरुष आहोत, अशा भ्रमिष्ट धारणेने मोदींना ग्रासले आहे. त्यामुळे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा, अशी मागणी घेऊन आंदोलन झाले की त्यांचा राजीनामा तर घ्यायचा नाहीच, उलट अधून मधून प्रधान किती उत्तम काम करत आहेत, अशी प्रशस्ती करत राहायची, हा मोदींचा खाक्या आहे. ते सीजेपीलाच नव्हे, तर या देशातल्या ज्या ज्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याशी प्रधानांच्या खात्याने खेळ केला आहे, त्या प्रत्येकालाच खिजवून दाखवत आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचा नेता अभिजीत दीपके याला मोदींनी भारतात प्रवेश कसा करू दिला, त्याला आंदोलन कसे करू दिले, वांगचुक यांना उपोषणाला कसे बसू दिले, असे प्रश्न काहींना पडले आहेत. शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी आपल्याच अन्नदात्यांच्या वाटेत खिळे ठोकण्याची मग्रुरी मोदींच्याच सरकारने दाखवली होती. आपल्या एका टग्या सहकार्याचं रक्षण करण्यासाठी देशाला ऑलिम्पिक पदकं मिळवून देणार्या महिला कुस्तीगीरांना फरपटत नेण्याचा पराक्रम करणारे हे विखारी राज्यकर्ते आहेत. त्यांनी सीजेपीला आंदोलन करून दिलं आहे ते त्यांची काही ताकद नाही, हे माहिती असल्यामुळे. मोदींच्या संकुचित परिवाराने देश नासवण्यासाठी उभे केलेले अण्णा आंदोलन आणि सीजेपीचे आंदोलन यांची तुलना करून पाहा. फरक स्पष्ट कळेल. अण्णांनी केलेले सगळे आरोप खोटे ठरले, लोकपालाच्या नावाने ठेंगा मिळाला, तरीही त्या बोगस आंदोलनाला दुसरा स्वातंत्र्यलढा म्हणून टीव्हीवर नाचवणारे गणंग आज राम मंदिराच्या दानचोरीमध्ये सरकारची अब्रू वाचवण्याच्या कामात इतके मग्न आहेत की सर्वसामान्यांसाठी उपोषणाला बसलेले वांगचुक त्यांना दिसतही नाहीत.
मोदींनी हे आंदोलन चिरडलं नाही, याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांना भारतीय जनतेची नस माहिती आहे. परीक्षा, शिक्षण, आपल्या मुलांचं भवितव्य या आणि अशा विषयांमध्ये भारतीय जनतेला खरोखरच काही रस असता, तर मुळात भारतीय जनता पक्ष सत्तेवरच आला नसता आणि तिसर्या कार्यकाळापर्यंत सत्तेत टिकूनही राहिला नसता. मोदी आणि कंपनी या लोकांना कोणीएक शत्रू दाखवणार आणि आपण शूरवीरपणे त्याला झोडत असल्याचा अभिनय करणार, मग हे टाळ्या पिटत तो तमाशा पाहणार, चेवाने मोदींची पाठराखण करणार- वास्तवात या नाटकात गुंगवून मोदी आणि कंपनी प्रत्यक्षात आपल्याला नागवं करत आहेत, याचा पत्ताही या देशाच्या बहुसंख्य नागरिकांना लागत नाही. जे हे वास्तव निदर्शनाला आणू पाहतात, त्याच्यावरच उलट हे मोदीभक्त डाफरतात. कमरेचं एक सोडलं तर दुसरं ़फेडून देऊ, संपूर्ण भोंगळे होऊ, पण, आम्हाला इतर कोणाचं तरी नुकसान होतंय, या कल्पनेचा आनंद लुटायचाय, ही यांच्या बुद्धीची मजल आहे.
सोनमजी, ज्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी तुम्ही उपोषणाला बसला आहात, त्यांच्या जथ्यांनी एव्हाना दिल्ली ओसंडून जायला हवी होती. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून काही हजार लोक तिथे आहेत, ती संख्या तेवढीच राहिली आहे. गेल्या काही वर्षांत बुद्धी गहाण ठेवून सगळे प्राधान्यक्रम हुकलेल्या लोकांचा देश आहे हा. त्याला ताळ्यावर आणायचं असेल, तर तुमच्या हौतात्म्याने काहीच होणार नाही, तुम्ही जिवंत राहायला हवं आणि नृशंस सत्तेशी लढण्याची वेगळी पद्धती विकसित करायला हवी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षणाच्या संदर्भातल्या विषयांवर काँग्रेससह देशातील प्रमुख पक्षांनी आधीपासूनच आंदोलन चालवले आहे. सीजेपीने त्या आंदोलनांचा भाग न बनता स्वतंत्रपणे अराजकीय आंदोलन सुरू केले आहे. साहजिकच विरोधी पक्ष या आंदोलनाकडे संशयाने पाहणारच! अण्णा आंदोलनाने केलेला भ्रमनिरासच तेवढा मोठा आहे. तरीही तुमच्यासारख्या गांधीवादी मार्गाने लढणार्या निरलस नेत्याच्या आंदोलनामागे शिवसेना उभी राहिली आहे, इतरही विरोधी पक्ष पाठिंबा देतील. ही सर्वांची लढाई आहे. एकदिलाने लढायची आहे. त्यामुळे त्यासाठी उद्धवजींच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडा आणि नवी रणनीती आखायला सज्ज व्हा! त्याची देशाला अधिक गरज आहे.
