• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एका क्षीण हाकेचा प्रवास

पुष्कर सामंत प्रत्यक्षदर्शी

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in विशेष लेख
0
एका क्षीण हाकेचा प्रवास

दिल्लीमधली ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यातली दुपार अंगाची लाहीलाही करत नव्हती. तसं बघायला गेलं तर थोडं गार वारंच अंगाला चाटत होतं. आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासूनच हवेत एक अस्वस्थता होती. मिट्ट काळोखात एखादं हिंस्र श्वापद दबा धरून बसावं तशी यंत्रणा श्वास रोखून सावजाच्या प्रतीक्षेत होती. एखाद्या व्रात्य कार्ट्याच्या मुस्काटात मारून त्याला गप्पं करावं तसं दिल्लीतले रस्ते, मेट्रो स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स, गाड्या, बसेस, ट्रेन्स सारं काही यंत्रणेने कानफटावून चिडीचूप करून ठेवलेलं होतं. दिल्लीच्या स्वभावधर्माच्या अगदी विरुद्ध वातावरण होतं. सकाळपासून एकामागोमाग एक तरुण नेत्यांची धरपकड सुरू झालेली होती. काहींना घरून, काहींना विमानातून, काहींना रेल्वेतून ताब्यात घेण्यात आलेलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इष्टस्थळी जावं की घरीच बसून बोंब ठोकावी अशा द्विधा मनस्थितीत तो होता. शेवटी गाठता येण्याची शाश्वती नसतानाही औत्सुक्याची भूक भागवण्यासाठी दक्षिण दिल्लीतल्या उच्च-मध्यम आणि उच्चभ्रू वस्तीतून तो स्कूटरवरून निघाला. ग्रीन पार्क, युसूफ सराय, एम्स मागे टाकून आयएनए-दिल्ली हाटपाशी तो पोचला.
एरवी हा रस्ता वाहनांच्या कोंडीचं प्रतीक मानला जातो. पण युसूफ सरायचा थोडासा भाग सोडल्यास फारशी वर्दळ नव्हती. एम्सचा तो प्रसिद्ध पूल ओलांडताच दिल्ली-हाटपाशी तुरळक गर्दी आणि पोलीस फौजफाटा त्याच्या नजरेस पडला. दिल्ली हाटच्या गेटवर खादी महोत्सवाच्या बॅनरपुढेच १०-१२ बसेस वेड्यावाकड्या उभ्या होत्या. त्याच्या थोडं पुढे त्याने त्याची स्कूटर थांबवली. काही वेळापूर्वीच तिथून एआयएसएफची नेहा बोरा, वकील प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आणि इतर कार्यकर्त्यांचा मोर्चा निघालेला होता. या तिघांसहित इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. त्या बसेस आधीच रवाना झालेल्या होत्या. आंदोलकर्त्यांनी भरलेली शेवटची बस निघायची होती. सफदरजंग एअरपोर्टच्या उड्डाणपुलाकडे बाकी कार्यकर्ते जमून आंदोलन सुरू ठेवणार अशी चर्चा होती. पण यंत्रणेच्या वर्दीधार्‍यांनी आधीच तो पूल बंद करून ठेवलेला होता. पुलाच्या डाव्या हाताने ब्रिगेडियर होशियार सिंग रस्ता धरून चाणक्यपुरीच्या चकाचक वस्तीमध्ये त्याने प्रवेश केला.

देशोदेशींचे उच्चायोग आणि दूतावासांनी भरलेला आणि भारलेला तो भाग डोळे मिटून पहुडलेला होता. दिल्लीच्या मर्मामध्ये धुमसत असणार्‍या खदखदीची जराही कल्पना नसल्यासारखं दिल्लीचं हे स्वच्छ अंग स्वतःला काळा डाग लागणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन होतं. एखाद्या दूतावासात कुणी शिंकला तरी त्याचा आवाज तिथे घुमू शकला असता. तो भाग मागे टाकून राष्ट्रपती भवनाच्या मागच्या रस्त्याला त्याची स्कूटर लागली. एका हाताला हिरवेगार रिज जंगल आणि दुसर्‍या हाताला देशाच्या पहिल्या नागरिकाचा राजमहाल. भर दुपारी त्या निर्मनुष्य रस्त्यावर नीरव शांतता होती. हा सगळा भाग त्याच्या परिचयाचा होता. एरवी या भागातून हिंडताना प्रसन्न, शांत वाटायचं. भिरभिरणारं चित्त स्थिर व्हायचं. पण आजची ही शांतता त्याच्या कानात किंचाळत होती, सकाळपासून भरकटलेलं मन अजूनच अस्थिर करत होती.

त्या तशाच मनस्थितीत तो बंगला साहिब गुरुद्वाराजवळ पोहोचला. तिथे गोल डाकखान्याला त्याने स्कूटर लावली. त्या सगळ्या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं होतं. तिथल्या अशोक रोड, बाबा खडकसिंग मार्ग, कालीबारी मार्ग आणि गुरुद्वारापाशी सीमारेषेलाही लाजवतील इतके गणवेषधारी होते. दुपारच्या सुमारास काही आंदोलक गुरुद्वाराच्या आसर्‍याला गेले होते. त्यांच्यामागे पोलीसही आत शिरल्याने तिथे जरा तणावाचं वातावरण होतं. त्यामध्ये एक दडपशाहीचा दर्प होता, विरोधी आवाजाची गळचेपी करणारा हुकमी गंध होता.
वातावरणाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत तो चालायला लागला. थोडंसंच चालल्यावर त्याला दोघेजण भेटले. त्यांच्याशी जरा माहितीपर गप्पा मारत तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो. मग एक चौथा पोरगा आला. त्याला परतीला जायचं होतं. नुकताच इष्टस्थळी पोचल्याने अनुभवाच्या जोरावर त्याने त्या चौथ्याला विश्वंभर दास रोडने जायचा सल्ला दिला. एवढंच संभाषण झालं आणि दोन पोलीस आले. ‘क्या कर रहे हो, चलो’ असं दरडावणीच्या सुरात म्हणत एकाने धरला त्याचा दंड दोनच सेकंदांसाठी. पत्ता विचारणारा चौथा पोरगा निघून गेला होता विश्वंभराच्या वाटेने. बाकीचे दोघेसुद्धा पांगले. तो त्या पोलीसाला गरीब चेहर्‍याने सांगू लागला की ‘बाबा रे तो पोरगा पत्ता विचारत होता तोच मी त्याला सांगत होतो. मला कस्तुरबा मार्गला जायचंय. सगळे रस्ते बंद आहेत, फिरफिरून माझ्या स्कूटरचं पेट्रोल संपत आलं आणि आता मी चालत जातोय. तुम्हीच सांगा कुठून जाऊ?’ त्याच्या मराठीमिश्रीत हिंदी उत्तराने ते दोघं पोलिसवाले निघून गेले. सकाळपासून इतरांना ताब्यात घेण्याच्या बातम्या, दृष्यं त्याने पाहिली-ऐकली होती. पण उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच पोलिसांना त्याला ‘धरत’ जाब विचारला होता.

कालपासून त्याने फक्त दुसर्‍यांच्यामार्फत हे सगळं काही ऐकलं-पाहिलं होतं. पण याचि देही याचि डोळा अनुभवताना त्याला कसंसंच झालं. इतर रस्त्यांप्रमाणेच हा देखील वाहनविरहितच होता. काही अंतरावर पुन्हा एका पोलिसाने त्याला अडवलं. ठरवलेलं उत्तर देऊन तो तिथून पुढे निघाला. आजूबाज्ाूला फक्त आणि फक्त पोलिसांच्या गाड्या आणि त्यांच्या साथीला भगव्या, केशरी, पिवळ्या रंगाच्या बसेस. त्या रस्त्यावरून चालताना तिथल्या हवेत दबून राहिलेलं एक साचलेपण त्याला जाणवत होतं. दोन महिन्यांपूर्वीच याच ठिकाणी ऐकलेल्या घोषणा त्याच्या कानात घुमत होत्या. शिवाजी स्टेडियम, हनुमान मंदिर मागे टाकून सीपीच्या आउटर सर्कलपर्यंत तो पोहोचला. पूर्वीच्या खादी ग्रामोद्योगकडून उजवीकडे गेल्यावर जंतरमंतर लागणार होतं. पण तिथे खाकी, निळे, लष्करी गणवेषधारी ‘अस्त्रावधानी’ होते. इथपर्यंत पोहोचताना त्याने वर्दीतल्या अनेकांचा डोळा चुकवला होता. इथे मात्र तसला काही प्रकार चालणार नव्हता.

पुढच्या अंगाला पालिका बाजारसमोर त्याला एक घोळका दिसला. आंदोलनकर्ते असल्याचं वाटून तो त्या घोळक्यापाशी जाऊ लागला. लहानपणी म्हटलेल्या मर्यादा पुरूषोत्तमाच्या ‘रक्षास्तोत्राशी’ मिळत्याजुळत्या घोषणा ऐकून तो थोडासा थबकला. एका विशिष्ट रंगाचे आणि विशिष्ट ‘संगा’चे हे लोक असल्याचं त्याने ताडलं. लहानपणापासून त्याच वातावरणात वाढल्याने त्याला त्या घोळक्याची भीतीही वाटली नाही. पण थोड्याच वेळात तो घोळका काही आंदोलनकर्त्यांच्या मागे लागला. त्यातल्या काही जणांना पळवून पळवून हाणायला लागला, ज्या ओठांवर काही क्षणांपूर्वी ओव्या होत्या, त्याच जिभेवर शिव्या नांदू लागल्या. त्याने थोडंसं मागे होतं बाजूला पाहिलं तर असंख्य वर्दीधारीही ते सारं काही शांत चित्ताने पाहत होते, निर्विकार चेहर्‍याने बघतही होते, काही हसतही होते. त्यांच्या मागूनच त्या विशिष्ट रंगाचा झेंडा आणि त्यावर चिखलात उगवलेलं ़फूल बोनेटवर नांदवत एका खासदाराची काळी स्कॉर्पिओ जाताना त्याला दिसली. आतमध्ये भगव्या वस्त्रांमध्ये कुणी बाबा बसला होता. ‘रंग दे बसंती’ सिनेमातलं ते दृश्य तो वास्तवात पाहत होता. त्याचं मन विषण्ण झालं, मेंदू गोठला, पावलं थिजली. एकाच पुरुषोत्तमाला मानणार्‍या भक्तांच्या वर्तणुकीत इतकी तफावत? या प्रश्नाचं उत्तर काही केल्या त्याला मिळेना. त्या धनुष्यधारी महापुरुषाच्या घोषणा देत झुंडशाहीचा पुरस्कार करणारी ती माथी पाहून त्याला किळस वाटली. याआधी त्याने अशा घटनांबद्दल वाचलं होतं, ऐकलं होतं पण आज तो हे अनुभवत होता. काही केल्या त्याचं मन मानायला तयार होत नव्हतं.

१२ वर्षांपूर्वी त्याच झेंड्याच्या नेत्याला सहर्ष निवडून दिल्यानंतरच्या घोर(?) तपश्चर्येचं हे फळ त्याला मिळालेलं होतं. आईवडिलांनी अनेकदा ‘आपल्यापुरतं बघावं’ हा दिलेला सल्ला त्याला आठवला. पण ‘आपल्यापुरतं’ बघता बघता ते सारं ‘आपल्यापर्यंत’ पोहोचलेलं आहे ह्याची जाणीव त्याला त्याक्षणी झाली. एका प्रचंड बुद्धिवान प्रजातीच्या जनावराचं हिंस्त्र, हिडीस विश्वरूप दर्शन त्याला आज झालं होतं. तो काही तिथे एकटा नव्हता, त्याच्यासारखेच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक धाडसी, प्रखर विरोधी तिथे होते. पण यंत्रणेच्या पाठबळापुढे सारेच गलितगात्र झालेले होते. कान सुन्न झालेले होते. स्वतःचे विचारही ऐकू येईनासे झाले. बधीर पावलं उचलत तो माघारी फिरला. आधीच शांत, निपचित पडलेले ते रस्ते आता त्याच्या अंगावर यायला लागले होते. अंधार्‍या वाटेवरून परत असतानाच त्याला एक क्षीण हाक ऐकू आली. तो आवाज त्याच्या ओळखीचा होता. त्याने चमकून इकडेतिकडे पाहिलं. पण आधीच उद्विग्न झालेल्या मनःचक्षूंवर आता काळोखाची चादर ओढली गेली होती. तरीही त्या हाकेने त्याचा पिच्छा सोडला नाही- ‘या मर्यादा-पुरुषोत्तमांच्या मर्यादा उघड आहेत. त्या मर्यादांचं श्राद्ध घाल. अन्यथा जिवंतपणी स्वतःच्या श्राद्धाच्या तयारीला लाग…’ ती हाक नसून चपराक होती याची त्याला जाणीव झाली आणि तो त्या समस्त स्वघोषित पुरुषोत्तमांच्या श्राद्धाच्या तयारीला लागला.

Previous Post

मोदीजी इट्स डन ब्रो!

Next Post

मुंबईतल्या आंदोलनात उतरलो तेव्हा…

Next Post
मुंबईतल्या आंदोलनात उतरलो तेव्हा…

मुंबईतल्या आंदोलनात उतरलो तेव्हा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.