
नव्हे खळवादी मताच पुरता।
सत्याची हे सत्ता उपदेश ।।१ ।।
साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे।
परिपाकी खरे खोटे कळे ।।२ ।।
नव्हे एकदेशी शब्द हा उखता।
ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ।।३ ।।
तुका विनवणी करी जाणतिया।
बहुमते वाया श्रमो नये ।।४ ।।
प्रस्तुत अभंगात तुकोबारायांनी त्यांची बांधिलकी कोणत्याही इझमशी नसून सत्याशी असल्याचं सांगितलं आहे. या अभंगातील मत हा शब्द दर्शन, तत्त्वज्ञान, विचारसरणी, इझम अशा अर्थाने आलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की मी केवळ एखाद्या मताशी बांधील नसून सत्याचा पुरस्कर्ता आहे. आपल्या भारतीय विचारपरंपरेत अनेक मतप्रवाह आहेत. विशेषतः वैदिक परंपरेत अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत आणि शक्तिविशिष्टाद्वैत असे अनेक वाद आहेत. वारकरी संप्रदायातील संतांनी यातील कोणत्याही एका विशिष्ट दर्शनाचा पुरस्कार केलेला नाही. संतांच्या काळातील पंडित यापैकी एखाद्या विचारसरणीचा स्वीकार करत असत. त्यासाठी तर्काधिष्ठित युक्तिवाद करत आपलीच विचारसरणी योग्य असल्याचं प्रतिपादन करत. त्यासाठी त्यांच्या विचारसरणीला पूरक प्रमाणे शोधत असत. जी प्रमाणे त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात असतील त्याचा शाब्दिक कीस पाडत विपर्यस्त अर्थ लावत. ते सत्याचा शोध न घेता त्यांच्या विचारसरणीला पूरक अशा प्रमाणांचा शोध घेत होते. तुकोबाराय प्रस्तुत अभंगात म्हणतात की, ‘मी माझ्या मनाला साक्ष ठेऊन तपासणी करतो आणि त्याआधारे खरं-खोटं ठरवतो. मनाला साक्ष ठेऊन केलेल्या तपासणीत जे सत्य आढळेल, त्याचाच लोकांना उपदेश करतो. एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करायला मी काही एकांगी नाही. माझे शब्द विचारसरणीपुरते मर्यादित नसून ब्रह्मांडाला व्यापून उरणारे आहेत.’ त्यानंतर तुकोबाराय अखेरच्या चरणात सांगतात की या मतवाद्यांच्या नादी लागून विनाकारण श्रम करून घेऊन नयेत.
सत्य आणि मत यात बराच फरक असतो. लोक एखाद्या मतालाच सत्य समजतात. सत्य हे व्यापक असतं. ते एका विचारसरणीत बांधता येत नाही. विचारसरणीचे संस्कार प्रश्नांकित केल्याशिवाय सत्याचा बोध होऊ शकत नाही. मी स्वीकारलेली विचारसरणीच सत्य आहे असं न म्हणता सत्य हीच माझी विचारसरणी आहे, असं म्हणण्याची गरज आहे. तुकोबारायांनी तेच सांगितलं आहे. तुकोबाराय प्रस्तुत अभंगात जे सत्य सांगत आहेत ते सत्तामात्र परमेश्वराचं सत्य आहे. मतमतांतराचा गलबला परमेश्वराच्या सत्यस्वरूपापर्यंत न नेता केवळ वादातच अडकून पाडणारा आहे. ‘तुका म्हणे वादे। वाया गेली ब्रह्मवृंदे ।।’ असं त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात.
वारकरी संप्रदाय कोणत्याही एका विशिष्ट विचारसरणीच्या समर्थनार्थ निर्माण झालेला नाही. या संप्रदायातील संतांनी कोणतंही स्वतंत्र मत मांडलं नाही. संतांनी त्यांना आलेल्या परमेश्वराच्या प्रेमाचा सत्य अनुभव मांडला. संतांना वादात नाही तर सत्याच्या अनुभवात रस होता. त्यामुळेच संतांच्या वाणीचा भर खंडण-मंडणावर नसून सत्याच्या अखंड शोधावर आहे. साहजिकच हे सत्य सांगताना संतांनी कशाचीही पर्वा केली नाही. बहुमताचा पगडा तर त्यांनी कधीच जुमानला नाही. एखाद्या मताला अनेक लोक पाठिंबा देतात, म्हणून ते मत सत्य ठरतं असं नाही. सत्याचं मोल बहुमतावर अवलंबून नाही. ‘सत्यअसत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. त्याचबरोबर अनेकदा सत्य सांगितलं तर लोक रागावतात. ‘खरं बोललं तर सख्ख्या आईलाही राग येतो’ असं म्हणतात. तुकोबाराय सत्य प्रतिपादन करताना लोकांच्या या रागलोभाची पर्वा करत नाहीत. ‘तुका म्हणे सत्य सांगो। येवोत रागे येतील ते ।।’ असं ते धडधडीतपणे सांगतात.
आपल्याकडे विशिष्ट तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करण्यातच पांडित्य आणि विद्वता दाखवण्याची सवय आहे. त्याचं प्रत्यंतर वारकरी विचारांचे भाष्यकार दादा महाराज सातारकर यांनाही आलं होतं. यासंदर्भात त्यांच्या चरित्रातील एक प्रसंग आणि त्यावरचं भाष्य गोपाळ शंकर राहिरकर यांनी केलं आहे. राहिरकर लिहितात- ‘महाराज (दादा महाराज सातारकर) रामानुजाचार्यांची जन्मभूमि तिरुपति येथे गेले, त्यावेळी विशिष्टाद्वैतमतांच्या विद्वानांची तेथे सभा भरली होती. महाराज त्या सभेसाठी मुद्दाम तेथे राहिले व हे श्रेष्ठ विद्वान धर्मचर्चा करून स्वहित व जनहित काय करितात, ते पाहण्याचे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे त्यांत झालेली भाषणे व ठराव पाहिले. त्यांत एकही भाषण अगर ठराव जीवांना सुख कसे लाभून घ्यावे याबद्दल नव्हता. तेथे एक परीक्षा मात्र घेण्यात आली. त्या परीक्षेला हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. शंकराचार्यांचे अद्वैतमत जो उत्कृष्ट रीतीने, त्यांच्याच ग्रंथावरून खोडून काढील त्याला ते बक्षीस देण्यात यायचे होते. त्या परीक्षेला विद्यार्थीही कमीतकमी शंभर होते. हा सर्व प्रकार पाहून महाराजांना पुष्कळ वाईट वाटले व या चारी आचार्यांचे आज कोणते कार्य शिल्लक राहिले आहे, याचा त्यांच्या चित्तांत सुंदर प्रकाश पडला. ‘एकूण या मतांना वाद हे नाव सार्थ आहे. अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत व शक्तिविशिष्टाद्वैत हे वाद प्रभूंचे प्रत्यक्षत्व भेटवण्याच्या ऐवजी शब्दांचा कीस काढून वाद वाढविण्यापुरते शिल्लक राहिलेले दिसतात. अद्वैत अनुभवाचा अगर द्वैतांत भक्तिसुख भोगणारा असा चैतन्याचा मूर्तिमंत पुतळा यापैकी कोणत्याही मार्गात भेटत नाही. तोंडाने हे अद्वैत अगर द्वैत तत्त्व बोलतात व मोक्षासाठी कर्मच प्रतिपादन करतात, अगर कर्माचाच तेवढा प्रचार करितात, कर्मांवरून जीवाजीवांत भेद करितात व स्वतःला या शब्दविद्वत्तेने अगर शास्त्रविहित कर्मांवरून श्रेष्ठ समजतात. ‘ब्रह्म सर्वंगत’ म्हणतात पण समाजचे समाज, शूद्र, अतिशूद्र म्हणून शास्त्रनिर्मित कायद्यांनी युगानुयुगे दास्यांत, हालांत जखडून, त्यांना उच्चत्व मिळण्याचे कायमचेच अशक्य करून टाकतात.
या चारी आचार्यांच्या वादाने काही विशेष केले असले तर ही हिंदू जनता कर्मांत गुंतवून, शाब्दिक युद्धाच्या चार छावण्यांमध्ये वाटून घेण्याचे कार्य तेवढे केले आहे. बिचारे मूढ लोक! त्यांना स्वतःला स्वतंत्र धर्मचर्चा, स्वतंत्र ज्ञानार्जन, व स्वतंत्र बुद्धीही ठेवण्यात आली नव्हती. ती, अनुभवालाही मागे सारणार्या शब्दप्रामाण्याने (तेही त्यांच्या पंथाच्या आचार्यांनी ठरवलेल्या न्यायशास्त्राने) पार जखडून टाकण्यात आली होती.
याउलट संतांचा धर्म आहे. तो कोणाही जीवाला अनुभव घेऊन तो सुखाचा आहे की, दुःखाचा, हे ठरविण्याला उघड व सुलभ आहे. सर्व धर्मांनी ज्यांना दूर टाकले त्यांनाही पोटी घेणारा हा धर्म आहे. तो कोणाचेही कर्मांवरून उच्चनीचत्व जाणीत नाही. केवळ जिवंतत्व आहे, हाच प्रभुसुख भोगण्याचा अधिकार आहे, अशी हाच एक धर्म खात्री करून देतो. हा पंथ जातिविशिष्ट काय पण धर्मविशिष्ट देखील नाही. जीवमात्राला श्रीहरी निकट आहे, तो स्मरणाने सहज भोगता येतो. तेथे साधनांच्या यातायाती कराव्या लागत नाहीत, असा तो धर्म आहे. एकदा, महाराजांना एकाने विचारिले, ‘इतर पंथांच्या मतांना अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत वाद म्हणतात त्याप्रमाणे या संप्रदायाच्या मताला कोणता वाद हे नाव आहे?’ महाराजांनी शांतपणाने त्याला उत्तर दिले, ‘हा मार्ग कोणत्याही मतवादाचा नाही. हा स्मृतिसुखाचा पंथ आहे. जीव स्मृतिरूप आहे. त्याला जी स्मृति (आवडी) तो भोग असतो. जीव ज्या प्रेमापासून (प्रभुपासून) व्यक्त दिसतो त्याची (प्रेमाची) स्मृती म्हणजे भोग राहणे म्हणजेच भक्त होणे होय. या धर्मात श्रीहरी शोधावयाचा नाही अगर देव स्थापावयाचा नाही. हा धर्म देवभोगाचाच केवळ आहे. ज्यांचा देव ठरलेला नसतो, त्यांना वादावाद करून देव स्थापन करावयाचा असतो. संत जीवाला शब्दज्ञानाऐवजी अनुभवाच्या मार्गांत नेतात. नामस्मरण भजन करून प्रभू सुख भोगवितात.’
अलीकडे काही विद्वान, इतर वादांच्या जोडीला या पंथाच्या नावावर एक वाद असणे अवश्य आहे म्हणून या धर्माच्या तत्त्वज्ञानाला स्फूर्तिवाद हे नाव देतात, पण ते अपुरे होईल. कारण भजनाचा बोध व भोग हा स्फूर्तिवाद या तत्त्वविचारांत येत नाही. ईश्वराचे, जीव व सृष्टी यांतील व्यक्तत्व म्हणजे ईश्वराचे कर्मरूप एवढ्यापुरताच त्या बोधाचा संबंध आहे. तेव्हा स्फूर्तिवाद, हे या धर्माच्या बोधाचे व यथार्थ संपूर्ण वर्णन नव्हे. त्यापेक्षा भक्तिमार्ग, प्रेमस्फूर्तिपंथ, इत्यादी वर्णन पुष्कळसे जुळेल तरी.’
दादा महाराजांच्या चरित्रातील या प्रसंगातून आपल्याला वारकरी संप्रदायाची भूमिका समजून येते. कोणतीही एखादी विशिष्ट विचारसरणी पूर्णपणे सत्य असते असं नाही. सत्य ही अखंडपणे शोधत राहण्याची अनुभवजन्य प्रक्रिया आहे. काही लोक धर्मग्रंथालाच सत्य समजतात. काही लोक त्या धर्मग्रंथाचा विशिष्ट अर्थ लावणार्या पंथीय धारणांनाच सत्य समजतात. काही लोक त्यांनी स्वीकारलेल्या एखाद्या इझमलाच कवटाळून बसतात. त्यांची बुद्धी स्वतंत्रपणे सत्याचा शोध घेण्याची तसदी घेत नाही. यातूनच पोथीनिष्ठा जन्माला येते. ही पोथीनिष्ठा संघटित अहंकाराशी जोडली जाते. त्यातून दांभिकता आणि असत्याची मालिका सुरू होते. तुकोबाराय मुळावर घाव घालतात. ते सत्याला सर्वोच्च मानतात. तुकोबारायांची ही सत्यनिष्ठा पुढे महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारसरणीत दिसून येते. त्यांनी कोणत्याही तथाकथित धर्माला सत्य मानलं नाही तर सत्यालाच धर्म मानलं. त्यामुळेच त्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्माची’ कल्पना मांडली. ‘सत्य तोची धर्म करावा कायम। मानवा आराम सर्वठायी ।।’ असं महात्मा फुले म्हणतात. माझा धर्मच तेवढा सत्य आहे असं नसून सत्य हाच माझा धर्म आहे, असा उलटापालट करणारा विचार त्यांनी मांडला. महात्मा फुले केवळ सत्य शोधणारे सत्यशोधक नव्हते, तर त्या सापडलेल्या सत्याचा उघडपणे उपदेश करणारे सत्योपदेशक होते. त्यापुढे जात त्यांनी केवळ सत्याचा उपदेशच केला असं नाही तर त्या सत्याची रुजवणूकही केली. त्यामुळे ते सत्याचे पालनवालेही होते. त्यामुळेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सत्याचा पालनवाला हा धन्य जोतिबा झाला। पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला ।।’ असं म्हटलं आहे. महात्मा फुल्यांच्या या सत्यनिष्ठेची मूळ प्रेरणा संतांची आहे. सत्यशोधक हा महात्मा फुल्यांच्या चळवळीचा शब्द मुळात संत कबीरांच्या साहित्यातूनच आलेला आहे, असं एस. एम. जोशी यांनी म्हटलं होतं. वारकरी संप्रदायातील संत हे या अर्थाने सत्यशोधकच होते. त्यामुळेच सत्यशोधक समाजातील ह. ना. नवलकर यांनी ‘सत्यशोधक महासाधू श्री तुकाराममहाराज’ या नावाने पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी ‘जनता जर निःपक्षपाती बुद्धीने आणि निर्विकार मनाने श्रीतुकाराम महाराज यांच्या अभंगांचे अवलोकन आणि मनन करील तर तिची अशीच पूर्ण खात्री होणार आहे, की सत्यशोधक जे सांगत आहेत तेच श्रीतुकाराम महाराज सांगून गेले. यावरुन ते कट्टे सत्यशोधक होते, याविषयी तिळमात्र संशय राहत नाही’ असं सांगून तुकोबारायांची सत्योपदेशकाची भूमिका स्पष्ट केली आहे.

