
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आणि राज्यात स्थापन झाल्यानंतर या पक्षाने साधन शुचिता, संस्कृती, संस्कार, नैतिकता, संवैधानिकता अशा मूलभूत सैद्धांतिक बाबींना जणू तिलांजली देत साम, दाम, दंड, भेद अशी चतु:सूत्रीच स्वीकारली आहे, असेच दिसून येते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांना फोडून भाजपत येणार्यांची संख्या बेसुमार वाढली. मूळ जनसंघाचे/राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अडगळीत फेकले गेले आहेत.
भाजपच्या प्रदेश कार्यालयातून पत्रकार परिषदेत येण्याचे ‘आवतन’ येत होते तेव्हा मी एकदा मस्करीत सांगितले की, आता आपल्या प्रदेश कार्यालयावर ‘भारतीय जनता काँग्रेस’ अशी पाटी लावा. तीच भविष्यवाणी ठरली या पक्षाच्या बाबतीत. आज सगळ्या देशभरात भाजपची सत्ता आल्याचे बाहेरून दिसते. पण, सत्तेत आहेत ते कोण आहेत? कुठून आलेले आहेत? आज आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल करीत करीत चौखूर उधळलेला वारु बेफाम होऊन लोकशाहीच्या चिंधड्या उडवीत आहे.
आसामचे हिमंता बिस्वा सरमा, पश्चिम बंगालचे सुभेंदु अधिकारी यांनाही अनुक्रमे काँँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधून फोडून भाजपचे मुख्यमंत्री बनविण्यात आले. विशेष म्हणजे त्या दोघांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. महाराष्ट्रातील अजित पवार यांच्यावरही ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करून चार दिवसांत आपल्या वळचणीला आणून उपमुख्यमंत्री बनविले. अशोक चव्हाण यांच्यावरही मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करीत आपल्या धुलाई यंत्रातून शुद्ध करुन राज्यसभेवर पाठविले. आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा आणि सहकारी अशा सात खासदारांना भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राज्यसभेत उजळ माथ्याने बसविले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी गोडीगुलाबीने आपल्या पक्षात सहभागी व्हा, गुजरातचा दहा वर्षांत जसा विकास झाला तसा तेलंगणाचाही विकास करू, असे सांगितले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होण्याची ऑफर दिली. ‘केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत गुजरातला जे काही दिलं, ते सर्व तेलंगणालाही देण्यासाठी मी तयार आहे, पण तुम्ही माझ्यासोबत या’, असे मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हंशा पिकला आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनाही हसू आवरले नाही.
अर्थात हे वरवर पाहता तेवढे सरळ नाही. या कार्यक्रमात रेवंत रेड्डी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील गुजरातच्या विकासाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळात ‘गुजरात मॉडेल’ विकसित झाले. त्याचप्रमाणे पुढील दहा वर्षांत तेलंगणातही ‘तेलंगणा विकास मॉडेल’ साकार व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. भारताच्या विकासासोबत तेलंगणालाही पुढे नेले पाहिजे. आमच्या विकास प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी आपण दोन तास वेळ द्यावा. त्यावर मोदींनी रेड्डी यांना ही ऑफर दिली. अर्थात रेवंत रेड्डी यांनी त्यावेळी सांगितले नाही की डॉ मनमोहन सिंग यांनी गुजरातला मदत करतांना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षात यावे अशी ऑफर दिलेली नव्हती. परंतु साम दाम दंड भेद याच चतु:सूत्रीचा वारंवार उपयोग करणार्या भारतीय जनता पक्षाकडून नैतिकतेची अपेक्षा कशी काय ठेवणार? भाजपाचे निझामाबादचे खासदार धर्मपुरी अरविंद यांनी रेवंत रेड्डी यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. रेवंत रेड्डी हे पश्चिम बंगालचे भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांच्यासारखे पाऊल उचलून काँग्रेसला मोठा धक्का देऊ शकतात, असे संकेत अरविंद यांनी दिले आहेत.
शुभेंदु अधिकारी यांनी काही वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता तसाच काहीसा प्रकार तेलंगणात घडण्याची शक्यता खासदारांनी वर्तवली आहे. २०२८-२९ च्या निवडणुकीत रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव होईल. यापूर्वी १९८५ आणि १९९४ मध्ये काँग्रेसचा जसा पराभव झाला होता, त्याहूनही वाईट स्थिती यावेळी असेल,’ असा दावा अरविंद यांनी केला. आगामी दोन वर्षांत तेलंगणाच्या राजकारणात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळेल आणि शेवटी भाजपा तिथे सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस आणि भाजपामध्ये आगामी ‘ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच वाद पेटलेला असताना, भाजप खासदाराच्या या दाव्यामुळे तेलंगणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आता यावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेस काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकमात्र खरे की एकापाठोपाठ एक अशी राज्ये साम दाम दंड भेद यांचा वापर करुन भारतीय जनता पक्ष गिळंकृत करीत आहे. याच चतु:सूत्रीचा वापर होईल का? रेवंत रेड्डी आणि तेलंगणा यांचे भवितव्य काय? लवकरच कळेल!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

