• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

घुसखोरी माणसांची,बदनामी वन्यजीवांची!

प्रशांत सिनकर (निसर्गायन )

marmik by marmik
May 29, 2026
in निसर्गायण
0
घुसखोरी माणसांची,बदनामी वन्यजीवांची!

पहाटेच्या शांत वातावरणात अचानक एखाद्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये बिबट्या दिसल्याची बातमी येते…

कधी एखादा अजगर इमारतीच्या गटारात सापडतो…

तर कधी कोल्हा, साळींदर किंवा घुबड मानवी वस्तीत आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरते. मग सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतात, टीव्ही चॅनल्सवर ‘थरार’ रंगतो आणि लोकांचा एकच सूर उमटतो, ‘या प्राण्याला पकडा आणि दुसरीकडे सोडा!’
मात्र या गोंधळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो…

खरंच हे वन्यजीव मानवी वस्तीत घुसले आहेत का?

की माणूसच त्यांच्या अधिवासात शिरला आहे?

आज ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात वेगाने होणारे नागरीकरण हे वन्यजीव संघर्षाचे सर्वात मोठे कारण बनले आहे. जंगल, खाडी, मॅन्ग्रोव्ह, दलदली, डोंगर आणि नैसर्गिक जलस्रोत यांच्या जागी काँक्रीटचे जंगल उभे राहत आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या सीमा पुसल्या जात आहेत आणि याचाच परिणाम म्हणून वन्यजीव मानवी वस्तीत दिसू लागले आहेत.

पूर्वी ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, ओढे, टेकड्या आणि मोकळी जमीन होती. अनेक वन्यजीवांचे स्थलांतर मार्ग नैसर्गिकरित्या खुले होते. पण गेल्या दोन दशकांत शहर विस्ताराच्या स्पर्धेत डोंगर पोखरले गेले, मॅन्ग्रोव्ह तोडले गेले आणि जंगलांच्या सीमांवर उंच इमारती उभ्या राहिल्या. परिणामी वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास तुटले. विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर हा याचे सर्वात जिवंत उदाहरण आहे. बिबट्यांचे अधिवास कमी होत असताना त्यांच्या आसपास मानवी वस्ती प्रचंड वाढली. जंगलाच्या सीमांवर झोपडपट्ट्या, गृहसंकुले आणि रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. त्यामुळे बिबट्यांसारख्या प्राण्यांचे हालचालीचे मार्ग बंद झाले. मग हे प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळू लागले. 

हेच चित्र खाडी परिसरातही दिसते. ठाणे आणि मुंबईतील मॅन्ग्रोव्ह क्षेत्रे ही केवळ झाडांची जंगले नाहीत, तर हजारो पक्षी, साप, कोल्हे, खेकडे आणि जलचरांचे घर आहे. पण या खाड्यांवर भराव टाकून रस्ते, मेट्रो कारशेड, टॉवर्स आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत. नैसर्गिक परिसंस्था उद्ध्वस्त होत असल्याने वन्यजीवांना नवीन आश्रय शोधावा लागत आहे.

वन्यजीव मानवी वस्तीत दिसला की लोकांच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण शहरातील माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्याला साप दिसला की तो विषारीच असेल असे वाटते. कोल्हा दिसला की तो हल्ला करेल अशी भीती वाटते. पण वास्तव वेगळे आहे. बहुतांश वन्यजीव माणसाला टाळण्याचाच प्रयत्न करतात. ते केवळ भीती, भूक किंवा दिशाभूल झाल्यामुळे मानवी वस्तीत येतात.
सापांच्या बाबतीत तर गैरसमज प्रचंड आहेत. पावसाळ्यात साप मानवी वस्तीत अधिक दिसतात. कारण त्यांच्या बिळांमध्ये पाणी भरते. उंदरांच्या मागे ते घराजवळ येतात. पण लोक घाबरून त्यांना ठार मारतात. प्रत्यक्षात साप हे पर्यावरणातील अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ते उंदरांची संख्या नियंत्रित ठेवतात. साप नसतील तर शेती आणि धान्यसाठ्यांवर उंदरांचे संकट वाढू शकते. त्याचप्रमाणे कोल्हे, घुबड, साळींदर यांसारखे प्राणीही पर्यावरण संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण नागरीकरणामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

आज सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ‘पकडा आणि दुसरीकडे सोडा’ ही मानसिकता. वन्यजीव दिसला की त्याला स्थलांतरित करणे हा उपाय मानला जातो. पण हा खरोखर वैज्ञानिक उपाय आहे का? प्रत्येक वन्यजीवाला स्वतःचा एक निश्चित परिसर असतो. त्याला कुठे पाणी मिळते, कुठे शिकार मिळते, कुठे धोका आहे याची नैसर्गिक माहिती असते. अचानक त्याला दुसर्‍या जंगलात किंवा अपरिचित भागात सोडल्यास तो तिथे टिकेलच असे नाही. अनेकदा स्थलांतरित प्राणी तणावामुळे मृत्युमुखी पडतात. काही वेळा ते दुसर्‍या प्राण्यांच्या हद्दीत गेल्याने संघर्षात जखमी होतात.
विशेषतः बिबट्यांच्या बाबतीत हे गंभीर आहे.

संशोधनातून असे दिसून आले आहे की सतत स्थलांतरित केलेले बिबटे अधिक गोंधळलेले आणि आक्रमक होऊ शकतात. कारण त्यांचे नैसर्गिक क्षेत्र आणि अन्नसाखळी विस्कळीत होते. म्हणूनच वन्यजीव व्यवस्थापनात ‘सहअस्तित्व’ ही संकल्पना अधिक महत्त्वाची ठरत आहे. म्हणजेच माणूस आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष कमी करून दोघांनाही सुरक्षितपणे जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे.
यासाठी सर्वात आधी आवश्यक आहे ती पर्यावरणपूरक शहर नियोजनाची. शहर विस्तार करताना नैसर्गिक अधिवास, जलमार्ग, मॅन्ग्रोव्ह आणि वनक्षेत्रे जपली गेली पाहिजेत. वन्यजीवांचे नैसर्गिक कॉरिडॉर खुले ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण दुर्दैवाने आज विकास प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय परिणामांकडे दुय्यम दृष्टीने पाहिले जाते. रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, टॉवर्स आणि औद्योगिक प्रकल्प उभारताना हजारो झाडे तोडली जातात. डोंगर सपाट केले जातात. पाणथळ जागा बुजवल्या जातात. परिणामी जैवविविधता नष्ट होते. शहरातील उष्णता वाढते, पूरस्थिती निर्माण होते आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येते.
ठाण्यासारख्या शहरात तर काँक्रीटीकरणाने परिसंस्थेचा समतोल बिघडवला आहे. झाडांसाठी जागा उरलेली नाही. नैसर्गिक जलवाहिन्या बंद झाल्या आहेत. खाड्यांवरील अतिक्रमणामुळे जलचर आणि पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे.

वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणेही तितकेच आवश्यक आहे. एखादा वन्यजीव दिसला की गर्दी करणे, दगड मारणे, फोटो काढण्यासाठी जवळ जाणे या गोष्टी अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे प्राणी अधिक घाबरतो आणि कधी कधी आक्रमकही होतो. वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती वाढवली पाहिजे. शाळा, महाविद्यालये आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये वन्यजीवांविषयी प्रशिक्षण आणि माहिती दिली गेली पाहिजे. साप दिसल्यास काय करावे, बिबट्या आढळल्यास कशी खबरदारी घ्यावी, वन्यजीवांना त्रास न देता परिस्थिती कशी हाताळावी याचे शिक्षण आवश्यक आहे. त्याचबरोबर वनविभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक साधने आणि जलद प्रतिसाद यंत्रणा असणे गरजेचे आहे. अनेकदा वन्यजीव पकडण्यासाठी येणार्‍या पथकांना उशीर होतो. लोकांच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिक बिघडते. त्यामुळे प्रत्येक शहरात सक्षम ‘वन्यजीव प्रतिसाद यंत्रणा’ उभारणे काळाची गरज आहे.

आज हवामान बदलाचाही वन्यजीवांवर मोठा परिणाम होत आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, जंगलातील आगी आणि जलस्रोतांचे आटणे यामुळे प्राणी विस्थापित होत आहेत. अनेक पक्ष्यांचे स्थलांतर पॅटर्न बदलत आहेत. काही प्रजाती शहरांकडे वळत आहेत. त्यामुळे भविष्यात वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाला फक्त ‘जमीन’ समजू लागलो आहोत. पण जंगल म्हणजे केवळ झाडांचा समूह नाही. ती एक संपूर्ण परिसंस्था आहे. प्रत्येक प्राणी, पक्षी, साप, कीटक आणि वनस्पती या साखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी एक घटक नष्ट झाला तरी संपूर्ण पर्यावरणीय समतोल ढासळतो.
आज माणूस स्वतःला पृथ्वीचा मालक समजू लागला आहे. पण निसर्ग कोणाच्याही मालकीचा नसतो. या पृथ्वीवर जितका अधिकार माणसाचा आहे तितकाच अधिकार वन्यजीवांचाही आहे. वन्यजीव संघर्षाचे खरे समाधान हे ‘प्राणी हटवा’ यात नाही, तर ‘निसर्ग वाचवा’ यात आहे. जंगलं, मॅन्ग्रोव्ह, जलस्रोत आणि जैवविविधता जपली तरच संघर्ष कमी होईल. अन्यथा भविष्यात शहरांच्या वाढत्या भिंती आणि जंगलांच्या कमी होत जाणार्‍या सीमांमध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होत जाणार आहे. आज वेळ आली आहे ती निसर्गाला विरोधक नव्हे, तर सहजीवनाचा आधार मानण्याची. कारण शेवटी माणूस निसर्गाशिवाय जगू शकत नाही… पण निसर्ग मात्र माणसाशिवायही स्वतःचा मार्ग शोधू शकतो.

‘पकडा आणि दूर सोडा’ हा उपाय नाही…
‘वन्यजीव मानवी वस्तीत आले की आपण घाबरतो… पण त्यांच्या जंगलात घुसताना आपण कधीच विचार करत नाही. प्रत्येक साप, बिबट्या, कोल्हा किंवा पक्षी हा निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांना वाचवणं म्हणजे फक्त प्राणी वाचवणं नाही… तर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करणं आहे. ‘पकडा आणि दूर सोडा’ हा उपाय नाही… तर जंगल, मॅन्ग्रोव्ह आणि नैसर्गिक अधिवास जपणं हाच खरा मार्ग आहे.’
— भरत मोरे (प्राणीमित्र ठाणे)

Previous Post

क्रिकेट जगणारा माणूस

Next Post

आता तेलंगणातही बंगाली जादू?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.