
भा रतीय संस्कृतीत विड्याच्या पानाला केवळ खाद्यपदार्थाचे नव्हे, तर परंपरा, आदरातिथ्य आणि सामाजिक जिव्हाळ्याचे प्रतीक मानले जाते. शुभकार्य असो, सण-समारंभ असो किंवा पाहुणचाराची सांगता त्यामध्ये विड्याचे पान मानाचे स्थान मिळवते. अनेकांना आजही रात्रीच्या जेवणानंतर सुगंधी, चविष्ट पान खाण्याची सवय असते. ही सवय फक्त तोंडाला ताजेपणा देणारी नसते तर मैत्रीचे धागे घट्ट विणणारी असते. ज्या ठिकाणी उत्तम दर्जाचे पान मिळते, ते ठिकाण हळूहळू केवळ पानाचे दुकान राहत नाही; तो मित्रमंडळींचा आवडता कट्टा बनतो. व्यापारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, कलाकार, उद्योजक, विद्यार्थी अशा विविध क्षेत्रांतील लोक रोजच्या धावपळीतून काही क्षण मन मोकळे करण्यासाठी येथे एकत्र जमतात. पानाच्या मधुर रसपानासोबत गप्पांचा फड रंगतो, नव्या कल्पनांची देवाणघेवाण होते, अनुभवांची शिदोरी वाटली जाते आणि अनेक नाती अधिक दृढ होतात. अशाच गप्पांमधून नवे व्यावसायिक संबंध, सामाजिक उपक्रम, आयुष्यभर टिकणार्या मैत्रीची सुरुवातही होते. या सार्या वातावरणाचा केंद्रबिंदू असतो तो पानाचा अप्रतिम स्वाद. पुण्यात विविध क्षेत्रांमधल्या मान्यवरांचा असाच एक हक्काचा कट्टा म्हणजे कर्वे रोडवरचा ‘अनिल पानवाला.’ कोणत्याही प्रकारचं पान खात असलात तरी इथे एक नंबर पान मिळणार, याची खात्री आहेच, पण, या जागेची खरी ओळख काय असे विचाराल तर ती म्हणजे ‘माणसे जोडणारे विद्यापीठ.’ या विद्यापीठाचे अनभिषिक्त कुलगुरू अर्थातच व्यक्ती नव्हे संस्था बनून बसलेले अनिल शेठ. पुण्यातील कलाकार, राजकीय मंडळी, संगीत क्षेत्रातील मंडळी अशा मान्यवरांचा अनमोल आणि अकृत्रिम स्नेह कमावलेला हा एक ‘श्रीमंत’ माणूस आहे…
कर्वे रोडवर आबासाहेब गरवारे कॉलेजच्या समोरच अनिल पानवाल्याचा ठेला दिसेल. अन्या या प्रेमळ पुणेरी हाकेनेच अधिक प्रसिद्ध असलेल्या अनिल शेठचे आडनाव परदेशी असे आहे, हे इथे वर्षानुवर्षे तोंड लाल करणार्या अनेक नियमित ग्राहकांनाही माहिती नसेल. संध्याकाळच्या वेळी भरपूर गर्दीतून पुढे जाऊन अनिल शेठचं दर्शन होतं तेव्हा दोन गोष्टी लक्षात येतात, अनिल शेठचे विद्युतवेगाने फिरणारे हात आणि त्यांच्या तोंडून गुणगुणली जाणारी लता मंगेशकरांची गाणी… अनिल शेठ हे अस्सल पुणेरी प्रकरण… बोलता बोलता कधी विकेट काढतील, सांगता येत नाही… पण, आपलं पान सांगितलं कधी, त्यांनी बनवलं कधी, आपल्या हातात आलं कधी आणि आपल्या तोंडात विरघळलं कधी, हे कळतच नाही, इतका वेगवान, शून्य मिनिटांत घडणारा नजरबंदीचा खेळ… एकदा तुमचं गोत्र जुळलं की अनिल शेठ खुलायला लागतात… त्यांच्याकडून एखादा पुणेरी टोला बसला की समजायचं आपण अनिल पानवाला मित्रमंडळाचे सदस्य बनलो… आता तुम्ही अनेक वर्षांनी आलात तरी अनिल शेठ तुम्हाला परफेक्ट ओळखणार आणि तुम्ही सांगायच्या आत तुमचं पान तयार करून तुमच्या समोर हजर करणार… अर्थात, याला कठोर तप:श्चर्या आणि भाग्य लागतं… पण, ते लाभलेले शेकडो मेंबर आहेत अनिलच्या कट्ट्यावर…

६५ वर्षांची तप:श्चर्या!
१९६१ सालातली गोष्ट. तेव्हा डेक्कन जिमखान्यावर पूना कॉफी हाऊस हे प्रख्यात रेस्टॉरंट होतं दिवंगत माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या मालकीचं. तिथे अनिलच्या काकांचे पानाचे दुकान होते. १९६१ सालापासून अनिलने आधी काकांकडून पान लावण्याचे धडे घेतले. त्या काळात पानाचे शौकीन फार नव्हते. जे होते त्यांच्याकडे स्वत:चा सरंजाम असायचा, पानाचा डबा असायचा. बाहेर जाऊन पान खाण्याची पद्धत कमी. पानाची दुकानं कमी होती. पूना कॉफी हाऊसच्या पानवाल्याचं पूना पान मात्र फेमस होते. रात्री उशिराही इथे पान खाण्यासाठी गर्दी असायची. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत पानाचे दुकान सुरू असायचे. लोक गप्पा मारत थांबायचे.
अनिल शेठ सांगतात, त्या काळात बनारस, कलकत्ता, मघई हे पानांचे प्रकार पुण्यात तरी फार प्रसिद्ध नव्हते. आम्हीच ही सगळी पानं आणायला आणि लावायला सुरुवात केली. आमच्याकडे पूना पानासाठी येणार्या ग्राहकांना आम्ही ‘हे पान पण खाऊन पाहा,’ अशी शिफारस करायचो. लोकांना हळुहळू ही वेगळी पानं आवडू लागली. इतरत्र न मिळणार्या या तीन पानांमुळे आमच्याकडे येणारे ग्राहक वाढू लागले आणि दुकानाचे नाव प्रसिद्ध होऊ लागले. तेव्हा पूना पानाची किंमत होती तीन पैसे, तर बनारस पान एका आण्याला होते. कलकत्ता आणि मघई पाने दोन आण्याला मिळत असत.
अनिल शेठच्या आठवणींप्रमाणे तेव्हा पुण्याच्या रेसकोर्सला घोड्यांच्या शर्यती होत असत, त्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार पुण्याला येत असत. त्यापैकी दारासिंग, मेहमूद, सुजितकुमार ही मंडळी डेक्कनवर येत असत आणि आठवणीने पूना कॉफी हाऊसच्या पानाचा आस्वाद घेत असत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडेही तेव्हा आपल्याकडे येत असतं, अशी आठवण अनिल यांनी सांगितली. पुलंनीच ‘पानवाला’ हे (मुंबईच्या पानवाल्यांवरचं) बहारदार व्यक्तिचित्र लिहून एका पिढीला पानाच्या रंगतीची ओळख करून दिली, हा एक योगायोग.

वर्ष १९८३….ठिकाण कर्वे रोड!
अनिल शेठनी १९८३मध्ये कर्वे रोडवर जागा मिळाल्यावर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि डेक्कनच्या दुकानी नियमित येणार्यांचा कट्टा कर्वे रोडला हलला. अनिल शेठच्या दुकानाची एक खासियत म्हणजे दुकान फुटपाथपासून थोडे आतल्या बाजूला आहे. त्यामुळे समोर भरपूर जागा. इथे पान घेऊन पिंका टाकत, गप्पा छाटत उभे राहता येते. रात्री अन्याकडे भेटू असा निरोप पुण्यात किमान शंभर दोनशे लोक एकमेकांना देत असतील आणि मग इथे उभे राहून वाट पाहात असतील.
अनिल शेठ लतादीदींची गाणी हुबेहूब त्यांच्याच आवाजात गुणगुणतात, अशी एक वदंता आहे. त्याबद्दल ते सांगतात की संगीताचे वेड मला पहिल्यापासूनच. जुन्या काळातल्या रेडिओमुळे गाण्याशी जोडला गेलो होतोच. त्यामुळे पान लावत असताना गाणी गुणगुणण्याची सवय अंगवळणी पडलेली. कधी शमशाद बेगम कधी लता मंगेशकर, कधी नूरजहाँ कधी आशा भोसले तर कधी महंमद रफी यांच्या आवाजात गाणी गुणगुणत असतो मी माझ्याच तंद्रीत. नवीन ग्राहकांला त्याविषयी अप्रूप वाटते. संगीताचा दर्दी पानवाला अशी एक ओळख त्यामुळे निर्माण झाली आणि हजारो लोक जोडले गेले.

या ओळखीने अनिल शेठना भरभरून दिले. अप्पा जळगावकर, जितेंद्र अभिषेकी बुवा, हृदयनाथ मंगेशकर यांच्यापासून ते साक्षात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांचा अकृत्रिम स्नेह अनिल शेठना मिळाला. यांच्यातल्या अनेकांचे पुण्यात आल्यावर अनिलच्या पानाशिवाय पान हलत नसे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाचे, उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी दीदी आपल्याकडे आल्याची आठवण अनिल यांनी अभिमानाने सांगितली. सिनेमा, नाटक, क्षेत्रातील मंडळींची मैफल अनिलच्या कट्ट्यावर रोजच भरलेली असते. पु.लं.च्या आणि ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या एका पुस्तकामध्ये देखील आपला उल्लेख असल्याचे अनिलने सांगितले.
कात आणि चुन्याचे परफेक्ट मिश्रण
अनिलकडे मिळणारे पान म्हणजे वा क्या बात है, अशा प्रकारातलेच. अनिल सांगतात, आपण पान तयार करायचे जे शिक्षण घेतले ते एकदम परफेक्ट घेतलेले आहे. पान तयार करताना त्यात कात आणि चुना यांचे मिश्रण बरोबर असेल तरच ते पान चांगलेच बनते. ग्राहकांना कोणत्या चवीचे पण द्यायचे याची माहिती आपल्याला पहिल्यापासून होती. त्यामुळेच तर इथे येणार्या शौकीनांच्या संख्येत कायमच भर पडत गेली आहे. शिवाय ग्राहकांशी आपुलकीने संवाद केल्यामुळेच त्यांच्याशी मैत्री वाढत गेली आणि लोकसंग्रह वाढत गेला. कलेच्या क्षेत्रात करियर करण्यास इच्छुक असणारा कुणी इथे येतो, पान जमवता जमवता अनिल शेठच्या डोक्यात विजेच्या वेगाने तारा जुळतात आणि ते त्याला सांगतात, उद्या अमुक वाजता ये, अमक्या तमक्या ज्येष्ठ कलाकाराशी गाठ घालून देतो तुझी… पुढे तुझ्या योग्यतेनुसार जे घडेल ते…

कलाकारांनी केली इच्छापूर्ती
अनिल शेठ सांगतात, मला कायमच पैशांपेक्षा लोक महत्त्वाचे वाटले आहेत, लोकांमध्ये जगलो, यालाच मी कायम महत्त्व देत आलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फार वाटायचं की आपल्या दुकानाला मोठ्या कलाकारांचे पाय लागावेत. ती इच्छा भरभरून पूर्ण झाली आहे. पुणेकरांचे लाडके दिवंगत कलाकार आनंद अभ्यंकर यांची एक आठवण त्यांनी सांगितली. त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात येऊन २५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी अनिल शेठनी दोन रुपयांच्या २५ नोटांचा हार त्यांना घातला होता. अनिलच्या पानाच्या दुकानावर येणार्या लोकांची नोंद अनिलने एका वहीत करून ठेवली आहे.
कोणत्याही कट्ट्याप्रमाणे याही कट्ट्यावर वेगवेगळे ग्रूप येणे, ग्रूपमधील मंडळींचे निरोप एकमेकांना देणे, कार्यक्रमाचे पासेस देणे असे उपक्रम इथे नियमितपणे होतात. पान विकणे हा अनिल शेठचा केवळ व्यवसाय नाही तर ती त्यांची जगण्याची एक शैली राहिली आहे. त्यामुळेच कलाकार, उद्योजक, शिक्षक, अधिकारी, साहित्यिक आणि सर्वसामान्य लोक अशा अनेक क्षेत्रांतील मंडळींशी त्याची जिव्हाळ्याची मैत्री निर्माण झाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर अनिलचा कट्टा म्हणजे मीटिंग स्पॉट. पानाचा सुवास, गप्पा आणि मैत्रीचे क्षण… या सगळ्यांनी त्या जागेला एक वेगळीच ओळख मिळवून दिली.

पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव जयंत जोशी सांगतात, ‘१९९०च्या दशकात मनात लहर आली की आम्ही अनिलच्या कट्ट्यावर हजेरी लावत असू.’ विठ्ठलशेठ मणियार यांच्या मते, संध्याकाळचे जेवण झाले की पावले आपोआप अनिलच्या दुकानाकडे वळायची. त्याने प्रेमाने दिलेले पान जितके रंगत जाई, तितक्याच रंगतदार गप्पा तिथे रंगत. अनिल नेहमी प्रसन्न, हसतमुख आणि उत्साही. त्याच्या बोलण्यातला जिव्हाळा प्रत्येकाला आपलासा वाटे. २०१०मध्ये पान खाणे बंद झाल्यानंतर अनिलकडे जाणेही कमी झाले, पण त्या कट्ट्याच्या आठवणी मात्र आजही मनात ताज्याच आहेत.
विशेष म्हणजे, १९६१ साली ज्या खुर्चीवर बसून अनिलने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली, त्याच खुर्चीवर बसून तो आजही ग्राहकांचे स्वागत करतो. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, सवयी बदलल्या. पण अनिलचा हसरा चेहरा, त्याच्या हातची पानाची चव, कट्ट्यावरची मैत्रीची ऊब आणि ती खुर्ची आजही कायम आहे. म्हणूनच विदेशात स्थायिक झालेली अनेक मंडळी भारतात परतल्यावर मुद्दाम वाट वाकडी करून अनिलच्या कट्ट्यावर येतात. इथे फक्त पान मिळत नाही तर पुन्हा भेटतात जुन्या आठवणी, दूर गेलेले मित्र आणि आपुलकीचे नातेही मिळते. विड्याच्या पानाबरोबर मैत्री, प्रेम आणि माणुसकीचा सुगंधही दरवळतो…

