– संजय डहाळे
अशोक शेवडे हा एक भन्नाट माणूस! बोलका, हसरा आणि ‘चंदेरी-रुपेरी’ दुनियेत मस्त भटकंती करणारा कलंदरच!
शेवडे मूळचे गिरगावचे. नंतर डोंबिवलीकर झाले. ते जेव्हा मुंबईत येत असत तेव्हा गिरगावातील मित्रांकडे, वरळीच्या दूरदर्शन केंद्रावर आणि प्रभादेवीच्या ‘सामना’ कार्यालयाला हमखास हजेरी ही ठरलेली. दहा एक वर्षे त्यांची नियमित भेट व्हायची. प्रत्येक भेटीत त्यांच्यातला उत्साह आणि नवा संकल्प हा थक्क करून सोडणारा असायचा.
‘मार्मिक’शी त्यांचं जवळचं जुनं नातं. अगदी श्रीकांतजी ठाकरे, प्रमोद नवलकर यांच्यापासूनचं. नाटकाचा कॉलम त्यांनी बरीच वर्षे चालवला. ‘मार्मिक’चं कार्यालय ‘सामना’त आलं. याच इमारतीत वरच्या मजल्यावर जयंत टिपणीस यांच्याकडे शेवडे यांचं ‘म्हाळसा प्रॉडक्शन’चं काम चालायचं. लघुचित्रपटांची निर्मिती, जाहिरातपट यांच्या अनेक संकल्पना इथेच पूर्णत्वाला पोहोचल्या. आधी प्रदीप भिडे तिथे होते. नंतर शेवडे यांनी ही कल्पकता पुढे नेली. अनेक पुरस्कारही पटकावले. एका भेटीत शेवडे म्हणाले होते, ‘ही वास्तू मला लाभदायी आणि स्फूर्तिस्थानदेखील आहे. साहेबांची कृपा आणि आशीर्वाद इथे आल्यावर मिळतो.’ मी ‘मार्मिक’चा लेखक आहे, हेसुद्धा ते अभिमानाने सांगायचे.
प्रयोगसंख्येचा जागतिक महाविक्रम करणार्या ‘तो मी नव्हेच’, ‘वस्त्रहरण’ या नाटकांप्रमाणेच ‘मुलाखतींचा महाविक्रम’ त्यांच्या नावावर जमा आहे. पाच हजारावर कलाकारांच्या मुलाखती त्यांनी आजवर घेतल्या होत्या. रंगकर्मींच्या तीन पिढ्यांचे ते साक्षीदार होते. मुलाखतीची त्यांची सहजता, रसिकांच्या मनातील प्रश्नांची निवड, संवाद कौशल्य ही वैशिष्ट्येच. मुलाखतीचे चित्रीकरण असो वा लेखन असो. त्यात एक प्रकारची शिस्तबद्धता असायची. ‘होमवर्क’ पक्के असायचे. त्यांचा उत्साह, स्टाईल हा वयालाही लाजविणारा होता. ‘झब्बेधारी’. त्यांना कायम त्यांच्या झब्यांबद्दल कुतुहलाने विचारायचे. वाढदिवस त्यांनी कधी साजरा केला नाही. वयाची पंचाहत्तरी झाली तरी त्याचे सूतोवाच त्यांनी करणे टाळले. एका गप्पांच्या मैफलीत त्यांना त्यांचे वय विचारले. ते म्हणाले, ‘वय लॉक केलंय.’
दूरदर्शन केंद्राच्या प्रवासात एक ‘नाटकवाला’ म्हणून त्यांची दिल्लीपर्यंत ओळख बनली. ‘गजरा’, ‘मुखवटे आणि चेहरे’, ‘रंगतरंग’, ‘नाट्यावलोकन’ या कार्यक्रमांतून ते घराघरात पोहोचले.
ब्लॅक अॅण्ड व्हाईट ते कलर या बदलात ते दूरदर्शनचे साक्षीदार बनले. नवीन तंत्र-मंत्राला ते जराही न अवघडता सामोरे गेले. ‘चंदेरी-रुपेरी’ हा स्टेज शो त्यांनी उभ्या देशभरात नेला. त्यामुळे अनेक राज्यांतील महाराष्ट्र मंडळांशी ते जोडले गेले.
स्टेट बँकेतली सुरक्षित नोकरी त्यांनी वाढत्या कार्यक्रमांच्या जबाबदारीमुळे सोडली. ‘व्हीआरएस’ स्वीकारली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची श्रद्धा होती. सुशीलकुमार शिंदे, रमेश देव, शरद उपाध्ये, दादा कोंडके, नाना पाटेकर अशा अनेकांशी त्यांचे जवळचे संबंध होते. मित्र परिवार संदर्भासाठी किंवा फोन नंबरकरिता त्यांच्याशी बोलत असत. मुलाखतीच्या निमित्ताने झालेल्या परिचयाचे रूपांतर मैत्रीत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुलाखतीपुरती मुलाखत न घेता त्यांना त्यांची कायम साथसोबत होती. हेच त्यांचे वेगळेपण आणि स्वभावाचे वैशिष्ट्यच. यात नवोदित ते बुजुर्ग रंगकर्मी, खेळाडू, साहित्यिक, कवी, अनेक क्षेत्रांतले विक्रमवीर यांची दखल त्यांनी घेतली.
शेवडे यांचा ‘चंदेरी सोनेरी’चा ३००वा प्रयोग दिमाखात दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये झाला. त्याला सुशीलकुमार शिंदे, रमेश देव, शरद उपाध्ये, शिवाजी साटम अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. आता ४००व्या प्रयोगाची त्यांनी पूर्वतयारी सुरू केली होती. गेल्या वर्षी म्हणजे लॉकडाऊनपूर्वी त्यांचा फोन होता. नाबाद ४००चे बेत ठरले होते. जय्यत तयारीचे सारे आराखडे त्यांनी यावेळी मांडले. त्याची एक जाहिरातही तयार होती. त्यांची सहकारी प्राची देवस्थळी यांच्याशीही त्यांनी सूतोवाच केले. भव्य दिव्य सोहळ्याचे त्यांचे स्वप्न होते. पण मार्चनंतर त्यांची तब्येत बिघडली नि पुढे बिघडतच गेली. त्यांचं स्वप्न अखेर अपुरंच राहिलं…
नाट्य आणि सिनेसृष्टीतील कुणाचेही निधन झाले किंवा वाढदिवस असला की हमखास शेवडेंना फोन खणखणायचा. त्याचे कारण त्यांची जबरदस्त स्मरणशक्ती. हवी ती माहिती काही मिनिटांत गोळा करून देण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. १९७९ हे वर्ष. त्यातील राजा परांजपे यांचा ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट ‘प्लाझा’ने पुन्हा लावलेला. नेमक्या त्याच दरम्यान ‘चित्रानंद’मध्ये इसाक मुजावर आणि शेवडे लिहित होते. आणि त्याचवेळी राजा परांजपे गेले. बातमी थडकली. ‘चित्रानंद’चा नवा अंक तर तयार झालेला. तो बाजूला ठेवून दोन रात्री जागरण करून आदरांजलीपर नवा अंक तयार केला. ठरल्याप्रमाणे सोमवारी वेळेवर ‘चित्रानंद’ बाजारात आला. विद्याधर गोखले यांनी मुजावर, शेवडे यांचं जाहीर कौतुक केलं. त्यांच्यातला पत्रकार हा सदैव जागरूक असायचा. त्यासाठी त्यांनी वेळ, पैसा याचा कधी विचारही केला नाही. झोकून देणार्या मुलाखतकारांच्या एका पिढीचं त्यांनी प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व जसं केलं होतं.
मुलाखतकाराचे काम हे मुलाखत घेतल्यानंतर तसं संपतं. पण स्वत: घेतलेल्या मुलाखतीत न आलेले किस्से, आठवण्ाी, भेटीगाठी या एका रंजक कार्यक्रमात गुंफून पुन:प्रत्ययाचा रंगमंचीय आविष्कार त्यांनी ‘चंदेरी-सोनेरी’तून सादर केला. रंगभूमीच्या प्रवाहात एक अनोखे दालनच त्या निमित्ताने उघडले गेले. त्याला व्यावसायिक ‘खिडकी’ उघडली गेली. याची नोंद नाट्य इतिहासात निश्चितच होईल. आकाशवाणी ते दूरदर्शन केंद्र आणि हौशी रंगमंच ते व्यावसायिक रंगभूमी असा त्यांचा तीन एक वर्षांचा प्रवास हा थक्क करून सोडणारा.
शेवडे यांच्यासोबतची एक आठवण. आम्ही दोघे एकाच वेळी ‘सामना’तून बांद्र्याला ‘मातोश्री’ला निघालो. बंगल्यावर माझे बोलणे झाले होते. काही कार्यालयीन काम होतं. पण शेवडे यांचा काही नीट संपर्क झाला नव्हता. टॅक्सीभर ते चिंतेत. साहेबांची भेट मिळेल का? हे प्रश्नचिन्ह त्यांच्यापुढे होते. आम्ही पोहोचलो. खबर आत गेली आणि खुद्द शिवसेनाप्रमुखांनी ‘या शेवडे या! आज कशी काय वाट चुकलात?’ असे म्हणत हसत स्वागत केले. त्यांनी त्यावेळी दूरदर्शनवर घेतलेल्या एका मुलाखतीबद्दलही काही प्रश्न त्यांना केले. आणि या दोघांच्या गप्पा रंगल्या. माझे काम उरकून साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी निघालो खरा, पण शेवडे एकेक किस्से सांगत होते आणि साहेबांची दाद मिळवत होते. दुसर्या दिवशी शेवडे यांचा फोन खणखणला, ‘संजयजी तुम्ही म्हणालात ते खरंय. मातोश्रीची दारं कलाकारांना कधीच बंद नसतात!’
मुलाखत घेणार्याची मुलाखत घेण्याचा दुर्मिळ योग त्यांच्या रंगवाटचालीत चालून आला. त्यांची मुलाखत तीनशे एक प्रयोगात घेणार्या प्राची देवस्थळी यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारी खुर्ची आता रिकामी झालीय…
(लेखक ‘सामना’चे माजी ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आहेत)