– धनंजय एकबोटे
वातावरणातील ताणतणाव बाजूला ठेवून सर्वांनी यंदा धुळवड साजरी करायची असे एकमताने ठरले. वर्षभरापासून एकटा कोरोनाच खेळत आहे, तेव्हा सर्वांनी आपापली राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून एकत्र जमण्याचे ठरले.
ठरल्याप्रमाणे बंगल्याच्या हिरवळीवर सर्व मंडळी जमली. थोडा वेळ रंग खेळल्यावर सारेच दमले व हाशहुश करत हिरवळीवर पहुडले. वेळ आनंदात घालवावा यासाठी गाण्याच्या भेंड्या खेळण्याचे ठरले. सत्ताधारी विरूद्ध विरोधक अशी टीम तयार झाली. देवेंद्र भाऊ, सुधीर भाऊ, नितीन भाऊ, नारायण राव एका बाजूला.
तर उद्धव साहेब, अजित दादा, छगनराव, बाळासाहेब, पवारसाहेब दुसर्या बाजूला.
‘श्री गणेशाय नम:…!’ ‘ह’ आला विरोधकांवर.
चला करा सुरुवात… ‘ह’…!
देवेंद्र भाऊ तावातावाने उठले – हम तुम एक कमरे में बंद हो, और चावी खो जाये….! ‘य’ आलं तुमच्यावर ‘य’.
बारामतीकर दादा गालातल्या गालात हसत- त्या तिकडे सकाळी चावी तर सापडली होती हो आपल्या दोघांना, आता कशाला चावीची आठवण…हा हा हा …
देवेंद्र भाऊ (चिडून) – दादा दादा … तसं नाही हं… जे सांगायचे आहे ते गाऊन सांगा.
दादा सरसावून बसले- ओके ओके….. ‘य’ वरून ना… हे घ्या. ये जो मोहब्बत है, ये उनका है काम. मेहबूब का जो बस देते हूवे नाम. मर जायें मिट जाए, हो जाए बदनाम… रहने दो छोडो, भी जाने दो यार, हम ना करेंगे प्यार…
सुधीर भाऊ – (उसळून) म्हणे बदनाम झाले… सकाळी शपथ तुम्ही घ्यायला लावली ना? मग? मोडल्यावर बदनाम तर होणारच ना?
दादा (घुश्शात) गाणं म्हणा गाणं. रडगाणे नाही. आज होळी आहे भाऊ. कळलं.
सुधीर भाऊ (नंबर आला म्हणून खुश होते) – रोते रोते हसना सिखो, हसते हसते रोओना, जितनी चावी भरी राम ने, उतना चले खिलौना.
सिनियर पवार साहेब – (खळखळून हसत) साहेबाना सांगा तुमच्या. चावी संपली होती म्हणावं. काय? हा हा हा…
देवेंद्र भाऊ (चुळबुळ करत) साहेब, आपण सिनियर आहात. गाण्यात मांडा काय ते. ‘न’ आलं ‘न’.
पवार साहेब – (ठेका धरत) ‘हिंमतवाला’मधलं एक गाणं आहे. ‘नैनो में सपना, सपनो में सजनी, सजनी पे दिल आ गया…
नारायण राव – हिंमतीला दाद तर द्यावीच लागेल साहेबांना. मानलं बॉ…
दादा (हसत) – गाण्यात मांडा दादा, मी दादा, तुम्ही पण दादा.
नारायण राव – (तोंडाचा चंबू करून) तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं…
दादा – नारायण राव, व्यथा नका मांडू हो… ‘य’ अक्षर आलं होतं. ‘त’ नाही. हा हा हा.
नारायण राव (खजील होत) – ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा… कहा दो दिलों ने, मिलकर ना होंगे जुदा…
छगन भुजबळ (हसतच) – म्हणे ना होंगे जुदा. अहो एक पक्ष तरी सोडला का? सगळीकडे हिंडून आले. हा हा हा.
नारायण राव (चिडून) – तुमच्या पक्षात आलो का अजून?
छगन भुजबळ – हो, अजून स्कोप आहे हो. हा हा हा.
(सगळे खो खो करून हसू लागतात.)
दादा (हस्तक्षेप करत) भांडू नका रे, विधानसभा आहे का ही… मजा करा आज तरी. चला गाणं म्हणा भुजबळ साहेब. ‘द’ आलं ‘द’.
छगनराव (बाही वर करत) – दोस्तों से प्यार किया, दुष्मनो से बदला लिया, जो भी किया हमने किया, शान से, शान से…
‘स’ आलं, ‘स’ आलं म्हणत सुधीर भाऊ सरसावतात.
‘समझोता गमों से करलो…
जिंदगी में गम भी मिलते हैं…
पतझड आते ही रहते है….
समझोता गमों से करलो…
उद्धव साहेब (खो खो हसत) – सुधीर भाऊ, ते तुमच्या साहेबांना सांगा की.
दादा (हसत हसत) – गाणं म्हणा की साहेब.
उद्धव ठाकरे – ले जाएंगे, ले जाएंगे…
दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे.
रह जाएंगे, पैसेवाले देखते
रह जाएंगे.
दादा – (हसतच) वा वा साहेब. जमलं बरं. ले जाएंगे ले जाएंगे…
देवेंद्र भाऊ (चिडून) काय ले जाएंगे? फसवणूक आहे ही जनतेची…
दादा – विसरा की राव ते आता. पुढं बघा. आता पाच वर्ष आहेत विचार करायला. दर्द भरे नगमें गुणगुणत बसायला… काय…
सुधीर भाऊ – (उत्साहात येत) ‘ग’ आलं ना. घ्या हे.
गाता रहे मेरा दिल.
तू ही मेरी मंजिल.
कहीं बिते ना ये रातें,
कहीं बीते ना ये दिन.
गाता रहे…
देवेंद्र भाऊ (रागातच) काय हे सुधीर भाऊ. ही आहे का आपली मंजिल? वा रे वा… म्हणे बीते ना ये रातें… विरोधक म्हणून रमलात की काय? आम्ही नाही जा.
देवेंद्र भाऊ रुसून बसतात. दादा पळत जाऊन डीजेवर होळीचे गाणे लावायला जातात.
‘होली के दिन, दिल मिल जाते हैं
रंगो में रंग मिल जाते हैं…’
सगळे खो खो करून हसू लागतात, आणि वातावरण निवळते.
(लेखक व्यंगचित्रकार आहेत)