नुकतंच पुरातत्व संशोधकांना २००० वर्षांपूर्वीच्या काही अत्यंत चांगल्या अवस्थेतील मानवी सांगाडे इटलीच्या पॉम्पाई या भागात आढळून आले आहेत. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या प्राचीन व सुंदर अशा टुमदार बंगल्याच्या आवारात उत्खनन करताना हे दोन सांगाडे आढळून आले आहेत. हा टुमदार बंगला ज्याठिकाणी आहे तिथे इसवी सन ७९ मधील एका प्राचीन रोमन शहराच्या अवशेषांचे उत्खनन करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते.
हे संपूर्ण शहर ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे नष्ट झाले होते, यामुळे येथील बहुतांश मानवी सांगड्यांची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाचीच झाली होती. आता नुकत्याच सापडलेल्या या दोन सुस्थितीतील सांगाड्यामुळे या शहराच्या पुरातत्व इतिहासाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. २०१७ मध्ये या भागात उंचपुऱ्या तीन घोड्यांचे अवशेष आढळल्यामुळे याठिकाणी इटलीच्या पुरातत्व विभागाने उत्खनन कार्य हाती घेतले होते.
पुरातत्व संशोधकांच्या मते या दोन्ही सांगाड्यापैकी एक सांगाडा हा एका गर्भश्रीमंत व्यक्तीचा असून दुसरा सांगाडा हा त्यांच्या गरीब नोकराचा आहे. दोन्हीही माउंट व्हेसुव्हियसच्या ज्वालामुखीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत होते असे या सांगड्यांच्या अवस्थेवरून स्पष्ट होत असल्याचे मत पुरातत्व संशोधकांनी व्यक्त केले आहे.
संशोधकांच्या मते एका सकाळी झालेल्या भयंकर विस्फोटातून निर्माण झालेल्या राखेच्या साम्राज्यपासून आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी दोन्ही मालक आणि नोकर सैरभर धावत सुटले होते परंतु एका समुद्र किनाऱ्यावरच्या मोकळ्या जागेवर राखेच्या साम्राज्याने त्यांचा वेध घेतला आणि अखेरीस दोघीच्या संपूर्ण अंगाला राखेने व्यापून त्यांचा जीव गेला.
हे दोन्ही सांगाडे झोपलेल्या अवस्थेत आढळून आले असून त्यांच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात राख साचलेली दिसून येत आहे.
इटलीचे प्रसिद्ध पुरातत्व संशोधक मासिमो ओसन्ना यांच्यामते हे दोन्ही लोक निवाऱ्याच्या शोधात भटकत होते, या ठिकाणाच्या भूमिगत जागेत लपून ते स्वतःचे या ज्वालामुखीपासून संरक्षण करण्याचे प्रयत्न करत होते, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही, परंतु यामुळे त्यांचे शव/ एका अतिशय उत्तम अवस्थेत जमिनीखाली आढळून आले.
माउंट व्हेसुव्हियस हा अजूनही एक सक्रिय ज्वालामुखी असून इटलीचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या नेपल्स बेटांच्या परिसरातच हा ज्वालामुखी आहे. इसवी सन ७९ नंतर याठिकाणी ज्वालामुखी स्फोटाच्या घटना घडल्या नसल्या तरी बऱ्याचदा या ज्वालामुखीतून राखेचे लोट बाहेर येत असतात.