अगदी नम्रपणे सांगावंसं वाटतं की, जेव्हा सुखाचे दिवस येतील ते कशामुळे येतील? तर ते दिवस आपण पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे येतील. आपल्याला दिलेल्या सगळ्या सल्ल्यांमुळे येतील. कुणामुळे येतील? तर पुन्हा मला नम्रपणे सांगावंसं वाटतं की, आपल्या कुटुंबप्रमुखामुळे… म्हणजेच मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक आदेशामुळे…
आपल्या आयुष्यात कशासाठी…? आणि कुणासाठी…? हे दोन प्रश्न खूपच महत्त्वाचे असतात. आताही कोरोनासारखे महाभयंकर संकट आपल्यावर आले आहे. हे संकट आल्यानंतर आपण बघितलं की आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे अगदी पोटतिडकीने, अगदी कुटुंबप्रमुखाच्या नात्याने प्रत्येकाला समजावत होते. हळूहळू सगळीकडे लॉकडाऊन करण्याची वेळ येत होती तेव्हासुद्धा ते आपल्या घरातल्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे प्रत्येकाला समजावून सांगत होते. तेव्हाही नेहमी प्रश्न यायचा की कशासाठी…? कुणासाठी…? हे सगळं काही चाललेलं होतं ते आपल्यासाठी… माझ्यासाठी. माझ्या कुटुंबासाठी. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकासाठी…
किती महत्त्वाच्या आहेत या गोष्टी… मुळात कशासाठी…? आणि कुणासाठी…? या प्रश्नांमध्ये बरीच उत्तरे दडलेली आहेत. ते जर आपण प्रत्येक ठिकाणी स्वत:ला विचारत गेलो तर केवढा आनंद होईल. तुम्हाला सांगतो, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचा अध्यक्ष म्हणून मंदिर बंद करण्याबाबत आम्ही जेव्हा लॉकडाऊनच्या काळात निर्णय घेतला तेव्हाही माझ्या मनात प्रश्न आले, कशासाठी…? आणि कुणासाठी…? कशासाठी तर आलेला संसर्ग रोखण्यासाठी. आणि हे कुणासाठी? तर आलेल्या प्रत्येक भाविकाच्या सुखासाठी. त्यांच्या सुरक्षिततेसाठी… मग तो सात महिन्यांचा कालावधी आपण सगळ्यांनी अनुभवला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रांगेमध्ये उभे राहून लोक आपलेपणाने प्रत्येक नियमाचे पालन करत होते. नियमांचे हे पालन करत करत कोरोना आपल्याला खूप काही शिकवून गेला.
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे हे १७वे वर्ष… `महाराष्ट्राच्या घराघरात मी जात होतो. २००४ साली सुरू झालेला या कार्यक्रमाचा प्रवास कधीच थांबला नाही. बरं, हा प्रवास कशासाठी सुरू होता? कुणासाठी सुरू होता? तर घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. याचे शीर्षकच मुळी ‘दार उघड बये दार उघड’ असे आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात ‘दार बंद कर वहिनी, दार बंद ठेव’ असं सांगावं लागलं. हे कशासाठी? तर तिच्या सुरक्षितेसाठी.. तिच्या आनंदासाठी… प्रत्येकाच्या घरातला आनंद राहिला पाहिजे. पुढच्या वर्षी यंदापेक्षा दुप्पट गर्दीने सगळे सोहळे आपल्याला साजरे करता आले पाहिजेत. म्हणून तर ही घेतलेली काळजी नसावी का? असे अनेक प्रश्न असताना…
बघा ना… इतकी वर्षे सगळ्यांच्या घरात जात होतो. प्रत्येक घरात गेल्यानंतर वहिनी घरातल्या सगळ्यांची ओळख करून द्यायच्या. मग त्या कार्यक्रमातून मी बघितलं की, प्रत्येकीची ओळख करून देत असताना वहिनींच्या मनात त्या प्रत्येकीबद्दल असलेला आदर व्यक्त होत होता. तो कशासाठी…? कुणासाठी…? तर माझं कुटुंब इतरांपेक्षा किती छान आहे, किती आनंदात आहे हे दाखवणारा सुनेचा प्रयत्न… तर घरातल्या सासूचा गृहलक्ष्मीच्या पावलाने आलेली आमची सूनही किती आनंदी आहे हे दाखवण्यासाठी, प्रसन्नतेने. तिच्याप्रती जरी मनात राग असला तरी घरातल्या सासूने कधी तो चेहर्यावर आणू दिला नाही.
मला वाटतं, आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. पण जबाबदारी वाढत असते. मग माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे या भावनेतून घरातल्या प्रत्येकाने काळजी घेऊन जर आपण या सगळ्या नियमांचं पालन केलं तर अगदी नम्रपणे सांगावंसं वाटतं की, जेव्हा सुखाचे दिवस येतील ते कशामुळे येतील? तर ते दिवस आपण पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे येतील. आपल्याला दिलेल्या सगळ्या सल्ल्यांमुळे येतील. कुणामुळे येतील? तर पुन्हा मला नम्रपणे सांगावंसं वाटतं की, आपल्या कुटुंबप्रमुखामुळे… म्हणजेच मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक आदेशामुळे… माणसातलं माणूसपण टिकवून समोरच्या माणसाचा आदर आणि काळजी करण्याची जी एक दूरदृष्टी आहे त्या दूरदृष्टीमुळे… मग विचार येतो की, कोरोनाचं हे संकट येणार होतं म्हणूनच की काय अत्यंत संयमी आणि दिलासादायक नेतृत्त्व महाराष्ट्राला लाभण्याचा योग जुळून आला. हा योग कशामुळे जुळला? कुणामुळे जुळला? मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या विश्वासामुळे.
आज सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचा दरवाजा खुला झालेला आहे. मंदिर खुलं झालं तेव्हा ऑनलाईन पद्धतीने पटापट क्युआर कोड घेऊन लोक आपलं अॅप डाऊनलोड करून फटाफट येऊ लागले. तेच भाविक होते. सिद्धीविनायकाच्या दर्शनाला तेच येत होते. मंदिर बंद होतं तेव्हा मंदिरात जणूकाही सिद्धीविनायक तपश्चर्येला बसले आहेत एवढी शांतता होती.
डॉक्टर, पोलीस, इतर सगळे आपत्कालीन सेवेतील मंडळी यांच्या रूपामध्ये सिद्धीविनायक बाप्पा फिरताहेत असंच मला वाटत होतं. प्रत्येक भक्ताच्या रक्षणासाठी… ज्या दिवशी मंदिर खुलं झालं होतं सगळे भाविक आले होते. तेव्हा सिद्धीविनायकाच्या चेहर्यावरचा आनंद तेच सांगत होता की हो, आता तुझ्यातल्या देवमाणसाला मला सुरक्षित ठेवायचंय. देवळातल्या देवासमोरच्य्ाा दानपेटीतला एकेक रुपया हा माणसातल्या देवासाठी खर्च करण्याची संधीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात आम्हाला सर्व विश्वस्त मंडळाला मिळत होती. त्यातूनच हा आनंद द्विगुणित होत होता. हे कशामुळे झालं? कुणामुळे झालं? तर श्रद्धेमुळे झालं… आपण पाळलेल्या शिस्तीमुळे झालं… जे जे नियम आपल्याला घातले ते आपल्यासाठी होते. याचं नम्रपणे पालन केलं म्हणून शक्य झालं. तेव्हा सिद्धीविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना आहे हे आलेलं संकट लवकरात लवकर नाहीसं होवो आणि पुन्हा आनंदाचे, वैभवाचे दिवस येवोत. हसत राहा. आनंदात राहा. स्वयंशिस्त पाळत राहा. उद्धवसाहेबांनी आपल्या सगळ्यांना जी त्रिसूत्री दिली आहे तिचं पालन करत माझं कुटुंब आनंदी कसं राहील यासाठी माझ्या जबाबदारीचं पालन करेन. खबरदारी घेईन आणि प्रत्येक कुटुंबाला आनंद देत कुटुंबाची गर्दी दिवसागणिक कमी न होता कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्न करत राहीन. कारण कोरोना हा सांगून येत नाही. तो उंबरठ्याच्या बाहेर आहे. तो बाहेर आहे कारण आपण स्वयंशिस्त पाळतो आहोत. पण हे सगळं कशासाठी? कुणासाठी? तर केवळ आपल्यासाठी… आपल्या आनंदासाठी!
ऑनलाईन औक्षण…
औक्षण तर कधीच थांबलं नव्हतं. लॉकडाऊनच्या काळातच ‘होम मिनिस्टर’चा कार्यक्रम पुन्हा सुरू करायचं असं ठरलं तेव्हा माझ्या मनातही प्रश्न आला की, तो पुन्हा केलाच पाहिजे का? कशासाठी करूया? कुणासाठी करूया?
पण झी मराठीने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली की, ‘किमान प्रत्येकाच्या घरात जे नैराश्येचे वातावरण आहे ते निघून जाऊ द्या… सगळं कुटुंब घरात आहे. टेक्निकल डिफीकल्टीजवर ऑनलाइन पद्धतीने मात करत बांदेकर तुम्ही बोला, बरं वाटेल.’ ठीक आहे म्हटलं. सुरू केलं.
तो पहिला दिवसही मला आठवतो. ऑनलाईन… मी माझ्या घरी पवईला होतो. पलीकडच्या वहिनी खूप दूर होत्या. त्यांच्या सासरची माणसं आणखीच दूर होती. माहेरची माणसंही तिसर्या बाजूला होती. पण या तंत्रज्ञानाच्या एकंदरीत वातावरणामध्ये हे शक्य झालं. कशामुळे? तर संपूर्ण टेक्निकल टीमनेही अत्यंत सकारात्मकतेने काम केल्यामुळे शक्य झालं. हे सगळं सुरू असताना तो प्रसंगही अजूनही आठवतो. मी दूर कुठेतरी बसलोय. ती माऊली कुठेतरी आणखीच ३००-४०० किलोमीटर अंतरावर दूर आहे. कार्यक्रम पहिलाच होता. ऑनलाईन पद्धतीने सुरू होणारा… ती म्हणाली, एक मिनिट हं… भाऊजी, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी जरा मी तुमचं औक्षण करते. मला धक्का होता. औक्षण… इतक्या लांबून? कसं काय? पण तिने हा विचार केला नाही. अनेक वर्षे जपलेल्या नात्यातलं अंतर तेव्हा दूर झालं होतं. तिने पटकन औक्षणाचं ते तबक हातात घेतलं. हे कशामुळे झालं? तर तिची इच्छा होती की कधीतरी हे औक्षण करण्याचा क्षण माझ्या आयुष्यात यावा. तिने तिथेच मोबाईललाच टिळा लावला होता. मी तर पलीकडे बसलो होतो. मला हे औक्षण लक्षात राहिलं ते यामुळे की ते या आदेशचं नव्हतं, तर मनोरंजन करणार्या छोट्या पडद्यावरच्या प्रत्येकाचं होतं. मी फक्त प्रातिनिधिक होतो.