दक्षिण हिंदुस्थानात सध्या थैमान घातलेल्या निवार या चक्रिवादळामुळे आंध्र प्रदेशमध्ये मात्र एक चमत्कार केला आहे. या वादळामुळे समुद्राच्या किनाऱ्यावर सोनेरी दगड सापडताना दिसत आहेत.
सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध गावात आता सोन्याची बरसात?
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यानजीक एक छोटं गाव आहे. उप्पाडा नावाचं हे गाव तिथे बनणाऱ्या जामदानी शैलीतील रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावाच्या किनाऱ्याला निवार चक्रीवादळाचा तडाखा बसला.
शुक्रवारी स्थानिक मच्छिमार जेव्हा किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना किनाऱ्यावर मोत्यांच्या आकाराएवढे सोन्याचे तुकडे मिळू लागले. समुद्र किनाऱ्यावर सोनं मिळत असल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली.
50 लोकांना मिळालं साडे तीन हजार रुपयांचं सोनं
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तब्बल 50 जणांना साडेतीन हजार रुपये किमतीचं सोनं मिळालं. त्यामुळे हे सोनं मिळण्यामागे काय रहस्य असावं, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
या सोन्याच्या बातमीमुळे आता जिल्ह्याचे महसूल अधिकारीही समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहेत. ते किनाऱ्यासह गावाचाही दौरा करून या बाबत अधिक जाणून घेणार आहेत.
सौजन्य : दैनिक सामना