- कोरोना संसर्गाशी मुकाबला करीत देशातील क्रीडाविश्वात आपण ‘मिशन बिगिन अगेन’चे बिगुल वाजविले. हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) या राष्ट्रीय फुटबॉल लीगपासून भारत-इंग्लंड आंतरराष्ट्रीय मालिकादेखील आपण यशस्वीपणे आयोजित करीत आहोत. मुख्य म्हणजे कोणत्याही कोरोना आपत्तीशिवाय! टेनिस, बँडमिंटन आदी स्पर्धांनंतर आता भारतभूमीला आयपीएलचेही वेध लागले आहेत. क्रीडांगणावरील या ‘मिशन बिगिन अगेन’चा सामनावीर ठरलेल्या ‘बायो बबल’ या संकल्पनेवर हा विशेष प्रकाशझोत…
महत्त्वाच्या स्पर्धा-मालिकेपूर्वी संघ व्यवस्थापनाची बैठक सुरू असते. मार्गदर्शक, खेळाडू, सपोर्ट स्टाफ सारेच यासाठी उपस्थित असतात. या बैठकीत चर्चा मात्र होते ती सामन्यातील रणनीतीबाबत नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत आपला एकही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा. दुसरीकडे ग्राउंड व्यवस्थापकदेखील हजारो प्रेक्षक स्टेडियममध्ये येण्यासाठी तयारी करण्याबरोबरच वैद्यकीय सुरक्षेचे कडे कसे अभेद्य राखता येईल, याचा विचार करताना दिसतात!
कोरोना संसर्ग परिस्थितीनंतर सारे जगच बदलले आहे. आपल्या दिनचर्येपासून स्थानिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सर्वच घटकांवर कोरोना संसर्गाने दूरगामी परिणाम केला आहे. क्रीडाक्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. मात्र कोणत्याही आपत्तीनंतर स्थानिक जनजीवनापासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समाजव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी क्रीडा क्षेत्राने नेहमीच मोलाची कामगिरी बजावली आहे. क्रिकेटमधील आयपीएल, भारत-ऑस्ट्रेलिया आणि भारत-इंग्लंड मालिका असो किंवा युरोपमध्ये सुरू झालेले फुटबॉलचे सामने, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस, बॅडमिंटन सुपर सिरीज, फॉर्म्युला वन कार रेसिंग… कोरोना संसर्ग काळानंतर न्यू नॉर्मलचे पालन करीत पुन्हा भरारी घेण्यासाठी क्रीडा क्षेत्राने मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र तसे करताना क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहेत. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. त्याचप्रमाणे, बिकट परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालणे, हा खेळांचा स्थायीभाव असतो. याच दोन्ही संकल्पनांचा क्रीडांगणावर अवलंब करून आकाराला आली आहे ‘नवीन क्रीडाव्यवस्थापन प्रणाली’.
सामनावीर… बायो बबल
क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करताना प्रारंभी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना येण्यास मज्जाव करण्यात आला होता. सामन्यांच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, तसेच स्टेडियम ही संसर्गाचे आगार बनू नयेत, ही त्यामागील काळजी होती. तसेच खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्तीला अग्रक्रमाचे महत्त्व देण्यात आले होते. त्यामुळेच त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचेल, अशी कोणतीही घटना घडू न देण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा ठेवण्यात आला होता. खेळाडूंबरोबरच स्पर्धा संयोजनाची जबाबदारी असलेल्या प्रत्येक घटकाच्या आरोग्यविषयक खबरदारीला प्राधान्य देण्यात आले होते. या कामी महत्त्वाची भूमिका बजावली ती ‘बायो बबल’ या संकल्पनेने. काय आहे नेमकी ही व्यवस्था?
कशा पद्धतीने ती ऑपरेट केली गेली?
क्रीडाव्यवस्थापन क्षेत्रासाठी खरोखरीच ऐतिहासिक ठरणारी ही संकल्पना आहे. आणि ती राबविण्यामध्ये प्रगत देशांबरोबरच भारतदेखील अव्वल ठरला आहे, हे नमूद करताना विशेष अभिमान वाटतो!
‘बायो बबल’ म्हणजे एक प्रकारचा कोरोनामुक्त वातावरणाचा झोन. अर्थात, खेळाडू-अधिकारी-व्यवस्थापक हे सर्व घटक क्रीडांगणापासून सराव मैदाने आणि निवासव्यवस्था करण्यात आलेल्या हॉटेल अशा अनेकविध ठिकाणी वावरणे अपरिहार्य आहे. मग अशा प्रवाही परिस्थितीत या सर्व ठिकाणी कोरोनामुक्त वातावरण कसे राखले जाणार? त्यांना बाहेरील घटकांचा संसर्ग होण्याचा धोका कसा टाळणार? त्यांनी कितीही खबरदारी घेतली, तरी संसर्गाचा फैलाव करणारे बाहेरील घटक त्यांच्या संपर्कात येणारच ना? याच शंका-कुशंका आणि शक्यतांवर विजय मिळविणारा पॉझिटिव्ह उपाय म्हणजे… ‘बायो बबल’.
सुरक्षित वातावरण…
या ‘बायो बबल’चे तीन-चार प्रमुख टप्पे आहेत. सर्वप्रथम, स्पर्धेसाठी आलेला प्रत्येक खेळाडू आणि संघ स्थानिक नियमांनुसार विलगीकरणात ठेवण्यात येतो. त्यादरम्यान त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाते. हाच निकष स्पर्धेसाठी आलेल्या पंच, सामनाधिकारी आणि व्यवस्थापकांना लावण्यात येतो. हे सर्व घटक मैदानाच्या कोअर भागामध्ये संचार करणारे असतात. इतकेच नव्हे, तर या कोअर घटकांशी संबंध येणारे सर्व उपघटकदेखील याच कडक नियमावलीचा भाग बनतात. उदाहरणार्थ– भारतीय क्रिकेट टीमच्या बसचा ड्रायव्हर, त्यांच्या हॉटेलमधील कर्मचारी आणि मैदानावरील देखभाल कर्मचारीदेखील. त्या सर्वांना कोरोनामुक्त सुरक्षित परिस्थितीमध्ये ठेवले जाते. हॉटेलमधील कर्मचारीदेखील त्याच ठिकाणी विलगीकरण केले जातात. म्हणजे बाहेरील जगाशी त्यांचा संपर्क पूर्णपणे थांबविण्यात येतो. त्यानंतर खेळाडू व संघांना टप्प्याटप्प्याने ट्रेनिंग ग्राउंडवर जाण्याची मुभा देण्यात येते. त्या ग्राउंडवरील सर्व मनुष्यबळाची कोरोना चाचणी पूर्वीच करण्यात आलेली असते. परिणामी, संसर्ग नसलेला हा सर्व समूह मिळून एक सुरक्षित झोन तयार झाला होता. त्यांचा कोणत्याच टप्प्यात बाहेरील कोणाशीही संपर्कात येत नाही. अशा पद्धतीने प्रत्येक संघ, त्यामधील खेळाडू हे बायो बबलमधून सुरक्षित ठेवले जातात. त्यापैकी कोणी संसर्ग बाधित झाला, तर त्याला सुरक्षित स्थळी हलवून इतर खेळाडू आणि घटक वैद्यकीय दृष्ट्या सुरक्षित राहतील याची खात्री घेण्यात आली.
खेळाडू, प्रशिक्षक आणि संघातील इतर कोअर सदस्य यांची कोरोना चाचणी हा बायो बबलच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा भाग. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या आय-लीग पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून कोलकात्यामध्ये देशात कोरोनानंतरची पहिली क्रीडा स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेपूर्वी बायो बबलची कशी पूर्वतयारी करण्यात आली, ते आता पाहू. कोलकात्यामधील दोन तारांकित हॉटेलमध्ये ११ संघांचे विभाजन करण्यात आले होते. वैद्यकीय सुरक्षा पथकाने स्पर्धेपूर्वी या हॉटेलांची तपासणी व जैव सुरक्षित बायो बबलमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तातडीने सात दिवसांचे अनिवार्य विलगीकरण ठेवण्यात आले. स्पर्धेपूर्वी प्रत्येक खेळाडूची तीनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील नमुने बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दहा, सहा आणि दोन दिवस आधी घेतले गेले. तपासणी केल्यानंतरदेखील खेळाडू टीम बबलमध्ये प्रवेश केल्यावर दुसर्या आणि पाचव्या दिवशी त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला चाचणी करण्यात आली.
प्रत्येक संघाला हॉटेलमध्ये एकूण २० खोल्यांचे वाटप करण्यात आले. त्याबरोबर प्रत्येक बाजूला स्वतंत्र वैद्यकीय / फिजिओ रूमची तैनात करण्यात आली. खोल्यांमध्ये जाणारे कर्मचारीदेखील याच बायो बबलचा भाग होते. दर तीन-चार दिवसांनी नियमितपणे त्याची चाचणी घेतली गेली. ड्रायव्हर्स, सुरक्षा कर्मचारी आणि हॉटेलमधील इतर कर्मचार्यांचीही नियमित तपासणी केली गेली.
प्रेक्षक आल्यानंतर आव्हाने वाढली…
प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धेच्या स्टेडियममध्ये काय परिस्थिती असते, तेही पाहू. स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यास परवानगी दिलेल्या सर्व घटकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. किंबहुना, स्टेडियममध्ये वेगवेगळे झोन करण्यात आले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाला ज्याप्रमाणे मंत्र्यांचे पीए, पत्रकारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. तसेच, क्रीडा स्पर्धेदरम्यान एक वेळ संघमालक, पत्रकारांची कोरोना चाचणी करणे शक्य असते. पण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचे काय करणार? म्हणूनच, पहिल्या टप्प्यात प्रेक्षकांविनाच सामने खेळविण्यात आले. त्यामुळे हा कोरोनामुक्त सुरक्षित वातावरणामधील गट तुलनेने कमी मनुष्यसंख्येचा राहिला. परंतु ऑस्ट्रेलियात आणि भारतामध्ये चेन्नईमध्ये कसोटी सामन्याच्या वेळी प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आणि बायो बबलचे आव्हान खडतर झाले. अशा परिस्थितीत मग स्टेडियमचे वेगवेगळे झोन तयार करण्यात आले. एका झोनमधून दुसरीकडे जाण्यास कडक निर्बंध घालण्यात आले. त्यामुळेच कितीही मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियममध्ये आले तरी बायो बबलच्या माध्यमातून सुरक्षित करण्यात आलेल्या घटकांशी त्यांचा संपर्क होण्याची शक्यता, मार्गच बंद करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय सुरक्षा भेदली जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली.
संगणकाधारित यंत्रणेचा वापर…
कल्पना करा, की आपल्याला चार-दोन व्यक्तींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती घेत राहण्याची जबाबदारी दिली, तर ती किती जोखमीची असेल. इथे तर शेकडोच्या संख्येत लोकांचा मागोवा ठेवावा लागतो. त्यातच, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती! त्या प्रत्येकाच्या कलाने घेत बसले, तर बायो बबलचे तीन तेराच वाजणार! कोणताही अपघात, अतिउत्साह वा आगाऊपणा टाळण्यासाठी खेळाडू, पंच, संघटक, व्यवस्थापक यांच्यापासून ते अगदी ग्राऊंड देखभाल करणारे आणि बस ड्रायव्हरपर्यंतच्या सर्व घटकांना या बायो बबलच्या नियम-निकषांची माहिती देण्यात आली. तसेच, त्याच्या कडक पालनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कधी तांत्रिक करारावर स्वाक्षरी घेऊन, तर कधी अक्षरश: पोलिसी खाक्या वापरून कोरोनामुक्त वातावरणनिर्मितीसाठी अहोरात्र कष्ट घेतले जात आहेत.
बायो बबलच्या या सर्व मोहिमेमध्ये संगणकाचा, विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाची अतिशय मोलाची मदत होता आहे. किंबहुना, स्कॉटलॅण्ड यार्ड किंवा मुंबई-महाराष्ट्र पोलिसांप्रमाणेच हे बायो बबलचे पहारेकरी आणि जासूस अगदी बारीक-सारीक गोष्टींवर संगणकीय व्यवस्थेच्या शस्त्रांच्या आधारे नजर ठेवून आहेत.
अर्थात, एवढी खबरदारी घेऊनही मेलबोर्न येथे रंगलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेपूर्वी बायो बबलसंदर्भात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होतीच. स्पर्धा संयोजक घटकामधील तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळेच त्यांना तात्काळ विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा एका रात्रीत शोध घेण्यात आला. इतकेच नव्हे, तर खेळाडू-पंचांसह स्पर्धेच्या संयोजनाशी निगडित दोन हजारहून अधिक जणांची तातडीने दोन दिवसांमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. ऑल इज वेल, असा संदेश आल्यानंतरच पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा पार पडली.
युरोपमधील काही फुटबॉल क्लबमधील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामने रद्द करण्याचीदेखील वेळ आली. अर्थात, ही कोणत्याही पद्धतीची नामुष्की ठरत नाही. संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपण यथाशक्ती लढतोच आहोत. त्यामध्ये काही प्रयोग फसतात, तर काही यशस्वी होतात. अशा ‘ट्रायल अॅण्ड एरर’ पद्धतीनेच कोरोना संकटामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सारे जग करीत आहे.
या निमित्ताने क्रीडा व्यवस्थापनासह संपूर्ण क्रीडाविश्वामध्ये एक नवे भान रुजविण्यात येत आहे. खेळाडूंपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटकांना आता आपल्या जबाबदारीची जाणीव होत आहे. प्रभावी क्रीडास्पर्धांच्या भविष्यातील यशासाठी ही सर्वांत महत्वाची गोष्ट ठरणार आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम सल्लागार आहेत)
———
टेनिस स्पर्धा संयोजनाचीदेखील बिनतोड सर्व्हिंस!
कोरोना संसर्ग परिस्थितीनंतर आता स्पर्धा आयोजित करणे हे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. खेळाडूंचे आरोग्य, वैद्यकीय सुरक्षितता आणि तंदुरूस्ती जपणे याला सर्वोच्च प्राधान्य असतेच. त्याशिवाय स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडणे, हे मोठे आव्हान ठरते आहे. महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेतर्फे पुण्यात डेक्कन जिमखाना मैदानावर आयोजित आयटीएफ महिलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत वैद्यकीय सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. किंबहुना, कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याला स्पर्धा खेळण्याची मान्यता आणि अधिस्वीकृतीच देण्यात आली नव्हती. तसेच, खेळाडूंच्या कोव्हिडविषयक स्थितीवर आणि नियमावलीचे पालन होत आहे की नाही, याबाबत रियल टाईम माहितीच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात आहे. एका अँपच्या माध्यमातून खेळाडूंना दररोज कोव्हिड नियमावलीसंदर्भातील माहिती सादर करावी लागते. तसेच, त्यांची शरीराचे तापमान आदी किमान आवश्यक तपासणी केली जाते. त्या सर्वांमधून क्लिअर झाल्यानंतरच त्यांना सामना खेळण्याची परवानगी देण्यात येते. जागतिक टेनिस महासंघाच्या स्पर्धांसाठी बायो बबल संकल्पना राबविण्यात येते. परंतु, आपल्या स्थानिक स्पर्धांना अधिक काटेकोर राहून कोरोनाविषयक नियमावलीची अंमलबजावणी केली जाते. किंबहुना, त्यासाठीच्या मार्गदर्शिका जारी करण्यात आल्या आहेत. त्याचे चोखपणे पालन करवून घेण्यासाठी विशेष वैद्यकीय अधिकारी, पथके नियुक्त करण्यात येत आहेत. दररोज स्पर्धेशी संबंधित कोरोनासंदर्भातील स्थितीचा आढावा घेतला जात आहे. अर्थात, खेळाडू-पालक आणि स्पर्धेशी संबंधित सर्व घटकांकडून या नियमावलीला आणि स्पर्धा संयोजकांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. म्हणूनच, कोरोनाचे आव्हान परतवित भारतामध्ये क्रीडास्पर्धांचे मिशन बिगिन अगेन होऊ शकले आहे, ही क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.
– सुंदर अय्यर,
सहसचिव, अखिल भारतीय टेनिस संघटना
मानद सचिव, महाराष्ट्र लॉन टेनिस संघटना
————-
‘खेळाडूंचे आरोग्य, तंदुरूस्ती हेच सर्वोच्च प्राधान्य’
कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत कोलकात्यामधील आय-लीग पात्रता स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून क्रीडा व्यवस्थापनाचा एक धडा घालून दिला आहे. स्थानिक प्रशासन, आरोग्य अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापनापासून हॉटेल व्यवस्थापकापर्यंतच्या प्रत्येक घटकाने त्यामध्ये दिलेले योगदान महत्वाचे आहे. खेळाडूंचे आरोग्य आणि तंदुरूस्ती हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे एकमेव प्राधान्य होते. आणि त्यामध्ये कोठेही तडजोड करण्यात आली नाही.
– सुनंदो धर
मुख्य कार्यकारी अधिकारी,
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची हीरो आय-लीग स्पर्धा