- कोव्हिड लस घेण्याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. अनेक तज्ज्ञांनी दिलेला सल्ला अशांनी मानावा. हा सल्ला म्हणजे ६० वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांनी आणि ब्लड-प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, दमा, एचआयव्ही-लागण इ. पैकी आजार असलेल्या ४५ ते ६० वयोगटातील सर्वांनी ही लस जरूर घ्यायला हवी. आजार असल्याचे सर्टिफिकेट संबंधित डॉक्टरकडून घ्यावे.
लस घेण्याच्या विरोधात जे मुद्दे पुढे केले जातात त्यांचा थोडक्यात विचार करू.
१) ‘आमच्या भागात करोना गेला आहे; अनेकजण मास्क न घालता बिनधास्त वावरतात, त्यांना काहीही झालेले नाही. मला गेल्या वर्षभरात करोना झालेला नाही, त्यामुळे आता मला होणार नाही.’
खरी परिस्थिती अशी आहे की ‘आता करोना गेला’ असे म्हणता म्हणता अनेक ठिकाणी कोव्हिड-१९च्या केसेस वाढल्या आहेत. पुण्यात सप्टेंबरमध्ये दिवसांत ४००० केसेस होत्या. जानेवारी-अखेर त्या ५०० पर्यंत कमी झाल्या. पण फेब्रुवारीमध्ये वाढत जाऊन आता दिवसाला १३०० केसेस होऊ लागल्या आहेत! ज्या वस्त्यांमध्ये केसेस व्हायच्या बंद झाल्या होत्या तिथेही त्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ज्यांना आतापर्यंत कोव्हिड-१९ झाला नाही त्यांना यापुढे होऊ शकतो.
२) ‘ही लस बोगस आहे, तिचा काही उपयोग नाही, ही लस घेतलेल्यांनाही करोना झाला आहे. लस करणार्या कंपन्यांचा फक्त फायदा!’
‘खरी परिस्थिती अशी आहे की दोन डोस झाल्यावर दहा दिवसांनी पूर्ण प्रतिकारशक्ती येते. ही जी उदाहरणे दिली जातात त्यात दोन डोस घेतलेले फारसे कोणी नाही! दुसरे म्हणजे कोणतीच लस १०० टक्के संरक्षण देत नाही. मात्र या लसीच्या अभ्यासात दिसले आहे की लसीचे दोन डोस पूर्ण केल्यावर अगदी क्वचित कोणाला कोव्हिड-१९चा आजार झाला तरी तो सौम्य असतो. सहसा तीव्र आजार होत नाही आणि कोणीही कोव्हिड-१९ने दगावत नाही. रेनकोट किंवा छत्रीने आपले पावसापासून पूर्ण संरक्षण होत नाही. पण ओलेचिंब होण्यापासून आपण वाचतो. तसेच हे आहे.
३) ‘ही लस पूर्ण परिणामकारक, निर्धोक आहे का? अनेक तज्ज्ञांनीही सरकारवर या लसीबाबत टीका केली ती उगाच का?’
या लसींना भारतात तीन जानेवारीला परवानगी देताना सरकारने काही चुका केल्या; पूर्ण सत्य पारदर्शीपणे लोकांपुढे मांडले नाही. त्यामुळे अनेक तज्ज्ञ आणि माझ्यासारखे आरोग्य-कार्यकर्ते यांनी त्याबाबत टीका केली होती. दुसरे म्हणजे ही लस नवीन असल्याने लस दिल्यावर किती प्रमाणात, कोणते दुष्परिणाम होतात, सरकार त्याबाबत काय दक्षता घेत आहे, या बाबतीतही सरकार नीट माहिती देत नाहीय. हे सर्व असले तरी एक म्हणजे कोव्हिड-१९ आजाराचा धोका अजून फार मोठा आहे. साथ ओसरायला २०२२ उजाडावे लागेल व तोपर्यंत लस न घेणार्यांपैकी हजारो लोक कोव्हिड-१९ने दगावतील. दुसरे म्हणजे जगात ठिकठिकाणी या कोव्हिड-१९ लसीबाबत खूप अभ्यास झाला आहे, निरनिराळ्या देशात कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे, भारतातही एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी ही लस घेतली आहे. कोव्हॅक्सिन या भारतीय लसीबद्दलसुद्धा ती ८० टक्के परिणामकारक आहे असे संशोधनातून मार्चच्या सुरुवातीला हाती आलेल्या प्राथमिक विश्लेषणात दिसते. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर स्पष्ट आहे की कोव्हिड-१९ लस घेतल्याने हजारो जीव वाचतील आणि लाखो लोकांचा गंभीर आजार टळेल. प्रत्येकाने फक्त आपापला विचार केला तरी एकंदरीत लस न घेण्यापेक्षा लस घेण्यामुळे आपली सुरक्षितता शेकडोपट वाढते. कोणत्याही औषधाचे काही ना काही दुष्परिणाम होतात; काही औषधांनी अगदी क्वचित जीव धोक्यातही येऊ शकतो. तरीसुद्धा जेव्हा गरज असेल तेव्हा आपण औषध घेतोच! दुष्परिणाम होतील म्हणून औषध घ्यायला नकार देत नाही. तसेच या लसीबाबतही आहे.
४) ‘मला समजा ब्लड-प्रेशर, मधुमेह, हृदयविकार असेल किंवा दमा किंवा असा काही आजार असेल तर लस घेणे धोक्याचे आहे का?’
नाही. आतापर्यंतच्या संशोधनात असे आढळलेले आहे की अशा लोकांना या लसीचा काही जादा धोका संभवत नाही. उलट असे आजार असलेल्यांना लोकांना कोव्हिड-१९चा जास्त धोका आहे हे मात्र निश्चित सिद्ध झाले आहे.
५) लशीमुळे मी आजारी पडलो तर?
लाखामागे एकाला लसीची तीव्र रिअॅक्शन येऊ शकते. असे झालेच तर लगेच उपचार करता यावे म्हणून ही लस देतांना
डॉक्टर हजर असतात व तीव्र रिअॅक्शन आलीच तर लगेच इंजेक्शन इ. ने उपचार करण्याची तयारी केलेली असते. लहान मुलांना त्यांच्या डॉक्टरच्या दवाखान्यातच त्यांच्या लसी दिल्या जातात. पण या कोव्हिड-लसीबाबत तुलनेने थोडाच अनुभव असल्याने ही लस साध्या दवाखान्यात नाही तर सरकारमान्य, सुसज्ज हॉस्पिटलमध्ये दिली जाते.
६) ‘लस घेतल्यावर काही लोकांना काही बाही त्रास होतो असे ऐकले आहे. असे झाले तर काय करायचे?’
एकंदरीत लहान मुलांना लसी दिल्यावर ज्या प्रकारे काहीना थोडा त्रास होतो तसाच प्रकार कोव्हिड-लसीबाबत आहे.
– कोविड-१९ची लस घेतल्यावर अनेकांना इंजेक्शनची जागा थोडी दुखणं थोडी अंगदुखी, डोकेदुखी, बारीक ताप अशा प्रकारे त्रास होऊ शकतो. गरज वाटली तर पॅरासिटॅमॉलची (क्रोसिन इ.) एक-दीड गोळी गरजेप्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा घ्यायला हरकत नाही.
– थकवा वाटल्यास विश्रांती घ्या.
– काहीजणांना दुसर्याविषयी अचानक थंडी वाजून ताप येऊ शकतो. असे झाले तर अजिबात घाबरू नका. ताप येऊ लागला की लगेच दीड पॅरासिटॅमॉलची (क्रोसिन इ.) गोळी घ्या, विश्रांती घ्या, बाकी काही करायची गरज नाही.
– मळमळ-उलटी, पोटदुखी, अंगावर पुरळ असेही होऊ शकते. पण घाबरू नका, त्याने कोणताही गंभीर धोका नाही. गरज वाटल्यास सरकारी डॉक्टरशी संपर्क करा.
– ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी लस घेण्याच्या आधी आणि लस घेतल्यानंतर अर्ध्या तासांनी रक्तदाब तपासून घ्यावा, कारण लस घेतल्यावर अगदी क्वचित प्रसंगी रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो.
७) लस घेतल्यावर कोव्हिड-१९ आजार न होण्याची गॅरंटी नाही, मास्क लावणे बंद करायचे नाही मग कशासाठी लस घ्यायची?
कोव्हिड-१९ आजार न होण्याची गॅरंटी नसली यशस्वी लसीकरण झाल्यावर कोव्हिड-१९ने मरणार नाही याची गॅरंटी आहे; तसेच तीव्र आजार होण्याची शक्यताही खूपच कमी आहे. मात्र घराबाहेर जातांना मास्क घालणे चालू ठेवावे लागेल, कारण कोव्हिडचे विषाणू आपल्या श्वासमार्गात शिरून, त्यांची पिलावळ शरीरात वाढून ती श्वासातून बाहेर पडण्याची थोडी शक्यता राहते; आजार होत नाही एव्हढेच. त्यामुळे आपण मास्क घातला नाही तर आपण इतरांना लागण देऊ शकतो. म्हणून आपल्यामार्फत इतरांना लागण होऊ नये म्हणून मास्क घालणे, ६ फूट अंतर ही पथ्ये साथ संपेपर्यंत चालू ठेवावी लागतील.
८) ज्यांना करोना होऊन गेला आहे, अशांनीही लस घ्यायला हवी?
हो. कोव्हिड-१९ आजारांमुळे मिळालेली प्रतिकार-शक्ती त्याने वाढते. लसीचा दुसरा डोस घ्यावा लागत नाही. कोव्हिड-१९ झाल्यापासून एक महिन्याने ही लस घ्यावी.
(लेखक वैद्यकीय व्यावसायात आहेत आणि विविध माध्यमांमध्ये आरोग्यविषयक लेखन करतात)