अतिशय सोपी आणि चवदार. आपले मराठी देशी सूप म्हणा. यात कोणतीही पालेभाजी किंवा फळभाजी पण चालते. आणि ताक/दही म्हणाल तर अगदी दोन चमचे… गरम मसाले, भरपूर तेल, तूप हे काहीएक नको. अगदी कांदा पण! फक्त लसणीच्या पाकळ्या, मिरच्या कुटून फोडणीत घालून पालक किंवा ज्या आहेत त्या भाज्या शिजवायचा. हवे असल्यास भिजवलेले शेंगदाणे किंवा डाळ… शिजले की थोडे घोटून, हाटून, बेसन लावलेलं ताक घालून उकळी अणायची. वरून हवी तर हिंग ± राई ± कढीलिंब फोडणी. गावाकडे या कढीत बहुतांशी भोपळा, वांगी, दोडका अशा भाज्या जातात. पारंपरिक पाककृती, पूर्ण स्वस्त, सोप्या परत पौष्टिक आहेत. आता कोणी व्हेगन असतील, तर त्यांनी ताक न वापरता निव्वळ बेसन लावायचे. खरे सांगायचे तर, गरीब घरात दूध दुभते दुर्मिळ. त्यामुळे उगाच थेंबभर ताक वापरलं जायचं. आणि हेच वैशिष्ट्य महत्त्वाचे. माफक सामग्रीमधून चवदार स्वयंपाक! भाजी, आमटी, तोंडी लावणे सर्व एकाच पदार्थातून. इथे पालक वापरलाय, पण कोणतीही पालेभाजी चालून जाते, अगदी शेपू किंवा चुका असला तरीही… घरोघरीच्या आज्या, आया, मावश्या असेच करत आल्यात. अर्थकारण आणि स्वयंपाक याची चोख सांगड त्या घालायच्या. कधीतरी जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान नको असते ते यामुळे… पण अशा अनवट, विस्मरणात गेलेल्या पाककृती जगभर पोहोचवल्या जातात, हे पण विसरता नये. बरोबर?
याला काहीतरी अफाट नाव दिले, की पॉश मेनूवर पण खपेल.
बेबी स्पिनच इन प्रो बायोटिक सॉस फ्लेवर्ड विथ क्रिस्प गार्लिक… मग बघा, ऐसी जीभ लपलपायी!!!! फक्त त्या आजी, आई, मावशीला मात्र कळू देवू नका…
नेहमीचा पास्ता, नूडल्स आणि छोले समोसे बाजूला ठेवून, अशा गावरान कढीचा मस्त भुरका, कधीतरी मारून पहा… आवडेल नक्की.
कृती :
पालक/ चुका/ शेपू /मेथी/ चवळी/ शेवगा पाला…
कोणतीही पालेभाजी, स्वच्छ निवडून, धुऊन चिरून.
थोडी लसूण ± हिरव्या मिरच्या जाडसर चिरून.
थोडे ताक, त्यात बेसन घालून घोटून ठेवायचे.
यात आवडीने भोपळा/वांगी/दोडका काही घालता येते, तुकडे करून.
शेंगदाणे भिजवून.
मीठ हळद.
तेल तापवून, त्यात मिरची ± लसूण वाटण परतून घ्यायचे.
त्यात पालेभाजी आणि त्यात जे घालणार ते व्यंजन टाकून, परतून, थोडे पाणी, हळद घालून एक शिट्टी घायची.
जास्त शिजवायचे नाही.
मग घोटून, बेसन लावलेले ताक घालून, व्यवस्थित हाटून, उकळी काढायची.
वरून हिंग ± लसूण ± जिरे यांची पळी फोडणी द्यायची.
पूर्ण अन्न.
(लेखिकेचे ‘पारंपरिक अन्न’ या विषयावर प्रभुत्व आहे.)