`मागे वळून पाहताना’ माझ्या चौफेर वाटचालीत ‘मार्मिक’ची आपल्याला खूपच मोठी साथ लाभली हे लक्षात येते. ‘मार्मिक’चा साधा पत्रलेखक होतो, पुढची सगळी पटकथा-संवाद घडत गेली. काही मध्यंतर आली, तो एकूणच वाटचालीचा भाग आहे असेच मानले.
सत्तरच्या दशकात मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात मुलगा शाळेत असतानाच त्याचे नाव संगीत व नृत्य क्लास आणि वाचनालय असे दोन्ही ठिकाणी घातले जाई. बराच काळ एकाच जागी बैठक मारून गाणे ऐकणे/शिकणे यापेक्षा माझ्या चळवळ्या स्वभावाला गिरगावातील खोताची वाडीतील आमच्या दहा बाय दहाच्या खोलीत अथवा ओटीवरील बाकड्यावर लोळत वाचन करणे जास्त आवडले. वाडीच्या नाक्यावरील डिंग डाँग बुक कॉर्नर लायब्ररीमधून वडील दररोज साप्ताहिके, मासिके बदलून आणत. (त्या काळात एक दिवस जास्त अंक घरी ठेवला की पाच पैसे द्यावे लागत.) क्रिकेट आणि सिनेमा हे एकूणच भारतीयांचे वेड माझ्यातही असल्याने मी प्रामुख्याने तेवढेच वाचत असे. अशातच वडील `मार्मिक’ आणू लागले.
१९७४ ची ही गोष्ट. व्यंगचित्र साप्ताहिक हे त्याचे वेगळेपण आवडले. राजकारणाची समज नसली (तशी ती आजही फारशी नाही.) तरी पहिल्या पानावरचे व्यंगचित्र, पान क्रमांक पाचवरचे व्यंगचित्र, त्याखालचे ‘टपल्या टिचक्या’ हे सदर आणि मधल्या दोन्ही पानावरची ‘रविवारची जत्रा’ ही व्यंगचित्रे पाहून शेवटच्या पानावरचे ‘सिने प्रिक्षान’ वाचायचो. ‘शुध्दनिषाद’ हे टोपण नाव आहे हे लक्षात येई. पण शाब्दिक बोचकारे, रोखठोक भाष्य आणि कॅची शीर्षक यामुळे प्रत्येक आठवड्यात ‘सिने प्रिक्षान’ वाचायची सवय कधी लागली हे कळलेच नाही. तेव्हा बहुतेक ‘मार्मिक’ची किंमत तीस अथवा पस्तीस पैसे असावी.
हळूहळू अंकातील इतरही मजकूर वाचू लागलो. अग्रलेख, केशव शिरसेकर यांची कविता, प्रमोद नवलकर यांच्या `आठवड्याच्या आठवणी’ हेही वाचू लागलो. (वृत्तपत्र, साप्ताहिकातील अग्रलेख आवर्जून वाच अशी वडिलांची शिकवण मी आजही कायम ठेवली असली तरी ‘आजची इंग्रजी वृत्तपत्राची बातमी अथवा लेख काही मराठी वृत्तपत्रांचा उद्या अग्रलेख असतो’ असे सोशल मीडियात मला अलीकडेच समजले. (अरेरे! वाचनाने अशीही माहिती मिळते.)
अशातच मी कॉलेजमध्ये असताना १९७८ च्या आसपास `मार्मिक’ च्या ७७ ए, कदम मॅन्शन, शिवाजी पार्क, दादर, मुंबई ४०००२८ या पत्त्यावर कधी एखादा लेख अथवा ‘दोन्ही कर जोडोनी’ या वाचकांच्या पत्राच्या सदरासाठी पत्रे पाठवू लागलो. (दादर, मुंबई ४०००२८ याच्या विलक्षण अभिमानात अनेक पिढ्या वाढल्या, म्हणून सविस्तर पत्ता दिला) अधूनमधून त्याला प्रसिद्धीही मिळू लागली.
त्या काळात आमच्या गिरगावातील कुडाळदेशकर वाडी, आंग्रे वाडी, अमृत वाडी, गोरेगावकर लेन यांच्या नाक्यावरील शिवसेना फलकावर कधी ‘मार्मिक’चे व्यंगचित्र तर कधी अग्रलेख असे. १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यावरचा `मराठी माणसा तुझ्या मनाला हे कसे पटेल’ हा ‘मार्मिक’मधील अग्रलेख या फलकावर दिला असताना तो वाचण्यासाठी सतत गर्दी दिसे म्हणून माझे राजकारणाबद्दलचे कुतूहल काही काळ नक्कीच वाढले होते. पण अमिताभ बच्चन आणि सुनील गावसकर मला सिनेमा आणि क्रिकेटपासून दूर जाऊ देत नव्हते. शुध्दनिषाद यांच्या समीक्षेसाठी तर मार्मिक हाती आल्याआल्या थेट शेवटच्या पानावर नजर जाऊ लागली. त्या काळात मुंबईतील वृत्तपत्रात शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाची त्याच दिवशी समीक्षा येई (याचे कारण समीक्षकांसाठीचा खेळ दोन तीन दिवस अगोदर होई.)
‘मार्मिक’मध्ये या शुक्रवारी रिलीज झालेल्या चित्रपटाचे परीक्षण पुढील गुरुवारी प्रसिद्ध होत असलेल्या ‘मार्मिक’मध्ये येई तरी त्या समीक्षेची वाट पाह्यची सवय अनेकांना लागली होती. अशी त्या समीक्षेची वाचनीयता आणि विश्वासार्हता होती. शुध्दनिषाद दादर, माहीम परिसरातील थिएटरमध्ये चित्रपट पाहतात हे त्यांच्या काही समीक्षेतील उल्लेखात येई आणि एव्हाना समजले की, शुध्दनिषाद म्हणजे संगीतकार, व्यंगचित्रकार अशा अनेक भूमिका असणारे श्रीकांतजी ठाकरे! आता हीच समीक्षा मी अधिक उत्साहाने वाचू लागलो. तेव्हाची काही शीर्षके आजही आठवताहेत. राजेश खन्नाची भूमिका असलेल्या `रेड रोझ’ला त्यांनी शीर्षक दिले होते, अरेरे… संथ गतीने `रेड रोझ’ कोमेजून गेला. तर रमेश सिप्पी दिग्दर्शित `शान’चे हेडिंग होते, ‘राहिले नाही कसले भान काढली `शान’…केली घाण.’ प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित `जागीर’चे शीर्षक देताना त्यांनी फक्त इतकेच म्हटले `जा… गीर’, तर दादा कोंडके यांच्या `रामराम गंगाराम’ला त्यांनी `एक पॅचवर्क’ असे म्हटले. मराठी सिनेमावाल्यांना बोचरी टीका आवडत नाही म्हणून मी मराठी चित्रपटाची समीक्षा करीत नाही असेही त्यात त्यांनी म्हटले.
एव्हाना मी काही दैनिके, साप्ताहिक, मासिके यासाठी पत्रलेखन अथवा एखादा लेख पाठवू लागलो होतो. काही प्रसिद्ध होई, बरंचसं `साभार परत’ येई. (त्यासाठीचे स्टॅम्प लेखासोबत पाठवावे लागत, तो भाग वेगळा). पण `आपण लिहिलेले अधूनमधून छापले जात आहे’ एवढाही आधार माझा उत्साह टिकवण्यासाठी उपयोगी होता आणि त्या बळावर आता मी दैनिक आणि साप्ताहिकांच्या ऑफिसमध्ये जाऊन मजकूर देऊ लागलो. (तेवढेच पोस्टाचे पैसे वाचले तरी बस व ट्रेनचा खर्च होताच.) असाच ‘मार्मिक’वरचा पत्ता घेत विचारत विचारत कदम मॅन्शनपर्यंत पोहचलो तेव्हा तळमजल्यावरील घरातून श्रीकांतजी कांदेवाल्याकडून कांदे घेत होते हे स्पष्ट आठवतेय. त्यांना पाहून मी थोडासा गोंधळलोच होतो. मी माझी ओळख करून देताच त्यांनी थोडे आत घरात बोलावले. एव्हाना माझे अक्षर त्यांच्या ओळखीचे झाले होते. त्यांनी अगदी सहज नजर टाकतच म्हटले, ‘अरे, तुझे मुद्दे खाली वर झालेले असतात. जरा लक्षपूर्वक लिहीत जा. बाळासाहेबही तक्रार करतात…’ हे सगळे ऐकत असताना घरात हाफ पॅन्टमधे त्यांचा मुलगा (स्वरराज… नंतरचा राज ठाकरे) बसलाय हे लक्षात आले.
श्रीकांतजींच्या कडक लेखनाप्रमाणेच त्यांचे बोलणे असणार हे अपेक्षित होतेच. मग मी कधी पोस्टाने तर कधी प्रत्यक्षात लेख देऊ लागलो. अधूनमधून श्रीकांतजीशी भेट होई. मी तात्कालिक गोष्टींवर अथवा कॉलेजच्या भित्तीपत्रिकेला साजेसं काही लिहायचो. ते वयच तसे होते. छापलं जायचं हे महत्त्वाचे.
त्याच वेळी ‘मार्मिक’मध्ये इतरही काही लेखक लिहीत असत. असाच एक लेखक संजय राऊत. त्याच्या एका लेखातून समजले की त्याचेही गाव आमचे अलिबाग आहे. असा आपल्या गावचा माणूस म्हणजे पटकन जवळचा वाटणं वगैरे मध्यमवर्गीय पारंपरिक मानसिकता.
आता आपण ‘मार्मिक’चे लेखक आहोत म्हणजे १३ ऑगस्ट या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास जायला हवं असे मनोमन वाटले आणि जाऊ लागलो. तेव्हा म्हणजे १९८१ च्या मार्मिक वर्धापन दिनाला संजय राऊतशी प्रत्यक्षात पहिली भेट झाली. मी १९८२ साली ‘नवशक्ती’त प्रूफ रिडर म्हणून नोकरीला लागलो. त्यानंतर संजय राऊतही काही काळाने इंडियन एक्सप्रेसमध्ये एका खात्यात आला.
‘नवशक्ती’त असतानाही ‘मार्मिक’मध्ये लिहीत होतोच. अशातच `बेताब’ (१९८३) मी पाहिला, पण श्रीकांतजीचा राहिला होता. नेमका तेव्हाच मी त्यांच्या घरी त्यांच्याशी गप्पा करत असताना सनी देओलची बरीच तारीफ केली म्हणून त्यांनी `बेताब’ पाहिलाच. विशेष म्हणजे आपल्या ‘सिने प्रिक्षान’मध्ये माझाही उल्लेख केला. हे मला खूपच सुखावणारे होते. मी प्रत्यक्षात मीडियात आल्यावर वर्षभरात असे घडणे मला महत्त्वाचे होते. शिवाय त्यांचा स्वतःचा हुकमी वाचकवर्ग होताच, त्यांच्यापर्यंत मी पोहचलो होतो. त्यांनी एक प्रकारे माझ्या मताना दुजोरा दिला होता, तोही ‘मार्मिक’मधून!
आता ‘मार्मिक’मध्ये श्रीकांतजी समीक्षा करत तर मी सिनेमावरच अन्य काही लिहायचो. मराठी व हिंदी चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग कव्हरेज, आऊटडोअर्स, प्रीमियर, पार्ट्या, एकादी मुलाखत यातून माझा मुक्त संचार असल्याने `काय बरे लिहायचे’ ही समस्या नसे. अशातच १९८४ च्या मार्मिक वर्धापन दिनाच्या वेळी षण्मुखानंद हॉलच्या व्यासपीठावर बाळासाहेब, श्रीकांतजी, प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी यांच्यासोबतच संजय राऊत आणि मलाही बसण्याची संधी मिळाली. आणखीन एक विशेष म्हणजे, साहेबांनी भाषणात माझा आणि संजय राऊतचा खास उल्लेख केला. `या दोघांची आम्हाला साथ असते’ असे ते भाषणात म्हणाले. असे काही होईल याची कल्पनाच नव्हती. खरं तर, मध्यंतरमध्ये आपण श्रीकांतजीना भेटावे एवढाच आमचा हेतू होता. पण प्रचंड सुखद धक्का बसला होता. (हा फोटो मी प्राणपणाने जपलाय!)
‘मार्मिक’मुळे असा हा कायमच लक्षात राहील असा क्षण आला. आता ‘नवशक्ती’ आणि ‘मार्मिक’ असा माझा दुहेरी प्रवास सुरू होता (त्याला मग अनेकानेक फाटे फुटले हा वेगळा विषय आहे). १९८५ च्या ‘मार्मिक’च्या वर्धापन दिनाच्या वेळी षण्मुखानंद हॉलमध्येच श्रीकांतजींकडून समजले, आता मार्मिकची जबाबदारी काढून घेण्यात येत आहे आणि मार्मिक आता ब्रॉड शीट साईज अशा स्वरूपात प्रसिद्ध होईल. तसेच त्याची छपाई आता न्यूज प्रिन्टवर न होता ग्लॉसी पेपर्सवर होईल. या बदलात श्रीकांतजींसाठी सदरासाठी मधले पान तर माझ्यासाठी मलपृष्ठाच्या आतील पान असे ठरले.
आता मी ‘मार्मिक’मध्ये टोपण नावाने लिहू लागलो. श्रीकांतजीनी सदराला नाव सुचवले `शणमा शणमा!’ दिलीप राजा असे माझे नामकरण केले. मराठी चित्रपटाच्या वाढत्या निर्मितीसंख्येवर तेव्हा केलेल्या कव्हर स्टोरीला मराठी चित्रपटसृष्टीतून मिळालेल्या रिस्पॉन्सने सुखावलो.
आजही याच विषयावर लिहायची वेळ येते याचा अर्थ मराठी चित्रपट होता तेथेच आहे असा कसा होईल? पण कालांतराने खरंच `पुन्हा एकदा’ याच विषयावर ‘मार्मिक’मध्ये कव्हर स्टोरी लिहिली. आता वर्षभरात शंभरपेक्षा जास्त मराठी चित्रपट निर्माण होऊ लागले होते. त्यात पाहण्यासारखे किती हा प्रेक्षकांना पडणारा प्रश्न मीडियाने विचारायचा नाही असा आजच्या चित्रपटसृष्टीचा दृष्टिकोन.
अशातच एका चित्रपटाच्या प्रेस शोसाठी श्रीकांतजी आणि मी जुहूच्या सुमीत प्रिव्ह्यू थिएटरला गेलो असता श्रीकांतजी म्हणाले, ‘चल प्रकाश मेहराला भेटूया (सुमीत प्रिव्ह्यूचा मालक तोच होता.) श्रीकांतजीनी तसा निरोप पाठवताच प्रकाश मेहराच बाहेर आला आणि मग त्याच्या केबिनमध्ये आम्हा तिघांत प्रामुख्याने त्यानेच निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या `जादूगर’ सिनेमाच्या फ्लॉपवर झालेल्या `ऑफ द रेकॉर्ड’ गोष्टी कधीच लिहिता येत नाहीत अशा होत्या. तो सुसाट बोलत होता. `जादूगर’चे अपयश त्याला फारच झोंबले होते. अमिताभसोबतचा त्याचा हा एकमेव फ्लॉप चित्रपट होता. (अशा `ऑफ द रेकॉर्ड’ अनेक गोष्टी ऐकायची सवय असेल तरच अनेक फिल्मवाल्यांना भेटावे.) त्यात प्रकाश मेहरा कमालीचे आऊटस्पोकन. (फक्त मनमोहन देसाईंचा विषय काढला रे काढला की… जादूगरच्या अगोदरच्याच शुक्रवारी मनजींचा `तुफान’ रिलीज झाला होता. दोघांचे अनेक चित्रपट एकमेकांच्या स्पर्धेत प्रदर्शित होत यावर एका ‘मार्मिक’मध्येच मी लिहिले. ‘मार्मिक’मध्ये विषय स्वातंत्र्य मिळाले.)
श्रीकांतजीनी आमच्या या गप्पांतील `आवश्यक त्या गोष्टी’वर लिहिताना त्यात माझा खास उल्लेख केला. हे नेमके ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या आ. श्री. केतकर यांनी वाचून आठवणीने सांगितलेही. (पत्रकाराने पत्रकाराचा उल्लेख झाल्याचे असे सांगणे हे तसे दुर्मीळ. हेही ‘मार्मिक’ने दिले.)
एव्हाना मी ‘मार्मिक’(आणि अनेक ठिकाणी अनेक टोपण नावांनी)चा स्तंभलेखक म्हणून स्थिरावलो. नव्वदच्या दशकात मार्मिक पुन्हा मासिकाच्या म्हणजे नेहमीच्या आकारात आले. आता अधेमधे मला ‘मार्मिक’मधून `काही कारणास्तव’ ब्रेक मिळायचा. काही काळाने माझे पुनरागमन व्हायचे. वसंत सोपारकर कार्यकारी संपादक असताना त्यांनी माझे नाव `पिक्चरवाला’ असे केले. माझ्या टोपण नावांना तुटवडा नव्हता आणि चित्रपटसृष्टीतील भटकंतीमुळे काय लिहायचं याचा तुटवडाही नव्हता (हे सतत अधोरेखित केल्याने मीडियात आपल्याला मागणी असते हे नेमके मला कधी सुचलं ते आता सांगता येत नाही). अधेमधे चित्रपट समीक्षा करू लागलो. विशेष म्हणजे, माझ्या सर्वच पुस्तकांची समीक्षा मार्मिकमध्ये आली हे अगदी आवर्जून सांगतो. थोडक्यात समीक्षा आणि एक प्रकरण अशी ‘मार्मिक’ची पध्दत होती.
मी २००९ साली ‘नवशक्ती’ सोडून `मोकळा’ झालो आणि आता मार्मिकमध्ये नावाने लिहू लागलो. काही चांगल्या कव्हर स्टोरी लिहिल्या (दक्षिण मुंबईतील गिरगावात लहानाचा मोठा होताना अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या माझ्या आठवणीवर अगदी तिकीटदरासह स्टोरी केली). पंढरीनाथ सावंतांशी जुन्या चित्रपटावर, विशेषतः गाण्यावर ‘मार्मिक’च्या ऑफिसमध्येच गप्पांचा फड रंगू लागला. श्याम मोकाशी एकादा वेगळाच विषय सुचवू लागले. श्रीकांत आंब्रेंशी खूपच जुना परिचय असल्याने ते ‘मार्मिक’मध्ये आल्यावर पटकन संवाद जुळला.
…आज `मागे वळून पाहताना’ माझ्या चौफेर वाटचालीत ‘मार्मिक’ची आपल्याला खूपच मोठी साथ लाभली हे लक्षात येते. ‘मार्मिक’चा साधा पत्रलेखक होतो, पुढची सगळी पटकथा-संवाद घडत गेली. काही मध्यंतर आली, तो एकूणच वाटचालीचा भाग आहे असेच मानले. ‘मार्मिक’चा लेखक म्हणून गिरगावातील शिवसेना शाखेत कौतुक होऊ लागले. तेव्हा राजन मोरवाले शाखाप्रमुख होते. १९८५ साली दिलीप नाईक नगरसेवक होताच मला चक्क उपशाखाप्रमुख केले. अर्थात, मला कपिल देवची गोलंदाजी आणि रेखाची अदाकारी आपल्याकडे आकर्षित करत असल्याने मी स्वगृही परतलो. पण काही काळाचे उपशाखाप्रमुखपद हे `मार्मिक’चे देणे.
माझ्या एकूणच जडणघडणीत ‘मार्मिक’चाही महत्त्वाचा वाटा आहे हे मी कायमच अभिमानाने सांगतो. ‘नवशक्ती माझी आई असेल तर मार्मिक मावशी आहे’ असे अनेकदा म्हणालोय…