लॉकडाऊन काळात सोशल मीडियावरून अपलोड केलेल्या 7 हजार आक्षेपार्ह पोस्ट महाराष्ट्र सायबरने हटवल्या आहेत. तर पोस्ट अपलोड प्रकरणी 322 जणांना तुरुंगाची हवा खावी लागली.
माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मीडियाचा गैर वापराचे प्रकार वाढत चालले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय नेते, सेलिब्रेटीबाबत मजकूर पाठवून त्यांना बदनाम केले जाते. लॉकडाऊन काळात राज्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. लोकल सुरु होण्यापासून ते लॉकडाऊन वाढवण्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या. कोरोना पासून वाचण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये, प्राण्यांमुळे कोरोना वाढतो या बाबतचे व्हिडिओ विविध अप्सवरून अपलोड केले गेले. तसेच खोटय़ा बातम्याच्या लिंक व्हायरल करून बदनामीचे करण्याचे प्रकार घडले.
सोशल मीडियावर अपलोड होणाऱया विडिओ आक्षेपार्ह मजपुरामुळे काही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी महाराष्ट्र सायबरने घेतली. लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर सुमारे 14 हजार पोस्ट अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 7 हजार पोस्ट या महाराष्ट्र सायबरने हटवल्या आहेत.
सोशल मीडियावर 14 हजार पोस्ट प्रकरणी महाराष्ट्र सायबरने 707 गुन्हे दाखल करून 322 जणांना अटक केली. विविध प्लॅटफॉर्मवरून अपलोड करण्यात आलेल्या पोस्ट पैकी 437 या समाजात तेढ निर्माण करणाऱया होत्या. तर 133 या खोटय़ा बातम्यांच्या पोस्ट होत्या. 253 पोस्ट या व्हाट्सअप, 301 पोस्ट फेसबुक तर 24 ट्विटरवरून तर 125 या इतर प्लॅटफॉर्मवरून पोस्ट केल्याचे महाराष्ट्र सायबरच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या निदर्शनास आले.
सौजन्य : दैनिक सामना