(अर्थात, ‘मराठी सारस्वत’ या ग्रंथाचं विडंबन असलेल्या ‘मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास’ या पुलंच्या लेखाचं विडंबन)
फार वर्षांपूर्वी पुलंनी दिवाळी अंकात मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास (पूर्वार्ध) लिहिला होता. पूर्वार्धात प्राचीन लेखकांवर लिहिल्यावर त्यांनी उत्तरार्धात अर्वाचीन लेखकांवर लिहिणं अपेक्षित होतं. आतल्या गोटातली बातमी अशी की ‘मराठी वाङ्मयाला एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे…’ याच्या पुढे पुलंना एक वाक्यही लिहिता आलं नाही. काही लिहावं म्हटलं तर यात अनुल्लेखानं मारल्या गेलेल्या लेखकुंचा मोर्चा दारावर येईल या किंवा एखाद्याबद्दल चार चांगले शब्द बोलावे लागून पुण्याच्या परंपरेला बट्टा लागेल या भीतीनं त्यांच्याकडून उत्तरार्ध लिहवला गेला नसावा. मराठीतले तमाम लेखक पुलं आपलं नाव या यादीत घुसडतील या आशेवर कित्येक वर्षं उगाच लिहीत राहिले. पुलंनी उत्तरार्ध न लिहिल्यानं बिचारे आजन्म उपेक्षित राहिले. या उपेक्षितांना अपेक्षित असलेला उत्तरार्ध म्हणजे मराठी इतिहासाची वाङ्मयीन गाळण.
कारण शेवटी, कुणीतरी हे शिवधनुष्य उचललंच पाहिजे होतं. हा लेख वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईल की, आम्ही (इतक्या लांबलचक नावाचा लेख लिहिला की, स्वतःचा एकेरीत उल्लेख करवत नाही.) केवळ हे धनुष्य उचलेलंच नाही तर आपल्याच अंगावर पाडून फजितीही करून घेतली आहे.
जाता जाता, एक डिस्क्लेमर (हल्ली हाच आधी सुचतो). मराठीतले जवळपास बहुतेक सर्वच लेखक हे मराठी भाषेला ललामभूत आणि प्रातःस्मरणीय असल्यानं आम्ही त्यांचा खूप आदर करतो. कित्येकांची पुस्तकं उशाला घेऊन झोपल्यामुळं ‘ग्रंथ आपल्याला केवळ ज्ञानच देतात असं नसून त्यांनी प्रकृतीही चांगली होते’ या सिद्धांतावर आमचा (झोपेइतकाच) गाढ विश्वास आहे. याच आदरापोटी यातल्या कुणाचेही नाव या लेखात घेतलेले नाही. लेख वाचताना जर वाचकांना कुणा एखाद्या नामवंत साहित्यिकाची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजावा. दुसरी गोष्ट म्हणजे, मराठीतील तमाम नामवंत लेखकांनी या लेखात आपले नाव आले नाही म्हणून नाऊमेद होऊ नये. प्रस्तुत लेख आमच्या आगामी त्रिखंडी ग्रंथाचा केवळ एक अल्प नमुना असून प्रकाशक मिळाल्यास संपूर्ण ग्रंथ प्रकाशित करण्याचा आमचा इरादा आहे. इत्यलम.
विसाव्या शतकात मराठीत अनेक महत्त्वाचे साहित्यिक होऊन गेले. त्यातील बहुतेक साहित्यिक साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्मयीन कोशात कव्हर झालेले असल्यानं (नसले तरी पुढंमागं होतील) ते सोडून इतर उल्लेखनीय साहित्यिक खालीलप्रमाणे…
महाराष्ट्रातला सर्वश्रेष्ठ विनोदकार म्हणजे लपु असं खुद्द लपुंचं मत होतं. आपले बरेचसे विनोद अब्राहम लिंकनपासून ते थेट प्र. के. अत्रेंपर्यंत सर्वांच्या नावाने खपवले जातात असा त्यांचा दावा होता. (उदाहरणार्थ, नोकरी मागणार्या माणसाला पावसाचं भविष्य कळणार्या गाढवाची उपमा देणारा लिंकनचा विनोद आहे ना, तो मूळचा लपुंचा. परत परत एकच स्थळ घेऊन येणार्या वधूपित्याला त्यांनी ऐकवला होता. शेवटी त्यांना त्याच मुलीशी लग्न करावं लागला हा नियतीनं उलटवलेला विनोद म्हणता येईल.) परंतु पुलंच्या विनोदासमोर लपुंचा विनोद नेहमी झाकोळला गेला. या प्रसंगावर त्यांनी ‘येथे ओशाळला विनोद’ असं तीनअंकी नाटक लिहायला घेतलं होतं. पण असंच काहीसं नाटक कुण्या लेखकानं पाचेक वर्षांपूर्वी लिहून रंगभूमीवर आणल्याचं कळल्यावर लपुंनी मोह आवरला. तसंही, लपुंनी लिहून जितकी मराठी शारदेची सेवा केलीय त्यापेक्षा त्यांनी न लिहून अधिक सेवा केलीय असं मराठी सारस्वतकारांचं मत आहे. त्यामुळं नव्या पिढीपासून लपुंचं लिखाण लपून राहिलं असलं तरी त्यांचे कोटीबाज विनोदाचे असंख्य किस्से उपलब्ध आहेत. यातलाच एक किस्सा असा-
बाळ लपुंनी मंडईच्या दारात बसलेल्या एकाला अंजिराचा भाव विचारला.
‘अंजीर विकायचे असतील तर भाव आहे, पण विकायचे नसतील तर भाव नाही.’
लपुंना हे उत्तर कळलं नाही (त्यांना तसं बरंच काही कळायचं नाही). त्यांनी ‘म्हणजे काय?’ असा प्रतिप्रश्न केला.
अंजीरवाला म्हणाला, ‘बाळ, आपल्याला समजत नसेल तर आपल्या पुण्याला साजेसेच प्रश्न विचारावेत. कळलं?’
(टीप- वरील वाक्यात नाशिक आवृत्तीत ‘तर’ऐवजी ‘तरी’ असा तेलकट पोटभेद आहे.)
हजरजबाबी लपुंनी लगेच प्रश्न विचारला, ‘भारताने फेडरेशन स्वीकारावे का हो?’
लपुंचा आणखी एक किस्सा सांगितला जातो (रॉयटरच्या हवाल्याने), तो असा-
लपुंनी एक कोंबडी पाळली होती. एकदा एका स्नेह्याने त्यांना प्रेमाने मेक्सिकन काचेचा टीसेट भेट दिला होता. बायकोच्या मितव्यव्यी स्वभावामुळे (म्हणजे लपुंच्या बायकोच्या, स्नेह्याच्या नव्हे) अनेक वर्षं तो बंद कपाटाआडच राहिला होता. त्याबद्दल बोलताना एकदा लपुं म्हणाले, ‘अहो टीसेट सोडा, फुटेल म्हणून आमची ही मला कोंबडीही करून देत नाही.’
कोंबडी कशी फुटेल असा विचार करकरून त्या स्नेह्यांचं डोकं नंतर फुटलं असावं. असो. यानंतर ती कोंबडी अनेक वर्षं त्यांच्या घरीच राहिली.
मराठी सारस्वतात अनेक प्रसिद्ध फडके होऊन गेले- जसे नासी, यदि, शाम आणि गंगाधरशास्त्री. इतके की त्याकाळी फडके आडनावाचा माणूस साहित्यात आला रे आला की लगेच त्याला प्रसिद्ध करायचाच असा छुपा शिरस्ता मराठी साहित्यात होता की काय अशी शंका येते. या परंपरेला अपवाद असलेले नाझीफडके दुर्दैवानं, शेवटपर्यंत अप्रसिद्धच राहिले. नाझींनी शेकडो कादंबर्या लिहिल्या. त्यांच्या सर्व कथांचे नायक हे हाईनरिख, गुस्टाव, गंथर अशा सोज्वळ नावांचे असत. ते वुलन कोट घालून, झुलपं उडवित कॉलेजात संचलनासाठी जात. तिथं त्यांना क्लारा, मॅग्डा वगैरे सुंदर सुवर्णकेशी नायिका भेटत. नायकांच्या उदात्त देशप्रेमाने भारावून त्या प्रेमात पडत. लग्न होऊन आदर्श आर्यन स्त्रियांप्रमाणे त्या सहाआठ मुलांना जन्म देत आणि शेवटी युद्ध हरल्यावर आत्महत्या करत. नाझींच्या बहुतेक कादंबर्यांत अशी साधीभोळी मांडणी असे. या एकाच छापाच्या त्यांनी अनेक कादंबर्या लिहिल्या.
नाझींच्या शृंगारिक कादंबर्यांची मोहिनी जनमानसावर इतकी पडली की त्या वाचून अनेकांनी कॉलेज सोडलं, काहींनी लग्न करणं सोडलं तर ज्यांना काहीच सोडणं शक्य नव्हतं त्यांनी सोडा सोडला. पण एक झालं, सर्वांनी नाझींच्या कादंबर्या वाचणं मात्र सोडलं. त्यामुळं आजही `वाचकमुक्त महाराष्ट्राच्या पहाटेचा पहिला सूर्य’ असं नाझींचं यथार्थ वर्णन केलं जातं.
ज्या युगात समस्त कुलकर्णीलोक एकतर शाळामास्तर किंवा समीक्षक होत असत, त्याकाळात सीए कुलकर्णींनी मराठी साहित्यात आपलं पाऊल ठेवलं. सीएंचं वैशिष्ट्य म्हणजे ते क्लासेसबिसेस काढून उगाच पोरांना शिकवणारे सीए नसून ऑडिट वगैरे करणारे अट्टल सीए होते. अर्थात, लिखाणात त्याचं प्रतिबिंब पडलं नसतं तर नवलच. ‘ऑर्फीयस’ कथेत
टॅक्सहेवनमधून युरिडीस या डमी कंपनीच्या नावे मनीलाँडरिंग करणारा नायक असो की कर चुकवण्यासाठी आश्रमरूपी धर्मादाय संस्था उघडणारा ‘स्वामी’मधला महंत असो की आपला सल्ला न ऐकणार्या राजपुत्राच्या टोटल कंपनीलाच टाळं लावणारा ‘विदूषक’ असो की ‘गुंतवळ’मधलं
इन्कमटॅक्स डिपार्टमेंटमधलं हर्षोत्फुल वातावरण असो, सीएंच्या कथांतून अकाऊन्टन्सी नेहमीच डोकावत राहिली. पण मराठीतील एक शैलीदार कथाकार अशी ओळख ही सीएंचं बलस्थान बनली, जसे–
आयटीआर फॉर्मच्या वेड्याविद्र्या ढिगाआडून दोन डोळे जणू एखाद्या पिसाटलेल्या पशूनं कराल जबडा आ वासावा तसे मजकूर वाचत होते. काळ्या कर्कश रेघोट्या खोदलेले बाकी कागद कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे एका अदृष्य बंधाने बद्ध होऊन बाजूस पडले होते. एखादं सुसंगत आकारपूर्ण रिटर्न असावं तसा लठ्ठ कपातला तपकिरी चहा पराभूत मूढगतीनं निवत चालला होता.
सीएंच्या अशा अनाकळणीय भाषेमुळे कित्येक वाचक इन्कमटॅक्सच्या नोटीसा आवडीनं वाचू लागले. त्या निमित्तानं बहुतेकजण नेमानं टॅक्स भरू लागून खात्याचं इन्कम वाढलं पण पर्यायानं आपलं काम वाढलं म्हणून आजही आयटी डिपार्टमेंटमध्ये सीएंविषयी चांगलं बोललं जात नाही.
बळकवी हे मराठीतले सर्वात पहिले रोमँटिक कवी समजले जात नाहीत. मराठी कवितेतून व्यायामाचे महत्त्व विशद करणारा कवी अशी त्यांची ख्याती आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे कवितेचे चरण जुळवत ते वाचकांना धोबीपछाड घालत. वृत्तबद्ध सूर्यनमस्कार, यमकी जोरबैठका, प्रासादिक मल्लखांब अशा रचना त्यांच्यामुळे नावारूपाला आल्या. काहीदा, बळकवी हे त्यांचे टोपणनाव नसून बळकावणे या क्रियापदाचे काव्यमय रूप आहे असा काहींचा समज होई. कित्येक कवीसंमेलनात स्टेजवर जागा पटकावून त्यांनी तो समज खराही करून दाखवला होता. बळकवींचे मूळ नाव ठो० बा० त्रिंबके. पण लोक ‘त्र’ लिहिण्याऐवजी ‘ञ’ लिहितात हे पाहून त्यांनी टोपणनाव वापरायला सुरुवात केली. (खरं तर, ‘ञ’ लिहिणार्यांना त्यांनी एक जोरदार ठो दिला पाहिजे होता.) लोक आवडीनं आपल्या कविता वाचतात हे लक्षात आल्यावर त्यांनी साभिनय कविता ऐकवायला सुरुवात केली. सूर्यनमस्काराच्या चालीवर औदुंबर, उत्तानपादासनात पुलराणी, एरोबिक्स करत श्रावणमानसी हर्षमानसी असे प्रयोग त्यांनी केले.
त्यांच्या कविता वाचण्यापेक्षा अनुभवाव्या लागतात. बळकवींच्या कवितांचा अनुभव घेतला की पोटदुखी, कंबरदुखी, आम्लपित्त इत्यादी विकार कमी होत असल्यानं बरेच समीक्षक त्यांचा तिरस्कार करत.
मराठी कवितेला लगामभूषण अशा कवींच्या यादीत पंगेश मडगावकर यांचं नाव अग्रणी राहील. दुर्दैवानं, लज्जित कापडाच्या जाहिरातींमुळं ते लोकांच्या स्मरणात आहेत. एकेकाळी लज्जित कापडाच्या छत्र्यांच्या जाहिरातींचे बोर्ड दिसू लागल्याशिवाय मुंबईत पावसाळा सुरू होत नसे. त्यांच्या बहुतेक कविता वास्तवाला भिडणार्या असत. ‘ट्रेन म्हणजे ट्रेन म्हणजे ट्रेन असते, तुमची आणि आमची अगदी सेम असते’ ही कविता लोकलच्या फलाटाफलाटावर गाजली. विशेषत: विरारवाले डोंबिवलीकरांना ही ऐकवत असत. मडगावकरांनी ओम्नी की वॅगनआर की काय तरी गाडीच्या नावावरून पुस्तक लिहिलं होतं, ते बरंच गाजलं असावं. कारण काहीजण मोटू लोकांचा देश ही कविता या संग्रहातली आहे असं समजतात. ती पडगावकरांची नाहीय.
पंगेश भाऊगीतांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘लाख चुका असतील केल्या’ या गाण्याला हार्डवेअर दुकानदारांच्या घोषणेचा दर्जा मिळाला. भाऊगीतांमुळं आणि फ्रेंचकटवर असलेल्या जाड भिंगांच्या चष्म्यामुळं काहीजण खरंच त्यांना भाई समजत. असं नसलं तरी पंगेश कधीकधी नावाप्रमाणेच पंगा घेऊन भिडत असत. पंगेश मडगावकर, पसंत पापड, वृंदा करवंदीकर अशी त्यांची जबरी गँग होती. तिघे मिळून कार्यक्रम करीत.
(टीप- येथे कार्यक्रम याचा अर्थ कवितावाचनाचा कार्यक्रम असा घ्यावा. हल्लीचे काही कवी भलतेच काही कार्यक्रम करत असतात म्हणून हा खुलासा.)
विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत शाळेच्या भिंतीसाठी सुविचार पुरवण्याचं एकहाती कंत्राट रामदासस्वामींकडं होतं. लोक मूर्खांची लक्षणंही सुविचार समजून वापरीत. समर्थांनी हे पाहिलं असतं तर त्यांनी
सदासुविचार बडबडे।
जैसे वाचाळ गधडे।
वाचोनि कोरे धडे।
तो येक मूर्ख।
हे एक लक्षण अॅड केलं असतं. इंग्रज अमदानीत सरकारी सेक्युलर सुविचार (लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी बरी, नाही निर्मळ मन, तेथे काय करील साबण इ०इ०) काही वर्षं चालून गेले. १९७२च्या दुष्काळात महाराष्ट्राला सुविचारांचं दुर्भिक्ष्य जास्तच जाणवलं. याचवेळी समस्त महाराष्ट्राला सुविचारांचा पुरवठा केला तो पपु गोरेंनी. महाराष्ट्रात जानेवारीपासून टँकरनं पाणीपुरवठा होतो तसा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की लायब्ररीतून पपुंचा सुविचारपुरवठा सुरू व्हायचा. आजच्या व्हॉटसअॅपच्या जमान्यात पपु गोरे असते तर विश्वास पाटलांपासून ते नाना पाटेकरांपर्यंत (व्हाया प्रकाश आमटे) कुणाच्याही डोक्यात त्यांनी एकही मोटिव्हेशनल वाक्य उमलू दिलं नसतं. हे बिचारे लोक पपुंची वाक्यं वाचून डिमोटिव्हेट झाले असते.
खरं तर, शैलीदार लेखक असूनही पपु या सुविचारांसाठीच प्रसिद्ध झाले. कॉलेजच्या लायब्रर्यांत त्यांचं कोणतंही पुस्तक उघडून पाहिलं पोरांनी पानापानावरच्या आवडत्या वाक्यांना अंडरलाईन केलेली आढळत असे. पुढं ही वाक्यं इतकी वाढत गेली की प्रकाशकांनी कॉलेजकुमारांच्या सोईसाठी रेडीमेड अंडरलाईन असलेल्या प्रती काढल्या होत्या.
पपुंचं नाव हा परमपूज्यचा शॉर्टफॉर्म आहे असं काहींचं मत आहे. तसं नसावं, सुविचार लिहिणारा माणूस उगाच कशाला स्वतःचं नाव छोटं होऊ देईल?
भयकृती या प्रकाराची महाराष्ट्राला ओळख करून देणारे विख्यात लेखक म्हणजे धारायण नारप. गूढ पाककृती, भयरेसिपी हा त्यांचा हातखंडा असला तरी त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली होती हे विशेष. नारपांनी मराठी स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडून भीतीला दिवाणखान्यात आणलं असं म्हटलं जातं. यामुळं काही समीक्षक कुचेष्टेनं त्यांना पुरुषांतला बंगला मार्वे असं म्हणत. त्यांची थैलीतला खाखरा, तिरक्या शंकरपाळ्या, मऊ कवटीची चंकली, कपटी कुंदा ही पात्रं विशेष गाजली. खऊट शेवलाडू हे कोंकणी पात्रही वर्हाडातल्या वाचकांच्या पसंतीस आलं. त्यांची लिहिण्याची शैली अद्भुत होती-
आगीच्या लवलवत्या जिभांवर नाचणार्या अदृष्ट कढईशेजारी तेलाचा बुधला एखाद्या सैतानी पापासारखा उभा होता. पिठाचा गोळा असरट-पसरट होऊन बेडौल पोळपाटावर पसरला होता. आकाशात तरंगणार्या एका डोळ्यानं काळाला तिरका छेद दिला आणि अनामिक शहार्यासारखा तवा चुरचुरून तापू लागला. पिठाची लाटी अवचित त्यावर पसरली आणि विरघळल्या मनासारखी आर्तपणे नाचू लागली. बाजूच्या थाळीत आणखी एक खाखरा त्याची वाट पाहत होता.
काही लोक नारपांच्या भयकृतींची तुलना कलमाबाई आगळेंच्या साहित्यकृतींशी करतात. आमच्या मते, ही तुलना अयोग्य आहे. आगळेंच्या पाककृती वाचताना अजिबात भीती वाटत नाही. करताना वाटते.
मराठी विनोदात नवा पायदांडा पाडणारे लेखक म्हणून किवी जोशींना ओळखता येईल. तसं तर त्यांना धोतर, टोपी आणि कोटामुळंही ओळखता यायचं. किवींच्या पूर्वसूरींनी प्राणी, पक्षी, गणित, राजकारण, विज्ञान यावर भरपूर विनोद करून झाले होते. विनोदात आता कोणती नवी वाट चोखाळावी याचा विचार करत असताना किवींना फळांवर विनोद करायचे सुचले. त्यांचा चिकूराव हा मानसपुत्र, त्याची काजू नावाची बायको, पेरू, आंबू, बोरू ही मुलं, संत्र्याभाऊ नावाचा मावसभाऊ, फणसू आणि लिंबू हे मित्र अशी भलीमोठी पात्रयोजना प्रसिद्धीस आली. कालांतरानं यात बायकोच्या मैत्रिणी नारिंगी-मोसंबी, प्रोफेसर अननस, डॉक्टर आलुबुखार अशी आणखी पात्रं त्यांनी जन्माला घातली. त्यांच्या या विनोदासाठी पश्चिम महाराष्ट्र बागायतदार संघटनेनं त्यांना नारळ देऊन त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी किवींचा विनोद शहाळ्यासारखा गोड आहे असे गौरवपूर्ण उद्गार व्याख्याते आं. बा. ताडमाडकर यांनी काढले होते. चिकूचे गुर्हाळ, हापूस पायरी, बोरी बाभळी, जायफळाचा मळा ही त्यांची निवडक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
किवींच्या विनोदाचा एक मासला बघण्यासारखा आहे. पण जागेअभावी आम्ही तो इथे छापू शकत नाही.
(लेखकाचा विनोदी लेखनात हातखंडा आहे)