पानियरम किंवा पड्डू या नावाने ओळखला जाणारा एक दक्षिण भारतीय पदार्थ महाराष्ट्रात आप्पे म्हणून ओळखला जातो. आप्पे खूप लोकप्रिय आहेत. इडली, वडा, डोसा या दक्षिण भारतीय त्रिसूत्रीपलीकडे दक्षिण भारतीय कुझिन चिकार मोठं आहे. आप्पेंचं मूळ तामिळनाडूतील चेट्टीनाड कुझिनमधे असावं अशी माहिती मिळाली.
आंबवणं ही प्रोसेस फार जुनी आणि महत्वाची आहे. आवश्यक पोषणमूल्यं वाढायला त्यानं मदत होते.
कुणाचं तरी इडलीचं पीठ जास्त उरलं असेल आणि इडल्या उकडण्याऐवजी बदल म्हणून त्यात भाज्या, मसाले, मिरच्या वगैरे मालमसाला घालून आप्पे भाजायची युक्ती सुचली असेल, असंही वाटतं.
आप्पे जास्त चमचमीत असतात. चटणी किंवा सांबार नसलं तरी नुसतेही खाता येतात.
आप्पे ब्रेकफास्टला तर पोटभरीचे असतातच. चहा कॉफीसोबत स्नॅक म्हणूनही चांगले असतात.
आप्पे आणि केरळचं अप्पम यात गल्लत होऊ शकते. अप्पम हा एक प्रकारे जाळीदार, नाजूक असा घावनाचा प्रकार म्हणता येईल. आप्पे लहान चेंडूंसारखे असतात. करायलाही सोपे असतात.
आप्पे सहसा तांदूळ, रवा वापरून केले की नीट फुगतात, हलके होतात. दरवेळेस घटक आंबवणं शक्य नसतं तेव्हा मात्र दही, सोडा, बेकिंग पावडर यांची मदत घ्यावी लागते. पण डाळींचे आप्पे मात्र रात्रभर डाळी भिजवून आंबवूनच करावेत.
आप्पे अनेक रीतींनी करता येतात. तिखट आणि गोड आप्पेही करता येतात. नेहमीप्रमाणेच तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून वाटून आंबवून केलेल्या पिठाचे आप्पे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. त्याव्यतिरिक्त आप्प्यांचे वेगळे प्रकार करता येतात.
केळ्याचे आप्पे
मध्यंतरी कोव्हिडमुळे ऑनलाईन बरंच सामान मागवायची सवय लागलेली असल्यानं फळं एकदम जास्त होत. विशेषतः केळी तर एकदमच पिकतात. दोन केळी फार पिकलेली होती. पिकलेली केळी भरपूर गोड असतात. त्यामुळे गूळ घातला नाही आणि आप्पे केले.
कृती : १. दोन केळी कुस्करून घ्यायची,
२. त्यात एक चमचा दही, एक टीस्पून जिरेपूड, दीड टीस्पून हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा टीस्पून मीठ, यात मावेल इतका रवा घालून फेटायचं.
३. यात पाव टीस्पून बेकिंग सोडा घालून दहा मिनिटांनी साजूक तुपावर आप्पे फ्राय करायचे.
साबुदाणा आप्पे
उपासाला करायचा जरा वेगळा पदार्थ म्हणून हे आप्पे आहेत.
साहित्य : एक वाटी रात्रभर भिजवून ठेवलेला साबुदाणा, (याला जरा ओलसर साबुदाणा बरा).
दोन टेबलस्पून दाण्याचे कूट,
एक दोन हिरव्या मिरच्या वाटून,
एक टीस्पून जिरं,
एक टेबलस्पून कोथिंबीर,
मीठ चवीनुसार,
दोन टेबलस्पून राजगिरा पीठ/ वरई पीठ/ उपास भाजणी (बायंडिग व्हायला हवं हाच उद्देश).
एक लहान बटाटा उकडून.
कृती : १. सगळं मिश्रण एकत्र भिजवून पाणी घालून थोडं मऊसर भिजवावं. नेहमीच्या साबुदाणा वड्याला करतो, त्यापेक्षा थोडं जास्त मऊ करायचं.
२. आप्पेपात्राला तेल लावून साबुदाणा आप्पे खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत.
३. साबुदाणा वडे तळण्यापेक्षा आप्प्यांमधे तेल कमी लागतं.
ज्वारीच्या पिठाचे आप्पे
दीड वाटी ज्वारीचे पीठ, एक टेबलस्पून दही, मीठ चवीनुसार, एक कांदा बारीक चिरून, एक गाजर किसून, लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण एक टेबलस्पून, कोथिंबीर, जिरेपूड एक टीस्पून. बेकिंग पावडर/सोडा एक चिमूटभर.
१. सगळं मिश्रण एकत्र करून फेटायचं. वीस मिनिटं ठेवायचं.
२. आप्पे करताना मिश्रणात बेकिंग पावडर/ खायचा सोडा मिसळून आप्पे भाजायचे.
३. ग्लूटेन फ्री खायचे समाधान मिळते. डायटसाठीही योग्य रेसिपी आहे.
गोडाचे आप्पे
साहित्य : रवा एक वाटी
ओला खवलेला नारळ अर्धी वाटी
किसलेला गूळ अर्धी वाटी/चवीनुसार
दही एक टेबलस्पून,
मीठ चिमूटभर, दूध पाऊण वाटी
वेलची पावडर चिमूटभर,
खाण्याचा सोडा चिमूटभर
लोणी/तूप
कृती : सगळं मिश्रण एकजीव करून लोणी/ तुपावर आप्पे भाजावेत. हा एक वेगळा गोडाचा पदार्थ होईल.
डाळींचे आप्पे
हा एक प्रोटीन रिच पदार्थ होतो.
साहित्य : उडीद, चणा, मूग, मसूर, तूर सगळ्या डाळी अर्धी वाटी. लाल मिरच्या चार पाच. आलं किसून अर्धा टीस्पून, जिरे एक टेबलस्पून, कढीपत्त्याची पानं चिरून चार पाच, मीठ चवीनुसार.
१. सगळ्या डाळी रात्री भिजत घालून ठेवायच्या. त्यातच लाल मिरच्याही भिजत घालायच्या.
२. सकाळी थोडं पाणी काढून डाळी आणि मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या.
३. त्यात जिरं, कढीपत्ता पानं चिरून, किसलेलं आलं, मीठ चवीनुसार घालून आप्पे तेलावर भाजायचे.
ब्रेडचे आप्पे
कधीकधी शिळा ब्रेड उरतो. तो खपवायला ही चमचमीत रेसिपी छान आहे. ब्रेडमध्ये मुळातच यीस्ट असतं. त्यामुळे त्यात सोडा वगैरे लागत नाही.
साहित्य : पाच सहा ब्रेडचे स्लाइस, एक बारीक चिरलेला कांदा, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक टीस्पून आलं किसून, एक टीस्पून जिरेपूड, एक टेबलस्पून रवा, एक टेबलस्पून दही. मीठ चवीनुसार.
कृती : १. अर्धी वाटी पाण्यात ब्रेडचे स्लाइस भिजत टाकायचे.
२. पंधरा मिनिटांनी त्यात दही, कांदा, मिरची, आले, मीठ, जिरेपूड घालून मळून घ्या. वरून एक टेबलस्पून रवा घाला.
३. मिश्रण आप्पे वळण्याइतपत व्हायला हवं, लागेल तसं पाणी घाला.
तेलात आप्पे खरपूस भाजून घ्या.