१९९०च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा कव्हर करण्याची संधी मिळाली होती. त्या काळात गो. रा. खैरनार हे शरद पवार यांच्याविरोधात ‘ट्रकभर पुरावे’ घेऊन फिरत होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी रान पेटवलं होतं आणि बाळासाहेबांच्या भाषणातही पवारांवर तुफान टीका असायची. पवारही शिवसेना-भाजप यांच्याबरोबरच बाळासाहेबांवरही थेट टीका करायचे.
एका निवडणुकीनंतर मुंबईतील पत्रकारांनी निर्मला सामंत प्रभावळकर या महापौरांच्या निवासस्थानी ‘म्हारे डेरे आओ’ हा श्रमपरिहाराचा कार्यक्रम आयोजित केला होता. मतदान संपलं होतं आणि निकाल लागायचा होता, त्यामधल्या टप्प्यात आयोजित या कार्यक्रमाला बाळासाहेब, पवार, मुंडे, प्रमोद महाजन आदी सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. त्यांच्यात खेळीमेळीने हास्यविनोद सुरू होते. एकाच्या विनोदाला दुसरा टाळी देत होता. एकाच्या सभांची दुसरा तारीफ करत होता. प्रत्येकजण दुसर्याचं क्षेमकुशल आस्थेने विचारत होता.
हे चित्र पाहून नवख्या पत्रकारांना आश्चर्याचा धक्का बसत होता. निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते ते हेच का, अशी शंका मनात येत होती. लढाई संपली, तिथली कटुता, तिथली आक्रमकता तिथेच सोडायची, एवढं समजण्याइतकी परिपक्वता असण्याचा तो काळ होता. राजकारण हा २४ तासांचा ‘खेळ’ नाही आणि राजकारणाचा उद्देश समोरच्याला कायमचा संपवणे, नेस्तनाबूत करणे असा असू शकत नाही, हे समजण्याचा सुसंस्कृतपणा त्या काळात होता. ज्यांच्याविरोधात जबरदस्त लढाया केल्या त्या विरोधकांची राजकीय कारकीर्दच संपवू, आमच्याशिवाय कोणी पक्षच धरतीवर शिल्लक असता कामा नये, असल्या हिरीरीने हे नेते एकमेकांबरोबर लढत नव्हते. हे आश्चर्यच होतं.
त्याचं निराकरण करण्याची संधी मिळाली बाळासाहेबांच्या जन्मदिन विशेषांकाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या स्मरणपर लेखासाठी मुलाखत घेताना. तुम्ही दोघे एकमेकांवर प्रखर टीका करत होतात, एकमेकांची उणीदुणी जाहीर सभांमध्ये काढत होतात. तरीही तुमची मैत्री अभंग कशी राहिली? बाळासाहेबांसाठी तुम्ही ‘शरदबाबू’च कसे राहिलात? या प्रश्नावर पवारसाहेबांनी दिलेलं उत्तर डोळ्यांत अंजन घालणारं होतं. ते म्हणाले, आम्ही सत्तेत होतो. ते सत्तेबाहेर होते. आम्हाला सत्ता टिकवायची होती, त्यांना ती मिळवायची होती. त्यासाठी आम्ही दिवसा एकमेकांशी लढत होतो, एकमेकांवर टीका करत होतो. आम्ही जे करत होतो ते आम्हाला करणं भाग होतं. ते जे बोलत होते ते त्यांना बोलणं भाग होतं. पण, हे सगळं संपवून संध्याकाळी आम्ही पुन्हा दोस्त बनत होतो. हा जिव्हाळा, हा उमदेपणा मैत्रीच्या नात्यात टिकवून ठेवण्यात बाळासाहेबांचा वाटा मोठा होता, पुढाकार मोठा होता.
या अंकात ‘बाळासाहेबांचे फटकारे’ या सदरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अ. र. अंतुले यांच्या कारकीर्दीत त्यांना पदावरून हुसकावून पाहणार्यांचं काय झालं, हे दाखवणारं अप्रतिम व्यंगचित्र आहे. वस्तुत: अंतुले हे काँग्रेस पक्षाचे. बाळासाहेब त्यांचे विरोधक. तरीही अंतुले यांच्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वावर बाळासाहेब खूष होते. हा मुख्यमंत्री धडाडीने काम करील, जनहिताचे निर्णय घेईल, असा विश्वास त्यांना होता. त्यांची अंतुलेंशी चांगली मैत्री जुळली होती. ती त्यांनी कधीच लपवूनही ठेवली नाही आणि जिथे अंतुले यांचं चुकलं तिथे त्यांच्यावर प्रहार करणंही सोडलं नाही.
फिल्मी नटांकडे होळीच्या वेळी जशी रंगारंग होली साजरी होते, तशी रंगपंचमी त्या काळात कोणा राजकारणी नेत्याकडे साजरी झाली असती, तर तेव्हाच्या सगळ्या नेत्यांनी तिच्यात मनसोक्त सहभाग घेतला असता आणि ‘गिले शिकवे भूल के दोस्तों, दुश्मन भी गले मिल जाते हैं’ याचं प्रत्यंतर पाहता आलं असतं, याची खात्री वाटते. कारण तेव्हा विरोधकांना शत्रू लेखण्याचा काळ नव्हता. तो काळ स्वप्नवत वाटावा असा दु:स्वप्नासारखा काळ आता सुरू आहे. आता विरोधक निव्वळ शत्रू नाहीत, तर देशद्रोहीच आहेत थेट. त्यांची जागा पाकिस्तानातच आहे.
राजकारण हे मूलत: समाजकारणाचं साधन आहे. इथे प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने जनतेचं भलं करण्याचा प्रयत्न करत असतो. जनतेचं हित कशात आहे, याच्या प्रत्येक विचारसरणीच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. त्या त्या वेळी लोकांना ज्या विचारसरणीची भूमिका पटते, त्या विचारसरणीला लोक सत्तेत बसवतात. अपेक्षाभंग झाला तर इतरांना संधी देतात. ही लोकशाही आहे. इथे अमुकमुक्त महाराष्ट्र, तमुकमुक्त भारत असला खुनशीपणा चालता कामा नये. पण तेच जहर राजकारणात भिनवलं गेलं आहे. हा देश आणि इथली राजकीय संस्कृती सगळ्या रंगांच्या मिसळणीतून तयार झालेली आहे. एकाच एका रंगात ती रंगवण्याचा राक्षसी अट्टहास धुळीला मिळाला पाहिजे. परस्परांमधल्या वाईटाला जाळून चांगल्याचा उमदेपणाने स्वीकार करणारी अस्सल भारतीय संस्कृती राजकारणाच्या अंगणात पुन्हा एकदा बहरून आली पाहिजे. राजकारणाच्या रणमैदानात दिवसभर झुंजल्यानंतर संध्याकाळी राजकारणाच्या झुली बाहेर सोडून मैत्रभावाने, स्नेहभावनेने नेते परस्परांना भेटले पाहिजेत, तीच संस्कृती कार्यकर्त्यांपर्यंत झिरपली पाहिजे. रंगात रंग मिसळून गेले पाहिजेत.
आपल्या राज्याला आणि देशाला अशी उमद्या मनाची होली खेळण्याची संधी पुन्हा मिळो, याच शुभेच्छा!