
शॅम्पलमध्ये घरचा गरम मसाला असतो, तो तयार करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून एकच असल्याने त्याच्या चवीमध्ये आजतागायत कोणताही बदल झालेला नाही.
आपल्याला मिसळ, बटाटेवडा खाण्याची इच्छा झाली की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्याच्याबरोबर उत्तम चवीचे शॅम्पल (मूळ शब्द सॅम्पल… म्हणजे हलक्या तर्रीचा चविष्ट तिखट पातळ रस्सा) असले की बात बन जाती है. कधी फक्त पाव
शॅम्पल खाण्याची तल्लफ येते. मग पाव, मसालेदार रस्सा, भाजी आणि सोबतीला कांदा यांचा आस्वाद घेताना खवय्यांचे मन तृप्त होऊन जाते. पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आणि शहरात पावाबरोबर मिळणारे हे शॅम्पल तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे चवीतही वैविध्य असते. या भागात तर उडप्याच्या हॉटेलमध्येही शॅम्पल मिळतं आणि चवही काहीशी हटके असते. पुण्यात पूर्वी अशी काही खास ठिकाणे होती, जिथे पाव शॅम्पल खाण्यासाठी खवय्यांच्या रांगा लागत असत. केवळ चव नव्हे, तर तिथलं वातावरण, पदार्थ बनवण्याची खास पद्धत आणि वर्षानुवर्षे जपलेली खाद्यपरंपरा यामुळे ही ठिकाणे लोकप्रिय झाली होती. काळ बदलला, खाद्यसंस्कृती बदलली आणि त्यातील काही ठिकाणे हळूहळू काळाच्या पडद्याआड गेली. मात्र, आजही पुण्यात पाव आणि वडा शॅम्पल या पदार्थांसाठी प्रसिद्ध असणार्या काही जागा आहेत. या पदार्थांमुळे स्वस्तात पोट भरण्याची सोय होते, हे खरंच आहे; पण, तरीही हे निव्वळ पोटभरीचे पदार्थ नाहीत, त्यांची अस्सल चव जपली तर ग्राहक त्या चवीमुळे खेचले जातात.
पुण्यात कुमठेकर रस्त्यावर असणार्या राज्य शिक्षण संशोधन कार्यालयाच्या पुढे डाव्या बाजूला एक जुन्या शैलीचे दुकान दिसेल. लाकडाच्या फळ्यांचा दरवाजा, जुन्या काळची बांधणी असणारे हे ठिकाण म्हणजे चंद्रविलास उपहारगृह. एका वेळी २४ लोक बसू शकतील अशा या ठिकाणी आपण गेलो की पहिल्यांदाच नाकात त्या शॅम्पलचा घमघमाट शिरतो आणि बटाटेवडा शॅम्पल किंवा मिसळीचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. गेल्या ७० वर्षांपासून कार्यरत असणार्या या उपाहारगृहाने आपली चव जशीच्या तशी ठेवली आहे, त्यामुळेच इथे कायमच ग्राहकांची गर्दी असते.
अशी झाली सुरुवात
या हॉटेलची सुरुवात झाली खानावळीतून. बबन जोरे यांची आधीपासून घरगुती मेस किंवा खानावळ होती. १९५२ साली या खानावळीत राईसप्लेट मिळत असे, जेवण घरगुती पद्धतीचे असल्याने अनेकजण इथे येत असत. बबन जोरे यांनी कुमठेकर रोडवर हे उपाहारगृह सुरू केलं, त्या काळात आजच्यासारखं बाहेर खाण्याचं फॅड नव्हतं. बबन जोरे यांचे चिरंजीव आणि आताचे मालक विलास जोरे सांगतात की तेव्हाच्या स्वस्ताईच्या काळात आमच्याकडे चहा दहा पैशाला, पाव शॅम्पल वीस पैशाला आणि मिसळ ४० पैशाला मिळत होती. आजच्यासारखी हॉटेलांची भाऊगर्दी तेव्हा नव्हती. कुमठेकर रोडवरही बोटावर मोजण्याइतकी उपाहारगृहे होती. सात दशकांपासून वडिलांची चव जपल्याने ग्राहक चंद्रविलास हॉटेलच्या प्रेमात आहेत. 
गरम मसाल्याने वेगळी चव
इथल्या किंवा कुठल्याही शॅम्पलची खासियत असते ती त्याच्या खास चवीमध्ये. जोरे सांगतात की त्यांच्या शॅम्पलची जान आहे तो त्यांचा घरगुती गरम मसाला. त्यात धणे, मिरची यांच्यापासून प्रत्येक घटक पदार्थ ठरावीक दर्जाचा वापरला जातो, शॅम्पलमधले इतर घटकही उत्तम प्रतीचेच असतात. अर्थात काही बाबतीत त्यांचाही नाईलाज होतो. विलास जोरे म्हणतात, पूर्वीच्या काळी मिळणार्या भाज्या वेगळ्याच असायच्या. तेव्हाच्या कोथिंबिरीला हात लावला तरी तिचा सुगंध हाताला कितीतरी काळ यायचा. आता तसे होत नाही, कारण काळ बदलला.
बटाटा आणि वाटाणा या नेहमीच्या आणि काहीशा सपक घटकांचा वापर करून इतकं चविष्ट सॅम्पल कसं तयार होतं? त्याची चव नेहमीच एकसारखी कशी लागते? त्यासाठी जोरे काटेकोरपणाला महत्त्व देतात. दरवेळी सॅम्पल बनवताना त्यासाठीचा मसाला हा वजन करूनच वापरला जातो. हाताचा अंदाज, आचार्याचं जजमेंट वगैरे लाड नाहीत. ही काळजी घेतल्यामुळे सॅम्पलच्या चवीमध्ये कोणताही बदल होत नाही. काही काळापूर्वीपर्यंत सगळे पदार्थ जोरे कुटुंबीयच तयार करत असत, मात्र, गेल्या १२ वर्षांपासून इथे कारागीर ठेवले आहेत, असं ते सांगतात.
सालीसकट बटाटा
चंद्रविलासच्या शॅम्पलची एक खासियत म्हणजे त्यातला सालीसकट वापरला जाणारा बटाटा, असा बटाटा तुम्ही कोणत्याही पदार्थात वापरा, त्याची वेगळीच चव येते. या खासियतीमुळे इथले ग्राहक देखील त्यामुळे दोन घास जास्तीचे खात असत. पण १५ वर्षांपूर्वी जोरे यांनी सालीसकट बटाटा वापरण्याची पद्धत बंद केली. इथे शॅम्पलसाठी आणि बटाटावड्यासाठी इंदोर बटाटा वापरला जातो, कारण तो टिकायला चांगला असतो. जोरे सांगतात, पूर्वी आम्ही तळेगाव वाणाचा बटाटा वापरत असू मात्र, त्याला तार सुटण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा वापर बंद केला आहे.

चहा-शंकरपाळी फेमस
चंद्रविलासची आणखी एक ओळख म्हणजे इथली खुसखुशीत शंकरपाळी. नेमाने फक्त चहा आणि शंकरपाळी खाण्यासाठी इथे येणार्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. इथे आठवड्याला किमान सहा किलो शंकरपाळी तयार करावी लागते. ही शंकरपाळी चार वर्षांपासून अमेरिकेलाही जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
संगीतकार अजय-अतुल, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची ही आवडती जागा आहे. जोरे सांगतात, पूर्वी अजय-अतुल इथे आल्यावर हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. त्यामुळे आता ते पार्सल घेऊन जातात. प्रवीण तरडे यांना इथले शॅम्पल फारच आवडते. अलीकडच्या काळात राजकारणी मंडळी इथे येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सगळ्यांना उत्तम चवीचे पदार्थ हवे आहेत. इथल्या तिखट पदार्थांमुळे ग्राहकांना जळजळ, पित्त असे कोणतेही प्रकारे होत नाहीत. कारण शॅम्पल तयार करताना त्यात हिरव्या मिरचीचा वापर अजिबात केला जात नाही. मिसळीतले बाकीचे घटक म्हणजे शेव, फाफडा, फरसाण, हेही सगळे इथेच तयार केले जाते. इथल्या बटाटावड्याचे आवरण जाड असल्यामुळे
शॅम्पलबरोबर खाताना बेसनाचा अर्क त्यात उतरतो. वड्याची भाजीही वेगळ्या चवीची. त्यामुळे वडा-सॅम्पलला उठाव खूप.
खाण्यासाठी बस सोडून आले…
जोरे सांगतात, तीस वर्षांपूर्वीचा हा किस्सा असेल. मुंबईवरून एक गृहस्थ कामासाठी पुण्यात आले होते. सकाळी त्यांचे काम झाले आणि ते पुन्हा मुंबईला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर गेले. बसमध्ये चढताना त्यांना चंद्रविलासमधील वडा शॅम्पल खाण्याची इच्छा झाली. तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते. वडा शॅम्पलच्या प्रेमापोटी त्यांनी ती बस सोडली आणि रिक्षाने हॉटेल गाठले. इथे येऊन त्यांनी मनसोक्त ताव मारला आणि त्यानंतर बस पकडून मुंबई गाठली.
इथली खास चव आठवड्यातून तीन वेळा आपल्याला इथे खेचून आणते, असं नियमित ग्राहक सागर देशपांडे यांनी सांगितलं. पुण्यात खाण्यापिण्याच्या नवनवीन जागांची कमतरता नाही. पण, जिभेला एकदा सवय पडली की पाय तिकडे आपसूकच पाय वळतात, हा अनुभव आपण इथे कायमच घेतो, असं ते सांगतात.
आज विलास आणि त्यांचा मुलगा समीर हे दोघे पूर्णवेळ हा व्यवसाय सांभाळतात. त्यामुळे चवीकडे त्यांचं बारीक लक्ष असते. काळाच्या ओघात उपहारगृहाच्या अंतर्गत सजावटीत अनेक बदल झाले. पूर्वी लाकडी टेबल-खुर्च्या आणि शहाबादी फरशीने सजलेले हे उपहारगृह आज स्टीलच्या फर्निचरने आणि नव्या फरशीने आधुनिक झाले असले, तरी त्याच्या बाह्यरूपात जुन्या काळाची आणि अंतरंगात जुन्या चवीची ओळख आजही कायम आहे. म्हणूनच सात दशकांचा समृद्ध खाद्यप्रवास पूर्ण करत आता अमृतमहोत्सवी टप्प्याकडे त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
