• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हिंदवी नीळकण्ठीझम

सचिन परब (प्रबोधन १००)

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in प्रबोधन १००
0
हिंदवी नीळकण्ठीझम

हिंदवी नीळकण्ठीझम हा शब्द किंवा संकल्पनाच पूर्णपणे नवीन होती आणि आजही आहे. ती प्रबोधनकारांनीच जन्माला घातलेली आहे. या शब्दातच इझम आहे. इझम म्हणजे विचारधारा. म्हणजेच या विषयावर आपण एक नवा विचार किंवा विचारधारा मांडतोय, याची जाणीव प्रबोधनकारांना आहे. पण ती त्यांनी आणखी सविस्तर मांडायला हवी होती.

 

प्रबोधनकारांनी बहुतेक १९२९च्या गणेशोत्सवात हिंदवी नीळकण्ठीझम नावाच्या वेगळ्याच विषयावर व्याख्यानं दिली. एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सवावर बहिष्कार घालण्याचं आवाहन करत सार्वजनिक नवरात्रोत्सवाची स्थापना करत असतानाच आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ते गणेशोत्सवाचा सार्वजनिक मंच वापरण्याची व्यावहारिकताही जपताना दिसतात. शिवाय त्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी अडचणीही होती की व्याख्यानातून होणारी अर्थप्राप्ती नाकारण्याचा ते विचारही करू शकत नव्हते. त्या अत्यंत अडचणीच्या काळात आजारांमुळे त्यांचं शरीर हतबल झालं होतं. गरिबीमुळे अर्थचक्र ठप्प पडलं होतं. तरीही त्यांचं विचारचक्र मात्र जोमानं सुरूच होतं. त्यातून हिंदवी नीळकण्ठीझम हे एक समग्र विचारधारा बनण्याची क्षमता असलेलं विचारबीज जन्माला आलं होतं. माझी जीवनगाथामध्येही एका परिच्छेदात त्यांनी या विचारांचं मर्म मांडलं आहे. ते आपण मागच्या लेखात वाचलंही.
जवळपास दोन वर्षांच्या खंडानंतर प्रबोधन पुन्हा सुरू केल्यानंतर प्रबोधनकारांनी दोन लेखांमधून हा विचार लिहून मांडलेला आढळतो. १९२९च्या ऑक्टोबर महिन्यात प्रबोधनचा पाचव्या वर्षाचा ११ आणि १२वा जोडअंक प्रकाशित झाला. त्यात हिन्दवी नीळकण्ठीझम आणि रशियन कम्युनिझम हा लेख आहे. तर सहाव्या वर्षीच्या दुसऱ्या अंकात या लेखाचा दुसरा भाग आहे. दोन्ही लेख महत्त्वाचे आहेत खरे, पण हा एक महत्त्वाचा विचार अधिक सविस्तर यायला हवा होता, अशी चुटपूट लावून जातात.

या लेखांचं निमित्त आहे, रशियात झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारतात व्यक्त होणारी लाल क्रांतीची भीती. प्रबोधनकार सांगतात, तेव्हा दोन वर्षांपूर्वी बरद्वान संस्थानाच्या राजाने दिलेला इशारा गाजला होता– लाल संकट साऱ्या जगभर सैरावैरा बोकाळले आहे आणि त्याच्या भिंगरीचा आस हिन्दुस्थानाच्या खोबणात गरागरा फिरत आहे. ब्रिटिश सरकारनेही भारतातल्या कम्युनिस्ट पाठीराख्यांची धरपकड सुरू केली होती. प्रबोधनकारांनी उल्लेख केलेला नसला तरी विसाव्या शतकाच्या विसाव्या दशकात भारतात कम्युनिझमचे वारे वाहू लागले होते. लोकमान्य टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांच्यासारख्या देशभर मान्यता असणाऱ्या नेत्यांनी रशियन राज्यक्रांतीची कुतूहल आणि कौतुक अशा दोन्ही दृष्टीनी दखल घेतली होती. पुढे श्रीपाद अमृत डांगेंनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापनाही केली. तसेच स्वतंत्र प्रयत्न विविध शहरांत होत होते. प्रख्यात विचारवंत एम.एन. रॉय तर थेट रशियात जाऊन तिथल्या परिषदा गाजवत होते. बहुतेक सशस्त्र क्रांतिकारक या विचारांशी जोडले जात होते. प्रबोधनकारांनीही अनेकदा कम्युनिझमचा उल्लेख आपल्या लेखनात केला आहे. त्या काळातल्या सर्वच विचारवंतांप्रमाणे प्रबोधनकारांवर कम्युनिझमचा प्रभाव आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे स्वराज्य या पुस्तकात तो प्रकर्षाने जाणवतो. कष्टकऱ्यांच्या आर्थिक शोषणाची मांडणी आणि क्रांतीचं तत्त्वज्ञान त्यांना भावलं होतं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर लाल, हिरव्या, पांढऱ्या रंगांमागच्या प्रतीकात्मकतेची भारतीय संदर्भात चर्चा करून प्रबोधनकारांनी या लेखाचं आणि संकल्पनेचं प्रयोजन त्यांनी मांडलं आहे. ते असं- अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या अधिकारी भाषेत सांगायचे तर गेल्या शंभर दीडशे वर्षांत हिन्दुस्थान आरपार धुपला जाऊन पांढरा फटफटीत पडला आहे (इंडिया ब्लेड व्हाईट). त्याचे लाल रक्त साफ धुतले जाऊन, अन्नान्न अवस्थेच्या पाण्डुरोगाने तो पांढरा फेक पडला आहे. असला पाण्डुरोगी हिन्दुस्थान हजारो मैलांवरच्या उपटशुंभ रशियन क्रान्तिकारकांच्या कम्युनिझमने अवचित लालबुन्द बनला, या हाका आरोळ्यांत कितपत तथ्य आणि सत्य आहे? अत्यंत प्राचीन काळापासून शेकडो रंगीबेरंगी क्रान्त्या आपल्या हृदयावर सहजलीलेने खेळवून, पुन्हा हिमालयाप्रमाणे ताठ उभा राहिलेला हिन्दुस्थान खरोखरच रशियन मांत्रिकांच्या पचनी पडला, की कम्युनिझमच्या नावाखाली सध्या येथे चाललेला राजकारणी धुमाकूळ म्हणजे आस्वलाच्या आधी दरवेशाची आरोळी? हिन्दुस्थानाच्या पिण्डीब्रह्माण्डी झोंबलेल्या पाण्डुरोगावर (क्रॉनिक अनीमिया) रशियन कम्युनिझम हा एकच शेवटला उपाय आहे, का खुद्द हिन्दुस्थानाच्या देशी बटव्यातच या रोगाची एकादी रामबाण जडीबुटी आहे? इत्यादि अनेक शंकोपशंकांची चिकित्सा करून पाण्डुरोगी हिन्दी प्रजाजन आणि त्यांचे लालबुंद गोरे सत्ताधारी यांच्या विवेकाचे प्रबोधन करण्याचा या लेखात प्रयत्न केलेला आहे.
पुढे पुराणातल्या समुद्रमंथनाचं वर्णन करून त्यांनी त्या काळातही विविध क्रांत्यांचं मंथन जगभर सुरू आहे, अशी थिअरी मांडलीय. या समुद्रमंथनाची सुरवात १९१४ साली पहिल्या महायुद्धाने झाली. त्याचा शेवट करणारा तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विन्स्टन चर्चिल यांचा शांतता करार ही समुद्र मंथनातून निघालेल्या १४ रत्नांप्रमाणे १४ कलमीच होता. भारतात ब्रिटिश सत्ताही भारताला चौदावं रत्नच दाखवत आहे, अशी जोडही त्यांनी दिलीय. पण या क्रांतींपैकी रशियन क्रांतीत नेमकं काय झालंय, याचं वास्तव कळत नसल्याचंही ते नोंदवतात. एखाद्या दिवशी मॉस्कोहून भारतात लक्षावधी रुपयांचं फंडिंग आल्याची बातमी असते, तर दुसऱ्या दिवशी रशियातल्या दुष्काळात लाखो जण मेल्याची. कधी कम्युनिस्टांनी रशियात स्वर्ग अवतरल्याचे दावे केले जातात तर कधी तिथे बेबंदशाही आणि झोटिंगशाहीने जनता बेजार असल्याचं सांगितलं जातं.

पण भारताची बिघडलेली तब्येत सुधारण्यासाठी समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी धन्वंतरीची गरज आहे. भारताच्या तब्येतीवर योग्य उपाचारांची गरज आहे. त्यासाठी त्याची पिंडप्रकृती समजून घ्यायला हवी. बहुतेक युरोपीय देशांनी त्यांच्या प्रकृतीनुसार स्वतःची प्रतीकचिन्ह ठरवली होती. उदा. इंग्लंडचा बुलडॉग, जर्मनीचा गरूड, रशियाचं अस्वल, पोर्तुगालचं तलवारधारी तरुणी. पण भारतासाठी असं एकच चिन्ह शोधणं कठीण असल्याचंही ते सांगतात. त्याचं त्यांनी सांगितलेलं कारण महत्त्वाचं आहे. ते असं-
हिन्दुस्थान एक राष्ट्र नव्हे, एक देश तर नाहीच नाही, तर भिन्नभिन्न प्रकृतींच्या अनेक राष्ट्रांनी बनलेले खण्ड आहे. म्हणूनच त्याला भरतखण्ड असे प्राचीन काळापासूनचे सार्थ नाव आहे. या खण्डाची प्रकृति आणि प्रवृत्ति अमुक एक अशी ठरावीक नाही. सर्व प्रकृत्या आणि प्रवृत्त्या येथे सामावल्या आहेत. हिन्दुस्थान बडा अजायबखाना आहे. जगात नाही ते येथे आहे आणि येथे नाही ते जगात नाही. सर्व भावनांचा हा महासागर. जगाच्या इतिहासात तोड सापडणार नाही, असे मोठमोठे भयंकर क्रान्त्यांचे पर्वत हिन्दुस्थानावर अनेक वेळा कोसळले, क्रान्तीच्या एकाद्या फटक्याने ग्रीक रोम इजिप्तसारख्या साम्राज्यांच्या संस्कृत्या फटाफट जमीनदोस्त झाल्या, पण शेकडो क्रांत्यांना तोण्ड देऊन हिन्दुस्थान अझून ताठ उभा आहेच आहे. या चमत्काराचे मर्म उमगल्याशिवाय त्याच्या पिण्डप्रकृतीचे निदर्शक चित्र अथवा चिन्ह ठरविता येणार नाही. आणि पिण्डप्रकृतीचा ताळेबंद निर्णय लावल्याशिवाय त्याच्या हाडीमासी भिनलेल्या पाण्डुरोगाच्या निर्दाळणाचा उपायही सांगता येणार नाही.

अशा प्रकारे विविधता असल्यामुळे भारताला युरोपीय देशांप्रमाणे कम्युनिझमसारख्या कोणत्याही एका इझमची चिंता बाळगण्याचं कारण नाही, असंही ते सविस्तर सांगतात, अष्टपैलू माणसाप्रमाणे अष्टपैलू प्रकृतीचे राष्ट्र क्रांतीच्या सागरमंथनात देवदैत्यांच्या बापाला आणि काळाच्या काकाला दाद देणार नाही. हिन्दुस्थान अष्टपैलूच काय, पण शतपैलू आहे. पाश्चिमात्य युरोपियन राष्ट्रे आपापल्या एक रंगी एक जिनसी संस्कृतीच्या टिकावासाठी, ज्या निरनिराळ्या `झम`चे (इझमचे) प्रयोग करून पृथ्वीवर नंदनवन थाटण्याच्या वल्गना करीत आहेत, ते सारे `झम् हिन्दुसाथनाला उष्ट्या कल्पनांचा उकीरडा होय. पुराणपुरुषाप्रमाणे या पोरकट पोरांचे हे पोरखेळ पाहून, हिन्दुस्थान बेदरकारीने गालातल्या गालात हासत आहे. रशियन बोलशेविझम उर्फ सपाट-समाज-पटु कम्युनिझम क्रान्तीची दिवटी पेटवून नाचू लागताच, एक जात युरोपियन राष्ट्रांची केवढी पंचेधांदल उडाली आहे, ती पहा… प्रत्येकाला आपल्या पापांची आणि टिकावाच्या वर्माची चांगली जाणीव असतेच. जो तो आपल्या कर्माला भीत आहे आणि वर्माच्या मर्माला जीव तोडून जपत आहे. पण हिन्दुस्थानाला त्याचे काय?

खरं तर तो काळ पारतंत्र्याचा आहे. देश गुलामगिरीत पिचलेला आहे. त्याचा स्वाभिमानही ठेचला जातोय. आधुनिकतेच्या नावाने भारतीय संस्कृतीची अवहेलना करण्याची एकही संधी जगभर सोडली जात नाही. अशा काळात प्रबोधनकार मात्र विकसित युरोपीय देशांसारखी भीती भारताने बाळगायचं कारण नाही, असं निर्भीडपणे सांगतात. हे आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. ते पुढे सांगतात, कम्युनिझम बिनचुक आपल्या वर्मावर मर्मी घाव म्हणून आपल्याला अस्तित्वातून उखडील, अशी ज्यांना नाजुक काळजी असेल, त्या राष्ट्रांनी खुशाल मनमुराद माथेफोड आणि तंगडझाड करावी, त्यांचे हातपाय धरण्याची किंवा त्यांच्या हातापाया पडण्याची हिन्दुस्थानाला मुळीच जरूर नाही. हिन्दुस्थानाने आपल्या सर्व कर्म वर्म मर्माचा संन्यास मागेच केला असून, कम्युनिझमसारखे शेकडो एक लहरी साप लीलेने हाताबोटांवर खेळवून, गळ्यात अडकवून, तो फणीधर बनलेला आहे.

भारतातच भारतीय संस्कृतीची अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही ही मांडणी करताना प्रबोधनकार इतका आत्मविश्वास कुठून आणतात, असा प्रश्न पडतो. पण ते त्यासाठी नेहमीप्रमाणे इतिहासाचे दाखले देतात, हिन्दुस्थानाच्या हिन्दू संस्कृतीला– आज ती बरी दिसो वा वाईट दिसो– आमूलाग्र गिळण्यासाठी बौद्ध, जैन, ग्रीक, अफगाण, इराणी, दुराणी, इस्लामी, क्रिस्ती इत्यादि अनेक बोलशेव्हिक क्रान्त्यांनी भरतखण्डावर झडपा घातल्या. पण त्या सर्वांना आत्मसात करून हिन्दुस्थानाने पचनी पाडले. या सर्व बोलशेव्हिकी सागरांना हिन्दुस्थान अगस्तीने एकाच आचमनात गटायस्वाहा केले.

यातल्या पहिल्या बौद्ध क्रांतीविषयी त्यांचा दावा असा- बौद्ध धर्माचा समाज-समता वाद म्हणजे हिन्दवी कम्युनिझमची केवढी दाण्डगी क्रान्ति! पण ती सुद्धा या शतपैलू संस्कृतीच्या भरतखण्डाने चावून फस्त करून तिचा शिलकी चोथा चीन जपानकडे भिरकावून दिला.
इस्लामी संस्कृतीच्या आक्रमणाविषयी ते सांगतात- इस्लाम धर्म म्हणझे समाज समतेचा आणि विश्वकुटुंब वादाचा कडवा प्रचारक. अमिर फकीर एकाच ताटात जेवले पाहिजेत, असला त्यांचा दाण्डगा दण्डक. मूर्तिपूजनाचा निषेध तोडाने न बडबडता प्रत्यक्ष मूर्तिभंगाने त्यने दणदणीत गाजविला, आणि अखेर कित्येक शतके हिन्दुस्थानची सार्वभौम बादशाहीही हाती ठेऊन हिन्दुस्थान इस्लामीझममय करण्याचे जंगजंग पछाडले, पण अखेर त्याच इस्लामी कम्युनिझमला ताबूताच्या प्रतिकपूजेची हिन्दु दीक्षा देऊन हिन्दुस्थानाने आत्मसात केले.
युरोपीय देशांनी व्यापाराच्या नावाने केलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचाराच्या छळवादालाही भारतीय संस्कृतीने कसं पचवलं, याचंही ते वर्णन करतात – इस्लामनंतर समाज समतेचे गगनभेदी बिगूल फुंकीत क्रिस्ती कम्युनिझमचा तुफानी फेरा आला. क्रिस्ती कम्युनिष्ट तर आज इस्लामी मोगलांप्रमाणे हिन्दुस्थानचे सार्वभौम सत्ताधारी आहेत. क्रिश्चन धर्माच्या आणि त्याच्या सपाट-समाज-पटु कम्युनिष्ट तत्वाचा प्रसार करण्यासाठी त्यांचे खास सरकारी `एक्लेझियास्टिकल धर्मखाते उघड माथ्याने क्रिश्चनमतप्रसाराचा आटारेटा चालवीतच आहे. इतके होऊनही हिंदुस्थान, हिंदु लोक, हिंदु जातिभेद, आणि सगळी इतर हिंदु लफडी जागी कायम आहेत. पोर्च्युगीज कम्युनिष्टांनी सारा साष्टीप्रांत क्रिस्ती बनविला. सगळ्या साष्टीकर हिन्दूना अंतर्बाह्य किच्चन साहेब बनविले. त्यांच्या अन्नवस्त्र राहणीच्या कल्पना आरपार बदलल्या, पण अखेर रोटीव्यवहारात एकजिनसी बनलेले समदे किच्चन साहेब बेटीव्यवहारचे सौदे ठरविताना मी बामन किच्चन, तो कोली किच्चन हा कट्टर हिन्दु जातीभेद पाळतातच. येथेही हिन्दु पिण्डप्रकृतीने क्रिस्ती कम्युनिझमला उर्फ विश्वकुटुंबवादाला आपाटलूण-हॅट गिळून पचनी पाडले.`

Previous Post

काटकर पोहे

Next Post

खर्‍या नोटांचा खोटा खेळ!

Next Post
खर्‍या नोटांचा खोटा खेळ!

खर्‍या नोटांचा खोटा खेळ!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.