रामनाथच्या मृत्यूचा तपास आता पुन्हा करीमभोवती केंद्रित झाला. काळे यांनी रामनाथच्या फोनचे जुने संपर्क तपासले. मागील काही महिन्यांपासून लतीफच्या नंबरवर बरेच कॉल झालेले आहेत, आत्महत्येच्या दिवशी देखील त्याने पाच ते सहा कॉल लतीफला केलेले दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी करीमचा सीडीआर काढून तपासला.
रात्रीचे साडेआठ वाजले होते. गल्लीत नेहमीसारखीच लगबग सुरू होती. कुठल्या घरातून टीव्हीचा आवाज येत होता, कुठे मुलं खेळत होती, तर कुठे बायका घराबाहेर बसून गप्पा मारत होत्या. रामनाथ यादवच्या घराचा दरवाजा मात्र बंद होता. सावित्री मुलांना घेऊन शेजारच्या नातेवाईकांकडे गेली होती. जवळपास तासाभराने ती मुलांना घेऊन परत आली. दरवाजा फक्त पुढे लोटलेला होता, तिने तो उघडताच तिने आवाज दिला, अहो…!
घरात शांतता होती.
‘अहो .. कुठे आहात?’
उत्तर आले नाही. ती पुढे गेली आणि अचानक तिच्या तोंडून हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली. ‘रामनाथऽऽऽ!’
मुलं घाबरून आईकडे धावली. ‘आई, काय झालं?’
सावित्रीला शब्द फुटत नव्हते. ती रडत घराबाहेर धावत आली. ‘कोणी तरी पोलिसांना फोन करा… रामनाथने…!’ तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच शेजारी धावत घरात गेले. काही मिनिटांतच गल्लीमध्ये गर्दी झाली. पोलिसांची जीप आली तेव्हा शेकडो डोळे त्या छोट्याशा घराकडे लागले होते. इन्स्पेक्टर काळे आणि त्यांचे पथक आत गेले. त्यांनी परिस्थिती पाहिली. प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा प्रकार दिसत होता. इन्स्पेक्टर काळे यांनी लगेच स्टाफला कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. पंचनामा सुरू झाला. रामनाथच्या कपड्यांची झडती घेताना पोलिसांना त्याच्या खिशातून एक छोटी चिठ्ठी मिळाली. काळे यांनी ती उघडली. त्यात लिहिले होते की ‘मी माझ्या मनाने आत्महत्या करत असून माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. सावित्री, मला माफ कर.’
काळे यांनी चिठ्ठी पुन्हा दुमडली. सगळं अगदी सरळ वाटत होतं. पण काळे यांना सरळ दिसणार्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवण्याची सवय नव्हती. तेवढ्यात त्यांचं लक्ष एका मुलाकडे गेलं. दहा-बारा वर्षांचा मुलगा एका कोपर्यात बसून रडत होता. काळे त्याच्याजवळ गेले.’काय नाव तुझं?’
मुलाने हुंदका देत नाव सांगितलं, ‘माझे नाव गणेश, माझे पप्पांना काय झालं?
त्यावर काळे म्हणाले की ते देवाघरी गेले. तू रडू नकोस, तुझे पप्पा चांगले होते ना, त्यांना तू रडलेले आवडणार नाही?’
मुलाने लगेच मान डोलावली, ‘हो… माझे पप्पा खूप चांगले होते.’
‘मग एवढं का रडतोयस?’
मुलाने डोळे पुसले, ‘मागच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला पप्पांनी मला आणि माझ्या मित्रांना केएफसीमध्ये पार्टी दिली होती. सगळे मित्र मला म्हणत होते, तुझा पप्पा किती बेस्ट आहे… तुझ्यासाठी किती खर्च करतो…’ मुलाचा आवाज पुन्हा भरून आला, ‘आता माझ्यासाठी पार्टी कोण देणार?’
काळे काही क्षण त्या मुलाकडे पाहत राहिले. एक साधा मजूर. रोजंदारीवर काम करणारा. आणि मुलाच्या वाढदिवसाला एवढा खर्च? त्यांच्या मनात पहिला प्रश्न चमकून गेला. एक तर हा मेलेला इसम फार संवेदनशील असणार, त्यामुळे मुलाच्या आनंदासाठी कर्जबाजारी होऊन त्यांनी पार्टी दिली असेल किंवा मग त्याचा काहीतरी वेगळा धंदा असणार. रामनाथकडे एवढे पैसे आले कुठून? काळे यांच्या विचाराचे चक्र वेगाने फिरू लागले. त्यांनी घराकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली. घर तर झोपडपट्टीतलं छोटं होतं, त्याच्या भिंती साध्या होत्या. पण घरातील काही वस्तू मालकाच्या परिस्थितीशी अजिबात जुळत नव्हत्या. नवे कपडे, महागडी उपकरणं, मुलांसाठी खरेदी केलेल्या वस्तू आणि एका ड्रॉवरमध्ये पडलेला पावत्यांचा गठ्ठा काही रामनाथच्या परिस्थितीशी जुळत नव्हते. काळे यांनी एक पावती उचलली. महागड्या वस्तूंची खरेदी. दुसरी उचलली. दागिन्यांची. तिसरी. महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची. ‘या सगळ्या पावत्यांची यादी करा,’ काळे म्हणाले, ‘दुकानानुसार विभागणी करा. उद्या प्रत्येक दुकानात माणूस पाठवा. खरेदी कोणी केली, किती पैसे दिले, रोख की कार्ड, सगळं काढा.’
रामनाथचे कोणत्या बँकेत खाते आहे आणि किती डेबिट, क्रेडिट कार्ड आहेत, याची माहिती विचारली तेव्हा सावित्री म्हणाली, माझं आणि माझ्या पतीचं कोणत्याही बँकेत खातं नव्हतं. आम्ही मजुरी करून जगणारे लोक. जेवढे पैसे मिळतील ते तेल-मीठामध्येच जात होते.
दुसर्या दिवशी तपास पथक परत आलं. ‘साहेब, एक गोष्ट लक्षात आली. सगळ्या वस्तू रोखीने घेतलेल्या आहेत.’
‘खरेदीदार?’
‘रामनाथ यादव.’
काळे खुर्चीत मागे रेलले, ‘मागचे किती महिने तो कामावर गेला होता?’
‘शेजार्यांच्या म्हणण्यानुसार तीन-चार महिन्यांपासून तो मजुरीला जातच नव्हता.’
काळे काही क्षण शांत राहिले. काम बंद… पण पैसा सुरू! आता आत्महत्येपेक्षा पैशाचा तपास अधिक महत्त्वाचा झाला होता. चौकशी सुरू झाली. शेजार्यांकडून माहिती घेताना एक नाव वारंवार समोर येत होतं. करीम. रामनाथच्याच गल्लीत राहणारा करीम. ‘रामनाथचा गेल्या काही दिवसापासून जवळचा मित्र झाला होता साहेब, त्याचे वागणे काही चांगले नाही, तरी रामनाथ त्याचेच बरोबर फिरत होता,’ एका शेजार्याने सांगितले. ‘अचानक रामनाथची त्याची परिस्थिती बदलली, अाम्हाला देखील आश्चर्य वाटत होते, पण कधी विचारले नाही, तेव्हा करीम नेहमी त्याच्याबरोबर दिसायचा.’ हे सर्व ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर काळे यांची खात्री झाली की या रहस्याचा उलगडा करीमच करू शकेल. त्याआधी त्यांनी रामनाथचे मोबाईलचे सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) मागवून घेतले, त्याच्या मोबाईलची पाहणी करून काही नोंदी तपास डायरीमध्ये करून घेतल्या.
करीम पोलीस ठाण्यात आला, तेव्हा त्याच्या चेहर्यावर काळजीचे भाव होते. ‘रामनाथला किती वर्षांपासून ओळखतोस?’
‘लहानपणापासून साहेब.’
‘तो अचानक पैसे कसे कमवायला लागला?’
करीमने खांदे उडवले, ‘मला माहिती नाही साहेब.’
‘लतीफ शेख कोण?’
करीमच्या चेहर्यावर क्षणभर सावली उमटली.
‘माझा एक नातेवाईक आहे.’
‘दुबईहून आला होता?’
‘हो साहेब. काही वर्षं दुबईला होता.’
काळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. ‘रामनाथला त्याच्याकडे तू घेऊन गेला होतास?’ ‘हो. रामनाथ मला म्हणाला होता की गरिबीचा कंटाळा आला आहे, मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि झटपट श्रीमंत व्हायचं आहे, तर तू मला काहीतरी मार्ग सुचव, त्यावर तो म्हणाला की माझे एक नातेवाईक आहे, आपण त्याच्याकडे जाऊ.’
‘कशासाठी?’
‘लतीफ म्हणाला होता की तो पैसे कमावण्याचा काही व्यवसाय सांगेल. मी त्याला घेऊन गेलो होतो, त्यावेळी त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले, मला माहित नाही. मी बाजूला होतो.’
‘मग?’
‘मला काही माहिती नाही साहेब. रामनाथ स्वतः काहीतरी करत होता.’
करीम निघून गेला. काळे काही क्षण त्याच्या मागे पाहत राहिले. त्यांना काहीतरी चुकत असल्याची जाणीव होत होती. रामनाथच्या पत्नीने तर सांगितले होते की करीम हाच घरी आला होता आणि माझ्यासमोरच माझ्या नवर्याला बोलत होता. तोच त्याला घेऊन गेला होता. ही काही महिन्यांपूर्वीची गोष्ट होती. रामनाथ रोज सकाळी मजुरीच्या शोधात निघायचा आणि संध्याकाळी थकून परतायचा. सावित्रीच्या म्हणण्यानुसार एक दिवस करीम त्याच्याकडे आला. त्यानेच रामनाथला सांगितलं की माझा एक नातेवाईक दुबईहून आला आहे. मोठा माणूस आहे. तुला पैसे कमावण्याची भारी आयडिया देईल. त्यावर रामनाथ हसला होता, ‘आपल्यासारख्या माणसाला कोण पैसे कमवून देणार?’ असं म्हणाला होता. करीम त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला होता, ‘म्हणूनच तर तुला घेऊन चाललोय.’ सावित्रीला सांगूनच दोघे गेले होते.
रामनाथच्या मृत्यूचा तपास आता पुन्हा करीमभोवती केंद्रित झाला. काळे यांनी रामनाथच्या फोनचे जुने संपर्क तपासले. मागील काही महिन्यांपासून लतीफच्या नंबरवर बरेच कॉल झालेले आहेत, आत्महत्येच्या दिवशी देखील त्याने पाच ते सहा कॉल लतीफला केलेले दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी करीमचा सीडीआर काढून तपासला. त्यात लतीफशी संपर्क वारंवार आढळत होता. इन्स्पेक्टर काळे यांनी पुन्हा करीमला बोलावून घेतले. आता तो त्यांच्या प्रश्नावर गडबडू लागला आणि उडवावीची उत्तरे देऊ लागला. त्यांची खात्री झाली की हा काहीतरी माहिती लपवतो आहे. त्यांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो काही क्षणातच पोपटासारखा बोलू लागला.
करीम सांगू लागला, माझा रामनाथच्या घरावर डोळा होता. त्याच्या घराला लागूनच माझी जागा होती, ते घर मला मिळालं तर मला माझं घर मोठं करता येणार होतं. रामनाथ मात्र ते घर सहज विकणार नव्हता. म्हणून मी माझा नातेवाईक लतीफ याच्याशी
बोललो. त्याने मला एक प्लॅन सांगितला. रामनाथला झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवायचं. त्याच्याकडून मोठी रक्कम उकळायची आणि मग गायब व्हायचं. कर्ज फेडण्यासाठी रामनाथला अखेर घर विकावंच लागेल. त्या वेळी त्याचं घर आपण बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिळवायचं. योजनेचा प्रत्येक टप्पा ठरलेला होता. त्यासाठी लतीफ मदत करणार आणि त्याबदल्यात मी त्याला पैसे देणार असे ठरवले होते.
लतीफ एका लॉजमध्ये उतरला होता. त्यानंतर एक ऑफिस भाड्याने घेऊन त्यामध्ये भाड्याने फर्निचर आणून जणू काही एक कॉर्पोरेट ऑफिस असल्याचा बनाव तयार केला होता. त्यांना माहीत होते की रामनाथ हा साधा सरळ माणूस आहे, जास्त शिकलेला नाही. आपण दाखवू त्यावरच तो विश्वास ठेवणार आहे. काही दिवसांनी रामनाथला पटवून सोबत घेऊन करीम लतीफच्या ऑफिसमध्ये पोहोचला. मोठं
ऑफीस, महागडी गाडी, आत प्रशस्त हॉल, टेबलावर लॅपटॉप, फाइल्स, काही कागदपत्रं आणि सतत वाजणारे दोन-तीन मोबाईल. रामनाथच्या डोळ्यांत आश्चर्य होतं. लतीफने त्याच्याकडे पाहून हसत विचारलं, ‘तूच रामनाथ? करीमने तुझ्याबद्दल सांगितलं आहे. मेहनती आहेस म्हणे.’
रामनाथ हसला, ‘मेहनत करतो साहेब… पण पैसा टिकत नाही.’
लतीफ काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला, ‘फक्त मेहनत करून पैसा मिळत नाही रामनाथ. पैसा कमवायला धाडस लागतं.’
‘कसलं धाडस?’
लतीफने आवाज खाली आणला, ‘एक काम आहे. थोडं रिस्की आहे. पण पैसा झटपट मिळतो.’
रामनाथ अस्वस्थ झाला, ‘बेकायदेशीर आहे का?’
लतीफ हसला,’कायदेशीर-बेकायदेशीर याचा विचार करत बसलास तर आयुष्यभर मजुरीच करशील.’ तो खुर्चीत मागे रेलला, ‘जिंदगी एक बार मौका देती है… वो मौका निकल गया तो फिर दोबारा नहीं मिलता.’
करीमने लगेच त्याला दुजोरा दिला, ‘अरे रामनाथ, आधी छोटी रक्कम घेऊन बघ. काही झालं तर मी आहे.’
लतीफने एक पाचशे रुपयांची नोट रामनाथ समोर ठेवली, ‘ही घे. बाजारात चालवून बघ.’
रामनाथने नोट हातात घेतली. त्याला अजूनही भीती वाटत होती. पण त्या दोघांनी इतका विश्वास निर्माण केला होता की शेवटी तो बाजारात गेला. दुकानात जाऊन त्याने काही वस्तू घेतल्या.पाचशेची नोट दुकानदाराच्या हातात देताना त्याचा हात थरथरत होता. दुकानदाराने नोट पाहिली. उजेडात धरली. काही क्षण तपासली आणि ती स्वीकारली. रामनाथला वस्तू मिळाल्या. तो बाहेर आला. त्याच्या चेहर्यावर आश्चर्य होतं. ‘खरंच चालली!’ लतीफ हसला. ‘सांगितलं होतं ना!’ त्याला मात्र हे माहीत नव्हतं की त्याच्या हातात दिलेली नोट बनावट नव्हतीच. ती खरी नोट होती. लतीफने जाणीवपूर्वक त्याच्या स्वतःच्या पैशातून ती दिली होती. रामनाथचा विश्वास बसावा, यासाठी. त्या दिवसापासून खेळ सुरू झाला.लतीफ कधी दोन हजार रुपये देई, कधी पाच हजार. रामनाथला सांगितले जाई की ही ‘डुप्लिकेट नोटांची कमाई’ आहे. रामनाथ त्या पैशातून बाजारात खरेदी करू लागला. त्याला कुणी अडवलं नाही. कारण त्याला दिलेल्या सुरुवातीच्या नोटा खर्याच होत्या. हळूहळू त्याचा विश्वास पूर्ण बसला. तो कामावर जाणं कमी करू लागला. नंतर पूर्णपणे बंद झालं. तो आळशी बनला होता. त्याच्या घरात पैसा येत होता. सावित्री विचारायची, ‘हे पैसे कुठून येतात?’
रामनाथ चिडून म्हणायचा, ‘तुला त्याचं काय?’
‘पण एवढे पैसे…’
‘माझ्यावर विश्वास ठेव.’ सावित्री शांत व्हायची. पण तिला काहीतरी बरोबर नसल्याची जाणीव होती.
दरम्यान करीम आणि लतीफचा खरा डाव पुढे सरकत होता. लतीफ हा काही दुबईत राहणारा व्यापारी नव्हता. तो करीमचा दूरचा नातेवाईक होता. काही वर्षांपूर्वी तो परदेशात कामाला गेला होता, एवढंच खरं. पण आता त्याचा दुबईशी काहीही संबंध नव्हता. तो काही काळासाठी गावाकडे जाऊन लपून राहणार होता. करीम आणि लतीफने आधीच सगळा डाव आखला होता. एक दिवस प्लॅन केल्याप्रमाणे लतीफने रामनाथला मोठं आमिष दाखवलं, ‘माझा दुबईचा माणूस कायमचा निघून जाणार आहे. त्याला त्याच्याकडील सर्व माल एकदाच देऊन जायचे आहे.’
रामनाथ त्याच्याकडे पाहू लागला, ‘किती माल आहे?’
‘एक कोटी.’
रामनाथचे डोळे विस्फारले.
‘पन्नास लाख लागतील.’
‘माझ्याकडे एवढे कुठून येणार? मी घरातील दागिने विकले तर दहा लाख होतील.’
त्यावर लतीफ म्हणाला, ‘एकदा तो गेला की पुन्हा चान्स मिळणार नाही. काहीही कर, पण हा मौका जाऊ देऊ नको. हे केले तर तू कोट्यधीश होशील, या झोपडपट्टीतून कायमचा मुक्त होशील. आणखी फक्त ४० लाख अरेंज कर, नंतर दुप्पट.’
रामनाथच्या डोक्यात स्वप्नांची गर्दी झाली. लतीफ म्हणाला, ‘५० लाखाचे नवीन घर. ५० लाख बँकेत. व्याजावर जग. पुन्हा मजुरीची गरज नाही.’
रामनाथच्या मनात एकच विचार घोळत राहिला— आयुष्यभराची गरिबी एका दिवसात संपणार. घरी परतल्यावर त्याने सगळं सावित्रीला सांगितलं. सावित्रीने स्पष्ट नकार दिला, ‘नको रामनाथ. आजपर्यंत जे मिळालं ते पुरे. एवढी मोठी रक्कम लावणं म्हणजे संकट ओढवून घेणं.’
‘तुला काही समजत नाही.’
‘मला एवढंच समजतं की हा पैसा सरळ नाही.’
‘आणि ही संधी सोडली तर?’
‘संधी गेली तरी चालेल. घर जाऊ नये.’
पण रामनाथला आता फुकटच्या पैशाची सवय लागली होती. मजुरीचे दिवस त्याला आता अपमानासारखे वाटत होते. सावित्रीच्या हातातील दागिने त्याने घेतले. घराचे कागद घेतले. सावकाराकडून कर्ज घेतले आणि ५० लाख रुपये घेऊन करीमकडे गेला. करीमने पैसे मोजले. ‘उद्या सकाळी १ कोटी तुला मिळणार.’
रामनाथच्या चेहर्यावर आनंद होता. ‘मग माझी सगळी चिंता संपली. ‘करीम फक्त हसला. रामनाथने संपूर्ण रात्र स्वप्न पाहत तळमळ काढली, सकाळी लवकर उठून देवपूजा करून लतीफच्या ऑफिसला गेला. त्याला कुलूप होते, त्याने आजूबाजूला चौकशी केली तर कोणाला काहीही माहीत नव्हते. त्या रात्रीच लतीफ शहरातून निघून गेला होता. त्याचा फोन बंद होता.
ऑफिस भाड्याचं होतं आणि कालच रिकामं केलं होतं. रामनाथ वेड्यासारखा लतीफचा शोध घेत राहिला. शेवटी करीमकडे धावला. त्याने करीमला सर्व सांगितले, हे ऐकून करीमनेही नाटक करायला सुरुवात केली, डोक्यावर हात ठेवला, ‘माझेही दहा लाख गेले रे!’ रामनाथ त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. ‘तुझेही?’ ‘हो. माझंही सगळं संपलं. ‘करीमच्या डोळ्यात पाणी होतं. पण ते अश्रू नव्हते. तो पुढच्या डावाची वाट पाहत होता. करीम रामनाथला म्हणाला, आता आपण पोलिसांकडेही जाऊ शकत नाही, पोलिस आपल्याला खोट्या नोटांच्या केसमध्ये आरोपी करतील. आपण आता गप्प बसू आणि लतीफचा शोध घेऊ, त्याने मलाही फसवले आहे, यावर रामनाथ काहीच बोलला नाही. त्यावरून करीम समजून गेला की रामनाथ काही पोलिसांकडे जाणार नाही. त्यांनी आखलेला डाव यशस्वी होतोय. त्याच्या चेहर्यावर एक प्रकारच्या अघोरी आनंद झळकला होता.
करीमचा कबुलीजबाब मिळताच तपास पथकाने त्याला ताब्यात घेऊन लतीफ उतरला होता त्या लॉजवर धडक मारली, लॉजची नोंदवही शोधून काढली. त्यात काही महिन्यांपूर्वी करीम आणि लतीफ एकत्र राहिल्याची नोंद होती. आता पोलिसांनी लतीफच्या कथित दुबई प्रवासाची माहिती तपासली. पासपोर्टच्या नोंदीत कळले की त्याने परदेश प्रवास केला नव्हता. म्हणजे लतीफ दुबईला परत गेलाच नव्हता. काळे यांच्या चेहर्यावर हलकं स्मित आलं. तपास पथकाने त्याच्या मूळ गावाचा पत्ता करीमकडून घेतला आणि त्याचे
टॉवर लोकेशन काढले. तो आपल्या मूळ गावी असल्याचे समजले. इन्स्पेक्टर काळे यांनी ही बाब लगेच आपल्या वरिष्ठांना सांगून उत्तर प्रदेशमधील करीमचे गाव ज्यांच्या कार्यक्षेत्रात येते, त्या पोलिस ठाण्याला कळवून इकडून टीम रवाना केली आणि अखेर एका छोट्या गावात एका नातेवाईकाच्या घरातून लतीफ सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली. पहिल्यांदा त्याने सर्व नाकारलं. ‘रामनाथला मी ओळखतही नव्हतो.’ काळे यांनी त्याच्यासमोर करीम आणि त्याचा फोटो ठेवला. ‘हा कोण?’ लतीफ शांत. ‘तुझा दूरचा नातेवाईक?’ शांत. ‘दुबई?’ शांत. काळे पुढे झुकले, ‘तू दुबईला होतास ही गोष्ट खरी नाही हे मला माहीत आहे. पण रामनाथला दिलेल्या नोटा दुबईतून आल्या होत्या का? की त्या पाकिस्तानातून आल्या होत्या? तुझा टेररिस्ट फंडिंगशी संबंध आहे काय? हे प्रश्न ऐकून लतीफच्या चेहर्यावर भीतीच्या छटा दिसू लागल्या, आपण फार मोठ्या संकटात सापडत आहे हे त्याला जाणवू लागले, तो घाबरून रडू लागला आणि म्हणाला, ‘साहेब, त्या सगळ्या नोटा खर्या होत्या.’ लतीफने मान खाली घातली, ‘रामनाथला गुन्ह्यात अडकवण्याची भीती निर्माण करण्यासाठी आम्ही तसं सांगितलं.’
‘आम्ही म्हणजे?’ लतीफ गप्प.
काळे म्हणाले, ‘करीम?’ काही क्षणांनी लतीफने मान हलवली आणि मग हळूहळू संपूर्ण कट बाहेर आला.
इन्स्पेक्टर काळे यांनी सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले. करीम आणि लतीफला अटक झाल्यानंतरही काळे काही काळ रामनाथच्या केस फाइलकडे पाहत बसले. एका अंमलदाराने विचारले, ‘साहेब, रामनाथनेही तर बेकायदेशीर व्यवहार केला होता, पण तो फसवला गेला होता. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला असता.’ काळे शांतपणे म्हणाले, ‘हो. त्याने चूक केली होती. त्याने लोभ केला, चुकीचा मार्ग निवडला हे खरे आहे.’ ते काही क्षण थांबले. ‘पण तो या कटाचा सूत्रधार नव्हता. तो या लोकांच्या जाळ्यात अडकलेला माणूस होता.’
काही दिवसांनी काळे रामनाथच्या घरी गेले. सावित्री दारात बसली होती. मुलगा वहीत काहीतरी लिहीत होता. काळे त्याच्याजवळ बसले. ‘काय लिहितोयस?’
‘पप्पांबद्दल.’
काळे काही बोलले नाहीत. मुलाने अचानक विचारलं,’साहेब… माझे पप्पा वाईट होते का?’
काळे काही क्षण शांत राहिले. ‘तुझ्या पप्पांनी काही चुकीचे निर्णय घेतले होते.’ मुलगा त्यांच्या चेहर्याकडे पाहत राहिला.
‘पण ते वाईट माणूस होते का?’
काळे यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ‘नाही रे. माणूस चूक करतो म्हणून तो पूर्णपणे वाईट होत नाही.’
काळे जीपमध्ये बसले. जीप सुरू झाली. रामनाथची झोपडपट्टी मागे सरकू लागली. पण त्यांच्या मनात एक वाक्य पुन्हा पुन्हा घुमत राहिलं—’खोट्या नोटा अस्तित्वातच नव्हत्या… खोटं होतं ते नोटांचं आमिष आणि त्या खोट्या आमिषाने एका माणसाचं खरं आयुष्य संपवलं होतं.’
