
वेलदोडे आणि जायफळानंतर मला केशराची आठवण ओघाने आलेलीच आणि दोनतीन वाचकांनीही केशरावर लिहिण्यास सुचवले. लेखनाचा विषय म्हणून केशर नवीन असली तरी तसा संबंध जुनाच, नाही का? अगदी लहानपणी केशराची चपटी लहानशी डबी हाताळणे म्हणजे अप्रुपच वाटे, सांडलवंड न करता त्यातल्या मोजक्या दोनचार काड्या बहुतेकदा श्रीखंड, बासुंदी वा तत्सम पदार्थांमध्ये घातल्या जात, नाही हो थेट नाही, चमचा दोन चमचे कोमट दुधात कुस्करून! मग पदार्थाचा रंग तर खुलायचाच, पण एक शाही गंध लाभायचा त्या पक्वान्नाला. मराठीच्या पुस्तकात काश्मीरच्या वर्णनात केशराच्या मळ्यांचे वर्णन वाचून हे केशर म्हणजे सुंदर जांभळ्या फुलांतील वाळवलेले पुंकेसर असतात हे समजले. नंतर कालौघात हीच केशर बरीच ओळखीची झाली, पूर्वीपेक्षा सहज व सढळ हाताने तिचा वापर घरोघरी होऊ लागलाय… अगदी उकडीच्या मोदकांपासून सर्व खिरी आणि बिर्याणीसारखे शाही तिखट पदार्थ केशराच्या वापराने आपापले गंधस्वाद आणखीन खुलवू लागलेत!
केशर खाण्याखालोखाल सौंदर्यप्रसाधनांमध्येही जागा पटकावून आहे. आंघोळीच्या साबणांपासून नानाविध क्रीम्समध्ये केशर असल्याचा दावा अनेकजण करतात. यात खरोखरच केशराचा वापर होतो का, याबद्दल खरेखोटे देव जाणे, पण त्या वस्तूंचा वास मला वैयक्तिक फार आवडतो. ‘स्वरांच्या सावलीत’ ह्या माई मंगेशकरांच्या आत्मचरित्रात केशराचा एक फार सुंदर वापर सांगितलाय, लग्नानंतरच्या पहिल्या रंगपंचमीला बायकोच्या कोर्या पांढर्या साडीवर नवर्याने केशराचे पाणी उडवायचे! कल्पनाच बघा किती रम्य आहे! पं. हृदयनाथ आणि भारती मंगेशकरांच्या आयुष्यातील हा प्रसंग फार छान वर्णलाय त्या पुस्तकात.
भारतात जशी काश्मीरची केशर सुप्रसिद्ध आहे, तशीच जगभरात वेगवेगळ्या देशांतील केशराला मागणी असते. मी लंडनहून स्पेनची आणलेली केशर एवढी सुंदर होती आणि मनोमन आवडली म्हणून सांगू की नंतर तकमावशी दरवर्षी येताना आमच्यासाठी न चुकता त्याच केशराच्या डब्या घेऊन येत असत. तो नेत्रसुखद वर्ण का विशिष्ट गंध, ह्यातले काय जास्त आवडते, ह्या प्रश्नाला बहुतेकांचे दोन्ही आवडते हेच उत्तर असेल, नाही का? पण ह्या गंधांचे एक खास वैशिष्ट्य आहे बरं… हा सुगंध माणसाला चिंतामुक्त व्हायला मदत करतो! केशराबद्दल मला वाटणार्या आजवरच्या कौतुकात ह्या चिंतामुक्तीच्या गुणामुळे विलक्षण भर पडलीये. सहसा चुटकीभर वापरली जाणारी ही वस्तु शब्दशः अमूल्य आहे नं? चिंता व चिता एकसमान, केवळ अनुस्वाराचा फरक असला तरी दोघी माणसाला जाळतातच. चितेवर जळणे आपल्या हाताबाहेरचे असले तरी चिंतेत न जळणे नक्कीच हातातले असू शकतेच की. व्यर्थ असल्या तरीही अनेक चिंतांचे बळी असतो आपण कळत नकळत. अगदी चिंतातुर जंतुसारखी अवस्था नसली तरी मानवी मनाचा एक पैलू म्हणून चिंतेकडे बघता येईलच, नाही का? थोड्याफार चिंतेमुळे कृतीला योग्य वळण लाभते आणि निर्धारित कामे पार पडण्याची शक्यता दुणावते. मात्र जरुरीपेक्षा जास्त चिंता माणसाला पोखरते हे नक्की. सद्सद्विवेक गहाण पडतो आणि अहेतुक कृतिशून्यता बळावते ह्या चिंतेपायी. दुसर्याची चिंता दूर करण्याचा केशराचा गुण प्रत्येकानेच यथाशक्ती यथामती अंगिकारला तर खरंच त्या केशराच्या माहेरघरासारखे, काश्मीरसारखेच, घराघराचे नंदनवन होईल, हे निश्चित.
‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हे सांगणारे स्वामी समर्थ असोत वा ‘प्रत्येक कठीण प्रसंगी लक्षात असुद्या की मी तुमची आई आहे’ हे सांगणार्या माताजी श्री सारदादेवी असोत, किती दिलासा देतात नं? कोणीतरी आपल्या पाठीशी आहे ही भावनाच चिंतामुक्त व्हायला मदत करते. एकट्याने केलेली वाटचाल सहसा कठीण वाटते ती ह्याचमुळे. भक्तांची चिंता वाहण्याचे काम साक्षात भगवंतही करतच असतो, फक्त तशी दृष्टी लाभावयास हवी.
एका मनुष्याचा जीवनपट समुद्रकिनार्यावर उमटलेल्या पाऊलखुणांमधुन उलगडून दाखवतांना तो भक्त व भगवंतातील एक संवाद आहे. बघ म्हणे माझ्या सुखी काळात तू होतासच पाठीशी, चार पावलं उमटली आहेत वाळूत. पण कठीण काळात काय रे परमेशा? तिथे दोनच पावलं दिसतात… अरे बाळा, नीट बघ म्हणे, ती दोन पावलं माझी आहेत, तू तर माझ्या कडेवर होतास रे. कठीण प्रसंगी वाटचाल सुरू ठेवणेच गरजेचे, आपल्याला उचलून घ्यायला व सुयोग्य जागी पोहोचवायला भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच लाभतो… मग कसली हो चिंता? दुसर्याची चिंता दूर करण्याचा हा वसा केशरासारखाच चिमूटभर जरी अंगिकारता आला नं तरी त्या भगवंतानेच दाखविलेल्या व योजिलेल्या मार्गावरची दुसर्यांबरोबरच स्वतःची वाटचालही समृद्ध होईलच ह्यात शंकाच नाही… ती चिंताच नको!

