• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कवी मिसळ, चिंचवड

सुधीर साबळे- पुणे तिथे खाणे

Marmik Team by Marmik Team
September 28, 2026
in खानपान, विशेष लेख
0
कवी मिसळ, चिंचवड

महाराष्ट्राच्या देशभरात परिचित खाद्यपदार्थांच्या यादीत वरच्या नावांमध्ये नाव घेतला जाणारा पदार्थ म्हणजे ‘मिसळ’. अलीकडच्या काळात शहरात, गावात, सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या चवीच्या मिसळी मिळू लागल्या आहेत. प्रत्येक मिसळीमध्ये तिचे वेगळे वैशिष्ट्य दडलेले असते. एका प्लेटमध्ये उसळ, फरसाण, कांदा, कोथिंबीर, शेव, रस्सा असे जिन्नस एकत्र आले की ती झाली मिसळ! पण कुठे त्यात पोहे पडतात, कुठे बटाट्याची सुकी भाजी असतेच, कुठे मटकीची उसळ, कुठे मुगाची, कुठे वाटाण्याची- कुठे मिश्र कडधान्यांची. पुण्यातल्या बेडेकरांच्या मिसळीच्या रश्शात काही भाज्याही असतात. काही मिसळी तिखट आणि झणझणीत असतात, त्याच्यासोबत तर्रीवाला, पाहूनच घाम फोडणारा रस्सा असतो. पहिल्या घासाला तिखटजाळ वाटणारी मिसळ दुसर्‍या घासाला खुलते, तिच्या मसाल्याची चव जिभेवर रेंगाळू लागते. काही मिसळी सौम्य असतात, तर काही अगदीच मिळमिळीत. मिसळीच्या चवीचा खरा आत्मा रश्शाची चव, रंग, सुगंध आणि तिखटपणा यामध्ये असतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये. बहुतेक नामांकित मिसळींमध्ये वर्षानुवर्षे वापरला जाणारा, ठराविक प्रमाणात बनणारा घरचा तयार केलेला ताजा मसाला हे त्यांच्या अनेक वर्षे एकसमान राहिलेल्या त्यांच्या चवीचं सिक्रेट असतं… हेच सिक्रेट १९८६पासून जपणारी चिंचवडमधली प्रसिद्ध मिसळ म्हणजे कवी मिसळ. मोरया गोसावी गणपतीच्या मंदिरात जाणार्‍या प्रत्येकाला ती माहिती आहे. फरसाण, वाटाणा-मटकीची उसळ, घरगुती मसाल्याचा रस्सा आणि सोबत पाव. काही पदार्थांमध्ये साधी घरगुती चव, हा यूएसपी ठरतो, तोच इथेही आहे.

अशी झाली सुरुवात
१९८६च्या सुमारास चिंचवडमध्ये दोन मिसळीची दुकाने प्रसिद्ध होती. एक होते नेवाळे मिसळ आणि दुसरी होती काळूशेठची मिसळ. उदय कवी यांना मिसळ खाण्याची आवड होती. पूर्वी त्यांचा साउंड सर्विस आणि किराणा मालाचे दुकान असे व्यवसाय होते. मिसळ खाण्याच्या आवडीतून त्यांच्या मनात आलं की आपण फर्मास मिसळ बनवून विकली तर? त्यांनी १९८६मध्ये मोरया गणपतीच्या मंदिराजवळ १५ बाय २० या जागेत मिसळीचे दुकान सुरू केले. तेव्हा तिथे आठ ते दहा जण बसतील एवढी व्यवस्था होती. सहसा गावाकडच्या मिसळींमध्ये जहाल तिखटपणा हे वैशिष्ट्य आढळतं. कवी मिसळीत मात्र हा प्रकार नाही. तिची एक खास चव तिला अल्पावधीतच लोकप्रिय करून गेली. ही चव ज्यांच्या जिभेवर रेंगाळली, ते पुणेकर १६ किलोमीटरवरून खास मिसळ खाण्यासाठी इथे येतात, असं उदय कवी यांचे चिरंजीव आणि कवी मिसळीचे विद्यमान मालक चिन्मय कवी सांगतात.

सात घटकांचा खेळ…
चिन्मय कवी म्हणतात, प्रत्येक व्यावसायिकाची मिसळ तयार करण्याची पद्धत वेगळी असते. काहीजण मिसळीत पोहे, बटाटा भाजी असे पदार्थ टाकतात. आमच्याकडची मिसळ साधी आहे. तिच्यात काय असते तर फरसाण, दगडी पोहे, मटकी-वाटाणा उसळ आणि रस्सा… सोबत कांदा, कोथिंबीर आणि पाव. अवघे सात घटक. मिसळीत सगळ्यात महत्त्वाचा असतो तो रश्शासाठीच्या गरम मसाल्याचा फॉर्म्युला. तो माझ्या वडिलांनी आणि आईने तयार केलेला आहे. या मसाल्यात ३२ प्रकारचे जिन्नस वापरले जातात. तो आम्ही घरी तयार करतो आणि तो दळून आणतो. दर आठवड्याला आम्हाला पाच किलो मसाला लागतो. आमच्या मिसळीची चव त्यात दडलेली आहे.

आचारी नाहीच….
चिन्मय सांगतात, आमच्याकडे मिसळ तयार करण्यासाठी आचारी नाही. मिसळीचा रस्सा मी किंवा माझे वडील असे दोघेच जण तयार करतो. मसाला तयार करण्याचे काम आई-वडील दोघेजण करतात. मिसळीचा सिक्रेट फॉर्म्युला आम्हा तिघांमध्येच आहे, त्यामुळे त्याच्या चवीत ना बदल होतो, ना बिघाड! पूर्वी ज्या जागेत हॉटेल होते, ती कमी पडू लागल्याने आम्ही त्याच ठिकाणी २००९मध्ये मोठी जागा घेतली. आता इथे एकावेळी ६३ जण बसतील अशी व्यवस्था आहे, असे कवी यांनी सांगितले.

४० वर्षे रोज येणारे ग्राहक
केटरिंग सर्विस चालवणारे बुवा कुदळे इथे दररोज मिसळ खाण्यासाठी इथे येतात. ते म्हणतात, वयाच्या ४६व्या वर्षांपासून मी रोज न चुकता इथे मिसळ खाण्यासाठी येतो आहे. आज माझे वय ८६ वर्ष आहे. पहिल्यापासून मिसळीची चव जशी आहे तशीच आहे. एक दिवस मिसळ खाल्ली नाही तर अजिबात चैन पडत नाही मला. या मिसळीबरोबर जणू मैत्रीच झाली आहे माझी, ती तुटू नये म्हणून मी रोज इथे येतो. कवींकडे मिळणारी उपवासाची मिसळ देखील प्रसिद्ध आहे. तिच्यात उपवासाचा बटाट्याचा चिवडा आणि शेंगदाण्याची आमटी असे दोनच पदार्थ असतात, मात्र त्याची टेस्ट लाजवाब असते, असे कुदळे सांगतात.

मंगेश पाडगावकरांची आवडती मिसळ
ज्येष्ठ कवी-गीतकार मंगेश पाडगावकर जेव्हा कधी पुण्यात येत असत तेव्हा आवर्जून या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी भेट देत असत. सुरुवातीपासूनच या मिसळीची चव कमी तिखट राहिलेली आहे, त्यामुळे आपल्या चवीत ही मिसळ परफेक्ट बसते, असे पाडगावकर म्हणत. खवय्या अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील इथे भेट दिली असल्याचे चिन्मय कवी यांनी सांगितले.

तिखटपणा वाढवण्याची मागणी...
चिंचवड गावात तिखटजाळ पदार्थ खाणारी मंडळी भरपूर आहेत, त्यामुळे तुमच्या मिसळीचा तिखटपणा वाढवा, अशी मागणी आमच्याकडे करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीला मान देऊन अलीकडच्या काळात ग्राहकाला लागेल तसा तिखटपणा उपलब्ध करून देत असल्याचे चिन्मय यांनी सांगितले. आम्ही सुरुवातीपासूनच लिमिटेड मेनू ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे इथे मिळणार्‍या पदार्थाची चव एकसारखी ठेवणे आम्हाला शक्य होत आहे. इथे मिसळ-पाव, वडा-सॅम्पल आणि वडापाव असे तीनच पदार्थ मिळत असल्याचे ते सांगतात.

बँकेची नोकरी सोडून व्यवसायात…
चिन्मय हे पूर्वी खासगी बँकेमध्ये नोकरी करत होतो. मात्र, एका टप्प्यावर त्यांना घरचा व्यवसाय योग्य पद्धतीने पुढे न्यावा असे वाटले आणि बँकेची नोकरी सोडून ते पूर्ण वेळ व्यवसायात उतरले. आता ते, वडील उदय आणि आई माधुरी असे तिघेजण हा व्यवसाय सांभाळतात. चिन्मय सांगतात, आमचे हॉटेलमध्ये प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असते. ग्राहकांशी आमचा थेट संवाद होत असतो. मुंबईतले अनेकजण मिसळ खाण्यासाठी इथे येत असतात. आयटीमुळे पुण्याचा चेहरा बदलला आहे. शनिवारी-रविवारी आयटीमध्ये काम करणारी मंडळी इथे मोठ्या संख्येने मिसळीवर ताव मारण्यासाठी येत असतात. आपल्या मिसळीचा दर्जा आणि चव कायम ठेवणे आणि ग्राहकांना समाधान देणे हेच आमचे ध्येय असल्याचे चिन्मय सांगतात.

मिसळ ही श्रीमंत-गरीब असा भेद न करणारी डिश आहे. साध्या खाद्यगृहापासून मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत मिसळीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. तिच्या किमतीत, सादरीकरणात आणि चवीत फरक असला तरी तिचे मूळ आकर्षण कायम राहते. मिसळ ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी जोडलेली आहे. ती फक्त पोट भरण्यासाठी खाल्ली जात नाही; तिच्यात स्थानिक चव, घरगुती मसाल्यांची आठवण, मित्रांच्या गप्पा आणि खवय्येपणाचा आनंद मिसळलेला असतो. तोच आनंद कवी मिसळ गेल्या ४० वर्षांपासून देते आहे…

Previous Post

गंध केशराचा… चिंतामुक्ती देण्याचा!गंध केशराचा… चिंतामुक्ती देण्याचा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.