
मध्यंतरी एकदा काहीतरी निमित्ताने शिरा करत होतो. नेहमीप्रमाणे सगळ्या सामानाची ठरल्या प्रमाणानुसार जुळवाजुळव करून मंद आचेवर रवा भाजायला घेतला. काही वेळाने बाहेर बसलेल्या ओमला विचारले, का रे येतोय का वास? हो नाही करता करता अखेरीस आला रे बाबा वास, पण शिर्याचा नाहीये म्हणे अजून! म्हटलं थोडं थांब, येईल आता तुला हवा तो वास. भाजलेल्या रव्यात दूध, साखर वगैरे मुरल्यावर थोडीशी वेलदोड्याची पूड घालून वाफ आणली अन् शिरा बनल्याचा सांगावा आपोआप गेला बाहेर. लगेच ओम महाराज म्हणतात, आता आला बाबा शिर्याचा वास, बनलाय नं? दे की पटकन. वासानेच लग्गेच खायची इच्छा झाली बघ. पुन्हा एकदा त्याच्यात मला माझे बालपणीचे प्रतिबिंब दिसले. आई- आजीच्या मागे मी अशीच घाई करत फिरायचो, गोड पदार्थ असला की तर हमखासच!
आजकाल जरा जास्ती वेलदोडे आणून थोडे शेकून मिक्सरवर पूड करून ठेवलेली असते. मात्र पूर्वी वेलदोड्याची पूड ताजी वेळच्या वेळी खलबत्त्यात केली जायची. छोट्याशा पितळी खलबत्त्याचा तो खणखणाट पुढे येऊ घातलेल्या गोड सुखाची नांदी देत असे. वरची साल काढून मधले काळे दाणे कुटले की मधुर सुगंधी पूड तयार होते. अर्थात बिर्याणीसारख्या शाही पदार्थांत अखंड वेलदोडेही जागा पटकावतातच. त्रयोदशगुणी विड्यातही वेलदोड्याचा मान अग्रभागी! आजकाल तर चांदीचा वर्ख लपेटलेले वेलदोड्याचे दाणे मिळतात खास! कोणत्या का रूपात असेना, हा सुगंध निर्माण व्हायला गरज असते ती अगदी चिमूटभराचीच. फार जास्ती वेलदोडे लागतच नाहीत सहसा.
मी चौथी-पाचवीत असताना घडलेला किस्सा इथे आठवणं क्रमप्राप्तच आहे. आम्ही अलिबागला मिर्ची गल्लीत राहायचो तेव्हा. खाली उतरलं की लहानसहान बरीच किराणाची दुकानं होती. महिन्याचं सामान तर मंगलकडूनच यायचं तेव्हा. पण पटकन काही हवं असलं तर ह्या लहान दुकानांमध्ये धाव घ्यायला अस्मादिक तयार असायचेच. एकदा आईने हातावर दोन रुपये देऊन मला वेलदोडे आणायला पाठवले. मी दुकानात ऐटीत जाऊन सांगितले पाव किलो द्या हो काका वेलदोडे. अरे काय बनवतेय म्हणे नेमकं आज आई? म्हटलं, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही द्या सांगितलेली वस्तू. एवढे खरंच हवेत का, एकदा विचारून ये, म्हणे. म्हटलं, सगळ्या वस्तू तर किलोच्या हिशोबात आणतो आपण, इथेच काय गोंधळ आहे देव जाणे! अखेरीस त्या काकांनी किती पैसे दिलेत वेलदोडे आणायला ह्यावरून गरजेचा अंदाज बांधला आणि मला दोन रुपयांचे बारा वेलदोडे बांधून दिले. घरी येऊन घडलेला प्रसंग सांगितल्यावर आई म्हणाली, अरे एवढेच पुरतात… असे किती टाकावे लागतात वेलदोडे?

स्वतःचे वेगळे अस्तित्व विसरणारे, चिमूटभरानी संपूर्ण पदार्थाचाच स्वाद खुलवणारे आणि अर्थात आयुर्वेदात औषधी गुणांसाठी मान्यताप्राप्त असलेले हे एवढेसे वेलदोडे किती सहज विचारांना वेगळी दिशा देतात नाही का? कोणत्याही नव्या, सकारात्मक व विधायक गोष्टीची सुरुवात स्वतःपुरती आणि स्वतःपासून केली की नकळतच आजूबाजूचा सगळा आसमंत उजळतो! एवढ्या मोठ्या गोड पदार्थाला मी काय पुरा पडणारे हा विचार वेलदोड्याचा सुगंध कधीच करत नाही तसेच माझ्या एकट्याने काय होणार हा विचारच आणायचा नाही मंडळी मनात! प्रत्येकातच काही ना काही खुबी नक्कीच असते, तिचा योग्य वापर केला की नक्कीच आपल्या खुबीचं सार्थक तर होतेच, पण नकळत आजूबाजूलाही आपल्या अस्तित्वाचा फायदाच होतो.
माझ्या एकट्याने काय होणार, हा विचार आपल्या संतांपासून, देशभक्तांसकट अनेक समाजसुधारकांनी केला असता तर आज आपण एका वेगळ्याच विश्वात वावरलो असतो. संन्याशाची मुलं म्हणून हिणवली गेलेली ज्ञानेश्वरादी भावंडं त्या निर्भत्सनेच्या वावटळीत वाहून न जाता आपापलं विहीत कार्य करत गेली, म्हणून तर आज ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव चाखायची संधी लाभू शकते वाचकाला. तीच गत लोकमान्यांनी पुकारलेल्या क्रांतीची. जहाल मताला किती पाठिंबा लाभेल ह्याची शाश्वती नसली, तरी हेतू व परिणामांची खात्री ह्याच भांडवलावर ते पुढे आले व इतिहास रचला गेला. तीच तर्हा बाबा आमटेंची. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांना पुर्नजन्म देण्याचं काम मी एकट्याने करून काय फायदा, असे म्हणून ते थांबले असते तर आजही समाजाचे वेगळेच चित्र दिसले असते.
मी किती करू शकेन हे गौण ठरते, पण मी जेही काही अल्प करेन त्याने स्वतःचे कल्याण तर साधेनच, पण इतरांचाही फायदाच होईल, हा दृष्टिकोन बाळगला की सोने होते आयुष्याचे. ‘आत्मनो मोक्षार्थं जगद् हिताय च’ ह्या ब्रीदवाक्याला अनुसरणार्या श्री रामकृष्ण मठाचा अथांग विस्तार बघितला की नतमस्तक व्हायला होते ते त्यांनी केलेल्या ब्रीदपालनामुळेच!! तुमच्या-माझ्या कणभर गुणांचेही योगदान असेच मणभराची गोडी वाढवणारे ठरो हीच सदिच्छा!

