• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लसणीच्या अ‍ॅलर्जीने कोडे उलगडले…

इन्स्पेक्टर प्रधान पंचनामा

Marmik Team by Marmik Team
August 28, 2026
in पंचनामा
0
लसणीच्या अ‍ॅलर्जीने कोडे उलगडले…

चित्र-नचिकेत कामतेकर

यमुना नगर पोलीस स्टेशनमध्ये रात्रीची शांतता पसरली होती. इन्स्पेक्टर काळे टेबलावर मान खाली घालून केस डायरी चाळत होते. तेवढ्यात अचानक पोलीस स्टेशनचा दरवाजा जोरात ढकलला गेला आणि एक जोडपे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आत आले. नवर्‍याच्या चेहर्‍यावर प्रचंड भीती होती, तर त्याच्या पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्यांना अशा अवस्थेत पाहून इन्स्पेक्टर काळे खुर्चीतून उठले. त्यांनी कर्तव्यदक्ष आवाजात पण तितक्याच समजूतदारपणे सांगितले, ‘अहो, शांत व्हा. आधी आत या आणि बसा. काय झालंय ते मला सांगा.’

त्यांनी त्या दोघांना आपल्या चेंबरमध्ये घेतले आणि पाणी प्यायला दिले. नवरा पाणी पितानाही थरथरत होता. त्याने स्वतःला सावरत म्हटले, ‘साहेब… माझा अर्णव… माझा नऊ वर्षांचा मुलगा… कोणीतरी त्याचं अपहरण केलंय साहेब!’ पत्नीने पुन्हा एकदा हंबरडा फोडला, ‘माझा अर्णव कुठे असेल साहेब? त्याला वाचवा!’

नवर्‍याचे नाव होते आनंदराव. ते शहरातल्या एका मोठ्या फॅक्टरीचे मालक होते. इन्स्पेक्टर काळे यांनी तात्काळ डायरी काढली आणि विचारले, ‘आनंदरावजी, नक्की काय घडलं? शांत डोक्याने सांगा.’

आनंदरावांनी सांगितले की अर्णव दुपारी शाळेतून घरी निघाला, पण तो वेळेवर घरी पोहोचलाच नाही. सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. काळे यांनी विचारलं, तुम्ही त्याच्या शाळेत आणि मित्रांकडे चौकशी केली का? त्यावर आनंदराव म्हणाले, सगळीकडे चौकशी केली, परंतु त्याचा पत्ता लागला नाही. त्यांची पत्नी सुजाता म्हणाली, माझा अर्णव असा न सांगता कधीच कुठे जात नाही हो. ती पुन्हा रडू लागली.

इन्स्पेक्टर काळे यांच्या डोक्यातील पोलिसी विचारचक्र वेगाने फिरू लागले. या मुलाला अपघात तर झाला नसेल ना, तो काही कारणाने घर सोडून गेला तर नसेल ना, कोणी त्याला पळवून नेले तर नाही ना, असे नाना विचार त्यांच्या मनात घोळू लागले. त्यांनी अणर्वच्या आईवडिलांना दिलासा देऊन घरी पाठवले. ठाणे अंमलदारांना अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आणि सर्व सोपस्कार होताच लगेच स्वतः कडे तपास घेतला आणि त्याचक्षणी त्यांच्या तपासाला सुरुवात झाली. त्यांनी लगेच आपल्या पथकाला बोलावले आणि अर्णवच्या शाळेपासून ते घरापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. तसेच मधल्या काळात जवळपास कुठे काही अपघात झाला आहे का याची परिसरात आणि हॉस्पिटलमध्ये चौकशी करायला सांगितले. कंट्रोल रूमला अर्णवचे वर्णन पाठवून सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देऊन शोध घेण्यास सांगितले गेले.

सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना दिसले की अर्णव शाळेबाहेर पडला आणि साधारण १०० मीटर अंतरापर्यंत चालत गेला. त्यानंतरचा परिसर काहीसा निर्जन आणि झाडीचा होता, जिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. त्यानंतर जिथे सीसी कॅमेरे सुरू होत होते, तिथे तो आलेलाच नव्हता. या मधल्या भागातूनच त्याचे अपहरण झाले आहे, असा कयास त्यातून बांधला गेला. त्या निर्जन रस्त्यावरून त्या वेळेत साधारणपणे २५ ते ३० छोटी-मोठी वाहने गेल्याचे फुटेजमध्ये दिसत होते.

इन्स्पेक्टर काळे कपाळावर हात मारून म्हणाले, ‘निर्जन भागात कॅमेरे नसण्याचा नेमका फायदा आरोपीने घेतलाय. या ३० गाड्यांमधून नक्की कोणत्या गाडीत अर्णवला टाकले, हे शोधणे जिकिरीचे आहे.’ हे अपहरणच आहे हे निश्चित झाल्यावर इन्स्पेक्टर काळे यांनी आनंदराव यांचा फोन ट्रेसिंगवर लावला. अपहरणकर्ता कोणालाही फोन लावू शकतो म्हणून इन्स्पेक्टर काळे आनंदराव यांच्या घरी त्यांची पत्नी, पुतण्या यांच्यासह सगळ्यांना फोन ट्रेसिंग म्हणजे काय असते हे समजावून सांगत असतानाच आनंदरावांच्या फोनची रिंग वाजली. अनोळखी नंबर होता. काळे यांनी लगेच हातानेच खूण केली— ‘फोन स्पीकरवर टाका आणि ट्रेसिंग मशीन चालू करा.’

‘हॅलो… आनंदराव? तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे,’ पलीकडून एक खर्जातील, रुक्ष आवाज आला.
‘हो… मी आनंदराव बोलतोय. माझा अर्णव कुठे आहे? त्याला काही करू नका, प्लीज!’ आनंदराव गयावया करू लागले.
‘अर्णव अजूनपर्यंत तरी ठीक आहे. त्याला जिवंत पाहायचं असेल, तर दहा लाख रुपये तयार ठेवा. कुठे आणि कधी यायचं ते मी नंतर सांगेन. पोलिसांत गेलात, तर मुलाचे तुकडे मिळतील!’ एवढे बोलून खचकन फोन कट झाला. पुढे दोन-तीन वेळा अशाच प्रकारे फोन आले.

‘साहेब, फोन ट्रेस झाला का?’ काळे यांनी तांत्रिक विभागाकडे पाहिले.
ऑपरेटर म्हणाला, ‘सर, लोकेशन नाही ट्रेस झाले. अपहरणकर्ता वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळी सिम कार्ड वापरून फोन करतोय. तो ट्रेसिंगच्या कक्षेत येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतोय.’

शेवटी आनंदरावांनी दहा लाख रुपयांची खंडणी देण्याचे मान्य केले आणि पोलिसांनी सापळा लावायचा ठरवले. अपहरणकर्त्याने त्यांना गुलशन कॉर्नर येथे पैसे घेऊन एकट्याला यायला सांगितले होते. आनंदरावांचा पुतण्या समीर म्हणाला की मी जातो पैसे घेऊन, काकांना बीपी आहे त्यांना त्रास होईल. परंतु काळे यांनी त्याला समजावलं की अपहरणकर्ता दुसर्‍या कोणाकडून पैसे घेणार नाही. उलट दुसरे कोणी गेले तर अर्णवच्या जिवाला धोका निर्माण होईल.
त्यानंतर इन्स्पेक्टर काळे यांनी एक गुप्त प्लॅन आखला, ‘आनंदराव, तुम्ही घाबरू नका. आम्ही साध्या वेशात तिथे तैनात असू. तुम्ही पैशाची बॅग घेऊन जा.’ पैसे घ्यायला कोणी आले की खिशातील रुमाल काढून तोंड पुसा, हा इशारा मिळाला की आम्ही लगेच त्याला पकडतो.
ठरल्याप्रमाणे अपहरणकर्त्याने सांगितलेल्या वेळेच्या १० मिनिटे आधी आनंदराव ‘गुलशन कॉर्नर’ येथे पोहोचले. हा रस्ता उंचावर होता आणि तिथून शनि मंदिराच्या पाठीमागून १०-१५ पायर्‍या खाली उतरल्या की दुसरा रस्ता लागायचा. त्या रस्त्याला गाडीने जायचे असेल तर पुढे जाऊन वळण घेऊन खाली रस्त्यावर यावे लागते. काळे आणि त्यांचे पथक वरच्या रस्त्याने स्पष्ट दिसत असल्यामुळे आजूबाजूला झाडीत आणि दुकानांच्या आडोश्याला दबा धरून बसले होते.

तेवढ्यात आनंदरावांना पुन्हा फोन आला, ‘आनंदराव, तिथे कचर्‍याचा डबा आहे ना? त्यात तुमचा मोबाईल फेकून द्या आणि कोणाशीही न बोलता मंदिराच्या मागच्या पायर्‍यांवरून खाली उतरा. तिथे एक गाडी उभी आहे, त्यात गुपचूप बसा.’
आनंदरावांनी घाबरून मोबाईल डब्यात टाकला आणि ते पायर्‍यांवरून खाली गेले. खाली एक गाडी उभी होती. आनंदराव त्यात बसले. गाडीच्या चालकाने तोंडाला मास्क लावला होता आणि तो काहीच बोलत नव्हता. गाडी सुसाट वेगाने शहराबाहेर निघून गेली. वर दबा धरून बसलेल्या पोलिसांना काही समजायच्या आत आरोपीने चकमा दिला होता. साधारण १० किलोमीटर शहराबाहेर गेल्यावर त्या चालकाने गाडी थांबवली, आनंदरावांना खाली उतरवले आणि त्यांच्या हातात एक टाईप केलेली चिठ्ठी देऊन गाडी वेगाने पळवून नेली.
आनंदरावांनी चिठ्ठी पाहिली, त्यावर यमुनानगर परिसरातील एका जुन्या गोदामाचा पत्ता होता. आनंदरावांकडे मोबाईल नसल्याने त्यांना पोलिसांशी संपर्क साधता येत नव्हता आणि आनंदरावाकडे मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना संपर्क साधता येत नव्हता. साधारण अर्धा तास चालल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील एका अनोळखी व्यक्तीला गयावया करून त्याच्या फोनवरून पोलिसांशी संपर्क साधला. आनंदरावांसह इन्स्पेक्टर काळे ताफ्यासह तात्काळ त्या गोदामावर पोहोचले. दरवाजा तोडून आत पाहिले, तर आत अर्णव होता. त्याचे हातपाय आणि डोळे बांधलेले होते. आनंदरावांनी धावत जाऊन मुलाला कवेत घेतले. अर्णवची सुखरूप सुटका झाली, पोलिसांचा जीव भांड्यात पडला… पण… अपहरणकर्ता आणि १० लाख रुपये गायब होते. आरोपीने पोलिसांना हुलकावणी दिली होती. हा इन्स्पेक्टर काळे यांच्यासाठी मोठा धक्का होता. हे त्यांचे अपयश होते.

पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर काळे हताश होऊन खुर्चीत बसले. दुसरीकडे आनंदरावांनी वरिष्ठांकडे तक्रार केली, ‘पोलिसांच्या चुकीच्या प्लॅनिंगमुळे माझे १० लाख रुपये गेले!’

वरिष्ठांचा दबाव वाढला, वर्तमानपत्रात पोलिसांच्या नाकर्तेपणाच्या बातम्या येऊ लागल्या. यामुळे काळे यांचा संयम सुटू लागला आणि ते टीमवर चिडू लागले. तपास पूर्णपणे भरकटला होता. पोलीस ठाण्यात काही वेळ शांत बसल्यानंतर काळे यांनी स्वतःला सावरले, ‘नाही, चिडून चालणार नाही. आरोपी आपल्या एक पाऊल पुढे चालतोय, कारण आपण त्याच्या पद्धतीने विचार करतोय. आता मला वेगळा विचार करावा लागेल.’

काळे पुन्हा आनंदरावांच्या घरी गेले आणि अर्णवशी बोलण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला आनंदरावांनी नकार दिला, पण काळे यांच्या आग्रहामुळे ते तयार झाले. काळे यांनी अर्णवला विचारले, ‘बेटा अर्णव, तुला नक्की काय काय आठवतंय?’
अर्णव घाबरलेल्या आवाजात म्हणाला, ‘काका, मी शाळेतून येत असताना पाटलांच्या शेताजवळ मागून कोणीतरी आलं आणि माझ्या नाकाला रुमाल लावला. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो. मला शुद्ध आली तेव्हा माझे डोळे बांधलेले होते. तिथे एक अंकल होते, ते माझ्याशी अजिबात बोलत नव्हते, परंतु एक दोन वेळा त्यांना फोनवर बोलताना आवाज ऐकला होता. त्यांनी मला जेवण दिलं.’
तेवढ्यात तिथे आनंदराव फॅमिली डॉक्टर विजय यांच्यासोबत आत आले.
‘काळे साहेब, पाच मिनिटं थांबा,
डॉक्टरांना अर्णवला तपासायचं आहे.’
डॉक्टरांनी अर्णवला तपासले आणि काही गोळ्या दिल्या. डॉक्टर बाहेर पडत असताना काळे यांनी सहज विचारले, ‘डॉक्टर, आता याची तब्येत कशी आहे?’

डॉक्टर विजय म्हणाले, ‘धक्क्यातून सावरलाय तो. पण आज सकाळी त्यांच्या घरच्या स्वयंपाकी बाईने त्याला लसूण असलेली भाजी दिली होती. ती खाल्ल्यामुळे त्याच्या अंगावर रॅशेस आलेत आणि खाज सुटतेय. त्याला लसणाची तीव्र अ‍ॅलर्जी आहे.’
हे ऐकताच काळे यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ते धावतच डॉक्टरांच्या मागे गेले आणि त्यांचा हात धरून विचारले,
‘डॉक्टर! मला सांगा, लसूण खाल्ल्यावर त्याला किती वेळात अ‍ॅलर्जीचा त्रास सुरू होतो?’
डॉक्टर आश्चर्यचकित होऊन म्हणाले, ‘साधारण दोन तासांच्या आत गोळी दिली नाही तर अंगावर मोठे चट्टे येतात.’
काळे यांनी डॉक्टरांचे आभार मानले आणि ते अर्णवकडे धावले. ‘अर्णव, तू त्या गोदामात चार दिवस होतास ना? तिथे तू काय काय खाल्लंस?’

‘काका, मी तिथे पुलाव, पराठा आणि व्हेज बिर्याणी खाल्ली.’
‘पण ते खाल्ल्यावर तुला कधी अंगाला खाज सुटली का? किंवा चट्टे आले का?’ काळे यांनी उत्सुकतेने विचारले.
‘नाही काका, काहीच नाही झालं.’ अर्णवने निरागसपणे सांगितले.
काळे य्ाांच्या चेहर्‍यावर एक विजयी हास्य आले. याचा अर्थ, अपहरणकर्त्याला अर्णवच्या लसणाच्या अ‍ॅलर्जीबद्दल पूर्ण माहिती होती. त्याने जाणूनबुजून त्याला लसूण नसलेले अन्न दिले होते. म्हणजे आरोपी अर्णवच्या अगदी जवळचा, कुटुंबातील किंवा ओळखीचाच कोणीतरी होता. काळे यांनी तत्काळ आपल्या २० टीम्स तयार केल्या आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर, नातेवाईकांवर आणि मित्रांवर गुप्तपणे पाळत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, काळे पुन्हा एकदा त्या गोदामाच्या परिसरात गेले. गोदामापासून ५० मीटर अंतरावर एक कचराकुंडी होती. त्या कचराकुंडीत आपल्याला पुरावा मिळणार असे त्यांना वाटत होते. त्यांच्या टीमला सांगून हे पटणार नाही आणि एवढ्या घाणीत काम करणारे कामगार पण लगेच मिळणार नाहीत म्हणून शेवटी स्वतः काळे यांनी हातात ग्लोव्हज घातले, मास्क लावला आणि स्वतः कचराकुंडीत उतरून तपासू लागले. तिथे हजर असलेल्या कर्मचार्‍यांना वाटू लागले की बदनामीमुळे साहेब वेडे झालेत की काय! पण पाच मिनिटांतच काळे यांच्या हाती एक प्लास्टिकची पिशवी लागली, ज्यात जेवणाचे रिकामे डबे होते. त्या डब्यांवर मोठ्या अक्षरात लिहिले होते— ‘मनोरा हॉटेल, गांधी रोड.’
बाहेर आलेवर लगेच काळे यांनी फॉरेन्सिक टीमला तिथे बोलावून तिथेच त्या डब्यातील अन्नाचे नमुने तपासले. त्या डब्यांत ५-६ दिवसांपूर्वीचा पुलाव आणि भाजी हे अन्नपदार्थ होते असा निष्कर्ष त्यांनी दिला. काळे तात्काळ मनोरा हॉटेलमध्ये पोहोचले आणि काउंटरवरील मॅनेजरला डबा दाखवला. मॅनेजरने तो ओळखला. गेल्या पाचसहा दिवसांत कोणी जास्त वेळा पार्सल घेऊन गेले आहे काय, हे काळेंनी विचारले. मॅनेजरने त्याला दुजोरा दिला आणि म्हणाला, गेले पाचसहा दिवस एक माणूस रोज सकाळी-संध्याकाळी इथून पुलाव आणि पराठे पार्सल घेऊन जायचा. तो नेहमी कॅश द्यायचा. पण एक विशेष गोष्ट… तो नेहमी सांगायचा की, ‘एका पुलावात आणि भाजीत अजिबात लसूण टाकू नका, ते पार्सल वेगळं बांधा.’

हे ऐकताच काळे यांच्या डोळ्यात चमक आली. त्यांनी लगेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक मध्यमवयीन, सडपातळ माणूस जेवण घेताना दिसत होता. काळे यांनी ते फुटेज मोबाईलमध्ये घेतले आणि आनंदरावांकडे गेले. फुटेज पाहताच आनंदराव दचकले, ‘साहेब, झूम करा बरं… अरे! हा तर गणेश यादव आहे. एक वर्षांपूर्वी हा माझ्या
फॅक्टरीत कामाला होता. दारू पिऊन गोंधळ घातल्यामुळे मी याला कामावरून काढून टाकलं होतं.’
गुन्हेगाराचा चेहरा समोर आला होता. पोलिसांनी गणेश यादवचा आनंदरावांच्या
फॅक्टरीतील जुना रेकॉर्ड तपासला, तेव्हा तो नालासोपार्‍यातील जुन्या मशिदीजवळ राहत असल्याचे समजले. काळे यांनी पथकासह तिथे जाऊन दबा धरला आणि गणेश यादवला बेड्या ठोकल्या.
लॉकअपमध्ये काळे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच गणेश यादव पोपटासारखा बोलू लागला. त्याने जे सांगितले, ते ऐकून काळे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ‘साहेब, मला माफ करा! हा सगळा प्लॅन माझा नव्हता. मालकांचा पुतण्या समीर… त्याने हा प्लॅन आखला होता!’ गणेश थरथरत म्हणाला.
‘समीर?!’ काळे यांनी विचारले.
‘हो साहेब. समीरला दारू आणि डान्स बारचे व्यसन आहे, त्यावर त्याचे खूप कर्ज झाले आहे. तो आत्महत्या करायचा विचार करत होता. मी त्याला म्हणालो की तुझ्या चुलत्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यावर तो म्हणाला की काका हरामखोर आहेत, ते पैसे देणार नाहीत. माझ्याही मनात त्यांनी कामावरून काढल्याचा राग होताच. मग आम्ही अर्णवच्या अपहरणाचा प्लॅन केला. समीरनेच मला सांगितले होते की अर्णवला लसणाची
अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे त्याला विना-लसणाचे जेवण दे. समीर घरातच राहून पोलिसांच्या प्रत्येक हालचालीची माहिती मला कॉल करून पुरवत होता. गुलशन कॉर्नरला पोलीस कुठे लपलेत, हे समीरनेच मला सांगितले होते आणि गाडीतून आनंदरावांना कुठे उतरवायचे आणि चिठ्ठी कुठे द्यायची, हेही त्याचेच
प्लॅनिंग होते. पैसे माझ्या खोलीत ठेवलेत साहेब, आम्ही ते १५ दिवसांनी अर्धे-अर्धे वाटून घेणार होतो.’
काळे यांनी तात्काळ एक टीम पाठवून गणेशच्या खोलीतून १० लाख रुपये जप्त केले. दुसरीकडे, आनंदरावांच्या घरातून समीरला कॉलर धरून पोलीस स्टेशनमध्ये आणले गेले. समीर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, ‘मला काहीच माहित नाही, पोलीस मला खोट्या केसमध्ये अडकवतायत!’ पण काळे यांनी गणेश यादवला त्याच्यासमोर उभे केले, तेव्हा समीरचे अवसान गळाले. तो काळे यांचे पाय धरून रडू लागला, ‘चुकलो साहेब! कर्जापायी आणि दारूच्या नशेत मी स्वतःच्याच चुलतभावाचा बळी द्यायला निघालो होतो. मला माफ करा!’
इन्स्पेक्टर काळे यांनी समीर आणि गणेश या दोघांना कोठडीत डांबले. त्यांनी तात्काळ डीसीपींना फोन करून केस सॉल्व्ह झाल्याची आणि रक्कम जप्त केल्याची माहिती दिली. डीसीपींनी फोनवरच काळे यांचे कौतुक केले—’वेल डन, काळे! प्राऊड ऑफ यू!’
आनंदराव आणि सुजाता पोलीस स्टेशनमध्ये आले. आनंदरावांनी जोडलेल्या हातांनी काळे यांची माफी मागितली, ‘काळे साहेब, मला माफ करा. मी तुमच्यावर संशय घेतला, पण तुमच्या हुशारीमुळे आज माझा मुलगाही वाचला आणि माझे पैसेही परत मिळाले. तुम्ही खरंच ग्रेट आहात!’
इन्स्पेक्टर काळे यांच्या चेहर्‍याव्ार आता हताशपणा नव्हता, तर एका खर्‍या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याच्या विजयाचा आनंद लकाकत होता.

Previous Post

गंध वेलदोड्याचा, कणाने स्वाद वाढविण्याचा…

Next Post

वहुमन कॅफे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.