• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

प्रक्षाळ काढा

शुभांगी जोशी चवदार साठवण

Marmik Team by Marmik Team
August 21, 2026
in चवदार साठवण
0
प्रक्षाळ काढा

रात्री शेजआरतीनंतर देवाला औषधी वनस्पतींचा वापर करून बनवलेला काढा दिला जातो. हा काढा देवळातच बनवला जातो. मला याची फारच गंमत वाटली. देव थकला आहे, मग त्याचा शिणवटा काढायला नको का? शेजघरातील काढलेला पलंग परत स्वच्छ व चकचकीत करून ठेवला जातो (चांदीचा). गादी, खोळ, पलंगपोस सर्व काही नवीन घातले जाते. शेजआरतीत काढ्याबरोबर शिरा, डाळ, खोबरं यांचाही नैवेद्य दाखवतात. आता आरती झाली की देव सुखनिद्रेसाठी शेजघरात जातात. तिथेच देवाजवळ हा काढा ठेवला जातो रात्रभर.

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे ।।
अशी आस धरून हजारो भाविक प्रतिवर्षी पंढरपूरला येतात. आषाढी कार्तिकीत ही भाविकांची संख्या काही लाखांपर्यंत जाऊन पोहोचते. लाखो भाविक आणि दर्शनाचे तास मात्र दिवसात चोवीसच. मग देवही जास्तीत जास्त भक्तांना दर्शन व्हावे म्हणून कंबर कसतो. एकादशीच्या मुख्य दिवसाच्या आधी देवाचे नवरात्र बसते, म्हणजे देव आपले नित्योपचार व निद्रा यांचा त्याग करून जवळपास चोवीस तास दर्शन देण्यास उभा ठाकतो. मंदिरात गर्भगृहाच्या डाव्या बाजूस देवाचे शेजघर आहे. त्यात असलेला पलंग या दिवसांत काढला जातो. या नऊ दिवसांत देव फक्त सकाळी स्नान करतो आणि संध्याकाळी दिवसभराचा शीण घालवण्यासाठी श्रीचरणी गरम पाणी घालून लिंबू सरबताचा नैवेद्य दाखवतात. (क्षार संजीवनीच्या वापरालाही काही शतकांची परंपरा आहे बरं का!)

हे देवाचे एक प्रकाराचे व्रतच म्हणायला हवे. या देवाच्या जास्तीच्या कामाच्या व्रताची सांगता होते ती प्रक्षाळपूजेने. नऊ दिवस देवाच्या पाठीमागे लोड लावून ठेवतात, देव थकेल म्हणून हा लोड आधारासाठी. पांडुरंग थकतो म्हणून त्याच्याचसाठी ही पूजा. त्याचा ‘शिणवटा काढणे’ म्हणतात. एका रात्री देवाला सुगंधी तेलाने मालिश करतात, आपादमस्तक त्याला तेलाने चोळतात. हे तेल मंदिरात बनवतात. याला ‘उदवलेल तेल’म्हणतात. या रात्री देवाला फक्त पांढरे धोतर नेसवतात.

प्रक्षाळपूजेचा दिवस पंचांग बघून ठरवतात. मुहूर्त काढतात. या दिवशी गावातले सर्व लोक देवाच्या पायाला लिंबू साखर लावतात. आता मात्र चांदीच्या पादुकांवर पिठीसाखर लावायला परवानगी आहे. सकाळी ११ वाजता पहिले पाणी देवाला स्नानाला घेतात. थकलेल्या देवाला गरम पाण्यामुळे आराम मिळतो. हे पाणी देवळात गरम केल जाते.२.३० वाजता दुपारी महाअभिषेक संपन्न होतो. ‘हरिहरा नाही भेद’ या उक्तीप्रमाणे शंकर व विष्णू यात भेद नाही. म्हणून चारही शाखांचे वैदिक आंमत्रित केले जातात आणि चौखांबी मंडपात बसून रूद्र म्हटले जातात. देवाला दुधाचा अभिषेक गाईच्या शिंगातून केला जातो. २५ ते ५० लिटर दूध लागते. तोपर्यंत संपूर्ण परिवारातील देवळांना पण गरम पाळण्याने स्नान घातले जाते. यात्राकाळात देऊळ अस्वच्छ होते, म्हणून देऊळ पण धुतले जाते. तसेच रुक्मिणीस पण दुधाचा अभिषेक केला जातो. रुक्मिणी पण दमलेलीच असते, मग तिला लिंबूपाण्याने आंघोळ घातली जाते. अंग चुरचुरेल म्हणून परत दुधाचा अभिषेक आणि केशर पाणी घातले जाते. तिथे पवमान म्हटले जाते.

आता विठ्ठलाला जरीकाठी पोशाख व अलंकार घालतात. दुपारी पाच वाजता नैवेद्य दाखवला जातो. यात पाच पक्वान्नं असतात. पुरणपोळी, खीर, श्रीखंड, करंजी, साखरभात, अळुची भाजी, कढी, भजी, बटाटा भाजी, वरणभात, दही, पापड, चटणी, पंचामृत, पुरी. देवावर अवलंबून जेवढे लोक आहेत, म्हणजे जे लोक वारी घालतात, तेवढे सगळे जण हा नैवेद्य पांडुरंगाला दाखवतात. देवाचे रूप पाहण्यासारखे असते. संध्याकाळी सात वाजता धुपारती जाते. त्या वेळेस आटीव केशरयुक्त व बदाम, पिस्ता, काजूयुक्त दुधाचा आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवतात. गावातील भाविकही हा नैवेद्य दाखवतात.

रात्री शेजआरतीनंतर देवाला औषधी वनस्पतींचा वापर करून बनवलेला काढा दिला जातो. हा काढा देवळातच बनवला जातो. मला याची फारच गंमत वाटली. देव थकला आहे, मग त्याचा शिणवटा काढायला नको का? शेजघरातील काढलेला पलंग परत स्वच्छ व चकचकीत करून ठेवला जातो (चांदीचा). गादी, खोळ, पलंगपोस सर्व काही नवीन घातले जाते. शेजआरतीत काढ्याबरोबर शिरा, डाळ, खोबरं यांचाही नैवेद्य दाखवतात. आता आरती झाली की देव सुखनिद्रेसाठी शेजघरात जातात. तिथेच देवाजवळ हा काढा ठेवला जातो रात्रभर. काकडा झाल्यावर हा काढा भाविक प्राशन करतात. शिणवटा काढायचा सोहळाच असतो. प्रक्षाळपूजा झाली की दुसर्‍या दिवसापासून पंढरपुरातील चातुर्मास सुरू होतो. गावात भागवत, गाथा हे सर्व कार्यक्रम सुरू होतात. पुण्याचे भाविक माळी देवाचा व रुक्मिणीचा गाभारा रात्रीत फुलांनी सजवतात. जणू इंद्राचा दरबार, स्वर्गाचा भास होतो. मन आणि डोळे तृप्त होतात.

मला खूप कुतूहल वाटत होतं की या काढ्यात काय जिन्नस असतील. मला सगळी यादीच मिळाली. ती आपल्याला सांगते, देवाचा शिणवटा काढण्यासाठी हा काढा वापरतात तर आपणही तो का करू नये? चला करूयात.

खालील प्रमाणात मोठ्या प्रमाणात करायच्या काढ्याचे आहे. ३ ते ४ चार लिटर पाण्यासाठी…
साहित्य :
७५० ग्रॅम ते १ किलो गूळ, गवती चहा ४० काड्या, तुळस १५ काड्या, सुंठ ५०
ग्रॅम, मिरे बारीक केलेले २ चमचे, दालचिनी २ ते ३ काड्या, लवंग १०, वेलदोडे १०, काजू, बेदाणे १०, लेड पिंपळी, जायफळ १, ज्येष्ठमध ५०० ग्रॅम, बदाम, शेंदेलोण, पादेलोण, केशर, शहाजिरे, साधे जिरे, खारीक, खडीसाखर.
कृती :
क्रमांक ४ ते १२पर्यंतच्या वस्तू सगळ्या बारीक पूड करून घ्यायच्या. आधी पाणी पातेलीत उकळत ठेवायचे, मग त्यात गवती चहा, तुळस घालायची. उकळी यायला लागली की वरील जिन्नसांच्या पुड्या घालायच्या. मग गूळ, मीठ घालून एक उकळी आणायची. मग काढा गाळून प्यावा.
वर दिलेलं प्रमाण हे देवळातील मोठ्या प्रमाणातील आहे. आपण निम्मे करून हा काढा घरी करूया आणि हा काढा पिऊन आपणही रोगमुक्त व ताजेतवाने होवूया.
या लेखासाठी सर्वश्री आशुतोष बडवे आणि विवेक बडवे यांचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे. त्यांचे आभार!

Previous Post

खाता किती खाशील दो करांनी!

Next Post

नाटकाच्या कोंदणातला एकपात्री!

Next Post
नाटकाच्या कोंदणातला एकपात्री!

नाटकाच्या कोंदणातला एकपात्री!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.