
तुमचा आजचा दिवस पार वाईट्ट गेलेला असतो… आजच्या दिवसातली एकच चांगली गोष्ट तुम्हाला आठवत असते, ती म्हणजे तो दिवस आता संपत आलेला असतो…
…सकाळी सकाळीच ऑफिसला आल्यावर साहेबांनी आपल्या केबिनमध्ये बोलावून तुम्हाला क्लायंटसमोरच चांगले झापलेले असते. शेजारच्या क्युबिकलमधल्या ‘जाड चष्मेवाल्या म्हशी’ने तुमची चुगली केली असावी, याची पक्की खात्री पटलेली असते; कारण तुम्ही केबिनबाहेर येताच ती तुमच्याकडे पाहात गालातल्या गालात हसताना दिसलेली असते…
…आता दिवस संपायला आलेले असताना तुम्ही तुमची बॅग घेऊन घरचा रस्ता धरून अर्धे चालत आणि अर्धे दुडक्या चालीने पळत घरी निघालेले असता. एकतर सकाळपासून न थांबता काम करून तुम्ही अगदी थकलेले असता. उशिरा काम संपल्यामुळे घरी पोहोचायलाही उशीर होणार हे तर नक्की झालेले असते. रोजचा रस्ता सोडून तुम्ही शॉर्टकट रस्ता पकडता. थोडे अंतर चालल्यावर कोपर्यावर भजी तळण्याचा खमंग वास तुमच्या नाकात शिरतो… ‘आता एवीतेवी उशीर झालाच आहे तर काहीतरी खाऊन जाऊ’ असा विचार तुमच्या मनात येतो…
…त्या खेचून नेणार्या वासाचे उगमस्थान म्हणजे एक छोटेसे हॉटेल असते. हॉटेलच्या दारासमोरच मोठ्या कढईत बटाटे वडे तळण्याचे काम चाललेले असते. चोखंदळ गिर्हाईके गरम वड्यांसाठी हातात पैसे घेऊन आणि एक डोळा कढईवर ठेऊन रांगेत तिष्ठत उभे असतात. तुम्ही मध्येच घुसण्याचा प्रयत्न केल्यावर ते लगेच दुसर्या डोळ्याची करडी नजर तुमच्यावर रोखून नजरेनेच ‘ओय, लाईन में आजा’ असे खुणावतात. तुम्ही निमूटपणे शेवटच्या माणसाच्या मागे उभे राहता. तिथून तुम्हाला ती कढई दिसत असते. तिचा मूळ रंग कोणता असावा बरे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा तुम्ही काही वेळ प्रयत्न करता, पण ते कोडे काही तुम्हाला सुटत नाही. थोड्या जवळ पोहोचल्यावर कढईतले, वापरून काळे पडलेले, स्कूटरमधल्या इंजिन ऑईलसारखे दिसणारे पाम तेल देखील दिसू लागते…
…डॉक्टरने तुम्हाला बाहेरचे तळलेले पदार्थ खाण्यास मनाई केली आहे, हे इथे आठवते. अर्थातच त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही एक प्लेट वडे मागवता. गरमागरम वड्याची वाफ तोंडातून बाहेर येत असते. त्या भाजलेल्या जिभेवर तळलेली हिरवी मिरची अजूनच जुलूम करत असते. जिभेवरची सर्व चवीची कवाडे खाड्कन् उघडून गेलेली असतात. तुम्ही अजून दोन वडे असेच खाऊन टाकता. आता तुम्ही दिवसभराचा शीण घालवलेला असतो. पोटात भर पडल्यामुळे आता अगदी ताजेतवाने वाटत असते. मन सुद्धा हलके फुलके झाले आहे, हे तुमच्या लक्षात येते. दुसर्या दिवशी कामाचा ताण कमी असला तरी तुम्हाला सहज वडा खावासा वाटतो. मग तुम्ही दररोज असे कधी बटाटे वडे तर कधी भजी असे पदार्थ खाऊ लागता… भूक लागलेली नसताना!
आपल्या शरीराला अन्नाची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी भुकेची भावना पोटात उत्पन्न होते. पण वर दिलेल्या उदाहरणात ना भूक लागली होती ना शरीराला अन्नाची गरज होती. एका तणावपूर्ण वातावरणापासून सुटका मिळवण्याचे साधन म्हणून तुम्ही काहीतरी खाल्ले होते… आपल्या खाण्याच्या सवयींवर नजर टाकली तर आपण का खातो ह्याची वेगवेगळी कारणे दिसून येतील. ‘भूक लागली म्हणून खाणे’ हे कारण आजकाल फक्त जनावरांना लागू पडेल, अशी परिस्थिती आहे. सकाळी आपण नाश्ता करतो. सगळेच करतात म्हणून आपणही करतो. नाश्त्याला जेवणासाठी असतात त्यापेक्षा वेगळे, खास पदार्थ असतात. उदाहरणार्थ- पोहे, शिरा किंवा उपमा घ्या. हे असले पदार्थ कुणी जेवणाला खात नाहीत. शिवाय त्याबरोबर चहा किंवा कॉफी हवीच. इंग्रज लोक तर जेवण झाल्यावर सुद्धा चहा-कॉफी घेतात. आपण भारतीय लोक जेवणच असे दाबून करतो की चहा-
कॉफीसाठी रिकामी जागाच मुळी ठेवत नाही. जेवणानंतर फार फार तर पान तोंडात कोंबू. एरवी आपल्याकडे चहा-कॉफी दिवसरात्र चालू असते. ‘वेळेला’ चहा हवाच पण चहाला ‘वेळ’ नसते, हे आपलं ब्रीदवाक्य! कॉलेजमध्ये असताना मला आठवते, हॉस्टेलमध्ये असताना आम्ही रूम मेट रोज रात्री दीड वाजता
हॉस्टेलबाहेरच्या टपरीवर जाऊन चहा पित असू आणि परत येऊन लगेचच झोपत असू. चहा प्यायल्यावर झोप उडते म्हणे! आम्ही तर लहान बाळ आईचे दूध पिऊन गाढ झोपी जाते, तसे गाढ झोपी जात असू चहा प्यायल्यावर. त्रास शारीरिक असो किंवा मानसिक, दोन्हीवर पक्का इलाज म्हणजे चहा पिणे. गरीब असो किंवा श्रीमंत, चहा सर्वांना एकाच समान धाग्यात गुंफवून टाकणारा मजबूत दुवा आहे.
मनुष्यप्राण्याचे खाण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे खाण्याचे पदार्थ सहज उपलब्ध असणे. पूर्वीच्या काळी काही मोजक्या मिठाया आणि चणे कुरमुरे सोडले तर फारसे पदार्थ मिळतच नसत. आतासारखी गल्लोगल्ली हॉटेलं आणि रस्त्याकडेला शंभर सव्वाशे मीटरवर धाबे दिसत नसत. आता फोनवर एका क्लिकवर हवी ती डिश हातात मिळवता येते, ती पण काही मिनिटांत. पूर्वी कितीही इच्छा झाली तरी अनेक पदार्थ स्वतः बनवून खाण्याशिवाय पर्याय नसायचा. आता खाण्यापिण्याचे एवढे पर्याय समोर मांडून ठेवलेत की ‘किती खाशील दो करांनी (आणि ऑफ कोर्स एका तोंडाने)’ अशी मनुष्याची अवस्था व्हावी! चॉकलेट-बिस्किटे तर देशी कमी आणि विदेशी जास्त मिळतात.
साध्या गोष्टींना उगाचच खोट्या प्रतिष्ठेच्या आणि गुंतागुंतीच्या करून सोडायची मनुष्याची सवय आहे. एका जागेवरून दुसर्या जागेवर जाण्यासाठी वाहनांचा शोध त्याने लावला. मग गप्प त्यात बसून त्याने दुसर्या जागेवर जावे की नाही? छे! तसे झाले तर माणसात आणि जनावरात काय फरक राहिला? त्या वाहनांची कधी सुरक्षा, तर कधी सुविधा कमीजास्त करून त्यांची किंमत वाढवली. ती महागडी वाहने घेणे म्हणजे प्रतिष्ठेची बाब बनवून टाकली. कपड्यांचे आणि राहणीमानाचे नवीन निकष बनवले. उन्हापावसांपासून आणि चोर-चिलटांपासून संरक्षण व्हावे ह्या मूळ उद्देशाने बांधलेल्या घरांची स्थानाप्रमाणे किंमत ठरवून घराला ‘मालमत्ता’ करून टाकले. ह्याच धर्तीवर खाण्याचे पदार्थ सुद्धा खोट्या प्रतिष्ठेच्या आवरणात बांधून टाकले. झुणका भाकर ही गरिबांची मेजवानी, तर पिझ्झा-बर्गर हे श्रीमंतांचे खाणे. झुणका-भाकरीत भले पोषण मूल्ये जास्त असतील, पण ते खाणे कमीपणाचे आणि बर्गरसारखे कदान्न खाणे मात्र प्रतिष्ठितपणाचे? रस्त्याकडेच्या टपरीवर मिळणारी कॉफी एखाद्या कॉफी शॉपमध्ये सहज दहा ते वीस पट जास्त किंमतीला विकली जाते. प्रतिष्ठा हवी असेल तर पैसे मोजा.
हल्ली बाहेरचं मागवून घरी खायचं ही फॅशन आहे. हॉटेलमध्ये पण तरुण मुलेमुली पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक मागवतात. साधे पाणी पिणे म्हणजे गावठीपणाचे लक्षण समजतात. अगदीच नाईलाज झाल्यास प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पॅक बंद पाणी मागवतात. एका पिझ्झाच्या किंमतीत चारवेळा घरचे सुग्रास आणि पौष्टिक जेवण खायला मिळेल, हे काही त्यांच्या लक्षात येत नाही. मैद्यासह चीजसारखे चिकट पदार्थ आतड्यांना चिकटून पोट बिघडवतात. मग हे डॉक्टरकडे जायला मोकळे. चायनीज नावाने विकले जाणारे चमचमीत मसालेदार पदार्थ अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात. व्यसन लागल्यासारखी ह्या पदार्थांची चटक लागते. भूक असो वा नसो, समोर असे पदार्थ दिसले की त्याचा फडशा पाडायचाच.
तुम्हाला शेवटची कडकडून भूक कधी लागली होती, ते आठवते? बर्याच जणांना आठवत नाही. कारण अशी भूक लागेपर्यंत ते कधी थांबलेलेच नसतात. सतत त्यांचे तोंड चालूच असते. वेळीअवेळी जे मिळेल ते तोंडात आणि पोटात जात असते. मग ते मानसिक कारण असो, नाही तर अजून काही! काहीही सेलिब्रेशन असले की ते काहीतरी खाल्ल्याशिवाय साजरे होत नसते. खाणेपिणे हे सेलिब्रेशन करण्याचे साधन बनवले गेले आहे. भूक असो वा नसो, फुकट गिळायला मिळाल्यावर कोण चान्स सोडेल? म्हणजे खाण्यामागचा मूळ उद्देश मैलभर मागे पडला. जिभेवर ताबा नसल्यामुळे आपण काहीही कचरा पोटात ढकलतो आणि आरोग्याची वाट लावून घेत असतो.
तुमच्या ओळखीतल्या काही व्यक्तींना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून लोकांना खाऊ घालण्यात समाधान वाटत असेल. लहान मुलासाठी त्याची सर्वात प्रिय व्यक्ती ही त्याची आईच असते. आईच लेकरांना मायेने खाऊ घालत असते. चांगलेचुंगले खाऊ घालणारी व्यक्ती म्हणजे आपल्या आवडीची आणि आपल्यावर प्रेम करणारीच असते, असे समीकरण मुलाच्या मनात खोलवर कुठेतरी रुजलेले असते. त्यामुळे तेही मोठेपणी दुसर्याला खाऊ घालून सुप्तपणे प्रेम दर्शवायला शिकतात.
मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे जो खाण्याच्या पदार्थांचे इतके वैविध्य असताना सुद्धा अजून अखाद्य समजल्या जाणार्या गोष्टीही खात असतो. कुठे कुणाची तरी बायको नवर्याचे डोके खात असते. वात्रट पोरे पालकांचा मार खात असतात. बीचवर टुरिस्ट ऊन खात पडलेले असतात, तर कुणी मंत्री पैसे खाण्यात मश्गूल असतो. कुठे कुणी सडकछाप रोमिओ कुणा सुंदरीच्या चपलांचा प्रसाद खात असतो, तर कुणी नुसता टाईमपास म्हणून गुटखा खात बसतो.
आता हे वाचून संपलेच आहे, तर तुम्ही पण निवांत हवा खात पडा!

