
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर वेगाने वाढणार्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत एक बदल शांतपणे घडत आहे. तो फारसा कोणाच्या लक्षात येत नाही, कारण तो रस्त्यावर दिसत नाही, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतही रोज येत नाही. पण हा बदल निसर्गाच्या दृष्टीने खूप मोठा आहे. आपल्या आजूबाजूला दिसणारे अनेक कीटक हळूहळू कमी होत आहेत. एकेकाळी पावसाळ्याच्या संध्याकाळी काजव्यांची चमक दिसायची. सकाळी फुलांवर मधमाश्यांची गुणगुण ऐकू यायची. बागांमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे सहज दिसायची. पावसाळ्यात
ड्रॅगनफ्लायचे थवे हवेत फिरताना दिसायचे. आज हे सारे अनुभव दुर्मिळ होत चालले आहेत.
कीटकांचा विचार आपण अनेकदा फक्त त्रासदायक जीव म्हणून करतो. डास, माशा, झुरळे किंवा पिकांचे नुकसान करणारे काही कीटक एवढीच त्यांची ओळख आपल्याकडे तयार झाली आहे. प्रत्यक्षात पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यात कीटकांचे योगदान अमूल्य आहे. पृथ्वीवरील ज्ञात प्रजातींपैकी सर्वाधिक प्रजाती या कीटकांच्या आहेत. लाखो वर्षांपासून ते निसर्गाचे चक्र सुरळीत चालवत आहेत. फुलांचे परागीभवन, मातीची सुपीकता, सेंद्रिय पदार्थांचे विघटन, पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी अन्न, जैवविविधतेचा समतोल या प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग आहे.
शहरांमध्ये वाढत चाललेले काँक्रीटीकरण हा या बदलामागील सर्वात मोठा घटक आहे. मोकळी जमीन झपाट्याने नाहीशी होत आहे. प्रत्येक रिकाम्या जागेवर इमारत, पार्किंग, रस्ता किंवा व्यापारी संकुल उभे राहत आहे. पूर्वी जिथे गवत, झुडपे, रानफुले, ओलसर माती आणि पाणथळ जागा होत्या, तिथे आज सिमेंट आणि डांबर पसरले आहे. कीटकांना जगण्यासाठी लागणारा अधिवास अशा प्रकारे संपत चालला आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये बागा तयार केल्या जातात, पण त्या अनेकदा सजावटीच्या स्वरूपाच्या असतात. परदेशी शोभेच्या वनस्पती लावल्या जातात. स्थानिक फुलझाडे, रानफुले आणि नैसर्गिक वनस्पती कमी झाल्यामुळे अनेक परागीभवन करणार्या कीटकांना अन्नच मिळत नाही. बागा सुंदर दिसतात, पण त्या अनेक कीटकांसाठी उपयुक्त राहत नाहीत.

रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर हे आणखी एक मोठे कारण आहे. शेतीपुरतेच नव्हे तर घरांच्या परिसरात, सोसायट्यांमध्ये, बागांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीही कीटकनाशकांची फवारणी केली जाते. एका हानीकारक कीटकाबरोबर अनेक उपयुक्त कीटकही त्यात नष्ट होतात. मधमाश्या, फुलपाखरे आणि इतर परागीभवन करणार्या प्रजाती याचा मोठा फटका सहन करत आहेत.
हवामान बदलाचाही परिणाम आता स्पष्ट दिसू लागला आहे. तापमान वाढत आहे. पावसाचे स्वरूप बदलले आहे. काही वेळा अतिवृष्टी, तर काही काळ पूर्ण कोरडे वातावरण अशी परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक कीटकांचे जीवनचक्र विशिष्ट तापमान आणि ऋतूंवर अवलंबून असते. हवामानातील बदलामुळे त्यांच्या प्रजननावर, अन्नाच्या उपलब्धतेवर आणि जगण्यावर परिणाम होत आहे. हवामान बदलाची वारंवारता कीटकांच्या अनुकूलन क्षमतेच्या कित्येक पट अधिक असल्याने अनेक कीटकांच्या प्रजाती जगण्याच्या स्पर्धेत अपयशी ठरू लागल्या आहेत.
रात्रीचा वाढलेला कृत्रिम प्रकाशही कीटकांसाठी मोठे संकट ठरत आहे. शहरांमध्ये रस्ते, इमारती, जाहिराती, मॉल आणि इतर ठिकाणी रात्रभर तेजस्वी दिवे सुरू असतात. अनेक कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांचे नैसर्गिक वर्तन बदलते. प्रजननात अडथळे निर्माण होतात. अनेक कीटक थकून मरतात किंवा शिकार्यांच्या सहज तावडीत सापडतात. काजवे तर प्रकाश प्रदूषणामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या प्रजातींपैकी एक मानले जातात. ध्वनीप्रदूषणाचाही परिणाम दुर्लक्षित करता येणार नाही. सततचा वाहनांचा आवाज, बांधकामे आणि यंत्रांचा गोंगाट यामुळे अनेक लहान जीवांच्या हालचाली आणि वर्तनावर परिणाम होतो. निसर्गातील शांतता कमी होत गेली की अनेक प्रजाती त्या भागातून कायमच्या नाहीशा होतात.
कीटक कमी होण्याचा परिणाम फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहत नाही. त्यावर संपूर्ण अन्नसाखळी उभी आहे. अनेक पक्षी आपल्या पिलांना कीटक खाऊ घालतात. बेडूक, सरडे, कोळी आणि इतर असंख्य जीव कीटकांवर अवलंबून असतात. कीटक कमी झाले की त्यांच्या संख्येवरही परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण पर्यावरणीय समतोल बिघडतो. जगातील अनेक पिकांचे उत्पादन परागीभवनावर अवलंबून आहे. मधमाश्या आणि इतर परागीभवन करणारे कीटक नसतील तर अनेक फळे, भाज्या आणि बियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे अन्नसुरक्षेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही, तर अर्थव्यवस्था, शेती आणि मानवी जीवनाशी जोडलेला आहे.
लहान मुलांचे बालपणही बदलत आहे. पूर्वी फुलपाखरांमागे धावणारी, काजवे पकडण्याचा आनंद घेणारी, मुंग्यांच्या रांगा पाहणारी मुले आज मोबाईलच्या पडद्यावर अधिक वेळ घालवत आहेत. त्यात निसर्गापासून वाढत चाललेले अंतरही कारणीभूत आहे. जे दिसत नाही त्याची काळजी घेण्याची भावना पुढच्या पिढीत कशी निर्माण होणार हा प्रश्न आहे.
शहरांचा विकास आवश्यक आहे. पण विकासाचा अर्थ प्रत्येक मोकळ्या जागेवर काँक्रीट टाकणे असा नसावा. प्रत्येक विकास प्रकल्पात स्थानिक जैवविविधतेचा विचार होणे आवश्यक आहे. मोठ्या वृक्षांबरोबर झुडपे, रानफुले, ओलसर पट्टे, पाणथळ जागा आणि नैसर्गिक वनस्पतींसाठीही जागा राखून ठेवणे गरजेचे आहे. याच ठिकाणी असंख्य कीटकांचे जीवन दडलेले असते. आपल्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा छोट्याशा अंगणातही स्थानिक फुलझाडे लावली तर अनेक फुलपाखरे आणि मधमाश्या पुन्हा आकर्षित होऊ शकतात. रासायनिक फवारणी टाळणे, अनावश्यक दिवे बंद ठेवणे, छोट्या हिरव्या जागा जपणे आणि स्थानिक वनस्पती वाढवणे अशा छोट्या कृतीही मोठा बदल घडवू शकतात.

महापालिका, नगररचना तज्ज्ञ आणि विकास प्रकल्प राबवणार्या संस्थांनीही आता फक्त झाडांची संख्या मोजण्यापलीकडे जाऊन कीटकांच्या अधिवासाचा विचार करणे आवश्यक आहे. जैवविविधतेचा अर्थ केवळ मोठी झाडे किंवा पक्षी नाहीत. अगदी छोट्या जीवांशिवायही निसर्ग अपूर्ण आहे. आज आपण हवामान बदल, वाढते तापमान, पूर, दुष्काळ आणि अन्नसुरक्षा यावर चर्चा करतो. पण या सर्व प्रश्नांच्या मुळाशी असलेल्या लहान जीवांकडे फारसे लक्ष देत नाही. कीटक नाहीसे होत असतील तर तो निसर्गाचा इशारा आहे. तो वेळेत समजून घेतला नाही तर त्याची किंमत पुढच्या पिढ्यांना मोजावी लागू शकते.
कीटक दिसायला लहान असले तरी त्यांचे काम विशाल आहे. ते निसर्गाचे अदृश्य कामगार आहेत. त्यांचे अस्तित्व टिकले तरच फुले उमलतील, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल, शेती फुलेल आणि पर्यावरणाचा समतोल कायम राहील. त्यांच्या अनुपस्थितीत निर्माण होणारी पोकळी भरून काढणे माणसाच्या हातात नाही. म्हणूनच कीटकांचे संवर्धन ही केवळ पर्यावरणाची चळवळ नसून मानवाच्या भविष्यासाठीची गरज आहे.
मानवी जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने…
कीटकांची संख्या कमी होणे हा केवळ एखाद्या प्रजातीचा प्रश्न नसून संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेला एक गंभीर इशारा आहे. मधमाश्या, फुलपाखरे, भुंगे, काजवे, चतुर-टाचण्या आणि इतर असंख्य कीटक हे निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. फुलांचे परागीभवन, सेंद्रिय पदार्थांचे विघटन, मातीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि अनेक पक्षी, मासे, उभयचर तसेच सरपटणार्या प्राण्यांसाठी अन्न उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे हे लहान जीव सातत्याने करत असतात.
मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या वेगाने वाढणार्या शहरांमध्ये काँक्रीटीकरण, मोकळ्या जागा व पाणथळी नष्ट होणे, स्थानिक वनस्पतींचा र्हास, रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर, रात्रीचे प्रकाशप्रदूषण आणि हवामान बदल यांचा एकत्रित परिणाम कीटकांवर होत आहे. त्यामुळे अनेक भागांत पूर्वी सहज दिसणार्या प्रजाती आता क्वचितच दिसतात. हा बदल भविष्यात शेती, जैवविविधता आणि अन्नसुरक्षेवरही परिणाम करू शकतो.
पर्यावरण संवर्धनाचा विचार करताना केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित राहून चालणार नाही. शहरांमधील उद्याने आणि मोकळ्या जागांचे नियोजन करताना जैवविविधतेला पोषक रचना असणे गरजेचे आहे. नागरिकांनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. कीटकांचे संरक्षण म्हणजे केवळ एका लहान जीवाचे संरक्षण नसून संपूर्ण पर्यावरण, शेती आणि मानवी जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
डॉ. दत्तप्रसाद सावंत (पर्यावरण तज्ज्ञ महाराष्ट्र)

