• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डीप स्टेट

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

Marmik Team by Marmik Team
July 31, 2026
in भाष्य, विनोदी लेख, विशेष लेख
0
डीप स्टेट

अध्वर्यू आणि नमित दोघेही मोर्च्यातून परतले. चेहर्‍यावर आंदोलन यशस्वीतेचं समाधान आहे. ते नमितच्या दारासमोर पोहचले कुठे नाही तर सळसळ पहाळे आले. तसे दोघेही नम्यानं ओट्यावर टाकलेल्या पडवीत आले.

‘बरं झालं. इथंवर येईपर्यंत थेंब नाही आले.’ अर्ध्याला न भिजल्याचं समाधान.
‘ह्या दोनचार शितोड्याने भिजलो असतो काय? हे वरवरचं आहे!’ नम्यानं मात्र त्या पडणार्‍या धारा किरकोळीत धरल्या.
‘पण तुला इथूनच पेट्रोल टाकून घ्यायला काय झालं होतं? तिथं बरं वेळेवर त्या पोरांनी मदत केली. नाहीतर दोन किलोमीटर पंपापर्यंत गाडी लोटीत न्यावी लागली असती. आधीच मोर्च्यात फिरून तंगडे दुखले त्यात एवढं चालायचं म्हणजे कुटकेच पडले असते.’ अर्ध्याची तणतण.

‘मी असल्यावर कुणी पण वेळेवर उभं रहातं! शेवट आपण कोणे?’ नम्यानं कॉलर उडवली.
‘सीआयएचे एजंट! मी कन्फर्म सांगतो ना? फुकट कोणी फंडिंग करील का?’ टीव्हीच्या वाढलेल्या आवाजाच्या मध्ये मोठ्याने बोलणारा एक आवाज आतून आला. तशे दोघं चमकले. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. कोण असंल? खाणाखुणा झाल्या. तसं नम्यानं दारातून घरात डोकावून पाह्यलं.

‘लास्टप्रथम व्हाट्सअप ग्रुपची मंडळी जमलीत आत. त्यांचं बोलणं चालुय.’ नम्या हसून अर्ध्याला सांगायला लागला.
‘हे खरंय म्हणजे? आमच्या कळीरामनं चारशे सव्वीस पानांचं कात्रण तयार केलंय. मलूल भारतमधील लेखांचं! भरभक्कम ठोस पुरावे आहेत ते! पण तो मेला नतद्रष्ट न्यायाधीश म्हणतो, असे कागद पुरावा समजणे चूक आहे.’ मधून दुसरा आवाज आला.
‘यायला मधी फार जोराची चर्चा चालुय तर?’ अर्ध्या हसला.
‘सगळे व्हाट्सअप विद्यार्थी! जेवढं ताटात पडंल, तेवढं निमूट खातात. इकडं तिकडं बघत पण नाही. अगदी झापडबंद बिचारे!’ नम्या मात्र हळहळला.

‘पण पोरं मात्र नुसत्या इंस्टावरच्या कॉलनं क्षणात जमा झालीत. अगदी शिस्तबद्ध. सगळं कसं आखीव रेखीव झालं.’ अर्ध्या मात्र आंदोलनाच्या आठवणीत रमला.
नम्याला पण कंठ फुटला. ‘जमलेली गर्दी, त्यातील सुसूत्रता, क्रिएटिव्हिटी असं सगळं पाहिलं का वाटतं…’
‘कन्फर्म चीन! त्याशिवाय का ही लाल माकडं उड्या हाणताय?’ मधला दुसरा आवाज मोठा झाला.
‘यायला चॅनेल बदलला का ब्रँड?’ अर्ध्या खळखळून हसला.
‘बरं ही मंडळी चीनच्या नावानं शिमगा करतेय, आणि महामानव मात्र नाव घ्यायला लाजतात की घाबरतात, काय माहीत?’ नम्यानं आतल्या म्हातार्‍यांची नस धरली.
‘हा बघ ना व्हिडीओ आलाय, इंस्टावर. घेराव घालायला गेलेल्या पोरांचा! पोलीस कसे घाबरले. मधली मंडळी कशी पळाली. सगळं आहे त्यात.’ अर्ध्या मोबाईल नम्याला दाखवू लागला.
नम्यानं डोकं खाजवलं आणि काही आठवत बोलू लागला, ‘अरे हे तर सेम… ह्याच्यासारखा! आपलं… हे नाही का?’
‘बांगलादेश पॅटर्न आहे हा! तिथल्या महाभागांनी सरळ पाठिंबा दिलाय. माझा पहिल्या दिवसापासून संशय आहेच!’ आतून तिसरा आवाज आला.
‘अरे हो रे! श्रीलंका, बांग्ला आणि नेपाळ. सगळा सेम पॅटर्न आहे रे! फार फार मोठा कट असेल हां!’ पहिल्या आवाजानं त्या आवाजाला साथ दिली.
आता मात्र बाहेर दोघांनी डोक्याला हाथ मारला.
‘काय करावं रे यांचं?’ अर्ध्यानं विचारलं.
‘आता काय अर्ध्या गोवर्‍या पोहोचल्या…’ नम्यानं नाईलाजाने काही वाक्यं वापरली.
‘अरे आपलीच माणसं ती! फक्त झापड आहे रे! भक्तीचं!’ अर्ध्या बोलला.
‘अरे भक्ती पण आली होती रे! चांगले पोस्टर होते हातात तिच्या! क्लास!’ नम्याला वेगळीच आठवण!
‘हां तुला तीच आवडते तेव्हा…’ अर्ध्या भस्कन काही बोलून गेला.
‘ए गपंय! माहा बाप मधी बशेले! उगच कश्याला आग लावतो. हे आधीच मधी बोंबाबोंब चालुय!’ नम्या नुसत्या उल्लेखानं भिला.
‘काय उपोषण करणारे का?’ अर्ध्यानं डिवचलं.
‘माला उपोषणाला बसवतील ते!’ इति घाबरलेला नम्या!
‘मग बस की! भक्ती मिळवायला!’ अर्ध्यानं चिडवलं.
‘इथं विषय काय…’ नम्या बोलता बोलता समोरच्या रस्त्यावरून जाणार्‍या पोरांच्या परतीच्या गाड्यांना हात करू लागला. ते बघून अर्ध्या पण समोर आला. पोरांना बघून दोघं हात हलवू लागले.
‘किती गाड्या भरून पोरं आले होते नाही?’ अर्ध्या नवलाने विचारू लागला.
‘बाबा, तुला माहीत नाही.’ एकदम नम्या आवाज बदलून बोलू लागला.
‘काय?’ अधीर अर्ध्यानं विचारलं.
‘त्यामागं सीआयएचं फंडिंग होतं.’ नम्यानं टोमणा मारला तसे दोघं पोट धरून हसू लागले. त्यात आवाज दारातून आत घरात जाणार नाही याची काळजी घेऊ लागले.
‘पण पोरांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे…’ अर्ध्यानं आंदोलनाची आठवण काढली.
‘हो, ते आहेच.’ नम्या.
‘एवढ्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या. डोकी फोडून घेतलीत, हात पाय मोडलेत. तरी पोरं हटायला तयार नाहीत. मानलं पाहिजे यार!’ अर्ध्या भारावला.
‘जो व्यवस्थेला भिडू शकतो तोच तरुण म्हणायचा!!’ नम्या.
‘पण त्या पोरीनं गाडी कशी थांबवली नाही? आणि ती पोरं? सरळ उभी राहिली. करा, करायचं ते! सॉल्लिड यार!’ अर्ध्या थकत नाही.
नम्या मान डोलवत बोलू लागला. ‘त्या पोरांचं मॉरल हाय असेल, त्यात स्पाईन! त्यात त्यांचं…’
‘ट्रेनिंग पाकिस्तान्यांकडून झालं असेल. हेच म्हणत होतो मी! हे काय? तेच दाखवताय चॅनेलवर!’ चौथा आवाज आला मधून!
‘कसली किंचाळताय ही?’ अर्ध्या आवाजानं दचकलाच.
‘तिकडं बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर तुटायच्या मार्गावर आहे, त्यामुळं हे असले उद्योग चालू केलेत त्यांनी! बाकी काही नाही!’ आतला दुसरा आवाज वाढला.
‘काही नाही रे! मी तर म्हणतो सरळ चीनसारखं लष्कर बोलावून चिरडून टाकावं ह्यांना! होऊ दे साला तिआनमेन!’ तिसर्‍या आवाजाने मार्ग सुचवला.
‘नाही तर काय? कुणी मुघल इतिहास समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करतं का?’ पहिल्या आवाजाची आणखी शंका!
‘आता त्यांना बॉर्डर पलीकडून आदेश असेल, तसाच पाळावा लागेल ना?’ दुसर्‍यानं त्यात भर घातली.
‘काही विदेशी ट्विटर , इंस्टा हँडल पोलिसांनी भारतात बंद केली. मी तर म्हणतो. त्या बातम्या देणारी चॅनेल्स सुद्धा बंद करायला पाहिजे.’ चौथा आवाज.
अर्ध्या आणि नम्या दोघं आता कान देऊन ऐकायला लागली.
‘मी तर म्हणतो, ही फार झालं तर दोनचार कारटी आहेत. यांना आणि यांच्या आईबापाला रस्त्यात घेऊन वाजवले पाहिजे. आपल्याला विश्वगुरू बनायचं आहे, तर यांची काय थेरं चाललीत?’ तिसरा आवाज पोटतिडकीने बोलू लागला.
‘हो, ना! देशाची किती बदनामी करताय ही पोरं? एकदोन काही वेडंवाकडं बोलतं आणि बाकीचे त्यांच्यामागे पळता. हे बरं नाही!’ दुसरा आवाज हळहळला.
‘ह्या पोरांची आणि त्यांच्या पालकांची बौद्धिकं घेतली पाहिजेत!’ पहिल्या आवाजाने प्रस्ताव मांडला.
‘त्यांना आपल्या ग्रुपात अ‍ॅड करून घ्यायला हवं. लास्टप्रथम! इथले लेख वाचले की ते ताळ्यावर येतील.’ चौथ्याने उपसूचना केली.
‘बघा, हेच बघायचं बाकी होतं. डीप स्टेट एजंट! हेच म्हणत होतो मी! बघा श्शी न्यूज वाल्यांनी शोधलंच त्यांना! अशी पत्रकारिता पाहिजे. अवघ्या दोन दिवसांत स्टुडिओत बसून त्यांनी तपास केला. हे सोप्पंय का?’ तिसर्‍याने शाबासकी दिली, बोलक्या
चॅनेलला!
‘मग आपण दर दोन दिवसाला एक एक शाळा-कॉलेज फिरून येऊ या! ही मुलं जी देशविघातक शक्तींना बळी पडताय. यांना आणि यांच्या पालकांना समजावून सांगत जाऊ. जी ऐकण्यापलीकडे असतील त्यांची पोलिसांत तक्रार करू. काय?’ चौथ्याने एकमताने नियम संमत केला. बाकीच्यांनी मूकपणे अनुमोदन दिलं.
‘सोबत आपल्या काठ्या असू देत! ऐकलं तर ठीक, नाहीतर जागेवर दंड!’ दुसर्‍यानं उपनियम जोडला.
‘सुरुवात..?’ पहिल्यानं बोलायचा प्रयत्न केला कुठे नाही तर अर्ध्या आणि नम्या आत शिरले.
‘आमच्यापासून करा.’ नम्यानं पुढाकार घेतला.
‘हे बघा, सकाळी पेट्रोल संपलं पण E२० एक मित्रानं आणून दिलं. मला वाटलं तो बेकार असेल. पण तुम्ही म्हणताय म्हणजे तो सीआयएचा एजंट असेल हो!’ अर्ध्या पण सामील झाला.
‘त्या एकदोन पोरी भारी इनोव्हेटिव्ह स्लोगन लिहून आल्या होत्या, पण फक्त उत्तरेकडे राहतात एवढीच माहिती होती. त्या थेट चीनशी कनेक्टेड आहेत, हे आताच कळालं!’ नम्यानं आघाडी सांभाळली.
‘काय पाकिस्तान? अरे संपत आलाय हो तो देश! उरलं त्यांचं लष्कर! कुठे त्यांना कसलंही श्रेय-अपश्रेय देताय?’ अर्ध्यानं सालं काढली.
‘आणि हे तुमचे ग्रुप आता तरी मोडा हो! निदान खोटं लिहिताना देखील ते क्षणात पलट्या मारत राहतात. आणि झोडपायची सुरुवात घरापासून करा, तुमच्या अंधभक्तीमुळे आम्ही आणि आमची पिढी डोळस जन्माला आली. खरंय ना?’ नम्यानं मुळावर घाव घातला.
आतील नम्याची काका मंडळी क्षणात गप्प झाली.

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

किती काळ ‘बुमरा’वलंबी राहणार?

Next Post
किती काळ ‘बुमरा’वलंबी राहणार?

किती काळ ‘बुमरा’वलंबी राहणार?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.