
‘बाई मी विकत घेतला राम!..’ गाणं मोठ्यानं वाजतंय. सकाळी कुणी देवाची गाणी लावलीत? काही जवळपास कुठे कार्यक्रम? गल्लीतले पोरं पण काही बोलले नाहीत नि घरात देखील कुठल्या धार्मिक कार्यक्रमाची वर्गणी मागायला कुणी आलेलं नाही ना आमंत्रण आलेलं. अर्ध्यानं घड्याळ बघितलं. अजून सकाळच आहे. मग असो. बाहेर पडल्यावर कळेलच. पण बाहेर जायच्या आत गाणं बंद पण झालं. आणि आवाजही येईनासा झाला.
अर्ध्या दोन घास खाऊन बाहेर निघाला.
‘येताना गिरणीतून दळण आण, अर्ध्या! नीट बघून आण, मागल्या वेळी आपला डबा देयेल होता तर तू गोणी आणली होती.’ घरातून बाहेर पडायच्या आत म्हातारीनं फर्मान सोडलं. हिचं हेच पटत नाही त्याला. तरुण पोरगा बाहेर चालला तर त्याला दळण-बिळण सांगायचं आणि जरा बरे घातलेले कपडे ढवळे-फट्टक करायचे याला काय अर्थय? त्यानं नाकतोंड मोडलं. पण नाही म्हणावा तर रातच्या भाकरीची पंचाईत! म्हातारी दारातच धोपटणं घेऊन उभी राहायची! नकोच!
‘हा आणतो! दरवेळी मला काय सांगती गं?’ अर्ध्यानं होकार दिला, पण भुणभुण पण केलीच!
‘मग काय गावच्या लोकांयला सांगू? गावभर उंडारण्यापेक्षा घरची कामं करीत जा! वेळेवर लग्न झालं असतं, तर दोन पोरांचा बाप झाला असता, जबाबदारी अंगावर आली असती. मग कळलं असतं घर…’ म्हातारीनं तोंडाचा पट्टा चालू केला.
‘पहाय ना मग एखादी बया माह्यासाठी! मग बसतो घरात भाकरी थापायला!’ अर्ध्यानं आईच्याच आवाजाची नक्कल करत मस्करी केली.
‘मुडद्या तव्हा शिकायचं ना नीट! चारदोन बुकं धड शिकला असता, इंजिनेअर काही झाला असता. पोरीच्या लायनी लागल्या असत्या…’ म्हातारी आणखीच खवळली.
आता तिला काय सांगावं? इंजिनिअर इथं थप्पीला पडलेत म्हणून! अर्ध्यानं वातावरण बिघडायच्या आत काढता पाय घेतला. बरं बाहेर ह्या वेळी भांडे घासणारी शेजारची वहिनी घरात पोरांना शाळेत पाठवायच्या गरबडीत घरात आहे वाटतं. नाहीतर दोन भोंगे एकत्र होऊन अर्ध्याच्या कानठळ्या बसल्या असत्या.
अर्ध्या खाली रस्त्यावर आला कुठं नाही, पुढं नम्या उभा!
‘चाल.’ त्याच्या आदेशावर अर्ध्या गपगुमान त्याच्या मोटारसायकलवर बसला. गाडी निघाली ती पोहोचली फोटो स्टुडिओबाहेर. नगरपालिका शेजारी.
‘इथं काय? फोटो काढू राहिला का?’ अर्ध्यानं नम्याला विचारलं.
‘येडा आहे का? मोबाईल कश्याला आहे माह्याकडं? त्याच्यात फिल्टर लावलं तर अशे फोटो येत्या का, ते ह्याला काय जमंल?’ अर्ध्याला पायरीवरचं उत्तर मिळालं.
‘मग त्याला तेचे फोटो काढून देतो का?’ अर्ध्या हार मानील होय?
‘पह्यले तुझा काढतो चल आत!’ नम्या आत घुसला, पाठोपाठ अर्ध्या गेला.
‘मग रमेश शेठ काय चालुय?’ नम्यानं काउंटरवर बसलेल्या रमेशचं ध्यान वळवलं.
‘काय चालणार आहे? ह्या वर्षी लगीनसराई स्लॅक गेली. फायद्याचा रुपडा मिळाला नाही. तवा बशेले माश्या मारत. पण तू का आला?’ रमेशनं अर्ध्याच्या मनातला प्रश्न विचारला.
‘हे बायोडाटा बनवून पाहिजे होता…’ नम्या अडखळत बोलला.
‘मला सांगायचं मी बनवून दिला असता!’ अर्ध्यानं मधीच तोंड मारलं.
‘काय लग्नासाठी पाहिजे का?’ रमेशनं दुखरी नस धरली.
‘हा एक पोरींवाले नानांना म्हणले, पाठवा बायोडाटा. मग ठरवू! म्हणून मग आलो. म्हंटलं तुझ्यापेक्षा भारी कोण बनवतं?’ नम्यानं स्तुतीचे दोन फुलं रमेशच्या डोईवर चढवले.
‘एवढ्या एवढ्यासाठी इथंवर आला तू? मला सांगायचं मी म्हणलं ना? मी याच्यापेक्षा चांगलं बनवून दिलं असतं… ते बी फुकटात!’ अर्ध्याला गप्प राहवतं कुठं?
‘तुला जर एवढे भारी बायोडेटा बनवता आले असते तर तुझे दहा लग्न झाले असते. बस गप्प!’ नम्यानं अर्ध्याचा चांगला अपमान केला. अर्ध्या त्यानं गप्प झाला. रमेश फक्त गालातल्या गालात हसला.
‘पण सगळी डिटेल्स आणली का? देऊक, कुळबीळ सगळं?’ रमेशनं कामाकडं लक्ष वळवलं.
‘हे काय? मी खिश्यातच घेऊन फिरतो, बायोडाटा!’ नम्यानं खिश्यातून एक कागद काढला अन् रमेशला दिला.
‘फोटो आणले का पण?’ अर्ध्यानं शांतपणे विचारलं.
‘हां ते लागतील बरं का भौ! अशे त्याच्यात टाकतो ना? कुणी नाही म्हणायचंच नाही.’ रमेशनं स्वतःची फुशारकी झोडली.
‘आणेल होते वाटतं..! यायला फोनमधले चालतील का?’ नम्या आणायला विसरला वाटतं. तो अजून पण खिसे चाचपून बघतोय.
‘चालतील ना! दे! व्हाट्सअपला पाठव मला.’ रमेश लागला तोंडापुढल्या कम्प्युटरचे बटणं दाबायला. दाणदाण!
‘आज नगरपालिका बंद दिसती ना?’ मोकळं बसंल तो अर्ध्या कसला?
‘तुला काय पंचाईती?’ नम्या कावला.
‘अरे एवढ्यात सुतक चालू असल्यावानी गायब आहे सगळे. कोणी दिसत नाही.’ रमेशनं माहिती दिली.
‘अरे मागल्या हप्त्यात तर पावसाळ्यापूर्वीचे काम करायला निघाले होते ना? नगराध्यक्ष न् नगरसेवक?’ आता प्रश्न नम्याला पडला.
‘पाऊस न पडताच वाहून गेले का काय मग?’ अर्ध्या एकटाच हसला.
‘अरे ते निवडणूक आहे ना? स्थानिक का काय आमदारांची? त्यासाठी कुठं गेले म्हणी सगळे.’ रमेश काम करता करता माहिती देऊ लागला.
‘कुठं गेले?’ नम्यानं खोदून विचारलं.
‘ते उमेदवारानं त्यांना हाटेलीत निलं! हप्ताभर मस्त मजा!’ रमेशनं माहिती दिली.
‘आयला आपलं मतदान राहतं तव्हा एक-दोन हिरवे गांधी देऊन आपली बोळवण करत्या. अन् ह्या बुजगावण्यांना पार हॉटेलचा खर्च? बाब्बो! अवघडै.’ नम्याला नवल वाटलं.
‘पण त्यांच्या पार्टीचा उमेदवार नाहीय ना इलेक्शनमधी?’ अर्ध्यानं खात्री करायला शंका विचारली.
‘असू दे की! पण विरोधातला आहे ना? त्यानंच निलं ट्रॅव्हल बुक करून!’ रमेशनं नवीन माहिती दिली.
‘पण ते तर कट्टर होते ना? त्यांच्या पक्षाचे?’ अर्ध्याला खुदबुद आहेच अजून.
‘कसंय अध्वर्यू, प्रत्येक जखमेला मलम असतं, तसं प्रत्येक निष्ठेला गद्दारीचं कारण असतं. आणि असलं नसलं तरी पैसा कारण बनवून देतो की! रेडिमेड! हा ते पटवून घ्यायचं की नाही हे ज्या त्या अल्पसंतुष्टांनी ठरवावं!’ रमेश एकबाजूला बटणं दाबत टाइप करतोय.
‘थांब माझं लगेच कळंल त्याला! कसंय अर्ध्या, प्रत्येक निष्ठावान हा थोडा थोडा अल्पसंतुष्ट असतोच! फक्त त्याला संधी मिळालेली नसते म्हणून तो सात्त्विक निष्ठावान बनतो. आता आपला भाऊ? कट्टर निष्ठावान की! पण तिकीट दुसर्याला येतंय हे बघून भाऊनं टपकन उडी घेतलीच ना? हां निवडून आला नाही ही बात वेगळी! पण अलीकडं विचार आणि निष्ठा झटपट विकल्या जातात. टाकल्या जातात. बदलल्या जातात. त्यात काय?’ नम्या विचारवंत बनला.
‘पण याचा खर्च किती येत असेल रे? एक एकाला हॉटेलात ठेवायचा? आणि निवडणूक खर्चात कसा दाखवत असतील ते?’ अर्ध्याचे प्रश्न बाकी आहेत.
‘हा समोर सभामंडप दिसतो ना? सहा खांब, एक स्लॅब एक घुमट असलेला? हा पंधरा लाख खर्च करून बांधला आहे. तेवढ्यात गरीबाचे छान सुंदर घर होईल. आता हा टेंडरमध्ये, ऑडिटमध्ये बसला. याचंच उलट तिथं करायचं. राजकीय सी. ए. लाखाचे चार कोटी नि शंभर कोटीचे दहा लाख सहज दाखवू शकतात. ते ज्याला जमलं तो निष्कलंक राजकारणी!’ रमेशनं अर्धं काम आवरत उत्तर दिलं.
‘मग का रे? इथून पुढं मतदान करायच्या आधी सगळ्यांनी पाट्याचं तयार करून ठेवायला पाहिजे.’ अर्ध्याला काही सुचलं.
‘काय?’ रमेश आणि नम्या दोघांना एकाचवेळी प्रश्न पडला, अर्ध्या नेमक्या कुठल्या पाट्यांबद्दल बोलतो ते!
‘मतदार विक्री केंद्र :-
लोकप्रतिनिधी विक्री केंद्र :-
प्रशासकीय कर्मचारी विक्री केंद्र :-
पत्रकारिता विक्री केंद्र :-
न्यायपालिका विक्री केंद्र :-
असे विभागवार बोर्ड लावून हरेकाची किंमत लिहावी. येथे अल्प दरात सर्व लोकशाही घटक विकले जातील असा ठळक बोर्ड लावावा. म्हणजे कुणी कुणाला निष्ठा शिकवणार नाही. बरं होईल ना असं?’ अर्ध्यानं काही मुद्दे सुचवले.
‘त्यापेक्षा सरळ म्हण की, एपीएमसीप्रमाणे लोकशाही घटक विक्री कमिटी स्थापा नि येथे सगळे विकाऊ आहे असा फलक लावा. बरोबर ना?’ नम्यानं सोपं सुटसुटीत करून सांगितलं.
‘रमेश झालं का? अरे बनला का बायोडाटा? त्यात एक बदल कर.’ अर्ध्या एकाएकी उठून रमेशजवळ गेला. नम्या आणि रमेश त्याच्या बोलण्यानं बुचकळ्यात पडले. नेमकं हा आता बोलतो काय? ‘अरे खाली ओळ टाक, नवरा मुलगा विकाऊ आहे.’ त्याच्या बोलण्यासरशी नम्या अर्ध्याला हाणायला धावला.

