• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘गोट’ कोण? मेसी की रोनाल्डो?

प्रशांत केणी खेळियाड

marmik by marmik
July 2, 2026
in खेळियाड
0
‘गोट’ कोण? मेसी की रोनाल्डो?

‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रंगात आलीय; पण महानायकांपैकी सर्वश्रेष्ठ कोण? लिओनेल मेसी की क्रिस्टियानो रोनाल्डो? ही चढाओढ चर्चेत आहे. रोनाल्डोनं चाळीशी ओलांडलीय, तर मेसी उंबरठ्यावर आहे. निवृत्तीकडे झुकलेल्या या दोन अव्वल फुटबॉलपटूंपैकी कोण आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवणार? कोण जगज्जेतेपद पटकावणार?

 

लिओनेल मेसी श्रेष्ठ की क्रिस्टियानो रोनाल्डो? ‘गोट’ म्हणजेच ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ अर्थात सार्वकालिक सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण, हा प्रश्न निर्माण होताच जागतिक फुटबॉलचाहते दोन गटांत विभागले जातात. कारण दोघेही किमयागार फुटबॉलपटू. मेसी… प्रतिभेचं दैवी वरदान लाभलेला खेळाडू. अशक्य ते शक्य करून दाखवण्याचं कर्तृत्व असणारा हा खेळाडू; तर रोनाल्डो… अचाट क्षमता, अथक परिश्रम आणि अमर्याद महत्त्वाकांक्षेच्या जोरावर मोठा झालेला खेळाडू.

फुटबॉलक्षेत्रातील हे दोघेही महानायक, म्हणूनच ही सत्तास्पर्धा अपरिहार्य. मेसी १० क्रमांकाच्या जर्सीचं अमरत्व जपणारा असा पेले, दिएगो मॅरेडोनाचा वारसदार, तर रोनाल्डोनं ७ क्रमांकाला ओळख मिळवून दिली. जेम्स बाँडचा ००७ हा क्रमांक हे त्याचं मूळ असलं तरी ‘सीआर ७’ हे बिरुद त्यानं हिंमतीनं कमावलेलं आहे. गेली दोन दशकं हे महाद्ंवद्व औत्सुक्य निर्माण करत आलेलं आहे. मग अर्जेंटिना किंवा पोर्तुगाल यांची लढत असो, वा इंटर मायामी किंवा अल नासर यांचे सामने असोत. जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर म्हणजे ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अद्याप ही जुगलबंदी पाहायला मिळालेली नाही. परंतु यंदाचा विश्वचषक सुरू होताच पुन्हा सर्वोत्तम कोण? ही चर्चा चांगलीच रंगू लागलीय!

विश्वचषकात आतापर्यंत प्रत्येक संघाचे एक किंवा दोन सामने सहज झाले आहेत. अर्जेंटिनानं पहिल्याच सामन्यात अल्जेरियाचा ३-० असा धुव्वा उडवला. मेसीनं हॅट्ट्रिक लगावत आपण यंदा पुन्हा वर्चस्वपताका फडकावत ठेवणार, याची ग्वाही दिली. पण तिकडे पोर्तुगालला पहिल्याच सामन्यात डॉमिनिक रिपब्लिक ऑफ काँगोनं १-१ असं आश्चर्यकारकरीत्या बरोबरीत रोखलं. या सामन्यात रोनाल्डोची पाटी कोरी. त्याच्या पायाचा फक्त २५ वेळा चेंडूला स्पर्श झाला. पोर्तुगालच्या आघाडीच्या फळीत खेळणार्‍या आणि संघाकडून एकमेव गोल करणार्‍या योआनी विसानं रोनाल्डोपेक्षा १० वेळा अधिक पदस्पर्श केला. ७२व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या राफेल लिओनं १४ वेळा चेंडूला पदस्पर्श केला. त्यामुळेच रोनाल्डोची कामगिरी आक्रमकाच्या भूमिकेला अजिबात न्याय देणारी नव्हती. एकीकडे मेसीनं वैयक्तिक १६वा गोल करून ‘फिफा’ विश्वचषकातील सर्वाधिक गोल साकारणार्‍या जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोजच्या विक्रमाची बरोबरी साधलीच; शिवाय ब्राझीलच्या रोनाल्डोला (१५) मागे टाकले. पण क्रिस्टियानो रोनाल्डोच्या खात्यावर विश्वचषकात आतापर्यंत जमा आहेत फक्त ८ गोल. हे सर्व गोल त्यानं गटसाखळीत साकारलेले.

कतार येथे २०२२मध्ये झालेल्या विश्वचषकातील स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याला वगळण्यात आलं होतं आणि तो सामना पोर्तुगालनं ६-१ असा आरामात जिंकूनही दाखवला होता. रोनाल्डो संघात नाही, हे १४ वर्षांत प्रथमच घडलं होतं. त्यावेळी मैदानाबाहेर धुमसणारा रोनाल्डो सर्वांनी पाहिला. पुढे उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून हार पत्करल्यामुळे त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. त्या सामन्यातही या खेळाडूला ५१व्या मिनिटाला मैदानावर उतरवण्यात आलं होतं. यंदाही परिस्थिती बदललेली नाही. रोनाल्डोचं मोठेपण जपणं एवढंच पोर्तुगालच्या आवाक्यात दिसतंय. विश्वचषकात सर्वाधिक गोल नोंदवणार्‍या फुटबॉलपटूला दिल्या जाणार्‍या ‘गोल्डन बूट’ पुरस्काराच्या शर्यतीत मेसी अग्रेसर असला तरी प्रâान्सचा किलियन एम्बाप्पे, नॉर्वेचा एर्लिंग हॅलँड आणि इंग्लंडचा हॅरी केन हे गाजलेले खेळाडू टिकून आहेत. पण रोनाल्डो या यादीत स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे.

सध्याच्या पिढीतले ते दोघंही सर्वोत्तम फुटबॉलपटू. पण या दोघांपैकी सर्वश्रेष्ठ कोण? या संदर्भात तुलना विविध मापनश्रेणी वापरून होत असते. रोनाल्डोनं उत्तम शारीरिक क्षमता, गोल करण्याचं अद्भूत कौशल्य आणि वेगवेगळ्या लीगमधील प्रभावी कामगिरीमुळे नावलौकिक मिळवलाय. मेसीचं ड्रिब्लिंग, सामना पुढे नेण्याची क्षमता आणि गोल करण्याची अचूकता या तिन्ही गुणांच्या अनोख्या संगमासाठी कौतुक केले जातं. मेसी (४६) आणि रोनाल्डो (३५) ह्या दोघांनी मिळून एकूण ८१ स्पर्धा जिंकल्या आहेत. प्रत्येक हंगामात ५० गोलचा टप्पा दोघांनी लीलया ओलंडलाय. राष्ट्र आणि क्लबसाठी मिळून दोघांच्याही खात्यावर प्रत्येकी ९००हून अधिक गोल जमा आहेत. सखोलपणे पाहिल्यास रोनाल्डोनं १३२६ सामन्यांत ९७३ गोल झळकावलेत आणि २६१ गोलसहाय्य केलेत, तर मेसीनं ११५७ सामन्यांत ९१४ गोल नोंदवलेत आणि ४१४ गोल सहाय्य केलेत.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक १४३ गोल रोनाल्डोच्या खात्यावर असले, तरी या यादीत दुसर्‍या क्रमांकावर मेसी (१२० गोल) आहे. रोनाल्डो आणि मेसी यांनी अनुक्रमे ५ आणि ४ वेळा चॅम्पियन्स लीग जिंकलीय. प्रतिष्ठेचा बलून डीओर पुरस्कार मेसीनं ८ वेळा तर रोनाल्डोनं ५ वेळा जिंकलाय. रोनाल्डोनं एकदा युरोाfपयन अजिंक्यपद जेतेपद पटकावलंय; पण मेसीनं कोपा अमेरिकन चषकावर दोनदा वर्चस्व गाजवलंय. ‘इन्स्टाग्राम’वर रोनाल्डोचे ७० कोटी फॉलोवर्स आहेत, तर मेसीचे ५० कोटी. या व्यासपीठावरील सर्वाधिक ‘लाइक’ केलेलं छायाचित्र म्हणजे अर्जेंटिनानं उंचावलेला विश्वचषक. जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या क्रीडपटूंच्या ‘फोर्ब्स’च्या आर्थिक यादीत रोनाल्डो (३० कोटी डॉलर्स) सलग चौथ्या वर्षी अग्रस्थानी आहे, तर मेसी (१४ कोटी डॉलर्स) तिसर्‍या स्थानावर आहे. इतकंच नव्हे, क्रीडा साहित्यामधील दोन जागतिक दर्जाचे प्रतिस्पर्धी ब्रँड्सही त्यांच्या पाठीशी उभे आहेत. अ‍ॅडिडाससोबत मेस्सी, तर नायकीसोबत रोनाल्डो. रोनाल्डोला अनेकदा संतप्त किंवा आक्रमक स्वरूपात पाहिलंय, तर मेसी शांत, संयमी आणि मितभाषी. त्यांची ही भिन्न स्वभाववैशिष्ट्यं. पण तरीही ते लोकप्रिय. एकंदर गोलतुलनेत रोनाल्डो अग्रस्थानी; पण त्याचं हे यश एकट्याचं. मेसी गोलसहाय्य करण्यातही पटाईत.
सध्या रोनाल्डो ४१ वर्षांचा आहे, तर मेसी ३८ वर्षांचा. यंदा दोघंही सहाव्या विश्वचषकात उतरलेत. २००६मध्ये दोघंही पहिल्यांदा विश्वचषकात खेळले. त्यावेळी दोघांच्याही खात्यावर फक्त एकेक गोल जमा होता. तेव्हा पोर्तुगाल संघानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण रोनाल्डोला अद्याप आपल्या देशाला जेतेपद मिळवून देता आलेलं नाही. पण मेसीनं २०२२मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिलं होतं, तर २०१४मध्ये उपविजेतेपद. हाच रोनाल्डो आणि मेसी यांच्यातील फरक ठळकपणे स्पष्ट होतो.

आता या दोन्ही महानायकांची वयं निवृत्तीची. रोनाल्डोनं चाळीशी ओलांडल्यामुळे आणि कामगिरी अपेक्षेनुसार होत नसल्यानं थांबावं, अशी वस्तुस्थिती. कदाचित हा दोघांचा किंवा किमान रोनाल्डोचा अखेरचा विश्वचषक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण रोनाल्डोचं महेंद्रसिंह धोनीसारखं झालंय. जसं धोनी ‘आयपीएल’मध्ये असावा, चेन्नई सुपर किंग्जमध्ये असावा, ही चाहत्यांची इच्छा असते. मग २०२६चा अख्खा १९वा हंगाम त्याचं सरावाप्रसंगीचं मुखदर्शन क्रिकेटरसिकांनी अनुभवलं; पण तो प्रत्यक्षात मैदानावर उतरला नाही. धोनी यंदा खेळणार की नाही? हा प्रश्न गेली चार वर्षं तसाच; आताही अनुत्तरितच. रोनाल्डो हा महानायक, तो संघात हवाच. हा विचार मागील विश्वचषकाच्या उत्तरार्धात पोर्तुगालनं बदलायला सुरुवात केली होती. त्यावेळी फर्नांडो सांतोस पोर्तुगालचा मुख्य प्रशिक्षक होता. आताचा प्रशिक्षक रोबर्टो मार्टिनेझनं जाहीरपणे रोनाल्डोचं वय आणि क्षमता यांची पाठराखण केली होती. ‘संघाला गोल नोंदवण्याची आवश्यकता असताना जुन्या-जाणत्या सर्वोत्तम गोल करू शकणार्‍या खेळाडूला का वगळावं? यापेक्षा विजयवीर म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतोय आणि युवा खेळाडूंनाही त्याच्याकडून बरंच काही शिकता येईल,’ असं मार्टिनेझ म्हणाला होता. कदाचित यावेळी तरी रोनाल्डोनं विश्वविजेतेपदाची पूर्ती करावी आणि सन्मानानं निरोप द्यावा, अशी धारणा पोर्तुगालच्या धुरिणांची असावी.

क्रीडा क्षेत्रात यंदाचं वर्ष हे पुनरावृत्तीचं मानलं जात आहे. मार्चमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतानं ट्वेंटी-२० विश्वचषकाला पुन्हा गवसणी घातली. मग मे महिन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं सलग दुसर्‍यांदा ‘आयपीएल’ जेतेपदावर नाव कोरलं. आता तीच अपेक्षापूर्ती मेसीकडून होऊ शकते. म्हणजेच अर्जेंटिना विजेतेपद टिकवू शकतं. तूर्तास, आपण विश्वचषकाचा आनंद लुटूया. सरतेशेवटी महानायकांपैकी सर्वश्रेष्ठ कोण? मेसी की रोनाल्डो? हे स्पष्ट होईलच!

Previous Post

बेबंद ‘विकास’ वर्षावनांच्या मुळावर!

Next Post

विकाऊ

Next Post
विकाऊ

विकाऊ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.